प्राजक्ताचा दरवळ- अभिजीत इनामदार
आज बरोबर दहा दिवस झाले मालतीबाईंना हॉस्पिटलाईज करून. त्या स्पेशल वॉर्ड मधील २०९ नंबरच्या रूम मध्ये विश्वासराव रोजच्यासारखेच मालतीबाईंच्या चेहऱ्याकडे एकटक नजर लावून बसले होते. अन्न जाण्यासाठी लावलेली फिडींग ट्यूब, नाकावरचा ऑक्सिजन मास्क आणि डोळे मिटून पडलेल्या मालतीबाई विश्वासरावांना हे सगळंच कसं विचित्र वाटत होतं. जो चेहरा त्यांनी गेल्या पन्नास वर्षांत नेहमीच प्रफुल्लित पाहिला होता, तोच चेहरा असा दवाखान्यात निस्तेज होऊन पडलेला पाहणे त्यांच्यासाठी अत्यंत क्लेशदायक होतं. वेगवेगळ्या तपासणीसाठी लावलेल्या ऑनलाईन मशिन्सचा बीप बीप आवाज काय तो शांतता भेदत होता.
गोठल्या डोळ्यांनी विश्वासराव मालतीबाईंकडे पाहत होते आणि मन मात्र भूतकाळात विहार करत होतं. गेल्या पन्नास वर्षांत कितीतरी गोष्टी घडून गेल्या होत्या. अगदी साध्याश्या घरातून आलेली सुनीता. तशी साधी, नाकी डोळी नीटस, नीट नेटकी राहणारी. त्याकाळची ग्रॅज्युएट. तिला कधीच गर्व नव्हता ना आपल्या रूपाचा ना शिक्षणाचा. विश्वासराव इंजिनिअर. घरची परिस्थिती सधन. घरी कशाची कमतरता नव्हती. त्यामुळे सुनीताबाईंनी नोकरी करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनीही हट्ट केला नाही. घरची, घरातल्या माणसांची काळजी त्यांनी घेतली. सासू सासऱ्यांची अगदी आपल्या आई वडिलांप्रमाणे सेवा केली. कधीच कुठली तक्रार न करता. एखादी गोष्ट आपण मनापासून केली की त्याचा त्रास होत नाही असे सुनीताबाई नेहमी म्हणायच्या. घराच्या जबाबदाऱ्यांशिवाय त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्याशिवाय त्या रोज ना चुकता लेखन करत होत्या.
विश्वासराव बऱ्याचदा कामानिमित्ताने दौऱ्यावर असत. घरी असले तरी त्यांच्याच विश्वात रमत. घरात काही कमी जास्त हे पाहण्याची कधी त्यांच्यावर वेळच आली नव्हती. आधी त्यांचे आई वडील सगळे पाहत असत आणि आता सुनीताबाई. पण कुठेही दौऱ्यावर गेले की सुनीताबाईंसाठी तिथली एखादी स्पेशल साडी किंवा काही खाण्याचे पदार्थ असतील तर ना चुकता आणत. दौऱ्यावर नसले की रोज संध्याकाळी येताना मोगऱ्याचा गजरा आणि चाफ्याची फुले अगदी न चुकता आणत. तो आणला की सुनीताबाईंच्या चेहरा खुलतो असा त्यांचा अनुभव होता. विश्वासरावांनी कधी स्वयंपाक घरात शिरून कुठला पदार्थ केला नाही पण अधून मधून सगळ्यांना घेऊन जेवायला, सिनेमा – नाटकाला जाण्याचा बेत ठरे.
विश्वासचा भारी जीव आहे हो तुझ्यावर या सासूबाईंच्या वाक्यावर त्या अगदी गोऱ्या मोऱ्या होऊन जात. या आणि अशा कित्येक गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात होत्या. त्यांच्या आई आणि पाठोपाठ त्यांच्या वडिलांचा झालेला मृत्यू. त्याच वेळी जन्मलेला शिरीष. सुनीताने कसे मॅनेज केले सगळे. दिवस सरत गेले. विश्वासरावांचा कामाचा व्याप वाढला. त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला. एकीकडे त्यांचा व्यवसाय वाढत गेला आणि दुसरीकडे सुनीताबाईंच्या कुशीत खेळणारा शिऱ्या. कामाच्या व्यापाने थोडे चिडचिडे झालेले विश्वासराव सतत धावत असायचे. पण त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सुनीताबाईंना बरोबर माहित असत. ते वेळेवर जेवण करतात का याकडे त्यांचे कायम लक्ष असे.
