पत्र क्रमांक १३ आणि १४

पत्र क्रमांक 13,
प्रिय बाबा,

गेल्या आठवड्यात फादर्स डे झाला . आपला  फोन झालाच पण सांगायचा मुद्दा हा की खूप लोकांनी फेसबुक आणि इतरत्र सोशल मिडियावर आपल्या बाबांसोबत फोटोज टाकले होते, खूप काही लिहिलं होतं. माझ्याही बऱ्याच आठवणी ताज्या झाल्या.

आमच्या शाळेची स्कुल बस सोसायटीच्या गेटजवळ यायची…आई,आजी आम्हाला तयार करून द्यायच्या ,तुमचीही ऑफिसला निघण्याची वेळ झालेली असायची मग आपण तिघे निघायचो..तुम्ही कितीही उशीर झाला तरी आम्हाला बसमध्ये चढवून दिल्याशिवाय जायचा नाहीत. पुढे  आम्ही मोठे झालो तरीही आम्ही शाळेत जाताना टाटा करायला तुम्ही हमखास असायचात. पुढे स्विमिंगचा क्लास, टेनिसचा क्लास या सगळ्याला कधी तुम्ही तर कधी आई सोडणे-आणणे अशी कामं करायचात. ऑफिस,घर सांभाळून हे करणं तारेवरची कसरत असेल तुम्हा दोघांसाठी पण तुम्ही कधीच हे जाणवू दिलं नाहीत. कोणतेच आई बाप जाणवू देत नाहीत, छोट्या छोट्या गोष्टीत ओढाताण होत असते तुमची पण आम्हा मुलांना मोठे होईपर्यंत पत्ता लागत नाही.

अजून एक आठवण आहे बाबा, मला खात्री आहे तुम्हालाही आठवतच असणार ही घटना. आम्ही दोघं इंजिनिअरिंग सेकंड इअरला होतो. मला डिजिटल कम्युनिकेशचा एक्स्ट्रा क्लास अटेंड करायचा होता आणि तुमचंही त्याच रस्त्यावर पुढे काम होतं.. मग आपण सोबत निघालो. घराच्या बरंच पुढे आलो आणि एका नाक्यावर पानटपरीजवळ गौतम दिसला. चार मित्रांसोबत आणि पुढची धक्कादायक गोष्ट म्हणजे तो सिगारेट फुंकत होता. तुम्ही पुन्हा एकवार बघून तो गौतमच आहे ना याची खात्री करून घेतील. माझ्याकडे  पाहिलं आणि विचारलं
“तुला माहीत होतं हे?”
मी घाबरले होते पण तुमच्याशी खरं बोलले तर ‘माफीचा साक्षीदार’ होईन याची खात्री होती. मी  खरं काय ते सांगून टाकलं, मला माहित होतं ,मागेच गौतमच्या सॅकमध्ये लायटर सापडलं होतं मला आणि त्याबद्दल मी त्याला विचारलं असता त्यानं उडवा उडवीची उत्तर देऊन विषय टाळला होता. झालं मी बडबडून रिकामी झाले पण पुढे काय होणार याने माझी धडधड वाढली. तुम्ही गाडी रस्त्याच्या कडेला थांबवलीत. मला  गाडीतच थांबण्याचा इशारा केलात, तुम्ही उतरून त्या पानटपरी जवळ गेलात..पानवाल्या भय्याला म्हंटलात
“मलाही एक सिगारेटचं पॅक दे”
आणि तिकडे गौतम घाबरला इकडे मी आश्चर्यचकित झाले. त्या भैयाने पॅक दिलं पण तुम्ही ते नाकारून त्याला परत दिलं आणि गौतमला चलण्याचा इशारा केला. तिथून आपण घरी परत आलो. येताना कुणीही कुणाशी काहीच बोललं नाही. फार विचित्र आणि सहन न होणारी शांतता होती ती. मला आणि गौतमला वाटलं की आता घरी जाऊन जाम तमाशे होणार पण सोसायटीत गाडी वळवताना तुम्ही म्हंटलात
“घरी कुणी याबद्दल काही वाच्यता करू नका..गौतम तुला मी लेक्चर देणार नाही पण तुझं तू ठरव वागलास ते बरोबर की चूक, तू पुरेसा मोठा झाला आहेस आता, स्वतःच वागणं चूक वाटत असेल तर ती चूक सुधार” आणि आपण घरी पोचलो. बाकी घरी गेल्यावर तुम्ही नॉर्मल.

