आज_मै_उपर…- अभिजीत इनामदार

आज एवढं कंप्लीट करुनच जा. साहेबांनी सांगितले.
अॉलरेडी ४ वाजून गेले आहेत, हे काम काही लवकर संपत नाही. आज माझी ५.५५ ची ट्रेन चुकणार बहुतेक.
नेहा काहीशी स्वतःशी काहिशी तिची मैत्रीण कम कलीग अनिताशी बोलत म्हणाली.
अनिता – हे नेहमीचंच आहे. ह्यांना काय गं. बॅन्केने घर दिलंय. बरं घरी कोणी नाही. बसतात तसेच. पण आपलं काय? आपल्याला आपापल्या ट्रेन पकडून घर गाठायचं असतं. बरं नुसतं घरी पोहोचलं की झालं असं तर होत नाही. परत घरी जाऊन घरचं सगळं आवरायचं, स्वयंपाक, मुलांचा अभ्यास.
नेहा – त्याबाबतीत मी सुखी आहे बाबा. मला माझ्या अनिलची खुप मदत असते, प्रत्येक बाबतीत.
अनिता – हो बाई. तेवढ्यासाठी मात्र मी तुझ्यावर कायम जळत राहणार गं.
नेहा – चलं तुझं आपलं काहीतरीच. बरं चल तुझ्याशी बोलत वेळ जाइल. मला ते सगळे रिपोर्ट द्यायचे आहेत. अन निघायचे आहे.
नेहा आणि अनिता. एका बॅन्केत काम करणाऱ्या मैत्रीणी. एकत्रच ह्या बॅन्केत रुजु झालेल्या आणि आगदी सहज सूर जुळून गेलेल्या.
नेहा ने पटापट काम करायला सुरुवात केली. भराभर काम उरकलं. काम अपेक्षेपेक्षा लवकर झाले. सगळे रिपोर्ट्स साहेबांच्या समोर आणुन ठेवले. साहेब पण चकीत. पण त्याचबरोबर खुष सुध्दा. कारण ह्या कामाने त्याने वरती दिलेली कमिटमेंट सुध्दा पुर्ण होणार असते.
नेहा ने अनीलला मेसेज केला. काम झाले. निघते आहे. ५.५५ ची पनवेल मिळेल. तूझे काय? पोहचलशील ना वेळेत? तिच्या शब्दात काळजी प्लस त्याला पाहण्याची ओढ दोन्हीही.
त्याचा रिप्लाय आला निघतोय. पण आज वेळ झाला आहे. वेळेत वडाळ्याला पोहचेन की नाही माहित नाही.
उत्तरादाखल तिने त्याला रडणार्‍या स्माईलीज पाठवल्या.
तीने भरभर आवरले. फ्रेश होऊन आली. धावतच बॅन्केबाहेर पडली. नेहमीचा स्टॉप गाठला. बस नेहमीप्रमाणेच खचाखच भरलेली. रोजच्याच लोचट अन हावरट स्पर्शांना कोपराने टोलावून आणि लाळघोट्या डोळ्यांना आपल्या भेदक नजरेने दुसरीकडे बघायला लावून बसमध्ये शिरली. सुट्टे पैसे वगैरे प्रकरण मिटवून दोन स्टॉप नंतर CST गाठले. तिने घड्याळ पाहिले. घड्याळ ५.४५ झाल्याचे दाखवत होते.
धावतच तिने सबवे गाठला. खेळणी वाले, रुमाल, सॉक्स, कपडे, हेडफोन, त्यांच्या अॅक्सेसरीज आणि अजून बरंच काही विकणाऱ्यांसाठी हा रोजचाच दिवस. त्यांच्यासमोर वस्तू घेणार्‍यांची रोजचीच गर्दी. प्रत्येकजण आपापल्या मालाची विक्री ओरडून ओरडून करत होता. सबवे मध्ये अक्षरशः कोलाहल. त्यातून मार्ग काढत ती पुढे जात राहते. चुकार निर्लज्ज स्पर्श तिच्या घाईचा गैरफायदा घेऊ पाहतात. शक्य तितके सावरून त्या स्पर्शांना चकवून ती स्टेशन मध्ये पोहचते. नेहमीची ट्रेन आता निघण्याची वेळ झालेली असते. ट्रेन निघण्याची ती विशिष्ट शिट्टी वाजते. धावतपळत ती नेहमीचा मधला लेडिज फर्स्ट पकडते. अजून अनिलचा म्हणजे तिच्या नवर्‍याचा काही मेसेज नाही.
अन अशातच सीएसटी पनवेल ट्रेन निघते…
नेहा विचार करत – श्या… हा जर वेळेत नाही आला तर काय उपयोग एवढी धावपळ करून.?
दोन वर्षे… हो दोन वर्षे झाली तिला ह्या बॅन्केत नोकरीला लागून. रोजचे असेच शेड्युल झाले होते. ती सीएसटी वरुन ट्रेन पकडत असे. तर अनील गोरेगाववरुन. त्याला अंधेरीत येऊन हार्बर लाईनची ट्रेन पकडावी लागायची. ती पकडून तो वडाळ्याला पोहचे अन मग तो सुद्धा तीच ट्रेन पकडत असे ज्यामध्ये नेहा असे. जर तो वेळेत पोहचला अन तसा मेसेज तीला मिळाला तर ती वडाळ्याला लेडीज फर्स्ट मधून उतरुन त्याच्या बरोबर सर्वांसाठीच्या फर्स्ट मध्ये चढत असे.
