मूळ पुरुष- भाग २/२

हॉटेलचं बुकींग होतंच. रूम वर थोडी विश्रांती घेऊन आम्ही संध्याकाळी समुद्र किनारी भटकायला गेलो. अख्ख्या किनार्‍यावर फक्त आम्ही दोघेच होतो. एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकत आम्ही जोडीने त्या किनार्‍यावरची वाळू तुडवत होतो. एकमेकांशेजारी चालता चालता एकमेकांच्या हातांचा होणारा हलकासा, पुसटसा स्पर्श, अंगावर काटा फुलवत होता. समुद्राचा भणाणता वारा माझ्या कानांवर आदळत होता. त्या वार्‍याने माझ्या डोक्यात परत गुणगुण सुरू होते की काय असं वाटायला लागलं. मला तसं व्हायला नको होतं. म्हणून घोगर्‍या आवाजात मी म्हटलं, “सरला, आपण रूमवर परत जाऊया? अत्ताच्या अत्ता.” लाजेनं चूर चूर होत तिने होकारार्थी मान डोलावली. माझ्या बोलण्याचा तिने काय अर्थ घेतला आहे ते जाणवून मला खोलवर गुदगुदल्या झाल्या.

हॉटेलच्या रूमवर परत येईपर्यंत सगळीकडून अंधार दाटून आला होता. पॅसेजमधल्या मिणमिणत्या बल्बच्या प्रकाशात, माझ्याकडच्या किल्लीने मी अडखळत दाराचं कुलूप उघडलं. आत अजूनच गच्च अंधार भरलेला होता. चार पावलं पुढे जाऊन मी मागे वळून पाहिलं. मावळत्या संधिप्रकाशात अजून दारातच उभ्या असलेल्या सरलाची कमनीय आकृती उठून दिसत होती. अर्धप्रकाशात खुणावणारे तिच्या देहाचे उतार चढाव, फडफडणार्‍या पदराखालचे उभार मला आव्हान देत होते. झपाटल्याप्रमाणे पुढे होऊन मी सरलाला खोलीत ओढलं आणि दरवाजा बंद करून घेतला. मनात उसळणार्‍या आवेगांच्या तालावर तिच्या वस्त्रांचा अडसर मी दूर करू लागलो. तिच्या प्रत्येक स्पर्शासरशी माझा मेंदू उकळल्या सारखा झाला. पण फक्त मेंदूच !!! आवेग, कामना, लालसा, मेंदूपुरतीच बंदिस्त राहिली होती. माझ्या इंद्रियाला जणू त्याच्यात काही स्वारस्यच नसल्यासारखं भासत होतं. त्या जाणिवेसरशी माझ्या डोक्यात चढलेला कामज्वर झपाट्याने उतरला. हात लुळे पडल्यासारखे झाले आणि रिता झाल्याप्रमाणे मी खोलीतल्या पलंगावर बसकण मारली.

नक्की काय झालंय हे कळायलाही सरलाला वेळ लागला. हलकेच ती बेडवर माझ्या पाठीशी येऊन बसली. अगदी बेड समोर असलेल्या आरशात मला तिची माझ्या मागे बसलेली आकृती दिसत होती. तिने तिचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. त्या आश्वासक स्पर्शाने मी जरा स्थिरावलो. तिने एका हाताने माझं तोंड वळवून माझ्या गालावर हलकेच ओठ टेकवले. परत माझा मेंदू उकळल्यासारखा झाला. वासना, लालसा, आवेग माझ्या मेंदूत फेर धरू लागले आणि परत घडणार्‍या घटनांमधे काहीही स्वारस्य नसल्यासारखा माझ्या इंद्रियाने असहकार पुकारला. असह्य होऊन मी ताडकन उठलो आणि आरशाच्या दोन्ही बाजूला हात रोवून, मान खाली घालून पराभूतासारखा उभा रहिलो. एकदम जाणवलं की आरसा रिकामा नव्हता ! मान वर करून मी आरशात पाहिलं, तर दोन टकटकीत, न मिटणारे, पिंगट डोळे आरशामधून माझ्याकडे टक लाऊन पाहत होते. वर्षानुवर्षांचं नैराश्य त्या डोळ्यांमधे साकळलं होतं ! मी दचकून मागे वळून पाहिलं. मागे कोणीच नव्हतं आणि परत वळून आरशात पाहिलं, तर तिथेही त्या डोळ्यांचा मागमूस नव्हता ! माझ्या डोक्यात मागे कसलीशी गुणगुण व्हायला लागली.