आनंदाची गोष्ट म्हणजे गौतमच्या सिगारेट सुटली..कायमची..माझा मुलगा किंवा मुलगी मला असं करताना दिसले असते तर कदाचित मी तिथेच भर रस्त्यात कानफटवल असतं. पण तुम्ही वेगळेच भासलात मला त्या दिवशी!!!

असे अनेक प्रसंग आहेत बाबा ज्यात तुम्ही बऱ्याचदा मला वेगळे भासलात. माझ्या ट्रीटमेंटची गेली 5 वर्षे आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप कठीण  होती. इथे आले , डोकं थंड झालं आणि एकेक गोष्टी आठवत गेल्या मागच्या 5 वर्षात खूप आधार आणि आत्मविश्वास दिलायत तुम्ही. आईची  चिडचिड व्हायची पण तुम्ही फार कमी वेळा चिडलेले दिसलात आणि मला फायनली पाळी आल्यावरही तुम्ही धीरोदात्तपणे सगळ्यांच्या एक्ससाईटमेंटला वेसण घातलंत. फादर्स डे दिवशी फोनवर हे बोलू शकले नाही
‘मनापासून थँक्स बाबा आणि लव्ह यु’

कसं काय जमतं हो बाबा तुम्हाला इतकं स्थितप्रज्ञ रहायला??

तुमचीच लेक,
गार्गी

**************************************

पत्र क्रमांक 14,
प्रिय गार्गी,

तुझं पत्र मिळालं..खूप छान वाटलं  वाचून तू तुझ्या आईला, आजीला, गौतमला लिहिलेली पत्रंही त्या सगळ्यांनी वाचून दाखवली. त्यामुळे  मी वाटच बघत होतो तुझ्या पत्राची. फक्त  बोललो नाही हे इतकंच पण बघ तुला समजलंच की. आत्ता ऑफिसच्या कामांमधून वेळ मिळाला आणि लगेच तुला पत्रोत्तर लिहायला बसलो.

गार्गी जशी मुलं मोठी होणं, त्यांचे विचार डेव्हलप होणं ही एक प्रोसेस असते तशी पालक म्हणून मोठं होणं, पालकांचे विचार त्या जबाबदरीसोबत डेव्हलप होणं हीही एक प्रोसेस असते. तू मागच्या पत्रात गौतमच्या सिगारेटप्रसंगाविषयी लिहिलं आहेस. आता तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण तरीही सांगतोच..हे सिगारेट प्रकरण मी तुमच्या आईला देखील सांगितलं होतं…आई कशी काही रिऍक्ट झाली नाही!! याचा धक्का तुला बसला असेल..सांगतो यामागची कारणंही सांगतो.

