कॅनव्हास…(रंग पांढरा)
पूजाच्या घरी पांढऱ्या शुभ्र रिकाम्या कॅनव्हासकडे बघत वीणा स्वतःशीच हसली. फ्लॉवर प्लॉटमध्ये आजही पांढऱ्या गुलाबाची होती. फरक फक्त एव्हढाच की त्यासोबत आता गुलाबी, पिवळी फुलंही तेवढ्याच दिमाखात मिरवत होती. घराचे निळ्या रंगाचे पडदे फिक्कट पिवळ्या रंगासोबत अगदी उठून दिसत होते. डायनिंग टेबलावरच्या काचेच्या भांड्यात मात्र फक्त मोगऱ्याची फुलेच दिसत होती. वीणा मनोमन हसली गेल्या तीन वर्षात हळूहळू पूजा जगायला शिकत होती नव्हे जगायला शिकली होती. तिला आठवली सात वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात आलेली पूजा!
सात वर्षांपूर्वी वीणाने जेव्हा नव्यानेच ऑफिस जॉईन केलं तेव्हा तिच्यासमोर अनेक समस्या होत्या. मुळातच ती तशी बोल्ड आणि सुंदर, त्यात घटस्फोटित. ती एकटीच राहत होती. साहजिकच तिच्यामागे लाळ घोळवत फिरणाऱ्यांची कमी नव्हती. शेजारी पाजारी, ऑफिसमध्ये अनेक ‘चान्स’ मारणारे पुरुष तिच्या अवती भोवती फिरत असत. पण वीणा मात्र सगळ्यांना पुरून उरत होती. तिच्यावर जळणाऱ्या बायकांचीही काही कमी नव्हती. ऑफिसमध्ये तर ती बायकांच्या हिटलिस्टवरच. अपवाद फक्त पूजाचा! पूजा तिच्याशी छान वागत असे.
पूजा म्हणजे तिच्यासाठी एक मोठं कोडं होतं. ती नक्की कशी आहे किंवा ती जशी आहे तशी का आहे, हेच वीणाला समजत नव्हतं. पूजा नेहमीच पांढऱ्या रंगाचे कपडे घालायची. दागिने हा प्रकार तिने कधीच वापरला नाही. मेकअप या प्रकाराशी तिचा दुरान्वयेही संबंध नव्हता. पांढरा ड्रेस, पांढरी पर्स, केसांचा तेल लावून चापूनचोपून बसवलेली एक वेणी. पायात साधीशी चप्पल. ऑफिसला वेळेत यायची. लवकर जायला मिळालं तरीही आनंद नाही जास्त वेळ थांबायला लागलं तरीही चेहऱ्यावर तेच निर्विकार भाव. कधी कोणाशी कामाव्यतिरिक्त बोलणं नाही की गॉसिपिंग नाही. ‘आपलं काम बरं की आपण बरं’ या तत्वाने वागणारी. पण एक प्रसंग असा घडला की पूजा आणि वीणा खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या.
त्या दिवशी ऑफिसमध्ये बदली होऊन आलेला एक अधिकारी पुजाशी अश्लील भाषेत बोलून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी वीणा तिथेच होती. तिने कसलाही विचार न करता त्याच्या खाड्कन एक कानाखाली मारली. या माणसाची पोच अगदी वरपर्यंत होती. पण वीणाने हार मनाली नाही. तिने ऑफिसमधल्या सगळ्या बायकांच्या सह्या घेऊन हेड ऑफिसला एक अर्ज पाठवून दिला. पूजाबद्दल ऑफिसमध्ये कोणाचंच वाईट मत नव्हतं, त्यामुळे ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफने वीणा आणि पूजाला साथ दिली. अखेर त्याची बदली इतरत्र करण्यात आली. या सगळ्या प्रसंगात पूजा आणि वीणामध्ये खूप छान मैत्री झाली.