रात्रीचा अंधार कधी सरूच नये असं मला कितीही वाटत असलं तरी सूर्य उजाडायचा काही थांबला नाही. सरलाच्या नजरेला नजर द्यायची माझी काही हिंमत होत नव्हती. कधीकाळी वाचलेले आणि तेव्हा अपरिचित वाटणारे, ’इरेक्टाईल डिस्फंशन’, ’परफॉर्मन्स एन्झायटी’, ’सेक्शूअल डिसऑर्डर’ वगैरे शब्द अक्राळविक्राळ स्वरूप धारण करून माझ्या भोवती नाचत होते. सरला बिचारी जणू काही झालंच नाही असं भासवत वावरत होती. आधीच ठरवलं होतं त्याप्रमाणे प्रायव्हेट रिक्षा करून जवळपासच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायचा कार्यक्रमही पार पडला. पण कशाचीच चव नसलेल्या आजारी माणसासारखी माझी अवस्था होती. सरला शक्य होईल तितका  माझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत होती आणि मी मात्र एकशब्दी उत्तरं देऊन तिच्यापासून दूर राहत होतो. त्या आणि पुढच्या दोन रात्रीही मी प्रयत्न करून पाहिला, पण दुर्दैवाने काहीही फरक पडला नाही. तीनही रात्री आरशात, नैराश्य आणि विफलता भरलेले, टकटकीत, न मिटणारे, पिंगट डोळे मात्र आवर्जून दिसले होते. माझे स्वतःचे डोळेही बहुधा तेवढ्याच नैराश्य आणि विफलतेने भरलेले दिसत असावेत.

सकाळी हॉटेल सोडायला चांगलाच उशीर झाला. मला सकाळी जाग आली तीच सरलाच्या हलक्या मुसमुसण्याने. रडण्याचा आवाज बाहेर फुटून माझी झोपमोड होऊ नये याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. माझ्याकडे पाठ करून रडू दाबण्याच्या या प्रयत्नात तिचं सारं शरीर गदगदत होतं. स्वतःची त्या क्षणाइतकी लाज मला आधी कधीही वाटली नव्हती, अगदी आदल्या तीन रात्रींमधल्या माझ्या संपूर्ण पराभवाच्या क्षणीही. मी फक्त स्वतःचाच विचार करत कुढत बसलो होतो पण या काळात ती कुठल्या मनःस्थितीमधून जात असेल याचा मी विचारच केला नव्हता. स्वतःची निर्भत्सना करत मी थोडं घाबरतच सरलाच्या पाठीवर हात ठेवला आणि हलक्या स्वरात पण अगदी मनापासून तिला “सॉरी” म्हणालो. माझ्या या स्पर्शासरशी ती आवेगाने वळून माझ्या कुशीत शिरली आणि तिने तिच्या सार्‍या कोंडमार्‍याला अश्रूंची वाट उघडून दिली. तिच्या पाठीवर हलकेच थोपटत असताना माझ्याही डोळ्यांमधलं पाणी मला आवरता आलं नाही. मळभ बरसून वाहून गेलं आणि त्या वासनारहित मिठीत असताना आमचा दोघांचाही डोळा लागला.

