बाजार…

आम्ही लहान असताना सुट्टीत मामाच्या घरी जाताना 165 क्रमांकाची बस पकडायचो. त्या डबल डेकर बसच्या पहिल्या मजल्यावर सर्वात पुढच्या सीटवर बसून, आ वासून वारा फुप्पुसात भरून घेण्यात मला आणि माझ्या भावाला खूप गंमत वाटे. बस नळ बाजार, गोल देऊळ, दो टाकी पार करत एका ठराविक रस्त्यावर आली की त्या अजाण वयातले आम्ही शांतपणे सीटवर बसत असू. काहीतरी वाईट किंवा आम्ही बघू नये असे आजुबाजुला असल्याची एक जाणीव होत असे. आई बाबा देखिल काहीतरी गमती जमती सांगून आमचे लक्ष आता खिळवून ठेवायचा प्रयत्न करायचे!

पुढे ज़रा मोठे झाल्यावर आम्ही त्याच बस ने एकटे मामाकडे जाऊ लागलो. तेव्हा त्या ठराविक रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या दोन मजली जुनाट चाळीतून रंगीबेरंगी परकर पोलके घातलेल्या, भडक मेकअप केलेल्या बायका टाळ्या वाजवून, शिट्टी वाजवून, प्रसंगी हाका मारून रस्त्यावर चालणाऱ्या पुरुषांना हाकाटे घालताना बघुन जरा विचित्र वाटायचे. त्याच इमारती बाहेरील फुटपाथवर काही वयस्क, जाड्या बायका जुनाट परकर पोलका लेवून बाजेवर पहुडलेल्या असत. एखादी बाई किंवा बुवा त्या म्हशेरी लावणाऱ्या जाड्या बाईच्या केसांना मसाज करत असे. त्याच रस्त्यावर पूर्वी मुंबईत प्रसिद्द असलेल्या घोडागाड्यांचे तबेले होते. कधीतरी टांगयापासून सूटा झालेल्या, गवत खात असलेल्या घोड्यांचे दुर्लभ दर्शन सुखावत असे. बिचारा घोडा मोकळा पाहून उगाच आम्हाला हलके वाटत असे. तिथून पुढे गुलशन, रोशन नामक थेटर येत. हातानी रंगवलेली जुन्या सिनेमांची बटबटीत पोस्टर्स लक्ष वेधुन घेत! एकंदरित प्रचंड कल्चरल डिफरंस असलेल्या त्या रस्त्यावरून जाताना त्या वयातही मन थोड़े खिन्न होत असे!

पुढे कॉलेजला गेल्यावर इतर बस रूट माहीत झाले आणि 165, तिचा तो रस्ता कुठेतरी मागे पडून विस्मरणात गेले. मग अचानक एकदा एका मित्राच्या हौशी कझिन बरोबर त्या थेटरांपैकी कुठल्यातरी एका थेटरात “फाय राइफल” नावाचा एक टुकार सिनेमा मॅटीनीला पाहीला तेव्हा तो रस्ता परत आठवला होता. त्या थेटरातील वातावरण, फाटक्या खुर्च्या, पायाखालून फिरणारे उंदीर, पान खाऊन खुर्चीखाली थुंकणारे ओंगळ प्रेक्षक, अंधारात काही प्रेक्षकांच्या मांडीवर बसून सिनेमा पहाताना चेकाळलेल्या त्या भडक परकर पोलक्यातील बायका आणि मूळ सिनेमा सोडून डोळे ताणून त्या डबल सीटवर सुरु असलेला “पिक्चर” डोळ्यात साठवून घेणारे आम्ही आजही स्पष्ट आठवतात. मग सिनेमा सुटल्यावर आपल्याला तिथे कोणी पाहू नए म्हणून तुटपुंज्या पॉकेट मनीतील एक मोठा हिस्सा खर्च करून पटकन पकडलेली टॅक्सी देखिल आठवते.

आज हे सर्व परत आठवले कारण त्याच रस्त्यावरून आज कित्येक वर्षांनी जाणे झाले. वातावरण बरेच बदलले आहे. आता रस्ता थोडा मोकळा आहे, थेटराचाही थोडाफार कायापालट झाला असावा असे वाटले. भूतदया म्हणून घोड्यांचे टांगे बंद होऊन घोड़े मुक्त झाले. तेथील गुप्तरोग डॉक्टरांच्या दवाखान्यात पुढली पीढी बसू लागली असेल. रस्त्यावर रात्री जास्त रोषणाई असेल. पूर्वी त्या परकर पोलक्यात तोंडाला लाली लावून हाकाट्या मारणाऱ्या बहुतेक एड्स किंवा गुप्त रोगांनी मेल्या असतील आणि जगलेल्या आता बाजेवर पहुडुन म्हशेरी लावत एखाद्या टुंगरुस कडून मसाज करून घेत असतील.

फक्त दोन गोष्टी बदलल्या नव्हत्या. एक म्हणजे वर्षानुवर्ष आतील बायका बदलणारे ते रंगीबेरंगी परकर पोलके, त्या हाकाट्या आणि दूसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या मजल्यावरच्या माडीच्या छोट्याश्या खिडकितून गिर्हाईकाची वाट पहाणाऱ्या असंख्य रंगीत चेहर्यांवरचे भकास, अंधारे, त्यांच्या देहासारखेच संवेदना केव्हाच हरवून गेलेले तरीही खूप करुण भासणारे भाव! मी डोळे मिटून घेतले. जगातील सर्वात जुन्या व्यवसायाचा बाजार आधुनिक जगातही कालबाह्य न ठरता, पारंपारिक पद्धतीने जोमात सुरु होता. स्त्रियांची अजून एक पीढी गर्तेत ढकलली जात होती! – मंदार जोग

Image by Stefano Ferrario from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!