नशा !!- पूजा पाठक
त्या दिवशी ढोल प्रॅक्टिस ला गेले आणि पहिल्यांदाच दिसला तो .. गोरा म्हणजे लक्ख गोरा .. नाजूक जीवणी .. शार्प जॉ लाईन .. सरळ नाक .. लालसर ओठ .. कानात भिकबाळी .. सव्वासहा फूट उंच .. अगदी बॉडी बिल्डर नाही म्हणता येणार पण मजबूत शरीर .. अंगात पांढरा शर्ट, कोपरापर्यंत दुमडलेला .. घामाने ओलसर झालेला .. ठळकपणे जाणवणारे त्याचे ढोल वाजवून लालसर झालेले गोरेपान पण मजबूत, अधून मधून हाताच्या शिरा आणि किंचित केसाळ दिसणारे त्याचे हात .. हिरवट घारे डोळे .. प्रोमीनंटली दिसणारं अॅडम्स ऍपल .. गुळगुळीत शेव्ह केलेली ! पण म्हणून माचो नाही असं अजिबात नाही .. वो बात तो उसकी आंखों में थी ! साखरभात खाता खाता लवंगीचा ठसका लागावा अशी भेदक नजर आणि चेहऱ्यावर कमालीचा ऍटीट्युड .. आधी केलेल्या वर्णनाच्या अगदी विरुद्ध !
मला बघून न बघितल्यासारखं करणारा तो .. त्याचं हेच दुर्लक्ष प्रचंड अपील झालेलं मला .. सगळ्या गोंडा घोळणाऱ्या मुलांमध्ये , आणि हो – हँडसम मुलांमध्ये बरका ! वेगळाच वाटला तो ! ढोल वाजवताना डोळ्याच्या कड्यातून पाहत राहायचे मी त्याला .. लालेलाल झालेला .. चेहरा आणि अंग घामेजलेल्या अवतारात तो जाम सेक्सी वाटायचा !
जरा सर्किट च होता तो ! बाहेरच्या देशात राहणारे लोक दिवाळीत घरी येतात, हा पठया गणपतीमध्येच यायचा ! ढोल वाजवायला, जागून देखावे करायला आणि बघायलाही ! विसर्जन मिरवणुकीत जागायला !
प्रॅक्टिस संपली. पहिली सुपारी मिळाली. मानाचा गणपती ! सगळ्या मुली नऊवारी नेसून तयार .. आणि मुलं कुर्ता – फेट्यात ! आम्ही आवरून निघणार इतक्यात याचा फेटा सुटला .. आणि विश्वामित्राचा नेम मोडायला हि मेनका सज्ज झाली !!
“बस खाली खुर्चीवर ..” हुकुमी आवाजात मी म्हणाले .. तो गपचूप बसला .. आईने सकाळीच हौसेने केशराचं अत्तर दिलं होतं लावायला .. त्याचा मंद सुगंध येत होता .. एकीकडे फेटा बांधता बांधता माझं बारीक लक्ष होतं त्याच्याकडे .. त्याची घालमेल बघून हसायलाही येत होतं ! एका क्षणी जेव्हा अगदी त्याचं डोकं माझ्या उरोजांपाशी आलं .. आणि त्याच्या कानाच्या पाळ्या अगदी लाल झाल्या ! चेहरा तरीही स्थितप्रज्ञ ठेवलेला ! फेटा बांधून झाला, आणि माझं लक्ष गेलं त्याच्याकडे .. सहज त्याच्या कपाळावर अंगठा टेकवला .. “चंद्रकोर मस्त दिसेल तुला ..” म्हणून मी गंधाची बाटली हातात घेतलीही ! तो पुतळ्यासारखा बसून होता .. अगदी त्याच्या नाकाच्या इंचभर अंतरावर माझं नाक होतं .. माझ्या हाताने त्याचा चेहरा अडजेस्ट केला .. खरंतर काही कारण नव्हतं पण उगाच त्याच्या कपाळावरून अंगठा फिरवला .. कशी आणि कोणत्या धुंदीत काढली मी ती चंद्रकोर काय माहित !! त्याच्या बंद डोळ्यांच्या बुबुळाच्या हालचालीवरून त्याची तगमग जाणवत होती .. श्वास कोंडल्यासारखा चेहरा झाला होता अगदी त्याचा ! मी उगाच वेळ काढत राहिले आणि इतक्यात त्याने डोळे उघडले .. थेट डोळ्यात बघितलं माझ्या .. ते आव्हान मी कधीच विसरू शकणार नाही ! अगदी बघता बघता त्याने फेटा विस्कटून टाकला .. “परत बांधून देशील ??” .. त्याची नजर जराही हटत नव्हती .. माझा खेळ माझ्या अंगाशी आला होता .. कसाबसा मी फेटा बांधला .. निघताना त्याच्या चेहऱ्यावर असणारं ते गूढ हसू .. पोटात गुदगुल्या करून गेलं उगाच !
मग अशाच काही सुपार्या झाल्या .. नजरबंदी सुरूच होती .. अधूनमधून त्याचं मुद्दाम एखादा धक्का देणं .. हाताला हलका स्पर्श करणं .. वेडावून जात होतं ! इतर गोंडाघोळ मुलांसारखा नव्हता तो .. त्याचं ते अटेन्शन कमांड करणं .. सॉलिड होतं अगदी !
आणि मग तो दिवस आला .. शेवटची सुपारी, विसर्जनानंतरची ! कार्यक्रम संपवून कपडे बदलण्यासाठी आम्ही काहीजण मैत्रिणीच्या फ्लॅट वर आलो .. गुंतलेल्या माळा काढता काढता वैताग आलेला .. आणि अचानक तो आला .. आजूबाजूला कोणी नाही बघून सरळ केस बाजूला केले आणि माळ सोडवू लागला .. मला न विचारता ! तीच कमांड, जी मी केली होती फेटा बांधताना ! उगाच अगदी जवळ येणं .. बोटांनी मानेला हलका स्पर्श करणं .. त्याचा तो ऑरा आणि तो डोमिनन्स .. तो आव्हानात्मक खेळ आता नशेसारखा चढायला लागला होता .. “बास” सहन न होऊन मी म्हणाले .. “काय बास .. सुरुवातही तूच करायची आणि शेवटही ??” म्हणून त्याने मला जवळ ओढलं .. उगाच ओठांवरून अंगठा फिरवत राहिला .. त्याचं हलकेच गालापाशी नाक घासणं .. पण बाकी काहीच नाही .. किती दुष्टपणा करावा माणसाने !
शेवटी मी डोळे उघडले .. समोर तो उभा होता .. मंद स्मित करत .. ते आव्हान संपलं होतं ! “परत खेळू हा खेळ .. पुढच्या वर्षी ! उद्या जातोय मी परत !” माझ्या अगदी कानाजवळ येत तो बोलला .. पुन्हा तेच ! स्पर्श न करता स्पर्श करणं ! तो हि इतका मादक ! हि नशा आता हवीहवीशी वाटत होती ! त्या नशेची कुपी आता पुढल्या वर्षी उघडणार होती !!
Image by Harpreet Batish from Pixabay
- दिवाळी २०२० स्पेशल- १९ - November 27, 2020
- दिवाळी २०२० स्पेशल- ३ - November 13, 2020
- पाडस - October 23, 2020
खूप छान लिहिलंय… अंगावर रोमांच आले 😊
Wah 👌👌
mastach
आहा
सगळं डोळ्यासमोर आलं…👌👌👌
Bhari..👍