अतर्क्य  (भाग 6/7)

इन्स्पेक्टर  वीरेंद्र  प्रधान.
तरूण तडफदार प्रामाणिक.
तितकाच अभ्यासू.
मानसशास्त्राचा पदवीधर.
गुन्हेगारांचं मानसशास्त्र  समजून घेताना तो स्वतःला त्यांच्या जागी ठेवायचा.
त्यांच्या जागी , त्या वेळी,  त्या ठिकाणी  मी असतो तर ?
तो तसा विचार करू लागला की जणू निर्जीव साक्षीपुरावे त्याच्याशी जिवंत होवून बोलू लागत.
परिस्थितीजन्य पुरावा ही त्याची स्ट्रेन्ग्थ.
फार बारकाईने  तपास करायचा.
सहसा त्याच्या नजरेतून काही सुटत नसे.
फोरेन्सिकवाल्यांची त्याला सुयोग्य  मदत मिळे.
त्याची ती भेदक नजर.
समोरच्याच्या अंतरंगाची सहज ठाव घेणारी.
दमदार ,आत्मविश्वासी आवाज.
अगदी कसलेला सराईत गुन्हेगारही पोपटासारखा बोलू लागे.
जास्तीत  जास्त  गुन्ह्यांची ऊकल करण्याचं रेकॉर्ड  वीरेंद्र  प्रधानच्या नावावर होतं.
इन्स्पेक्टर  प्रधान  होमवर्क  करू लागले.
गुढीपाडव्याच्या  दिवशी सकाळी  साडेसात वाजता ते स्पाॅटवर  पोचले होते.
पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून जगनशेटची बाॅडी खाली आलेली.
जमिनीवर  ऊताणी पडलेली.
खाली वाळलेला रक्ताचा सडा.
त्या तोतर्या कंपाऊंडरने खबर दिली अन् पोलिस  स्पाॅटवर पोचले.
एकतर जगनशेटला मागून कुणी तरी धक्का दिला किंवा  त्यांनी स्वतःहून ऊडी मारली.
खून की आत्महत्या ?
इन्स्पेक्टर प्रधानांनी आजूबाजूचा परिसर  घारीच्या नजरेनं चाळायला सुरवात केली.
हवेलीच्या जुन्या लाकडी जिन्यावरच्या पावलांचे ठसे तपासले.
बाॅडीपासून जवळच छत्रीचं यु शेपवालं मोडकं छत्रीचं हॅन्डल  मिळालं.
 जगनशेटच्या अंगावर धोतर अन् मलमलचा काॅलरवाला कुर्ता.
कुर्त्याची काॅलर फाटलेली.
कुणी तरी गचांडी पकडल्यासारखी.
जगनशेटच्या खोलीचा तपास .
कोपर्यात हाफ चहाचा न ऊष्टावलेला कप.
टेबलवर शिवापूरच्या जमिनीचे कागजात.
दस्तखत न केलेले.
रविवार पेठेतल्या “Her”नावाच्या बुटिकची निमंत्रणपत्रिका.
दुसर्या खिडकीत एक सिरींज आणि  ईन्शुलीनची छोटी बाटली.
पण त्या रात्री  शेटनं ईन्जेक्शन घेतलेलं दिसत नव्हतं.
होमवर्क झाला.
फोरेन्सिकवाल्यांचा रिपोर्ट  आला.
जिन्यावर रफीकच्या पुरानी स्लीपरचे ठसे.
डाॅ. वर्माच्या लेदर शूजचे ठसे.
मनसुखलालच्या कोल्हापूरी चपलांचे ठसे.
अन् त्या तोतर्या कंपाऊंडरच्या अनवाणी  पायांचे ठसे.
पाच पाच संशयित .
खरा अपराधी कोण ?
इन्स्पेक्टर  प्रधानांनी  कडक चहा मागवला.
खुर्चीत रेलता रेलता एकेकाची कुंडली मांडायला सुरवात केली.
रफीक.
रफीक सहा महिने आतच होता.
आत्ताच बाहेर आलेला.
बंदी असलेला गुटखा विकत होता साला.
त्या दिवशी पहाटे  चारच्या सुमारास  तो चहा घेवून जगनशेटकडे पोचला.
खरं तर एरवी त्याचा पोर्याच जातो.
पण यावेळी  हा स्वतःच गेला.
तो सोमवार होता.
गंजपेठ बंद असते.
गिर्हाईक कुणीच नव्हतं
पाचच मिनिटात  परत आला.