आपल्या किती छोट्या छोट्या गोष्टी हिने केल्या. माझी प्रत्येक गोष्ट तिला माहिती आहे. पण मला तिच्या गोष्टी, आवडीनिवडी माहिती आहेत? मागे एकदा हॉटेलमध्ये गेलो होतो तेव्हा तिला डोसा खायचा होता पण मी म्हणालो डोसा नको पंजाबी डिश घेऊ तर काहीही कुरकुर न करता तिने ते मान्य केले. असं म्हणतात पाण्याचा रंग कसा? ज्याच्यात मिसळू तसा. सुनीताने कधीच अमुक एक हवे, असेच हवे आणि तसेच हवे असं हट्ट नाही धरला. कायम माझ्या रंगात पाण्यासारखी मिसळून राहिली. मला खरंच कधी सुनीता कळली होती का? असाच आता प्रश्न पडला आहे. पण खरेच एक बरे झाले परवा आमची खोली आवरताना तिची डायरी आणि तिने लिहिलेल्या ललित लेख आणि कवितांची वही सापडली.
किती छान लिहितोस तू सुनीता. माझे कौतुक करताना तुझे कौतुक करावे असे कोणालाच कसे वाटले नाही? अगदी मला देखील? आपल्याच माणसाबाबत आपण किती गोष्टी आपण गृहीत धरतो ना? याचे जातिवंत उदाहरण म्हणजे तू आणि मी सुनीता. मी गृहीत धरत आलो आणि तू मला धरू दिलेस.
काल रात्री वाचलेल्या सुनीताच्या डायरीतून एक वेगळीच सुनीता त्यांना उमगली होती. विश्वासराव उठले सुनीताबाईंच्या शेजारी जाऊन बसले. एका हाताला सलाईन लावलेले होते. त्यांनी दुसरा हात हातात धरला. आणि अगदी प्रेमाने त्यांनी हाक मारली
विश्वासराव – सुनीता, ए सुनीता. ऐकतेस ना? उठ बघू आता? किती दिवस अशी झोपणार आहेस? हे बघ आज मी तुझा हात हातात घट्ट धरून बसलो आहे. तुझी इच्छा होती ना? की कधी तरी मी तुझा हात हातात धरून तुझ्या जवळ बसून राहावे. आपण गप्पा माराव्यात. पण गप्पा ह्या दोघांनी मारायच्या असतात. आधी कधी तुझ्याशी गप्पा मारायला मला वेळ नसायचा. आता मला माझी चूक उमगलीय तर तू अशी गप्प पडून आहेस. उठ पहा. आपण आता खूप गप्प मारू. ऐकतेस ना?
अन काय आश्चर्य? अचानक बीप बीप करणाऱ्या मॉनिटर्स वर बदल झाले. बीप बीप आवाज वाढू लागला. विश्वासरावांनी लगेच बेल दाबली. तसे नर्सेस आणि त्यांच्या मागून डॉक्टर्स पळत आले. पण काळजी करण्यासारखे काही नव्हते. सुनीताबाई शुद्धीत आल्या होत्या. डोळे उघडून त्या भिरभिरत्या नजरेने त्या इकडे तिकडे पाहू लागल्या. पाणावलेल्या डोळ्यांनी पाहणारे विश्वासराव त्यांच्या शेजारीच उभे होते. डॉक्टर्स चेकअप करून गेले. आणि आता विश्वासरावांना काय करू आणि काय नको असे झाले. पण त्यांना लगेच स्ट्रेस देऊ नका असे डॉक्टर्सनी सांगितल्यामुळे ते त्यांचा हात एका हातात धरून दुसऱ्या हाताने थोपटत राहिले. काही वेळाने शिऱ्या आला आणि त्याची पत्नी श्रीशा आली. आईला जाग आलेली पाहून त्या दोघांनाही बरे वाटले.
पुढच्या आठवड्याभरात सुनीताबाईंच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली. आणखी दोन दिवसांनी डॉक्टर्स डिस्चार्ज देणार म्हणाले. तसे विश्वासराव आणि शिऱ्याची काहीतरी गडबड सुरु आहे असे सुनीताबाईंना जाणवले. त्यांनी तसे विचारले देखील पण त्यांनी काहीच सांगितले नाही. अखेर आज डॉक्टर्सनी त्यांना डिस्चार्ज दिला. बऱ्याच दिवसानी घरी आल्यावर सुनीताबाईंना बरे वाटले. पण विश्वासरावांच्यात काहीतरी बदल झालाय हे त्यांना जाणवत होते. एक दिवस असाच गेला आणि दुसऱ्यादिवशी सकाळपासून शिऱ्या आणि विश्वासराव काहीतरी कार्यक्रमाची आखणी करत असल्यासारखे वाटत होते. शेवटी न राहवून त्यांनी विश्वासरावांना विचारलेच
सुनीताबाई – काय? कसली एवढी गडबड चालू आहे? काय नक्की सुरु आहे?