पूजा कॉलेजच्या सेकंड इअरला असताना तिचं लग्न ठरलं. तिच्या सासूला ती अजिबात पसंत नव्हती. पण घरातल्या सर्वानी आणि मुख्य म्हणजे पूजाच्या नवऱ्यानेही तिलाच पसंत केल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. सुरुवातीपासून त्या पूजाचा राग राग राग करायच्या. त्यात भरीस भर म्हणून पूजाने शिक्षण पूर्ण करायची इच्छा बोलून दाखवल्यावर तिच्या सासऱ्यांनी तिला लगोलग परवानगीही दिली. सासू वाईट असली तरी घरातली इतर माणसे खूप चांगली होती. मोठी जाऊ तर बहिणीसारखीच वागायची तिच्याशी. तिचा आठ वर्षांचा पुतण्या राजू मात्र आजीच्या शिकवणीनुसार सतत तिला त्रास द्यायचा. पूजा ग्रॅज्युएट झाली त्यादिवशी सेलिब्रेशनसाठी सगळ्यांनी बाहेर फिरायला जायचं ठरलं. सासूने नकार दिला. त्यामुळे तिला ठेवूनच बाकी सगळी गाडी घेऊन फिरायला गेली. पण दुर्दैवाने इथेही तिची पाठ सोडली नाही. त्यांच्या गाडीला खूप मोठा अपघात झाला. पूजाला काहीच झालं नाही पण बाकी सगळ्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला. तिचा पुतण्या त्यादिवशी त्याच्या मामाच्या घरी गेला असल्यामुळे तो मात्र वाचला होता. मरताना पूजाच्या जावेने तिच्याकडून राजूला आणि घराला सांभाळायचं वचन घेतलं होतं. या आकस्मिक घटनेनंतर पूजा कोलमडून गेली होती. त्यात तिच्या सासूने सगळा दोष तिच्या माथ्यावर मारला होता. तिला मिळालेले विम्याचे पैसेही सासूने जबरदस्तीने काढून घेतले. खरंतर हे पैसे मिळाल्यावर पूजाला घरातून हाकलून द्यायचाच प्लॅन होता त्यांचा पण पूजाच्या सुदैवाने नात्यातल्या काही सज्जन माणसांनी खटपट करून तिला तिच्या नवऱ्याच्या कंपनीमध्ये नोकरी मिळवून दिली.
त्यांनतर घरातली कामं, ऑफिस, राजूचं संगोपन या सगळ्यामध्येच तिने स्वतःला गुंतवून घेतलं. दिवसभर राब राब राबून तिच्या पदरी फक्त अपमानच पडत होता. पूजा चित्र खूप छान काढायची. तिच्या नवऱ्याने तिला चित्रकलेसाठीचं सगळं सामान वाढदिवसाला भेट म्हणून दिलं होतं. पण सासूने दुष्टपणा करून ते सगळं सामान तिच्याजवळून हिसकावून घेतलं. पण कॅनव्हास स्टँडला मात्र पूजाने हात लावू दिला नाही. तसंही तो पांढरा आहे, असा युक्तिवाद करून पूजाने तो रिकामा कॅनव्हास आपल्याच खोलीत ठेवला. जी तिची माणसं होती, ती तिला सोडून गेली होती आणि जाताना मात्र तिचा राग करणाऱ्या दोन व्यक्तींची जबाबदारी तिच्यावर टाकून गेली होती. सासूने अनेक बंधनं घातली होती तिच्यावर. विधवेने पांढरे कपडेच घालायचे. कुठल्याही शुभ कार्यात जायचं नाही, एक ना अनेक. तिच्या माहेरी अठरा विश्व दाळीद्रय, त्यात कजाग वाहिनी त्यामुळे आई वडिलंनीही तिला घरी परत नेण्याचा विचार केला नाही. आणि केला असता तरी पूजा आपलं वचन पाळण्यासाठी सासरीच राहिली असती. गेली दहा वर्ष ती हेच सहन करत होती. रोज घरातली कामं मग ऑफिस त्यानंतर घरी गेल्यावर पुन्हा काम. सुरुवातीचे काही महिने तर, तिची सासू तिचा सगळा पगार स्वतःच्या ताब्यात ठेवत असे.कारण पूजाला ती नोकरी तिच्या मुलामुळे मिळाली होती. पण काही वर्षांनी मात्र पूजाच्या हितचिंतकांनी तिला समजावलं. त्यानंतर मात्र पगाराचे पैसे पुजाने आपल्याच बँक खात्यात ठेवले. सासूने खूप तमाशे केले पण पूजा ठाम होती. याचा परिणाम म्हणजे सासूचा छळ अजूनच वाढला.पण पूजा सगळं सहन करत काही न बोलता शांतपणे आपलं काम करीत राहायची.
पूजाची कहाणी ऐकून वीणाला वाईट वाटलं. तिने पूजाला वेगळं राहण्यासाठी समजवायचा खूप प्रयत्न केला पण पूजा आपल्या निर्णयावर ठाम होती.