गार्गी आपण म्हणतो पालक म्हणजे आदर्श असतात मुलांसाठी. पालकांचंच मुलं अनुकरण करतात. पालक जसं मुलांना कसं वागावं हे शिकवतात तसच नकळत कसं वागू नये हेही शिकवतात. मी असं का म्हणतोय हे तुला पुढे स्पष्ट होईल. हं तर गौतम सिगारेट प्रकरण मी तुमच्या आईलाही सांगितलं. खरं तर ती घटना माझ्यासाठी ती घटना देजा व्ह्यू सारखी होती. काही वर्षांपूर्वी अण्णांनी म्हणजे तुमच्या आजोबानी मला असंच सिगारेट पिताना पकडलं होतं. तुझे  डोळे खोबणीतून बाहेर आले असतील हे वाचताना पण नीट एक्सपलेन करतो. तर  कुणीतरी मला सिगारेट फुंकताना पाहिलं घरी जाऊन अण्णांच्या कानात हा वार्तालाप घडला आणि मग मी घरी गेलो तेव्हा घरच्या तापमानात खूप वाढ झाली होती हे सांगायला नकोच..पुढे अण्णा खूप खूप बोलले मला. अगदी  नको नको ते, संबंध नसलेलं देखील बोलले आता गौतमच्या आणि माझ्या घटनेत फरक एवढाच होता की हे जेव्हा माझया बाबतीत घडलं तेव्हा मी गौतम इतका लहान नव्हतो… मी 2 मुलांचा बाप होतो. तुम्ही खूप लहान होतात त्या  काळी. तर  घडल्या प्रसंगानंतर मी सिगारेट सोडली पण अण्णा मला जे  अद्वातद्वा बोलले , माझा जो अपमान केला ते मी अजूनही विसरू शकत नाहीये. म्हणून  बऱ्याचदा मी म्हणतो की पालक मुलांना कसं वागू नये हेही शिकवत असतात आणि म्हणूनच मी गौतमच सिगारेट प्रकरण शांततेत हँडल केलं आणि त्यात मला तुमच्या आईनेही साथ दिली. अण्णा स्वभावाने खूप तापट होते माझ्या आईने त्यांचा विक्षिप्तपणा खूप सहन केलाय त्यातुन मी ठरवलं की आपण आपल्या बायकोशी असं वागायचं नाही. आईही  आमच्या लग्नानंतर नंदेशी खूप विचित्र वागली. आमच्यात  सतत लुडबुड करून, हरएक बाबतीत तिचेच सगळं ऐकावं असा टोकाचा आग्रह धरून नंदेला बराच सासुरवास केला. आमच्यात  म्हणजेच तुझ्या आईमध्ये आणि माझ्यात या कारणामुळे बरेच वाद झाले आणि नंदा इतकी वर्षे झाली हे सगळं अजूनही विसरली नाहीये. बरं तुझ्या आजीला काही सांगायला जावं तर ती चुकीचे अर्थ काढते.

असो तुझी आई आणि माझी आई या घरातल्या दोन बायका किती हट्टी आहेत हे तुझ्या आणि माझ्या शिवाय चांगलं कोण जाणत?

तर मुलं मोठी होताना, मोठी झाल्यावर पालक काय आणि कसे वागतात याचे मुलांवर, त्यांच्या मनावर खोल परिणाम होत असतात हे पालकांनी नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. पालक आहात म्हणजे देव बनण्याचा परवाना मिळाला अस होत नाही. मी  आणि नंदा खूप भाग्यवान आहोत तुमच्यासारखी मुलं मिळाली. तुम्ही दोघेही खूप डिमांडीग नव्हतात गं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळायचा तुम्हाला. परवा ऑफिसमधल्या एका कलीगच्या मुलाला दहावीत 85% मिळाले आणि मुलाने आयफोनची मागणी केली म्हणून त्याच्या वडलांनी त्याला लेटेस्ट आयफोन घेऊन दिला. मला खूप आश्चर्य वाटलं. सुदैवाने तुम्हा दोघांच्याही डोक्यात अशा हायफाय कल्पना कधीच नव्हत्या आणि मुख्य म्हणजे आपले आईवडील मध्यमवर्गीय आहेत याची तुम्हाला सतत जाणीव होती/आहे.

आता गेल्या 5 वर्षांतल्या तुझ्या ट्रीटमेंटचा विषय. त्या काळात माझं शांत राहणं फार गरजेचे होतं कारण तुझ्या आईचे पेशन्स संपत चालले होते. त्यात मिहिरची आई म्हंटली की
“तुम्ही अशी वांझोटी पोर आमच्या गळ्यात बंधू पाहत होतात” तेव्हा मात्र नंदा खूप बोलली त्यांना…आणि तिने ते योग्य केलं..माझाही तोल सुटला त्यावेळी..पहिल्यांदा तू मला एवढं चिडलेलं  पाहिलं असशील.

असो नको तो विषय. तर  तुम्हाला वाढवताना आम्ही आदर्श बिदर्श पालक बनलो की नाही माहीत नाही , मुळात हा हेतू कधी नव्हताच पण आम्ही पालक म्हणून डेव्हलप होण्यात तुम्हा मुलांचा खूप मोठा वाटा आहे आणि असेल एवढं नक्की.

बाप सगळं बोलून दाखवत नाही गं पण तरीही म्हणतो लव्ह यु. पुण्याला  कधी येतेयस?

तुझे बाबा

Image by Ralf Kunze from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!