ओळख

आपल्याला स्वयंपाक तसा आधीपासून येत असतो, पण भाताची पेज,नाचणीचं सत्व, मुगाचे कढण असे पदार्थ अस्तित्वात असतात हे समजतं, ते यांचा जन्म झाला की. सेरेलॅक, रव्याची खीर, दूधबिस्किटाचं बदगण, उकडून साखर घातलेलं सफरचंद, कुस्करलेलं तूपकेळं या फारसे कधी न महत्त्व दिलेले पदार्थ आपल्या आयुष्यात शिरकाव करतात, ते, ही रांगायला लागली की. दुधाचा पांढरा, चॉकलेटी, चहाच्या रंगाचं, डार्क चॉकलेटी, सायवालं, सायविरहित, गरम, कोमटच्या वर एक डिग्री, कोमट, गार, गोडगिच्च, गोड, किंचित गोड, अजिबात साखर नसलेलं, असे अगणित प्रकार असतात हे आधी कुठे माहीत असतं आपल्याला? हातावर घेऊन पदार्थ फार गरम गार नाही ना, हे याआधी कधी बघितलेलं असतं आपण? थेट खायला तर सुरवात केलेली असते. पण आता ते आवर्जून बघायची सवय लागते, ते यांना भाजू नये, गार लागू नये म्हणून.
भात कालवलेला असतो आपण याआधी कितीतरीवेळा, पण तो आसट शिजवून, गरमागरम असताना, वरण पातळ करून, भरपूर तूप घालून चांगला गुरगुटून एकजीव कालवण्याची एक वेगळीच रेसिपी आहे आणि त्याची चव जगातल्या सर्व पदार्थांमध्ये उजवी आहे समजतं, जेव्हा ही मुटुकमुटुक खायला लागतात तेव्हा. इवलूश्या पातेल्यांमध्ये वाडगाभर नाचणीची, गव्हाची खीर, मुगाची मऊ खिचडी कशी बनवायची? अशी तक्रार करणारे आपण, बिनधोक प्रमाण वगैरेचा विचार न करता ते पटापट बनवायला लागतो, जेव्हा ही भुकेने कांगावा करायला लागतात तेव्हा. सांडलेली दूधं, फुर्र करून उडवलेल्या खिरी, वाळून गारगुट्ट झालेले वरणभात, तूप लावलेले पोळीचे गार झालेले छोटे तुकडे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात ते यांनी खायला सुरुवात केली की. अळणी पदार्थ न आवडणारे आपण, मोठ्यांच्या भाजीमधे तिखट घालायच्या आधी भाजी आठवणीने वेगळी काढायला लागतो, ते यांना दात आले की! एकच भाजी काय ग सारखी सारखी करतेस? म्हणत आईच्या अंगावर करदावणाऱ्या आपण, भेंडीची भाजी आठवड्यातून तीन वेळा सुद्धा करायला तयार होतो, ते निव्वळ ही त्या दिवशी एकच्या ऐवजी दोन पोळ्या खातात म्हणून.
बाहेर जाताना आठवणीने एखादा लाडू, बिस्कीटचा पुडा, कालवलेल्या वरणभाताचा डबा पर्समधे ठेवायला लागतो, ते यांना मधेच भूक लागली तर काय म्हणून. रेसिपीजची पुस्तकं, यू ट्यूबची चलती, आया सासवांना पदार्थांवरून फोन व्हायला लागतात, ते यांना काही  विशिष्ट पदार्थ आवडतात म्हणून.    पदार्थानुसार आवर्जून जास्त दूध, तूप, खारीक, चीज, मेथीपूड, जवसपूड घालायला लागतो, ते ही मोठी होऊ लागली म्हणून. कितीही मोठी झाली तरी यांची आठवण काढल्याशिवाय आपल्याला जेवण जात नाही.  “आई, तुझ्या हाताला कश्याची सर नाही” हे वाक्य कितीही क्लिशे वाटलं तरी प्रत्येक वेळी अंगावर मूठभर मांस चढवतंच.
अन्नाची किती विविधप्रकारे ओळख करून देतात आपल्याला मुलं! त्यांचे खाण्यापिण्याचे नखरे सहन करताना कितीही रागावलो, चिडलो, करदावलो, हतबल झालो, तरी आपल्या मुलांना खाताना बघताना, खाऊ घालताना, त्यांना वाढताना बघतानाच्या आनंदाची तुलना कश्याशीही करता येत नाही हेच खरं. मातृत्वाचा किती उदोउदो करावा, त्याला किती महत्त्व द्यावं जे ज्याचं त्याने ठरवावं. कोणी सुगरण असो नसो, अगदी अन्नपूर्णा असो नसो, पण आपल्यातल्याच असलेल्या पण आपल्याला माहीत नसलेल्या व्यक्तीशी ओळख घडवतात आपली मुलं हे मात्र खरं..
Image by mohamed Hassan from Pixabay 
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

14 thoughts on “ओळख

  • September 26, 2019 at 2:39 am
    Permalink

    खूप गोड….

    Reply
    • February 5, 2020 at 9:20 am
      Permalink

      विसरले होते थोडी वर्षे मुली मोठ्या झाल्यावर. आज हे सगळे वाचून खूप खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझी लेक गाडीत भात भरवताना डब्याचे झाकण टाकून द्यायची हमखास. गोड लेख

      Reply
  • September 26, 2019 at 5:26 am
    Permalink

    sundar.. anubhawtye mi he atta

    Reply
    • September 27, 2019 at 3:56 am
      Permalink

      ❤️❤️❤️

      Reply
    • July 21, 2021 at 5:10 pm
      Permalink

      अगदी खरं…👌
      Experiencing the same now !

      Reply
  • September 26, 2019 at 10:35 am
    Permalink

    😍😍💕💕

    Reply
  • September 26, 2019 at 5:24 pm
    Permalink

    कित्ती मस्त!! 😊😊

    Reply
  • September 27, 2019 at 2:18 am
    Permalink

    अगदी खरं!

    Reply
  • September 27, 2019 at 7:22 am
    Permalink

    प्रत्येक आईच्या मनातलं ❤

    Reply
  • October 8, 2019 at 6:42 pm
    Permalink

    भारी लिहिलंय..!

    Reply
  • April 24, 2020 at 1:26 pm
    Permalink

    मस्त
    माझ्यातल्या वेगळ्याच ‘मी’ ला माझ्या मुलीने जन्माला घातलं आता माझी लेक आणि माझ्यातली नवीन ‘मी’ एकमेकांसोबत मोठ्या होत आहोत.
    खूप छान लिहिलं आहेत

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!