ड्रायव्हर….
लहान असताना त्यानं ठरवलेलं.
मोठ्ठं झाल्यावर ड्रायव्हर व्हायचं.
ईन्जीन ड्रायव्हर.
मोठा झाला तो.
त्याचं लग्नही झालं.
मग तो खरंच ड्रायव्हर झाला.
बायकोचा ड्रायव्हर.
आज्ञाधारक.
नम्र.
कंटाळा हा शब्द, डिक्शनरीत नसणारा.
संक्रांतीनंतरचा पहिला रविवार.
त्या रविवारची संध्याकाळ.
ही संध्याकाळ म्हणजे, त्याची फायनल एक्झॅम.
त्याच्या पेशन्सचा कस लावणारी.
रविवारी दुपारपासून, त्याची तयारी सुरू व्हायची.
गाडी स्वच्छ धुवून पुसून रेड्डी.
नाक्यावरनं डझनभर मोगरीचे गजरे.
दोन गाडीत लावायचे.
आई , बायको आणि लेकी.
ऊरलेले वाटून घ्यायच्या.
मोगरा फुलला.
नुसता घमघमाट.
पेनड्राईव्हवर छान गजला डाऊनलोड करून घ्यायच्या.
दोन चार आवडीची पुस्तकं.
अखंड पारायण करता येतील अशी.
डॅशबोर्डच्या ड्राॅवरमधे रचून ठेवायची.
गुळगुळी दाढी करायची.
सभ्य सांस्कृतिक पोशाख.
सिल्कचा झब्बा पैजामा.
चेहर्यावर विनम्र भाव.
मुखी “सगळं मोह माया”चा जप.
सहा वाजता गाडी कंपाऊंडच्या बाहेर काढायची.
रेड्डी रहायचं.
साडेसहापर्यंत घरातल्या बायकांची, पाच मिनटं संपतात.
नटून थटून आई , बायका , पोरी गाडीत बसतात.
पैठणीचा थाट.
परकर पोलक्यांचा नखरा.
सेंटची फवारणी.
बांगड्यांची किणकिण.
गजरा मुहब्बतवाला..
यात तो गुंतून पडत नाही.
तू जहा जहा चलेगी..
मेरा साया साथ होगा.
तू तिथं मी.
बायको सांगेल त्या रस्त्यावर, तो गाडी नेतो .
वाटेत ,सगळ्यांच्या मॅचींगचं तो भरभरून कौतुक करतो.
वातावरण प्रसन्न ठेवतो.
नेमक्या घरापाशी गाडी थांबवतो.
“लवकर ये हं…”
चुकूनही असं म्हणत नाही.
गाडीतला लेडीज क्लब त्या घरात शिरतो.
त्या घरातून गडगडाटी हसू ऐकू येत असतं.
झुंबडी गर्दी असते.
कमीत कमी अर्धा तास.
तो गुलाम अलींना गायला सांगतो.
जिम काॅर्बेटला वाचायला घेतो.
अर्ध्या तासात टेम्पल टायगरला शोधून दमतो.
तेवढ्यात क्लब परत येतो.
मिळालेली लूट तो व्यवस्थित डिक्कीत ठेवतो.
तुम जो ईतना मुस्कुरा रहे हो…
नुसत्या डोळ्यांनी तो ,बायकोचं तोंडभरून कौतुक करतो.
खरंच ती छानच दिसत असते.
बायको खुष.
तो पुरा ईन्डिया खुष.
शिरा पुरी..
जा त्या घरी.
तो घरघर करू लागतो.
तहानभूक विसरून.
घड्याळ विसरून.
स्वाभिमान विसरून.
” आमच्या ह्यांना बिलकुल वेळ नसतो.
एक बदली ड्रायव्हर मिळाला.
त्याला घेवून हिंडत्येय गावभर..”
त्याची बायको ,कुठल्या तरी गृहस्वामिनीला सांगत असते.
तो ऐकून न ऐकल्यासारखं करतो.
हल्ली त्याला राग येत नाही.
बायकोची दया येते.
खरच तो ,सगळ्याच्या पलीकडे पोचला की काय ?
डिकीतली सुरतेची लूट वाढत चाललेली.
” काय बाई लुटतात बायका..
आता मॅगी काय लुटायची गोष्ट आहे ?”
‘ वही तो..’
तो रिवीजन करतो.
मागच्या वर्षी त्याच्या बायकोनं, रांगोळीच्या रंगांचा काॅम्बो पॅक लुटलेला.
तो तोंड भरून , तोंड दुखेपर्यंत , तोंड देखलं त्याचं कौतुक करतो.
वर्षभर तेच करतोय तो.
साडेदहा वाजतात.
त्याचं ‘मॅनईटर्स आॅफ कुमाँऊ’ वाचून संपलेलं.
गुलाम अलींचा गावून गावून घसा बसलेला.
” दमले बाई..
चला आपल्या घरी…
फार वेळ काढतात बायका.
पटकन् हळदीकुंकू द्यावं.
वाण लुटावं.
पण नाही.
निवांत गप्पा मारत बसतात.”
तो आदरानं बायकोकडे बघतो.
केवळ तिच्यामुळे तो अकराच्या आत घरात.
दमलेल्या बायका हाशहुशत घरात शिरतात.
गडीमाणूस लुटीच सामान सांभाळत ,सरपटत घरात जातो.
” आज काय स्वयपाकाला ,फारसा वेळ मिळाला नाही.
आमचं सारखं चरणं चालूच होतं, प्रत्येक घरी.
आम्हाला कुणालाच भूक नाहीये.”
त्याची बायको दोन चार किलोचा मेकअप ऊतरवायला, बेडरूमात शिरते.
त्याची आई.
त्याच्या लेकी.
डिट्टो तसंच करतात.
तो आणि त्याचे बाबा.
आमटीभात खावून, अर्धपोटी घोरायला लागतात.
रथसप्तमीपर्यंत दोन एक रविवार,तो असे कुर्बान करतो.
चलता है !
तो पण हुश्शार ड्रायव्हर असतो.
व्हिझीटलेल्या प्रत्येक घराला नोट डावून करतो.
तिथल्या कर्त्या पुरषाचा नंबर मिळवतो.
रथसप्तमी झाली.
लगेचचा रविवार.
त्याची बायको नाही म्हणूच शकत नाही.
तो पटाटा नंबर फिरवतो.
बायकोच्या मैत्रिणींचे नवरे.
गरीब बिच्चारे.
बारी बारी ड्रायव्हर होणारे.
भूखेप्यासे..
हाकेसरशी धावून येणारे.
लगेच धावून येतात.
कुठं तरी आडोशाला बसतात.
सुखदुःखाची ऊजळणी करतात.
नवं मैत्र जोडतात.
जब मिल बैठेंगे चार यार…
वाण नाही तरी गुण लागतोच.
भरभरून एनर्जी मिळवतात.
पुढच्या वर्षीचा वायदा करतात.
ड्रायव्हर रेड्डी..
पुढच्या हळदीकुंकवासाठी..
Image by Clker-Free-Vector-Images from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
सही
लय भारी