तुझ्यावाचून करमेना…- कौस्तुभ केळकर
तोच होता तो.
विवेक .
बरोबर नेमक्या जागी त्यानी गाडी पार्क केली.
सावकाश पण दमदार पावलं टाकत, तो खाली ऊतरला.
कडक ईस्त्रीचा शर्ट.
ईन केलेला.
पाॅलीश्ड शूज..
पृथ्वी व्यापून टाकणारा तो सेंटचा वास.
अगदी कुठल्या तरी बिझनेस मिटींगला आल्यासारखा अपटूडेट..
अजूनही तसाच.
एक वर्षापूर्वी बघितला होता, तसाच.
खरं म्हणजे तोच बघायला आला होता सईला.
खानदानी श्रीमंती..
बंगला , गाडी , फाॅरेन ट्रीप्स सबकुछ.
तो राजबिंडा.
तीन पिढ्यांपासून चालत आलेला, सेटल्ड कन्स्ट्रक्शनचा बिझनेस.
तो स्वतः स्ट्रक्चरल इन्जीनिअर.
सई आर्किटेक्ट.
आख्ख्या जगाला असं वाटत होतं की, असं स्थळ शोधूनही सापडणार नाही.
सईशी तो निवांत बोलला.
त्याच्या फ्युचर प्लॅन्सविषयी.
कुठल्यातरी अगडबंब टाऊनशीपविषयी..
सगळीकडे मी माझं.
जणू तो रेमण्डस् मॅन होता.
कम्प्लीट मॅन..
परफेक्ट मॅन..
त्याला फक्त फोटोतली रिकामी जागा भरायची होती.
तीनं आॅफिस जाॅईन करण्याविषयी विचारलं..
बाय आॅल मीन्स..
पण त्याची फारशी गरज नाही.
हौस म्हणून आलीस तर हरकत नाही.
तिचा होकार तो गृहीत धरून चालला होता.
तरीही ..
तरीही सई नाही म्हणाली.
कुठं तरी त्याचं गृहित धरणं खटकत होतं.
मी , माझा याच्या गर्दीत ‘आपण दोघं’ कुठंच ऐकू येत नव्हतं.
कॅन्व्हास आधीच भरलेला होता.
तिच्यासाठी कोपर्यात एवढीशी जागा होती.
तिला हवा होता मोकळ्या आभाळासारखा रिकामा कॅन्व्हास.
दोघांना मिळून रंगाची मनसोक्त ऊधळण करता येईल ,असा अवकाश..
मग सलीलच प्रपोजल आलं.
आर्टिस्ट होता तो..
स्वतःचा स्टुडिओ..
लाख रूपयाला विकलं गेलेलं त्याचं पोट्रेट.
जहांगीरमधलं दरवर्षी भरणारं त्याचं एक्झीबीशन..
या कशाविषयीही तो काहीही बोलला नाही.
त्यानं सईची चौकशी केली.
तिचे प्लॅन्स , तिची स्वप्नं..
माझ्या स्टुडिओत भरपूर जागा आहे.
तिथेच तुझं आॅफिस सुरू करता येईल.
अर्थात तुला आवडत असेल तर…
त्याचा सूर ‘तू अन् मी’ असा लागलेला.
रिकाम्या जागा भरा नाही..
मॅच दि पेअर..
पटलाच तो.
सलीलबरोबर हे वर्ष तरंगत गेलं..
सलील भरपूर स्पेस द्यायचा.
पण त्या स्पेसमधल्या प्रत्येक अणूरेणूत, तो जाणवायचा.
गरज लागली तर दोघं एकमेकांच्या फिल्डमधे डोकवायचे.
तेवढ्यापुरतंच.
पण संध्याकाळी सहा वाजले की दुकानबंद.
दोघं आणि फक्त ती दोघं.
आख्खं जग विसरून जायचं त्या दोघांना .
आणि ती दोघं आख्ख्या जगाला.
दोघंही आपल्या फिल्डमधे पुढची पायरी गाठत होते.
ठरवून त्यांनी दोघात तिसरा आणायचं ठरवलं होतं.
तशी चाहूलही लागली होती.
म्हणूनच सेलीब्रेट करायला ती दोघं ईथं, गोव्याला आली होती.
ब्लू लगून रिसाॅर्टमध्ये.
विवेकच्या गाडीतून कोण ऊतरतं, याकडे सई टक लावून बघत होती.
ती..
विवेकला साजीशीच.
भारी डिझायनर साडी.
हातात सोनेरी पर्स.
मंद सुगंधी सेंटचा शिडकावा.
एटिकेटस् सांभाळणारी.
विवेकला साजीशी..
मेड फाॅर ईच आदर टाईप.
दोघं खाली ऊतरली.
मंद पावलं टाकत लाॅबीकडे गेली.
एकंदर ती खुष दिसत होती.
सई तिच्या रूमच्या गॅलरीतून हे बघत होती.
तिच्या कपाळावर नकळत एक आठी ऊमटली.
सलील शेजारी कधी येवून ऊभा राहिला कळलंच नाही.
क्या हुवा ?
एकदम मूड डाऊन !
तिनं सगळं सांगून टाकलं.
सई…
तुझा निर्णय बरोबरच होता.
पण म्हणून दुसर्यांचा चुकीचा, असं होत नाही.
ती मुलगी विवेकबरोबर आनंदात आहे, याचं तुला दुःख होतंय.
तिला तशीच लाईफस्टाईल आवडत असेल.
आफ्टर आॅल तो तिचा चाॅईस असेल
अॅन्ड शी ईज एन्जाॅयींग देअर.
सेम अॅज यू आर हिअर..
सलील परफेक्ट बोलला.
सईला आपण का अस्वस्थ झालोय ते कळलं.
खरंच आपलं थिंकींग बदलायला हवं.
सलीलनं काॅफी मागवली.
“लेटस् विश हॅपी मॅरीड लाईफ फाॅर मिस्टर अॅन्ड मिसेस विवेक ,अॅन्ड आॅफ कोर्स फाॅर बोथ आॅफ अस.”
सईचा गेलेला मूड परत आला.
तिला पिसाहून हलकं वाटायला लागलं.
पिसाच्या मनोर्यासारखी ती सलीलच्या खांद्यावर झुकली.
प्यार किये जा ….
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021