वीणामुळे पूजाला एक हक्काचा खांदा मिळाला होता. तिच्यामुळे ती काही क्षण तरी वेगळं जग अनुभवायला लागली होती. तिच्या आयुष्याच्या पांढऱ्या कॅनव्हासवर तात्पुरते का होईना पण रंगीत शिंतोडे उडत होते. वीणासोबतचं शॉपिंग, त्यानिमित्ताने खाल्लेली पाणीपुरी, बघितलेला सिनेमा या सगळ्या गोष्टी पूजाला नवसंजीवनी देत होत्या. गेल्या दहा वर्षात आयुष्यातून हरवून गेलेल्या क्षणांना ती पुन्हा जगत होती. बघता बघता चार वर्ष झाली. पण नशिबाला तिचा आनंदच मंजूर नव्हता. वीणाची बदली झाली. पूजा हमसून हमसून रडली. पण वीणा मात्र स्तब्ध होती.
सेंड ऑफच्या दिवशी ती पूजाला म्हणाली, “पूजा आपला मान आपणच राखायचा असतो. माझ्या नवऱ्याने दुसऱ्या स्त्री साठी मला बाहेर काढलं तेव्हा मी ही कोलमडले होते. पण त्याला सहजासहजी घटस्फोट मिळू दिला नाही मी. त्या बदल्यात माझ्या स्वप्नातलं घर हिसकावून घेतलं त्याच्याकडून. पण ज्याच्यासोबत त्या घरात राहायचं, तोच कोणा दुसरीचा झाला होता. त्यामुळे मी त्या फ्लॅटमध्ये कधीच राहिले नाही. पण माझ्या सुखचित्रामध्ये कोणा दुसऱ्याचे रंगही भरू दिले नाहीत मी. ही माझ्या फ्लॅटची किल्ली. आपल्या मैत्रीची भेट. हे गिफ्ट डीडचे पेपर. मी या शहरात नसले तरी नेहमी तुझ्यासोबत असेन, कसलीही गरज लागली तर कळव मला. अजून एक ही बदली मी स्वतःहून करून घेतली आहे.”
वीणाचं बोलणं ऐकून पूजाला धक्का बसला. “काय बोलतेस तू हे? तू स्वतःहून?…आणि याफ्लॅटच्या किल्ल्या, हे गिफ्ट डिड हे सगळं का केलंस? कशासाठी?”
“मला तुला जगताना बघायचं आहे पूजा. कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांमध्ये रंग भरताना बघायचं आहे. पण तू रंग बघितलेस नाहीस तर रंगवशील काय आणि कसं? कधीकधी दुःखाची जाणीव व्हायलाही कधीकधी नवीन दुःख आयुष्यात यावं लागतं. त्या फ्लॅटमध्ये पडद्यांपासून फ्लॉवर प्लॉटमधल्या फुलांपर्यत सगळंच पांढरं आहे. आपल्या पुढच्या भेटीच्या वेळी मला त्यात रंग भरलेले दिसायला हवे आहेत.” वीणा
पूजा उदास होती. पण तिच्या मनात सतत वीणाचे शब्द घोळत होते…. “आपला मान आपणच राखायचा असतो.” ती घरी गेली तेव्हा तिची सासू नेहमीप्रमाणेच डेली सोप बघत होती. पुतण्या सोफ्यावर लोळत मोबाईलवर गेम खेळात मग्न होता. पूजाला खूपच एकाकी वाटत होतं.
पूजा आला दिवस ढकलत होती. पण अखेर तो दिवस आला. त्या दिवशी राजूचा इंजिनिअरिंगचा रिझल्ट होता. राजू घरी आल्यावर पुजाने त्याला रिझल्टविषयी विचारल्यावर त्याने निर्लज्जपणे नापास झाल्याचं सांगितलं. हे ऐकून पूजाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने खाड्कन त्याच्या एक मुस्काटात मारली. यावर सासू मोठया आवाजात तिच्यावर गरजली. पण पूजाचा आवाज मात्र तिच्याही वर गेला होता. खूप वादावादी झाली आणि पूजाच्या संयमाचा बांध अखेर तुटला. आपली पर्स उचलून ती तडक घरातून निघाली. जायचं कुठे हा प्रश्न होता. तिला विणाची प्रचंड आठवण येत होती. त्याचवेळी तिला पर्समध्ये असणाऱ्या आणि वीणाच्या फ्लॅटच्या किल्ल्यांची आठवण झाली.आणि पूजा त्या फ्लॅटवर राहायला गेली. काही दिवसांनी पूजाची सासू तिच्या ऑफिसमध्ये तिला भेटायला अली होती. तेव्हा महिन्याला १५००० रुपये देत जाईन. पुन्हा मला भेटायला यायचं नाही असं सांगून पूजाने तिला निघून जायला सांगितलं. अर्थात तिलाही पूजाच्या पैशांमध्येच रस होता.
