लाल ढेप- (संक्रांत विशेष)
हल्ली गिरगावात तशीही मराठी लोकांची संख्या रोडावली होती. चाळींच्या जागी टॉवर उभे राहिले होते. पूर्वीच्या गच्या, कौलं ह्यावर धावत पतंग उडवणे, पकडणे, लटकवणे आता अभावानेच दिसत असे. गच्चीत मोठमोठे स्पीकर्स लावून, डोळ्यांवर गॉगल लावून, रंगीबेरंगी टोप्या घालून, बियरचे क्रेट आणि चकण्याच्या बश्या रिचवत “ए लपेटsss” किंवा “कायपो छे” ह्या आरोळ्या आता क्षीण झाल्या होत्या.
पण तरीही नव्या पिढीतील काही पोरं अजूनही उरल्या सुरल्या चाळींच्या आणि पुनर्निर्मिती टॉवरच्या गच्चीत पतंग उडवायला जमू लागली. फिरक्या, पतंग, मांजा, गॉगल, टोप्या ह्यांनी गच्या थोड्याफार फुलल्या. पोरांनी पतंग बदवायला सुरुवात केली होती. पश्चिमेच्या आकाशात खुप उंचावर एक लाल ढेप (मोठा पतंग) स्थिर उडत होती. एखाद्या घरीसारखी खाली नजर लावून शांत एका जागी टिकली झाली होती. नव्या पोरांनी आपापले पतंग हळूहळू उडवले. आपले पतंग आकाशात बघून पोरं खुश झाली. इतक्यात ती लाल ढेप आकाशातून घारीच्या वेगाने खाली येऊन दोघा तिघांना एकत्र घसटून परत आपल्या जागी शांतपणे स्थिर झाली. आता समोरच्या आणि आजूबाजूच्या गच्चीतील पोरांनी देखील पतंग हवेवर सोडले. परत ती ढेप वेगाने खाली येऊन चार पाच जणांना हातापासून घसटून आकाशात जाऊन बसली!
प्रत्येक पोराचे एक दीड कोडी पतंग कापलेल्या त्या ढेपेबद्दल सर्वच मुलांच्या नजरेत कुतूहल होतं. ती कुठून उडते आहे ह्याचा अंदाज तिचा मांजा बघून येत नव्हता. एरियातली पोरं जाम वैतागली. दोघा तिघा टग्यांनी त्या ढेपेला घसटायचा प्रयत्न केला आणि स्वतःचे पतंग घालवून बसले. दुपारी पोरं जेवायला घरी आल्यावर त्या लाल ढेपीची चर्चा सगळ्या चाळीत रंगली. संध्याकाळी म्हातारे कोतारे लोक आणि बाया बापड्या त्या ढेपेला बघायला सगळ्या गच्यात जमा झाले. संध्याकाळी हवा जोरात होती. आता ती ढेप पूर्वेकडून पश्चिमेकडे सर्रर्रर्रर्र करत फिरत होती. मध्ये येणाऱ्या सगळ्या पतंगांना कापत होती. वाऱ्याच्या दाबाने आणि ढेपेच्या धक्क्याने पतंग उडवणार्या पोरांची बोटं देखील कापली जात होती!
सकाळपासून उडत असलेली ती ढेप कोण उडवतय आणि कुठून हे मात्र कोणालाच कळत नव्हतं! आपल्या काळोख्या खोलीत एकटाच बसून छोटी फोर स्क्वेअर ओढत ओसी चे घोट घेत बसलेल्या सदाला कोणत्यातरी पोराने येऊन त्या ढेपीबद्दल सांगितलं. ते ऐकून सदाचे तांबरलेले डोळे अचानक चमकले. सदा म्हणाला “चल गच्चीवर. सदाने सिगारेटचं पाकीट आणि चपटी खिशात कोंबली आणि तो निघाला. सदाचं वय साधारण पंचावन्न. लग्नकार्य काहीच नाही. दोघी बहिणी लग्न होऊन आपापल्या घरी गेल्या. हा इथेच चाळीत राहिला. आई वडील गेल्यावर एकटाच. बारीक बारीक नोकऱ्या केल्या. वडिलांच्या fd आहेत आणि बहिणी पैसे पाठवतात. सदाचं मस्त चालू आहे. दोन वेळची दारू आणि जेवण सुटतं. त्याच्या गरजाच तेवढ्या होत्या आता.