जगनशेटनं आपल्याला समजुतीच्या चार गोष्टी  सांगितल्या.
मुझे भी ऊनपें गुस्सा  नही आया.
मैं बदल गया हूँ.
ऊलट दुधाची एजन्सी  घेण्यासाठी  जगनशेट मला भांडवल देणार होते.
मै ऊनका खून किस वास्ते करू ?
रफीक पाचच मिनिटात  परत आला.
येताना खुषीसे सिटी बजाते बजाते आया था.
असं त्याचा कामवाल्या पोर्या सांगतो.
पण दोन महिन्यांपूर्वी  साहेर आल्यावर त्याने जगनशेटला ‘तुम्हारा हिसाब पूरा कर दूँगा’ अशी जाहीर धमकी दिलेली.
त्याच्या पुरानी स्लीपरचे ठसे जिन्यावर होतेच.
क्या रफीक  सच में बदल गया था ?
या फिर ऊसनें अपना पुराना हिसाब चुकता किया था ?
मनसुखलाल.
मनसुखलालचं बापाशी फाटलेलं.
तसे त्याचे काही गैरकानूनी व्यवहार नव्हते.
आय.टी. डिपार्टमेंटची नोटीस आलेली.
त्याविषयी त्याच्या सी.ए.नी सांगितलं तसं तो वागला.
काही टॅक्स  भरलाही.
तुरडाळीचा  माल भरायचा होता.
त्यासाठी खेड शिवापूरची जमीन विकावी म्हणून तो बापाच्या मागे लागलेला.
त्या दिवशी गोडावूनमधी ट्रक खाली होणार होता.
तो पहाटेच तयार झाला.
चारच्या सुमारास तो बापाच्या खोलीत.
बापाशी वादंग.
जगनशेटनं दस्तखत करायला दिलेला नकार. चिडून दाणदाण पाय आपटत तो जिना ऊतरला.
त्याच्या कोल्हापूरी  चपलेचे ठसे जिन्यावर.
बाईकवरून दोन किलोमीटरवर गोडावूनमधी  गेला.
साडेचारच्या सुमारास तो तिथं पोचल्याचं वाॅचमन सांगतो.
पैशासाठी मनसुख आपल्या बापाचा मर्डर करेल ?
या फिर मनसुख खरं बोलत होता.
डाॅ. वर्मा.
पहाटे चारचा सुमार.
यावेळी  कधी डाॅ.वर्मा गंजपेठेत आले नव्हते. .
पण तरीही  त्या दिवशी ते दबक्या पावलांनी जिना चढताना रफिकच्या चायवाल्या पोर्याला दिसले.
डाॅ. वर्मा  एकदम पुचाट.
इन्स्पेक्टर  प्रधानांनी  जरा आवाज चढवला अन् ढेपाळले.
हो मी तिथे गेलो होतो.
मी घाबरलेलो.
आदल्या  दिवशी  मी जगनशेटला ती स्पेशल डोसवाली बाॅटल दिलेली.
पण डोस चुकला तर ?
जगनशेट  पहाटे चहानंतर ईन्शुलीनचा डोस घेतात , मला माहीत होतं.
रफिकचा पोर्या चहा घेवून  यायचा होता.
मी पटकन्  वरती गेलो.
जगनशेट टेबलाशी  काही  तरी वाचत बसलेले.
मी खिडकीतून हात घालून  बाॅटल बदलली आणि  परत फिरलो.
परत येताना रफिक मला जिन्यातच दिसला.
मी लगेच माझ्या क्वार्टर्समध्ये गेलो.
जगनशेट बडी आसामी होती.
ऊन्हें कुछ हो जाता तों मैं फँस जाता.
म्हणून मी बाॅटल बदलली.
डाॅ. वर्मांनी ती स्पेशल डोसवाली बाॅटल प्रधानांना दिली.
क्या डाॅ. वर्मा सच बोल रहे थे ?
तशा स्पेशल  डोसवाल्या एकापेक्षा  जास्त बाॅटल त्यांच्याकडे होत्या ?
आपल्यावर संशय येवू नये म्हणून त्यांनी बाॅटल बदलली  ?
असं होवू शकतं खरं……….
कंपाऊंडर
तो तोतरा कंपाऊंडर.
प्रधांनापुढे आला अन् त्याची जीभ अजून तोतरी झाली.
सकाळी  सात वाजता धप्पकन आवाज आला.
मी पळालो.
बघितलं तर जगनशेटची बाॅडी  खाली जमिनीवर.