एकटं राहायला लागल्यावर पूजा खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकली. ती घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्या या निर्णयाबद्दल फक्त वीणाला मेसेज करून कळवलं होतं. पूजाने वीणाला एक दोन वेळा फोनही केला पण वीणाने उचलला नाही. आणि तिला पुन्हा कॉल बॅकही केला नाही.
त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पूजा घरी आली. समोर वीणाला बघून तिला आनंदमिश्रित आश्चर्य वाटले. धावत जाऊन तिने वीणाला मिठी मारली. आज तीन वर्षांनंतर दोघी भेटत होत्या.
“पूजा मला माफ कर मी तुला माझ्यापासून दूर केलं. पण तुला तुझ्या स्वतःच्या जवळ आणण्यासाठी हे आवश्यक होतं.” वीणा
“काही बोलू नको वीणा. मला माहिती आहे तू माझ्या बाबतीत कधी चुकीचं वागणार नाहीस. गेल्या तीन वर्षात मी जगायला शिकलेय. बघ माझ्याकडे.आज तुला वेगळीच पूजा दिसत असेल.” पूजा.
तिचा फिक्कट गुलाबी रंगाचा ड्रेस, हलकासा मेकअप आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, पूजाला बघून वीणाला खूप आनंद झाला. दोघींनी खूप गप्पा मारल्या.
“पूजा बाकी सगळं बदललंस पण ही फुलं आणि हा पांढरा कॅनव्हास? हा अजूनही रिकामाच कसा?” वीणा
“ सांगते सगळं सांगते. डायनींग टेबलवरच्या काचेच्या भांड्यात नेहमी मोगऱ्याचीच फुलं राहतील कारण त्या फुलांच्या सुगंधाने माझ्या नवऱ्यासोबत आयुष्यातले सोनेरी क्षण दिले आहेत मला. फ्लॉवर पॉटमध्ये एकतरी पांढरे गुलाबाचे फुल राहील कारण त्यामुळेच बाकीचे रंग उठून दिसतात.मी घरातून बाहेर पडल्यावर फक्त एकदाच घरी गेले हा कॅनव्हास आणायला. पण मी ठरवलं होतं त्याच्यावर चित्र तेव्हाच रेखाटेन जेव्हा तू माझ्या आयुष्यात परत येशील. आज माझ्या आयुष्याच्या कॅनव्हासवर नव्याने चित्र रेखाटणार आहे मी, आपल्या मैत्रीचं!
आयुष्याचा कॅनव्हास नेहमी रिकामा आणि पांढराच असतो. म्हणूनच तर त्यावर कोणतंही चित्र रेखाटता येतं आणि त्यात आपल्याला आवडणारे सगळेच रंग भरता येतात.-
लेखिका- मानसी जोशी
Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
क्या बात है …..
Khup mast…
सुंदर 👌👌
आपला मान आपणच राखावा हे मात्र अगदी खर.उगाच आयुष्यात अशा लोकांसाठी त्याग वैगरे करु नये ज्या लोकांना आपली कींमत नसते. 👍☺️
आपला मान आपणच राखावा हे मात्र अगदी खर.उगाच आयुष्यात अशा लोकांसाठी त्याग वैगरे करु नये ज्या लोकांना आपली कींमत नसते. 👍
वाचायला आवडेल,
मस्त
Superb
👌
अप्रतिम !!👌👌 मनमोहक canvas!!!
खूप सुंदर..!!❤️
आपला मान आपणच राखावा हे मात्र अगदी खर.उगाच आयुष्यात अशा लोकांसाठी त्याग वैगरे करु नये ज्या लोकांना आपली कींमत नसते. 👍😊
मस्तच👌🏻
खूप छान
खूप छान
आपला मान आपण च राखावा ,,👌👌👌 खूपच सुरेख शिकवण आणि कथा तर एकदम मस्त
Khup chan
wa