चाळीचे जिने चढून सदा वर आला. त्याने आकाशात नजर टाकली आणि म्हणाला “राजन”! कोणाला काहीच उलगडा झाला नाही. सदाने घाईघाईत एक पतंगाला कणी बांधली. तो पतंग फिरकीला बांधून सदा कौलांवर गेला. चालत चालत मध्यावर आला. आता सूर्य मावळतीला आला होता. संधीप्रकाश पडला होता. अगदी वीस वर्षांपूर्वी पडला होता तसाच! त्या दिवशी राजन जोमात होता. सकाळपासून सदाचे दहा पतंग हातापासून कापले होते त्याने. सदा त्याच्या एरियातला एक नंबर पतंग उडवणारा. आज त्याचा इगो हर्ट झाला होता. सदाची जाम सटकली होती. संध्याकाळी वारा फिरला. आता चान्स सदाचा होता. हवा त्याच्या फेव्हर मध्ये होती. आता ह्या साल्या राजनचे पतंग पण हातापासून घसटायचे ह्या आनंदात पाच बियर पिऊन टाईट झालेला सदा होता. सदाने पतंग उडवला. पण मागून आलेल्या एका लाल ढेपेने त्याचा पतंग हातापासून कापला. सदाने रागाने मागे पाहिलं तर राजन आता त्यांच्या बिल्डिंगच्या कौलांवर उभा राहून परत हवेच्या फेव्हर मध्ये येत पतंग कापत होता. बिल्डिंग मधली पोरं ओरडली “ए सदा कायपो छे!” आणि फिदीफिदी हसली. सदाची सटकली. “हा साला चार महिन्यांपूर्वी एरियात राहायला आलेला राजन माझे पतंग हातापासून कापतो?” मग सदा पतंग उडवायच थांबवून बियर पीत राजनला आणि त्याच्याकडे कौतुकाने बघणाऱ्या पोरींना बघत होता. हळू हळू काळोख झाला. पोरं आणि लोक गच्चीतून खाली गेले. राजन अजूनही कौलांवर उभा राहून पतंग उडवत होता.
सदाच्या डोक्यात बियर बरोबर खून चढला होता. सदा हळूच मागल्या बाजूने कौलांवर चालत गेला आणि त्याने राजनला हलकेच धक्का दिला. राजन पाचव्या मजल्याच्या उंचीवर असलेल्या कौलांवरून गडगडत खाली पडला आणि चाळीच्या चौकातल्या लादीवर डोकं फुटून तिथेच मेला. सदा धावत परत गच्चीत आला आणि त्याने राजन पडल्याचा ओरडा सुरू केला. चौकात लोक जमले. राजनचे अंत्यसंस्कार झाले. पोलिसात अपघाती मृत्यू म्हणून नोंद झाली. त्या रात्री सदा झोपला आणि थोड्या वेळात त्याला त्याच्या मानेवर मांजा फिरत असून ती कापली जात असल्याची जाणीव झाली. तो झोपेत प्रचंड डिस्टरब होत तो मांजा सोडवू लागला. हे असं त्या रात्रीनंतर रोज रात्री होत असे. सदाची झोप त्याची दुश्मन झाली होती. मग सदा काहीही करून रात्री जागत असे. दिवसा चुकून झोप लागली तरी तेच फिलिंग. तोच मान कापणारा मांजा. राजनला ढकललं ती आठवण, प्रचंड गिल्ट!
अशीच काही वर्षे गेल्यावर एकदा राजन त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला “का मरालास मला? पतंग कापले म्हणून? मी तुला केव्हाच मारला असता, पण तुझी वेळ आली नाहीये अजून. पण ती वेळ येईल. काही वर्षांनी येईल. तुझी जायची आणि माझी यायची वेळ एकच असेल. तेव्हाही आकाशात माझी लाल ढेप असेल! तोवर तू जग, मरणाहून वाईट आयुष्य!” त्या दिवसानंतर राजन परत कधीच सदाच्या स्वप्नात आला नाही. पण तो मांजा इतकी वर्षे त्याची मान कापत त्याला झोपू देत नव्हता. झोपेसाठी सदाला बेशुद्ध होईपर्यंत दारू प्यावी लागत होती!
आता सदाचा पतंग आकाशात उंचावर होता. सदा त्या लाल ढेपेवर नजर खिळवून होता. आजूबाजूच्या सगळ्या गच्यामधून लोक हाच सामना बघत होते. लाल ढेप वेगाने खाली आली. सदाचा पतंग कापून तिचा मांजा सदाच्या गळ्यावरून फिरला. सदाच्या गळ्यातून रक्ताची चिळकांडी उडाली आणि सदाची शुद्ध जाऊन तो कौलांवरून गडगडत चाळीच्या चौकात पडला. राजन पडला होता तिथेच! त्याच वेळी शेजारच्या चाळीत राहणाऱ्या राजनच्या पुतणीला हॉस्पिटल मध्ये मुलगा झाल्याचा फोन आला आणि ती लाल ढेप मांजा तुटल्यासारखी आकाशात तरंगत नाहीशी झाली! आता गिरगाव चौपाटीवर सूर्य अस्ताला गेला होता! संक्रांत संपली होती!
Image by Dimitris Vetsikas from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
बापरे! ! खूपच वेगळी कथा..
वा खूपच सुंदर ! परत आलेला राजन कुतूहल चाळवून गेला. त्याला घेऊन पार्ट 2 लिहा.
छान लिहिली आहे
Thanks
खूपच मस्त