दिवस उशीरा सुरू झाल्याने मूळ पुरुषाचं स्थान असलेल्या गावी पोहोचायला दुपार उलटून गेली. आधी तिथल्या हॉटेलमध्ये सामान टाकलं. हॉटेलच्या मॅनेजरला, आम्हांला जायचं होतं ते मंदीर कुठे आहे ते माहिती नव्हतं. पण त्याच्याच सांगण्यानुसार स्टॅन्डवरून आम्हांला रिक्षा आणि माहिती दोन्ही नक्कीच मिळाली असती. स्टॅन्डवर अनेक रिक्षावाल्यांकडे चौकशी केली, तेव्हा एका म्हातार्‍याला त्या मंदिराची जागा साधारण कुठे आहे याची माहिती होती. “कसलं मंदीर साहेब, पडकं घर आहे निस्तं. कुत्रंसुधा फिरकत नाही तिकडे. तुम्ही रिटर्न भाडं घ्या. नायतर परतनार कसे? मी थांबेन बाह्येर.” आम्हांला तर कसलीच माहिती नव्हती, तेव्हा त्याचा सल्ला मान्य करायचं ठरवलं. जायचा रस्ता मात्र फार सुंदर होता. दोन्ही बाजूंनी चिमुकल्या रस्त्यावर झुकलेली झाडं, हवेतला सुखद गारवा आणि सरत्या दिवसातला ऊन-सावलीचा खेळ. रिक्षावाल्याने  शोधशोधून एका अस्पष्ट पायवाटेच्या बाजूला रिक्षा थांबवली, तेव्हा हा सुखद प्रवास थांबल्याचं दुःखच झालं. “हीच वाट असायला पायजे. फार लांब नसंल. जावा तुमी, पर लवकर आटपा, अंधार अगदी व्हायलाच आलाय. जावा आता. मी थांबतो हितंच.” तो म्हणाला.

पूजेच्या सामानाची पिशवी सावरत आम्ही दोघे त्या पायवाटेने निघालो. रिक्षावाल्याचं बरोबर होतं, पायवाटेने अगदी दोनच वळणं घेतल्यावर आम्हांला ते घर दिसलं. कातरवेळ अगदी दाटून आली होती. चराचरावर एक उदास, करडी छटा पसरली होती. आबाळ आणि दुर्लक्ष यांनी त्या घराची अगदी दशा केली होती. एकुलत्या एक दारावर वेड्यावाकड्या अक्षरात “मूळ पुरुष” एवढच लिहिलं होतं फक्त. दरवाजा उघडाच होता, नुसता लोटून घेतलेला. घरात तर जवळपास अंधारच होता. हवेत एक प्रकारचा कोंदट, उबस्स दर्प होता. त्यामानाने धूळ वगैरे फारशी नव्हती. खोलीतच एक छोटीशी घुमटी असल्यासारखं वाटत होतं आणि त्यापुढे एक लहानशी घंटा टांगलेली दिसत होती. मी सरलाला दिवा लावायला सांगितलं. दिव्याची तयारी करून पुढे जाताना सरलाचा त्या घंटेला धक्का लागला आणि एक विचित्रसा किण्ण्ण्ण असा ध्वनी उमटला. त्या आवाजासरशी माझ्या डोक्यात मागे कसलीशी गुणगुण व्हायला लागली. माझं मस्तक त्या गुणगुणीने भरून जायला लागलं. दिवा लावायला सरलाने काडी ओढल्याचा आवाज झाला. दिवा पेटताच ती घुमटी उजळून निघाली. आत मूर्ती वगैरे काही नव्हतंच. फक्त एक मुखवटा होता आणि त्या मुखवट्यावर ते डोळे होते. टकटकीत, न मिटणारे, पिंगट डोळे ! गेले चार दिवस मला भेडसावणारे तेच ते डोळे, त्या मुखवट्यावरून माझ्याकडे रोखून पाहत होते ! मात्र अत्ता त्या डोळ्यांमधे कुठलीच निराशा, कुठलंच वैफल्य नव्हतं. होता तो दृढ निर्धार. ते डोळे पाहून मी हात वर करून आपोआप पुढे झालो. डोक्यात मागे गाजणार्‍या गुणगुणीने कळस गाठला होता. पुढे सरकताना माझा हात त्या एकमेव घंटेला लागला. मात्र यावेळेस नुसता किण्ण्ण्ण आवाज न होता शेकडो घंटा घणघणण्याचा प्रचंड ध्वनी माझ्या कानांवर आदळला. त्यात अजून पडघम वाजल्याचा आवाज मिसळून माझं भान हरपलं.

