चखणा…
“निघूया?” आनंदने विचारलं आणि जयाने आरशात पाहत मानेनेच होकार दिला. दोघ छान तयार झाले होते. वीकएंडची मजा, मूडच काही वेगळा असतो. उद्याची धांदल नसते की कसली चिंता नसते. त्यात अजूनतरी ते दोघच, राजराणीचा संसार. निघताना जयाने आनंदकडे एकवार पाहून घेतलं. पुढच्या दोन तासात त्याचं बदललेलं रूप तिला पहायला मिळणार होतं. एरवी प्रेमळ, जरासा स्वतःत हरवलेला असा तिचा नवरा पुढच्या दोन तासात पार बदलून जाणार होता.
जयाला एव्हाना सवय झाली होती. शनिवार रविवार म्हणलं मौजमजा, मौजमजा म्हणलं की दोस्त लोकं, दोस्त म्हणले की पार्टी, पार्टी म्हणलं की दारू आणि दारू म्हणलं की सगळ्या सुष्टदुष्टतेच्या सीमारेषा पुसत व्हायची सुरुवात ! त्यांच्या शहरी जीवनाच्या अविभाज्य भाग झाल्या होत्या या पार्ट्या आणि गेटटुगेदर्स. सगळ्या मित्रमंडळींनी वीकएंडला एकत्र यायचं, कुठेतरी भटकायला जायचं, मौजमस्ती करायची आणि रिफ्रेश व्हायला, नाही कुठला तो शब्द बरं? हां..unwind करायला करायला दारू प्यायची.
गावाकडे बंदिस्त वातावरणात वाढली असली तरी जया तशी मोकळ्या विचारांची होती. दारू पिणे वाईट हे मनात बिंबवलं गेलं असलं तरी दारू पिणारी सगळी माणसं वाईट आणि न पिणारी चांगली अश्या ठोस आणि बेगडी कल्पना तिने करून घेतल्या नव्हत्या. एखाद्याच्या आवडीनिवडीवरून त्याला जज करणे तिच्या स्वभावात नव्हतं. कुठल्याही गोष्टीच्या, व्यसनाच्या आहारी जाऊ नये हे पक्क माहीत असल्याने, कधीकधी ती सुद्धा “एन्जॉय” करायची. पण तिची झेप बियर किंवा ब्रीझरचा एखादा घोट घेण्यापर्यंतच. हार्ड ड्रिंक्स कधी फारशी झेपलीच नाहीत तिला. व्यसन करणे आणि एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेणे यातला फरक तिला चांगलाच माहीत होता.
दोघं मित्राच्या घरी पोचले. नेहमीप्रमाणे ख्यालीखुशाली झाली, दारू कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू आनंद तिला पारखा होऊ लागला. मित्रांमध्ये रमून गेला. विनोद, टवाळक्या सुरू झाले. एकदोन, जग फिरलेल्या, “घेणाऱ्या” मैत्रिणी “चियर्स” म्हणत गप्पांमध्ये सामील होऊ लागल्या. एकामागोमाग एक चखणा आणला जाऊ लागला. जयाने घरून करून आणलेल्या चकलीस्टिक्स सुद्धा चखण्यात सामील झाल्या. तिला या चखण्याची फार गंमत वाटायची. किती चटकमटक असतात हे पदार्थ. खरंतर हेच पदार्थ अगदी वेळेशीर, भरपूर खावेत आणि नंतर भरल्या पोटाने गप्पा मारत बसाव्यात. पण लोक बरोबर उलट करतात. चखणा एवडुसा खातात आणि दारू भरपूर पितात. असो. प्रत्येकाची आवड असते, आपल्याला समजत नसेल हे पार्टी कल्चर फार, असं स्वतःलाच तिने समजावलं.
जयाची ब्रीझर अर्धी संपत आली. नेहमीप्रमाणे भूक लागल्याने तिने चखण्यावरच पोट भरायला सुरुवात केली. ह्या दारूपार्ट्या म्हणजे जेवायला जाम उशीर. तिच्यासारख्या लोकांची तर जाम पंचाईत होई. बाकीचे निवांतपणे पेग रिचवत असताना, आपल्या पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असतो. मग चखण्यावर आडवा हात बसत रहातो. जेवायच्या वेळी चखणा पोटात जाऊन बसल्याने नंतर जेवायचे वांदे होतात.
