वाल्या….
भाई च्या घरी अनेक वर्षांनंतर पूजा घातली गेली होती. साधी पूजा, सत्यनारायण देखील नाही.
अनेक वर्षे विजनवासात घालवल्यानंतर, फासे सुलटे पडले होते. त्याच्या नावावर असलेले अनेक गुन्हे आता खूप मागे ढकलले गेले होते. त्याच्यावरील फाईल्स बंद झाल्या होत्या. उजळ माथ्याने भाई आज कित्येक दिवसांनंतर खुलेआम वावरत होता.
कित्येक वर्षांमध्ये भाई स्वतःच्या कुटुंबालाही धड भेटला नव्हता. म्हणजे त्याने त्यांची काळजी घेतली नव्हती असं नाही. दर महिन्याला गलेलठ्ठ पाकीट अगदी न चुकता घरी पोचवत होता तो.
मुलाबाळांना भाई खरंच अनेक वर्षांनंतर भेटला होता. पोरं थोडी बावचळलीच होती. पण आता भाई इतक्या वर्षांची कसर भरून काढणार होता.
पूजा संपली. भाईला काही कमतरता जाणवली. भाई म्हणाला, “गुरुजी, आज कथा नाही सांगितलीत?” गुरूजी म्हणाले “यजमान, आज सत्यनारायण नाही, म्हणून कथा नाही.”
“ते तुम्हाला ठावूक. पण पूजे नंतर कथा हवी. माझं मन राखायला, तुम्हाला आवडेल, जमेल ती कथा सांगा.” भाई म्हणाला. गुरूजी गावातलेच होते. त्यांना भाईची सगळी चित्तरकथा माहिती होती. कसल्याशा प्रेरणेने ते बोलायला लागले.
किर्तनात उत्तररंग लावावा, तशी त्यांनी वाल्या कोळ्यांची कथा सुरू केली. वाल्याचा आणि भाई च्या कथेत अनेक साम्यस्थळे होती. नाव न घेता, त्यांनी जणू भाईचं आख्यान सुरू केलं.
जमलेल्या पाहुण्यांना ते जाणवलं. त्यांनाच कशाला, भाईलाही जाणवलं ते. पण गुरुजींच्या जिभेवर आज सरस्वती नाचत होती. त्यांच्या प्रभावी वाक् प्रवाहात जनता बुडून गेली. अनेकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं, अगदी भाईचेही डोळे पाणावले अन् त्याच्या कुटुंबियांचे ही !!!
नारदाच्या भेटी नंतर वाल्या त्याचे अपराध स्वतःच्या कुटुंबा समोर मांडून त्यांची त्यात सहमती मागून, त्यांचा त्या पापात सहभाग कबूल आहे का? हे विचारतो हा भाग गुरुजी सांगत होते, तेव्हा श्रोत्यांच्या अंगावर काटा उभा राहिला !!!!
गुरूजी श्वास घ्यायला थांबले तसा एक सन्नाटा पसरला. भाईने घसा खाखरला. म्हणाला, “गुरूजी, कथा छान आहे, पण जरा इथेच थांबवा. मला कळलं तुम्ही ही कथा का सांगितलीत. आज तुमच्या समोरच मी माझ्या कुटुंबाला विचारतो, हो केली मी अनेक पापं, केले अनेक गुन्हे. आहात का तुम्ही त्यात शामील? उचलाल का त्यांचा भार? व्हाल सहभागी?”
चराचरात एक बोचरी शांतता पसरली. कुणाच्या तोंडून एक शब्दही फुटेना. दडपण असह्य व्हायला लागलं. भार असह्य व्हायला लागला. त्याखाली चेंगरून जायला होईल असं वाटू लागलं.
अखेर भाईचा धाकटा मुलगा उभा राहिला. वकीली शिकत होता तो. म्हणाला, “सिध्द होतील तितक्या आरोपातील पापात सहभागी व्हायला मी तयार आहे!” त्याचे बोल ऐकून चोहोबाजूंनी टाळ्यांचा कडकडाट झाला. भाईने आपल्या धाकट्या मुलाला प्रेमाने कवेत घेतलं.
मिठीत असताना धाकटा आपल्या कर्त्रुत्ववान बापाच्या कानात कुजबुज ला, “मात्र एकही आरोप सिद्ध होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या, आणि ते कसं करायचं हे मलाही शिकवा !!!!”
गुरूजींना भरघोस दक्षिणा मिळाली आणि वाल्याला त्याचा वारस मिळाला !!!!!
Latest posts by prashantp (see all)
- मूळ पुरुष- भाग २/२ - March 5, 2020
- मूळ पुरुष- भाग १/२ - March 3, 2020
- करकोचा आणि कादंबरी- प्रशांत पटवर्धन. - February 16, 2020
झकास
आधुनिक वाल्या कोळी