बसायला जागा मिळायची नाहीच कधी. पण मग ती दरवाज्याच्या बाजूच्या ग्रीलला टेकून उभी राही. अनील तिच्या दोनी बाजूला हाताने ग्रील पकडून उभा राही. तिचं हक्काचं संरक्षक कडं आपोआप तयार होई. आता तीला ग्रील पकडून उभे राहण्याची गरज नसते. जरी गेला तोल, तरी तिचं संरक्षक कडं तिला सावरत असतं. त्यामुळे काळजी नसते.
सकाळी सीएसटी ला उतरुन अॉफिसला जाताना ते आत्ता वडाळ्याला पोहोचेपर्यंत तीला जळूसारख्या चिकटलेल्या वखवखलेल्या नजरा, लालसेने तिच्या गोर्‍यापान मौंसल दंडावर किंवा हातावर वा खांद्यावर मारलेले धक्के तिच्या संरक्षण कड्यात शिरल्यावर आपोआपच गळून पडत. ती आश्वस्त होई. तिचा चेहरा खुलून जाई. आणि मग दिवसभर काय झाले ते दोघे एकमेकांना सांगत असत. कधी जर त्याचे टायमिंग चुकले तर तीला एकटीला पुढे जावे लागत असे. अशा वेळेस तिने वडाळ्याला उतरुन त्याची वाट पाहणे ह्याला काही अर्थ नसे कारण इथून पुढे येणारी प्रत्येक ट्रेन पहिल्या ट्रेन पेक्षा जास्त भरलेली असायची.
आज काय होते आहे कोणास ठाऊक? नेहा स्वतःशीच पुटपुटली. वडाळा जवळ आलं तशी उगीच तिची धडधड वाढली.
तिकडे अनीलची ट्रेन आता वडाळ्यात शिरत होती. त्याचं संपूर्ण लक्ष पलीकडच्या प्लॅटफॉर्म कडे. नुकतीच आलेली पनवेल निघण्याच्या बेतात. त्याने त्याची ट्रेन थांबण्याची वाट न पाहता थोडी स्लो झालेल्या ट्रेन मधून उडी घेतली. धावतच फुटओव्हर  ब्रीज गाठला. जिथे पनवेल लागली होती त्या फ्लॅटफॉर्म कडे धावला. ट्रेन ने आता धावायला सुरुवात केली होती. वेग पकडायला सुरुवात केली होती. तेवढ्यात त्याचा मोबाईल किणकिणला. नक्की नेहाचा मेसेजे असेल. आहेस ना? पण आता मेसेज ला रिप्लाय करायला वेळ नव्हता. तो तसाच धावत ब्रीज उतरु लागला. पण ट्रेन ने वेग घेतला.
तिकडे नेहाच्या जीवाची घालमेल. काय झालं असेल? पोहचला का नाही तो. काहीच मेसेज नाही. म्हणजे नसेल पोहचला. आर्धा अधीक प्लॅटफॉर्म सोडून पुढे गेलेल्या आणि वेग पकडलेल्या ट्रेन चा काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे वेग मंदावतो. पण बस एक दोन मिनिटेच. ट्रेन पुन्हा वेग पकडते. मार्गस्थ होते.
त्याचा काही मेसेज नाही म्हणजे तो पोहचू शकला नाही तर. काळजी आणि हिरमोड दोन्हीही गोष्टींमुळे तिचा चेहरा कोमेजून जातो. अन नेमका त्याच वेळी तिचा मोबाईल किणकिणतो.
अनिलचा मेसेज असतो. मी आहे. पुढच्या स्टेशन वर पुढच्या डब्यात ये.
मघाशी जेव्हा ब्रीजवरून अनीलने पाहिले की ट्रेन ने वेग घेतला आहे तेव्हा त्याचाही धावण्याचा वेग कमी झाला. पण अचानक थांबू लागलेली ट्रेन पाहून त्याने राहिलेल्या चार पाहिऱ्यांवरुन उडी घेतली आणि दुसर्‍या मिनीटाला नेहमीचा डबा गाठला. केवळ आपल्या साठीच ट्रेन थांबली की काय असं त्याला वाटून गेलं.
लेडीज फर्स्ट मधून मध्ये फक्त जाळी असलेल्या सर्वांसाठीच्या फर्स्ट कडे ती बघते. घामाने ओथंबलेल्या चेहर्‍यावर गार गार वारा घेत दारात उभा असलेला अनील तीला दिसतो.
आपलं संरक्षण कडं परत एकदा धावतपळत आपल्यासाठी पोहोचलं म्हणून नेहाचा चेहरा खुलतो. ती मोहरते. प्रफुल्लित होते. आणि तीचं आवडतं गाणं गुणगुणू लागते.
“आज मै उपर… आसमां निचे…
आज मै आगे… जमाना है पिछे…
Image by Rehan Ansari from Pixabay 
Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

4 thoughts on “आज_मै_उपर…- अभिजीत इनामदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!