म्हणजे मी शुद्धीत होतो. हलत चालत होतो, पण मला काही ऐकू येत नव्हतं की काही समजत नव्हतं. मधे मधे तुकड्यातुकड्याने काही चित्र उमटत होती. मुखवट्यासमोर मी घातलेलं साष्टांग लोटांगण. आमचा परतीचा प्रवास. थोडं जेवून घेणं, हॉटेलला परतणं आणि माझं तब्ब्येत ठीक नसल्याचं सांगून बेडवर आडवं होणं हे धुरकट धुरकट समजत होतं. एकदा अपरात्री श्वास कोंडल्याने दचकून जाग आली. कुणीतरी माझ्या छातीवर बसलेलं असावं अशी भावना होत होती आणि छातीवर बसलेल्या माणसाचा चेहरा येईल, त्या उंचीवरून ते डोळे माझ्याकडे पाहत होते. तेच टकटकीत, न मिटणारे, पिंगट डोळे. माझं भान परत हरपलं.

सकाळी थोड्या उशीरा डोळे उघडले तेव्हा सरला न्हाऊन मला उठवत होती. गहिर्‍या, मादक नजरेनी ती माझ्याशी दोन वाक्य बोलली, पण माझ्या मेंदूपर्यंत काही ते पोहोचलं नाही. अंग प्रचंड दुखत असल्याचं मात्र जाणवलं. मग परतीच्या एसटी मधे बसल्याची जाणीव. दोन सीटच्या इवल्याशा जागेत, माझ्या दंडाचा आसरा घेऊन सरलाचं गाढ झोपून जाणं आणि सरतेशेवटी आमच्या घरी सुखरूप पोहोचणं. नीट भान आलं तेव्हा दुसर्‍या दिवशीची सकाळ उजाडली होती. सुट्टी कालपर्यंतच होती, तेव्हा मला ऑफिसला निघणं गरजेचंच होतं. मी घाईघाईने आवरायला घेतलं. भराभरा तयार होवून मी ऑफिसला निघालो. जाताना सरलाने डोळ्यांनीच निरोप दिला. दोन जीने उतरून खाली आलो आणि आठवलं की पाकीट आणि त्यातला पास घरीच विसरलो आहे. परत दोन जीने चढून वर आलो.

घरातून आईचा आवाज येत होता. ती सरलाकडे आमच्या मधूचंद्राची चौकशी करत होती. माझे पाय जागच्या जागी गोठले. आई विचारत होती, “काय सूनबाई, ज्या कामासाठी गेला होतात, ते काम व्यवस्थित पार पडलं की नाही?” मी किंचितसा पडदा बाजूला करून पाहिलं. आईच्या प्रश्नाने सरला लाजेने अगदी चूर झालेली दिसत होती. एव्हाना माझ्या डोक्यात मागे कसलीशी गुणगुण सुरू झाली होती. अगदी खालमानेने सरलाने लाजत लाजत आईच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणी आई खूश होऊन त्यावर काहीतरी बोलली आणि अचानक माझ्या कानात पडघम वाजल्यासारखं होऊन माझं भान हरपलं. पण या वेळेस त्यात वेगळेपणा होता.

जलदगतीने डोळ्यांसमोरून चित्रपट सरकावा तसं काहीसं झालं होतं. लहानपणापासून “मूळ पुरुषाय, पुत्रदायकाय, सर्वविघ्नहराय प्रसीदं प्रसीदं” हा मंत्रजाप करणारी आई आणि तो ऐकताच डोक्यात मागे सुरू होणाऱ्या गुणगुणीसह, कुठल्याही गोष्टीला असला तरी आपोआप विरघळणारा माझा विरोध.