विश्वासराव – सांगतो थोड्या वेळाने सगळे सांगतो. शेवटी उत्सवमूर्तीना सांगायलाच हवे का?
सुनीताबाई – म्हणजे? काय करणार आहात?
तेवढ्यात श्रीशा आत आली आणि म्हणाली
श्रीशा – आई आजच्या कार्यक्रमात ही साडी नेसा. हा कलर छान आहे आणि तुपाच्या आवडीचा देखील आहे.
सुनीताबाई – अगं पण कसला कार्यक्रम?
श्रीशा – अय्या, म्हणजे बाबा तुम्ही अजून सांगितले नाहीत का त्यांना?
विश्वासराव – नाही गं आत्ता सांगणारच होतो तेवढ्यात तू आलीस.
श्रीशा – अच्छा म्हणजे मी डिस्टर्ब् करतेय का तुम्हाला? पण तुम्ही सांगा. मी देखील ऐकते.
त्याबरोबर दोघेही खळखळून हसले. सुनीताबाईंना कळेना नक्की काय चालू आहे? पण श्रीशा इतर कामाला गेली आणि विश्वासरावांनी बोलायला सुरुवात केली.
विश्वासराव – सुनीता, किती केलेस या घरासाठी तू. माझ्यासाठी, माझ्या आई वडिलांसाठी, आपल्या संसारासाठी आपल्या मुलासाठी.
सुनीताबाई – अहो असे का म्हणता? संसार आपल्या दोघांचा आहे ना? मग ती माणसं माझीही कोणी तरी आहेतच की.
विश्वासराव – ते तर आहेच गं. पण तू कधीच कसलीच कुरबुर केली नाहीस. कायम सर्वाना देत राहिलीस. आणि मी जे देत आलो तेच तुझी आवड आहे असे वागत राहिलीस. मी आणलेल्या कोणत्याच गोष्टीला ना तू कधी नावे ठेवलीस ना कधी आवडली नाही असे म्हणाली नाहीस. अबोलीचा गजरा आवडत असूनही तू मी आणलेल्या मोगऱ्याचा गजरा केसात माळलास. चाफ्याची फुले केवळ मी आणतो म्हणून आवडून घेतलीस पण पारिजातकाचा गंध आवडतो हे तू एकदाही सांगितलं नाहीस. आणि अशा कितीतरी गोष्टी ज्या तू कधीच मला बोलली नाहीस. अन मी वेडा तू नेहमी आनंदात आहेस असेच समजत होतो.
सुनीताबाई – मी खरेच आनंदात होते आणि आहे. तुम्ही असे का म्हणता? तुम्ही आणलेला मोगरा मी आनंदानेच माळला कारण मला तुमची त्यामागची भावना कळत होती. ज्या प्रेमाने, मायेने माझी आठवण ठेऊन आणत होतात तेच माझ्यासाठी महत्वाचे होते. अबोलीचा गजरा मनाला भावतो खरा पण तुम्ही दौऱ्यावर असताना मी तो आणायचे. पण तुम्ही आसपास असताना तुम्ही आणलेल्या मोगऱ्याचा सुगंधच मला आजवर भावात आला. तीच गोष्ट इतर गोष्टींची. मला न मागताच तुमच्याकडून इतकं सगळं मिळालं कि आणखी मागायची आवश्यकताच वाटली नाही कधी.
विश्वासराव – हो पण मी तुला कधीच विचारले नाही की तुला काय हवे? किंवा काय आवडते? मी मला जे वाटेल ते आणत गेलो आणि तू त्यातच खुश राहिलीस. पण माझी खरंच चूक झाली की मी तुझ्या आवडी निवडी विचारल्याच नाहीत कधी.
सुनीताबाई – असे काही नाही हो. जेंव्हा इतरांकडे काहीच नसते तेव्हा आपल्याकडे काय आहे हे समजते.
विश्वासराव – कशी गं तू एवढी समंजस?
सुनीताबाई – मी अशीच आहे.
विश्वासराव – पाण्यासारखी… इतरांच्या रंगात मिसळून जाणारी. हो ना?
