जिमबॅग
बऱ्याच ठिकाणी चौकशी करून, एक दोघींकडे नीट विचारपूस करून, आपल्या वेळापत्रकात परफेक्ट बसेल अशी वेळ पाहून तिने शेवटी प्रयत्नांती, एकदाचं जिम जॉईन केलं. खरंतर पोहायला शिकावं, ही तिची अनेक दिवसांची इच्छा होती. पण तिच्या वेळेत, म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात, या वेळेतली कोणतीही बॅच तिला सापडेना. अगदी या जिमशेजारच्या स्विमिंग क्लबची देखील नाही. कुछ नहीं तो जिमही सही म्हणत तिने जिमचे पैसे भरून टाकले. स्वतःसाठी दिवसातला एक तास बाजूला काढणं हे किती मोठं दिव्य असू शकतं, हे तिला परत एकदा कळून चुकलं. घराजवळच, फार हायफाय नाही, अगदी साधंसं, नेटकं जिम होतं ते, पण तिच्यासाठी परफेक्ट होतं. आता मागे वळून पहायचं नाही. फिट रहायचं, स्वतःकडे लक्ष द्यायचं, वजन आटोक्यात ठेवायचं, घरापासून, रोजच्या कलकलाटापासून चार घटका दूर रहायचं, “मी टाइम” की काय त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा, हा आणि इतकाच अजेंडा तिच्या डोक्यात घोळत होता.
जिम व्यवस्थित सुरू झालं. वर्कआऊट नंतर येणारा घाम, तो हलकं वाटत असल्याचा अनुभव, तिच्या आवडीचा झाला, इन्स्ट्रक्टरचा आवाज, तिचा ओरडा, तिने वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन, सारं सारं तिच्या आयुष्याचा एक छोटासा आणि छानसा भाग होऊन गेले. घरच्यांनाही “तो एक तास” ती घरी नसण्याची सवय झाली. काहीही झालं, तिकडे जगाला आग लागली तरी जिम बुडवायचं नाही हे तिने मनावर ठसवलं. कधी काही कारणाने जायला जमायचं नाही, तेव्हा तिचा जीव चरफडायचा. व्यसन (पण चांगलं) म्हणजे काय असतं हे तिला हळूहळू समजू लागलं होतं.
जिम म्हणलं की जिमबॅग आलीच. तिला पहिल्यापासून या जिमबॅग्स अतिशय आकर्षक वाटायच्या. कसल्या टेचात येतात इथल्या बायका! छान फिट होणारं स्पोर्ट्स वेयर, स्पोर्ट्स शूज, डोक्याला बँड लावून हाय पोनीमध्ये बांधलेले केस आणि एका खांद्यावर घेतलेली ती डमरू जिमबॅग. कुठल्याही अलंकाराविना स्त्रीचं हे रूपही किती आकर्षक दिसू शकतं हा विचार तिच्या मनात डोकावल्याशिवाय रहायचा नाही.
हे जिमबॅग प्रकरण तिला परवडणाऱ्यातलं नव्हतं असं काही नव्हतं, पण तिची अडचण वेगळीच होती. आजपर्यंत तिने विविध किस्से ऐकले होते. “जिमचे सगळे कपडे नवीन विकत घेतले आणि दुसऱ्या दिवशी समजलं मी प्रेग्नन्ट आहे. मग काय, सगळा आनंदच! डिस्काउंटमध्ये मिळाली म्हणून जिमची मेंबरशीप घेतली आणि दुसऱ्या दिवसापासून जिमला गेलेच नाही. अजिबात जमलंच नाही! जिमसाठी म्हणून नवे कोरे करकरीत शूज घेतले आणि पाय मुरगाळून घरी बसलो.” हे ऐकल्यापासून तिने धसकाच घेतला होता. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ येईल म्हणून जिमबॅग घ्यायचा प्लॅनच तिने कॅन्सल केला. ती बॅग घेतली रे घेतली की आपलं जिम बंद पडणार याची तिला खात्री वाटू लागली. एक जुनी, वापरलेली कॅरीबॅग घेऊन ती जिमला यायची. कधीकधी तर वाटेत थेट भाजी, सामान घेऊन ती बॅग आणि शूजवाली कॅरीबॅग असं एकत्र घेऊन ती जिमला जायची. अश्या पिशव्या घेऊन जिमला येणारी ती एकटीच असेल. मैत्रिणी हसायच्या, म्हणायच्या, “सोने, ही कसली जुनाट कॅरीबॅग वापरतेस ग? वाढदिवस कधी आहे ते सांग, तुला एक मस्त जिमबॅग घेऊन देतो.” ती घाबरून नको म्हणायची. एकदा का जिमबॅग आली, की आपलं जिम बंद पडणार याची खात्री होती तिला. अंधश्रद्धाच खरंतर. मैत्रिणी हे ऐकल्यावर हसायच्या. पण तिने मनाचा निश्चय ढळू दिला नाही. नाही म्हणजे नाही घेतली जिमबॅग. विशेष म्हणजे एक अख्ख वर्ष ती आणि तिच्या शूजची जुनाट कॅरीबॅग बिलकुल खाडा न करता नियमितपणे जिमला जात राहिले.