हो मी चारच्या सुमारास जगनशेटकडे गेलेलो.
रोजच जातो.
त्यांना ईन्शुलीनचं ईन्जेक्शन  द्यायला.
जगनशेट कुठलीतरी निमंत्रण पत्रिका  वाचत होते.
मला म्हणाले तू सहा वाजता ये.
मी कामात आहे.
चेहरा रडवेला वाटत होता त्यांचा.
मग मी परत आलो.
माझ्या  छत्रीचंच हॅन्डल  आहे ते.
 तीन दिवसांपूर्वीच तुटलेलं.
मीच फेकलं होतं अंगणात.
बाकी मला काही माहित नाही.
एवढं सांगताना सुद्धा  तो घामेघूम झालेला.
बहुधा तो खरं बोलत असावा.
इन्स्पेक्टर  प्रधानांना तरी तसं वाटलं.
कदाचित  आयुष्यात  पहिल्यांदा  प्रधानसाहेब माणूस वाचताना चुकले की काय ?
रामजाने.
सलोनी.
हो मी गेले होते.
चारच्या सुमारास बाबूजींच्या खोलीत.
आदल्या  दिवशी  रात्रीच मी निमंत्रण पत्रिका  त्यांच्या टेबलवर ठेवली होती.
मी गेले तेव्हा ते तीच पत्रिका वाचत होते.
मला बघताच ते रागावले.
पण काहीच बोलले नाहीत.
मी ऊद्घाटनाला येणार नाही.
एवढंच म्हणाले.
त्यांच्या डोळ्यात अश्रू  बघून मला पण खूप वाईट  वाटलं.
मनसुख आल्यावर ठरवू काय करायचं ते.
मी माझ्या खोलीत परत जायला निघाले.
जाताजाता बाबूजींच्या टेबलाचा कोपरा माझ्या मनगटावर जोरात घासला गेला.
सालटं निघालं अगदी.
मी तशीच वेदनेनं आणि  रागानं विव्हळत खोलीत परत गेले.
टेबलाच्या कोपर्याशी घासल्याच्या खुणा काही दिसल्या नाहीत.
सलोनी खोटं बोलते आहे.
कदाचित  तिनेच तर…
जगनशेट.
हो.
 प्रधानांनी जगनशेटचीही कुंडली काढली.
डाळींचे प्रसिद्ध  व्यापारी.
त्यांची पत्नी ,मनसुख लहान असतानाच वारलेली.
केसरबाई  प्रकरण त्यांच्या आयुष्यात  पंचवीस वर्षे  टिकलेलं.
आता तेही नुकतंच संपलेलं.
रंगीन जिंदगी रंगहीन झालेली.
वयाच्या पंचावन्न्व्या वर्षी ते आता देवधर्माच्या मागे लागलेले.
भरपूर पैसा कमवला.
आता भरपूर दानधर्मही करत होते.
नुकतीच गावातल्या एका शाळेला पत्नीच्या नावे दहा लाखांची देणगी दिलेली.
या वयात त्यांना फारसे कुणी शत्रु असावेत असं वाटत नव्हतं.
मग त्यांचा खून कुणी का करावा?
आत्महत्या तरी का करावी ?.
तेवढ्यात पी.एम. रिपोर्ट  आला.
मृत्युचे कारण हार्ट अॅटॅक.
मृत्यु पहाटे चारच्या सुमारास.
अनामिक  भितीच्या छायेत जगनशेटला हार्ट अॅटॅक आलेला.
तोल जावून किंवा नेमका त्याच वेळी  त्यांना मागून धक्का  दिलेला.
सात वाजता खून झाला असं सगळे  खोटंच सांगत आहेत.
इन्स्पेक्टर  प्रधान कनफ्युजले.
अपराधी कोण ?.
फाईल ऊद्या  क्लोज होणारच.
तोवर तुम्ही  विचार करा.
कोण असेल . ?
  (क्रमशः)
Image by Gerd Altmann from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

3 thoughts on “अतर्क्य  (भाग 6/7)

  • October 14, 2019 at 9:40 am
    Permalink

    खूपच interesting…..लवकर टाका शेवटचा भाग

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!