सुनीताबाई नुसत्या हसल्या… विश्वासरावांनी एक पुडी त्यांच्या हातावर ठेवली. त्यांनी ती उघडली. अबोली आणि मोगऱ्याचा गजरा त्यांच्या हाती पडला आणि त्यांचा चेहरा खुलला.
विश्वासराव – आता आणखी एक गोष्ट
सुनीताबाई – आणखी काय?
विश्वासराव – आतापासून मनात जे येईल ते मला सांगायचे? इतकी वर्षे तू माझ्या आवडीच्या गोष्टी करत आलीस. आता आजपासून आपण तुझ्या आवडीच्या गोष्टी करणार आहोत. आता मी तुझा हात हातात धरून बसायला लाजणार नाही. डोसा खायला तुला अडवणार नाही.
सुनीताबाई – तुम्ही माझी डायरी वाचलीत?
विश्वासराव – होय. पण त्यामुळेच मी तुझ्या नव्याने प्रेमात पडलोय सुनीता.
सुनीताबाई – अहो काहीतरीच काय? बाहेर मुले आहेत.
विश्वासराव – असू देत ना. पण हे तेवढेच खरे आहे. आणि माझ्याच बायकोवर प्रेम करायला कोणाची हरकत आहे?
सुनीताबाई लाजून म्हणाल्या – हरकत काहीच नाही.
विश्वासराव – झाले तर मग. त्यांनी उठून कपाटातून गुलाबांचा गुच्छ आणला आणि त्यांना देत म्हणाले विल यू बी माय व्ह्यालेनटाइन सुनीता?
सुनीताबाई – अहो हे काय आता? ५० वर्षांपूर्वीच तुमची व्ह्यालेनटाइन नाही का झाले?
विश्वासराव – ते त्यावेळचे झाले आता आज पासून पुन्हा नव्याने.
सुनीताबाई हसल्या. सुरकुतलेले हातात हात आज नव्याने प्रेमात पडून प्रेमाचा नवीन स्पर्श अनुभवत होते. ते दोघे कितीतरी वेळ तसेच बसून राहिले. अचानक लक्षात आल्यासारखे सुनीताबाई म्हणाल्या
सुनीताबाई – ते कार्यक्रम कसला आहे आज? मघाशी श्रीशा काय म्हणत होती?
विश्वासराव – अरे हो ते राहिलेच. पण ते सिक्रेट आहे.
सुनीताबाई – असे काय करताय? आपल्या व्ह्यालेनटाइनला नाही सांगणार?
विश्वासराव – झाले. केलेस लगेच मला इमोशनल ब्लॅकमेल?
सुनीताबाई – असे काही नाही.
विश्वासराव – पण हरकत नाही आत्ताच तुला शब्द दिलाय तुझ्या मनासारखे करायचे म्हणून. आता फक्त डोळे बंद कर.
सुनीताबाई – आता हे काय लहान मुलांसारखे.
विश्वासराव – आता हे ऐक हा
सुनीताबाई – बरं बाई… हे घ्या केले डोळे बंद.
विश्वासरावांनी कपाटातून अजून एक पॅकेट आणले. सुनीताबाईंच्या हातात ठेवले. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिले पण विश्वासरावांनी ते उघड असे खुणावले. सुनीताबाईंनी ते उघडले. “प्राजक्ताचा दरवळ” असे नाव असलेले ते पुस्तक होते. अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेल्या एका घरकुलाचा फोटो असलेले ते मुखपृष्ठ पाहताच आवडण्याजोगे होते. सुनीताबाईंच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडले “वा… सुरेख आहे मुखपृष्ठ” सुनीताबाईंनी हलकेच त्या फुलांवरून हात फिरवला आणि हात फिरवताना त्यांच्या डोळ्यात असावे जमा झाली, कारण खाली लेखक म्हणून नाव होते “सौ. सुनीता विश्वास कारखानीस”
आज सुनीताबाईंनी लिहिलेल्या ललित लेख आणि निवडक कथांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता. सुनीताबाईंना खरंच विश्वास बसत नव्हता. पुन्हा पुन्हा ते नाव त्यांनी वाचले. आतील मजकूर पहिला आणि विश्वासरावांकडे वळून अश्रुपूर्ण डोळ्यांनी सुनीताबाई म्हणाल्या – थँक यू माय व्ह्यालेनटाइन… थँक यू सो मच.
Image by Besno Pile from Pixabay
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
खूप छान
Very nice
Want to be a member of this
तुमचं लिखाण पहिल्यांदाच वाचलं .
छान आहे.
Farach sunder….
सुरेख ह्रदयस्पर्शी