त्या आजोबांचा “सुबोध सुधाकर विश्वनाथ जगन्नाथ पांडुरंग विष्णू जोशी. बरोबर ना? अरे याची खतावणी असणार नाही आणि करायचीही नाही. अरे कुलक्षय वंशातला आहे हा. हा आपल्या घरात जेवणारही नाही. शापित शाखा …” हे बोल. पण यावेळेस त्याच्या पुढचंही बोलणं, “शापित शाखा आहे ही. यांच्या मूळ पुरुषाने भयंकर लैंगिक अपराध केला होता म्हणून त्याच्या पुढच्या पिढ्या वंशवृद्धी करायला अक्षम निपजतील असा शाप आहे त्यांना. पण त्या कुलक्षयी अस्तित्वाची भूक आणि वंशवृद्धीची ओढ अजून मिटलेली नाही. याला आपल्या घरात थारा नाही. हा फक्त साधन आहे काही काळापुरतं.”

परवाच्या रात्री माझ्या छातीवर बसून, त्याच्या टकटकीत, न मिटणार्‍या, पिंगट डोळ्यांनी बघत, कसल्याशा अगम्य कठोर साधनेने माझ्या शरीरात विरघळणारा तो, आमच्या शाखेचा मूळ पुरुष.

काल पहाटे न्हाऊन मला उठवताना सरलाने काढलेले उद्गार, “काल काय भूत शिरलं होतं की काय तुझ्या अंगात? गेल्या चार रात्रींचं उट्टं एकाच रात्री काढून किती दमवलंस मला.”

अत्ता आईच्या प्रश्नावर सरलाने दिलेलं उत्तर, “सुरवातीला काही नाही झालं, पण मूळ पुरुषाच्या आशीर्वादाने सगळं सुरळीत झालं सासूबाई.” त्यावर, “म्हणजे सातव्या पिढीतही शाप नाहीच तुटला म्हणायचा. आता मी तुला मी जपलेला, आपल्या जोश्यांच्या घराण्यातील मूळ पुरुषाचा मंत्र देते. त्याचा नीट जप कर. रात्री जेवल्यानंतर तर अवश्य कर. म्हणजे सगळं सुरळीत होईल.” हे आईचं उत्तर.

माझ्या पायांनी भरकटत भरकटत मला योग्य त्या ठिकाणी आणलं होतं. आता एकएक कोडं उलगडत होतं. माझे वडील माझ्या जन्माच्याही आधी का गेले? माझ्या घराण्यातले पुरुष अल्पायुषी का असतात? न चुकता प्रत्येक पिढीत एकच मुलगा का असतो?

ज्या दिवशी आमच्या घराण्यातल्या पुरुषाला, त्याचा देह नुसता देखाव्या पुरता वापरला जातो आहे, पण मूळ प्रेरणा, वासना आणि त्याची तृप्ती, अजूनही मूळ पुरुष करून घेतो आहे हे कळतं, त्याच दिवशी तो पुरुष प्राणत्याग करतो.

सांगितलं ना, मधुचंद्रावरून परत आल्यावर दुसर्‍याच दिवशी मी आत्महत्या केली.

:

Image by LoggaWiggler from Pixabay 

5 thoughts on “मूळ पुरुष- भाग २/२

  • March 5, 2020 at 9:13 am
    Permalink

    बापरे किती भयानक गूढ कथा

    Reply
  • March 9, 2020 at 7:54 pm
    Permalink

    खूप छान लिहिली आहे…

    Reply
  • November 4, 2020 at 5:57 pm
    Permalink

    बापरे! एक क्षण वाचताना भीतीच वाटली.

    Reply
  • May 7, 2021 at 9:45 am
    Permalink

    Bhayanak ahe… Pan vachaila maja ali.. khup chhan varnan

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!