आनंद आता चांगलाच मूडमध्ये आला होता. पुढे काय होणार हे तिला माहीत होतं. थोडेफार नॉनव्हेज जोक्स, मग कधीही न सांगावेसे वाटलेले प्रसंग रंगवून रंगवून सांगणे, येत असो वा नसो, एखादा डान्स, एखादी दर्दभरी गज़ल. वाईट असोत, आनंदी असोत, आठवणींचा डोह मात्र ढवळून काढते ही दारू!
जयाने सहज आठवून पाहिलं, गावी असताना पार्टी म्हणून काय करायचो आपण? घरातले सगळेजण उन्हाळ्यातल्या रात्री एकत्र अंगणात बसायचो. मग बाबांचा मूड बघून बापूकाका हळूच त्यांच्यासमोर पेटी आणून ठेवायचा. स्वतः तबल्यावर बसायचा. त्याचा डग्गा कधीचा बिघडला होता, पण दुरुस्त करायचं नाव नाही. तसंच काम चालवायचा. कोणाला आग्रह लागायचा नाही की आर्जवं. थेट गायला सुरू करायचे बाबा, “माझे माहेर पंढरी…” जरा खडा होता बाबांचा आवाज, पण अतिशय सुरेल. पेटीवर बोटं तर इतकी आपसूक फिरायची. हे सगळं कुठेही कसलीही शिकवणी न लावता, आजोबांचं वाजवणं बघून बघून. मग आईला आग्रह व्हायचा. सुरेख म्हणायची आई “मेरे तो गिरीधर गोपाल”.. एरवी फार न बोलणारा बापूकाका “व्वा वहिनी!” म्हणत जोरदार कौतुक करायचा. मग घरातली सगळी मंडळी त्यांना येणारी सर्व गाणी म्हणायची. दुरवरून साथीला समुद्राची गाज असायची. घरातल्या सुरावटींनी आसमंत उजळून निघायचा.
मधेच कॉफीची फर्माईश व्हायची. बापूकाका सगळ्यांसाठी भरपूर दूध घालून वेलचीवाली कॉफी बनवायचा. दिवसभर राबणाऱ्या आईने कुठल्याही कामाला हात लावायचा नाही अशी तंबी द्यायचा. मग यायचा चखणा. मस्त खारवलेले काजू, नारळाच्या वड्या, कोपऱ्यावरच्या दुकानातली बॉबी, नानूच्या दुकानातला चिवडा, असं सगळं बाहेर निघायचं. आता कॉफीबरोबर खातात त्याला कोण कसं चखणा म्हणेल? पण शेजारचा राजन त्याला चखणाच म्हणायचा. बाबांना तर संशय होता, हा राजन इथे घरात मैफिलीत बसतो आणि मधेच “येतो” असं सांगून जे जातो ते चार दोन घोट घेऊनच येतो की काय! आपण सगळे हसायचो. ही पार्टीसुद्धा चांगली साग्रसंगीत रात्री उशिरापर्यंत चालायची. या पार्ट्या म्हणजे आनंदाचा ठेवा होता जयाच्या आयुष्यतला.
पार्टी संपत आली होती. आनंद जयाला “चल, घरी जाऊया” म्हणत होता. दोघ टॅक्सीने घरी आले. जया स्वतःच्याच विचारात हरवली होती. आनंदला पण ते जाणवले असावे. सकाळी उठल्यावर भरपूर लिंबूपाणी पीत आनंद म्हणाला, “जया, यावर्षी थर्टी फस्टला गावी जाऊया का? कंटाळा आलाय या शहरी पार्ट्यांचा. मस्तपैकी अंगणातली कॉफीपार्टी करू, बापूकाकाचा तबला ऐकू, आईंचं गाणं ऐकू, राजनबरोबर मधेच जाऊन एखादा “घोट” घेऊन येऊ. काय वाटतं तुला?” जया त्याचं बोलणं ऐकून इतकी हरखून गेली की तिच्या तोंडून शब्दच फुटेना. इकडे आनंद पुढच्या सुट्टीचे प्लॅन्स करत होता, मात्र तिच्या कानात समुद्राची गाज ऐकू येत नाही, वेलचीवाल्या कॉफीचा सुगंध दरवळत होता आणि कॉफीबरोबरच्या चखण्याची चव आधीच जिभेवर रेंगाळायला लागली होती!
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
मस्त
👌
Khup surekh hoti story