यावर्षी नवऱ्याने तिच्या वाढदिवसाला सरप्राईज पार्टी ठेवली. सरप्राईज पार्टी म्हणजे सरप्राईज भेट आलीच. तिने पॅकेट उघडून पाहिलं. तर आत नेमकी लाल आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली एक झकास ब्रँडेड जिमबॅग! “वर्षभर न चुकता जिमला जाते आहेस, त्याबद्दल कौतुक म्हणून ही जिमबॅग,” असं म्हणाला. बॅग तर मस्त होती, तिला वापरावीशी ही वाटत होती. प्रश्न फक्त आता तिच्या इवलूश्या अंधश्रद्धेचा होता.
“वर्षभर नेमाने जात आहोत आपण, असं काय होईल की आपलं जिम आता फक्त या बॅगमुळे बंद पडेल? इतक्या पण चुकीच्या समजुती करून घेऊ नयेत. त्या जुनाट कॅरीबॅगचा नाहीतरी कंटाळाच आला आहे.” असं मनाला समजावत तिने शेवटी ती जिमबॅग वापरायला काढलीच. बॅग खरोखरी झकास होती. तीत बूट, सॉक्स, एकीकडे पाण्याची बाटली, नॅपकिन ठेऊन तिने चेन बंद केली आणि तिला एका खांद्यावर लटकवून ती टेचात निघाली. आज कुरकुर आवाज करणारी कॅरीबॅग सोबत नव्हती. एक वेगळाच आत्मविश्वास जाणवत होता तिला स्वतःमध्ये. एक छोटीशी बॅग इतका फरक पाडू शकते? तिला आश्चर्य वाटलं.
आठवढाभर नेमाने ती जिमला जात राहिली. शनिवारी मात्र ती जिमपाशी गेली तर दारापाशी तिला गलका दिसला. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पुढे जाऊन पाहिलं तर जिमच्या दारावर नोटीस लावली होती, “अचानक निर्णय घेतल्यामुळे दिलगीर आहोत पण सदर जिमचे रिन्होवेशन करत असल्यामुळे अपरिहार्य कारणास्तव एक महिन्यासाठी जिम बंद करत आहोत.” पुढे लिहिलं होतं, “मात्र ज्यांना इच्छा असेल, त्यांना जिमच्या फी मध्येच जिमशेजारच्या स्विमिंग क्लबमध्ये एक महिना पोहायचा क्लास लावता येईल. बाकीच्यांचे पैसे ऍडजस्ट केले जातील.” तिने स्विमिंग क्लबकडे पाहिले , “महिलांसाठी स्पेशल बॅच, संध्याकाळी साडेसहा ते साडेसात” चा बोर्ड तिला दुरूनच दिसला. तिची पावलं झपाझप पूलच्या दिशेने पडू लागली.
तिने एकवार हसून आपल्या जिमबॅगकडे पाहिलं, मनात म्हणाली, “आजपासून एक महिना तुझं रूपांतर स्वीमबॅग मध्ये. थँक्यू सो मच!” स्विमिंग पूल जवळ येत होता. एका खांद्यावर जिमबॅग घेतलेली तिची मूर्ती टेचात स्विमिंग पूल कडे जाताना दिसत होती.
Image by OpenClipart-Vectors from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
Mast 👌👌👌👌
खुप सुंदर लिखाण
Mast 👌👌
❤️❤️
मस्त .
आवडलीच ही Gym bag 👌👌
मस्त
khup chan Gauri. Awadali gym bag
Mast 😊👌👌👌
Mast ch