अबोला…
तो तसा तिच्या ऐकणार्यातला होता.
निमूट ऐकून घ्यायचा.
अगदी मान खाली घालून.
आवाज चढवणं, त्याला आयुष्यात कधीच जमलं नव्हतं.
लग्नाआधीपासून.
त्याची ताई.
त्याच्याहून सहा वर्ष मोठी.
ती म्हणेल ते ऐकायचा.
आई बाबांचं ऐकायचा.
क्लासटीचरचं ऐकायचा.
मित्रांचं ऐकायचा.
जगाचं ऐकायचा.
म्हणजे ऐकून घ्यायचा.
ऊलट बोलून समोरच्याला दुखवायचं नाही म्हणून.
तत्व म्हणजे तत्व.
आयुष्यभर सांभाळलेलं.
म्हणून समोरचा सांगेल तस्सं वागायचं…
छोडो यार.
ते मात्र त्याच्या तत्वात बसत नव्हतं.
मग समोरचा अजून चिडायचा.
चिडणं एका लिमिटबाहेर गेलं की..
मग याचं चॅनल म्युट होवून जायचं.
मौनम्.
अबोला.
कुणीही येवू देत.
तोंडातून चकार शब्द निघणार नाही.
अगदी दहा पंधरा दिवस, एकही अक्षर न बोलता तो सहज जिवंत राहू शकत होता.
त्याच्या स्वतःच्या काही टर्म्स अन् कंडिशन्स होत्या.
त्याच्यात बसेल तसं सगळं करणार.
त्याच्याबाहेर..
नुस्तं ऐकून घेणं.
तसं न वागणं.
समोरच्याचं लिमिटबाहेर चिडणं.
याचं मौन.
घरासाठी रूटीन होतं.
तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं.
पहिल्या भेटीतच, तिला तो फार फार आवडलेला.
निमूट सगळं ऐकून घेणारा नवरा, कोणाला नाही आवडणार ?
शोकेस अन् गोडावून में फर्क होता है भाभीजी.
आता कळायला लागलं होतं.
खरं तर तिचा नवरा अजून तिला कळलाच नव्हता.
गेला आठवडाभर ती बोंबलतेय.
“शोना , रोज दाढी करायची हं.
दाढी केल्यावर कशा गोड्डु दिसतोस ना तू ,बेबी.”
बेबी नुसतं ऐकून घ्यायचा.
दाढीच्या खुंट्या हातभर वाढलेल्या.
आता तर दाढीत ऊवाही होतील ,अशी भिती वाटायला लागलेली तिला.
शीशा हो या दिल..
या फिर पेशन्स..
आखिर टूटही जाता है.
खळ्ळखटाक्.
तिचा पेशन्स संपला.
फाडफाड बोलली ती त्याला.
अगदी बिनपाण्यानं.
तो ऐकत होता.
लिमीट संपली.
त्याचं चॅनल म्युट.
‘गेलास ऊडत..’
ती म्हणाली.
‘तू पण..’
यानं मनातल्या मनात म्हणलं.
दहा बारा दिवस.
काही बोलायाचे आहे.
पण तो बोलणार नाही.
अचानक तिचा सेलफोन वाजतो.
तिचा लाडका मामा येतोय.
लग्नानंतर पहिल्यांदा, कुणीतरी माहेरून येणार.
तीचा मामा म्हणजे, प्रचंड बडबडा.
मनमौजी.
खुशालचेंडू.
आणि तिच्या नशिबी हे म्यूट चॅनल.
मामु क्या सोचेगा ?
तिला जाम टेन्शन.
बेल वाजते.
धक धक धक.
याची नजर आढ्याकडे.
ती पळत पळत ,दार ऊघडते.
आनंदी खिंकाळ्या.
घुम्या बाहेर येतो.
कसनुसं हासतो.
ती चहा टाकायला आत.
मामाची टकळी सुरू.
तीचा जीव ऊतू चाललेल्या दुधासारखा, वरखाली.
अचानक टाळ्यांचा आवाज.
हसण्याचा गडगडाट.
दोन माणशी डबल धमाका.
घमासान बडबड.
पाचच मिनटात, तीचा मामु तिच्या नवर्याचा जानी दोस्त.
त्याचा अबोला, अबोलीच्या सुक्या गजर्यासारखा चिंधीचिंधी होतं.
तिला भरून येतं.
नवर्याविषयी, अलोट प्रेम का काय ते ?.. वाटू लागतं.
मामाचं वादळ तृप्त मनानं ,दुसर्या दिवशी पहाटे गुल.
तो ऊठतो.
ती त्याला कातील लुक देते.
अनायसे सुट्टी.
त्याला आवठडते म्हणून बासुंदी पुरी.
तो वाटी वाटी ओरपतो.
ती शब्दांची भुकेली.
हा ढिम्म.
ब्रेक के बाद अबोला चालू झालेला.
सासरच्या मंडळींपुढे घडी केलेला तत्वांचा गुंडाळी फळा , मंडळी गेल्यावर पुन्हा ऊघडायचा असतो.
तत्व म्हणजे तत्व.
ती भांबावते.
नंतर रिलॅक्सते.
‘तुझी तत्व गेली तेल लावत.
उतू देत , मातू देत.
माझ्या माहेरच्या माणसांपुढे याची गरीब गाय होते.
बैलोबा आहे नुसता.’
नवरा जातीची तिला खरी ओळख पटते.
आनंदानं ती बासुंदी ओरपू लागते.
तीला ती जरा जास्तच गोड लागते.
टाईम प्लीज म्हणून तो आपला अबोला कंटिन्यू करतो.
संस्कार म्हणतात याला.
हं….
युगानुयुगे हे असंच चालत आलंय.
असंच होत राहणार.
तोवर तुम्ही आपले…
नांदा सौख्यभरे.
भांडा सौख्यभरे.
Image by Vitabello from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
मस्तच. मला वाटलं हा बदलला
Zakas 👌👌👌👌
वा
कौस्तुभ काय कॉमेंट लीहायची? तुमच्या सर्वच स्टोरी छान असतात. तुम्ही लीहा आम्ही वाचक खुष होऊन वाचतो, कींवा वाचुन खुष होतो.