लहान काकू

“आता काय… काकाचं लग्न म्हणजे धमाल असणार आहे. शिवाय शाळेला सुट्टी… मग काय नवीन काकू कडून लाड करून घ्यायचे फक्त… हो की नाही पूर्वा?”
शेजारच्या नूलकर मावशी मला म्हणाल्या… तर लगेच आई म्हणाली, “नवीन काकूला वेळ तरी असणार आहे का लाडबिड करायला? ती तर आम्ही तयार केलेला डबा घेऊन ऑफिसला निघून जाईल ती संध्याकाळीच घरी येईल.”
नुलकर मावशी, मोठी काकू आणि आई हसत होत्या. तितक्यात आजी आल्याची चाहूल लागली आणि नूलकर मावशी घरी पळाल्या आणि मोठी काकू, आई स्वयंपाक घरात.
आजी पुटपुटत माझ्याजवळ आली, ‘स्वतःची कामंधामं सोड आणि शिकव म्हणावं आमच्या सुनांना काहीबाही…’… “काय ग पूर्वा काय बोलत होत्या तुझी आई आणि काकू?”
“मला नाही माहिती… मी नाही ऐकलं.” मी खोटं बोलले कारण आई आणि मोठी काकू क्वचित कधीतरी हसायच्या. आजीला खरं सांगितलं तर तिचं बोलणं ऐकून दोन दिवस नुसतं रडतच बसतील.
“ह्म्म… उंदराला मांजर साक्षी… बरं आता तुझी नवी काकू येईल नं… तिला लहान काकू म्हणायचं बरं का? आणि… “
“पण आजी ती कशी आहे ग? आणि आज येणार आहे का इथे?”
“नोकरीवाली आहे. तुझ्या काकाची निवड आहे बाई… नाकापेक्षा मोती जड होऊ नये म्हणजे झालं…. “
अशी काहीतरी बडबड करत आजी निघून गेली. एकुणात ही नवीन काकू म्हणजे लहान काकू आई किंवा मोठ्या काकू पेक्षा वेगळी आहे इतकंच मला समजलं… जिच्यामुळे आई, मोठी काकू आणि हो, आजीला पण टेंशन आलं होतं ती काकू बघायची जाम उत्सुकता वाटत होती.
नीरज दादाला मी विचारलंही कशी वाटली लहान काकू तुला म्हणून. पण त्यानं पाहिलीच नव्हती. त्याच्याही कॉलेजची परीक्षा होती ना… वर तो म्हणाला, “आपल्याला काय फरक पडतो? कशी का असेना?” श्या… खूपच बोअर करतो नीरज दादा.
माझी उत्सुकता भरपूर ताणून काकू मला दिसली ती शेवटी त्यांच्या लग्नाच्या दिवशीच. उंच, शिडशिडीत, गोरीपान काकू दिसायला छानच होती. सोनेरी काड्यांचा चष्मा तिला शोभून दिसत होता. तिचे भरपूर मित्र मैत्रिणी लग्नाला आले होते आणि सगळ्यांशी अगदी हसून खेळून बोलत होती ती. आमचा काकाच उलट बुजला होता. कोणाशीच बोलत नव्हता.
लग्न आटोपलं आणि लहान काकूला घेऊन आम्ही घरी आलो. शहरातली काकू गावातल्या आमच्या घरी अगदीच वेगळी उठून दिसत होती. ती फक्त काकाशीच बोलत होती. काकाकडून सगळे निरोप इतरांना मिळायचे. लवकरच तिचं ऑफिस सुरू झालं. काका आणि ती सकाळी नऊलाच घर सोडायचे. त्यांचे डबे भरण्यासाठी आई काकूची धांदल उडायची. काकूला डब्यात वेगवेगळ्या भाज्या, मऊ पोळ्या देतायत का यावर आजीची करडी नजर असायची.
काकूला खोटं बोललेलं, चुकीचं वागलेलं बिलकुल खपायचं नाही. मी तर खिजगणतीत नव्हते तिच्या. थोड्याच दिवसात माझं काकू बद्दलचं कुतूहल संपलं.
मी माझ्या खेळात रमले. असच एकदा खेळत असताना ओळखीची हाक ऐकू आली…”पूर्वा… ए लाडूsssss” ….  आणि मी नखशिखांत हादरले… पोटात गोळा आला… अंगाला घाम फुटला… तळवे ओले झाले… मी स्तब्ध झाले…. मला ओरडावसं वाटत होतं… पण घशाला कोरड पडली होती… रडू येत होतं पण भीतीही वाटत होती.
लग्नाच्या या धांदलीत मी विलास काकांना विसरूनच गेले होते. आज गावाहून ते महिन्याभराने परत आले होते.
आता ते नियमित घरी येणार, तास न् तास बसणार. मला मांडीवर घेणार. त्यांचे हात… त्यांची ती पापी… मला मळमळायला लागलं.
मी एकदा आईला हे सांगायचा प्रयत्नही केला. पण आई मलाच ओरडली, “अगं आजीचे नातेवाईक आहेत ते. आणि अंध आहेत जन्मापासून. त्यांना दिसतही नाहीस तू. त्यांना संसार, मुलं बाळं नाहीत म्हणून तुझ्यावर माया करतात. अजुन कोणाजवळ काही बोलू नको असं काही.”
विलास काकांनी आज आल्या आल्याच मला पकडून मांडीवर घेतलं. लहान काकुशी ओळख करून घेतली. “जा सूनबाई, चहा बिस्कीट आण” असं म्हणत ते माझी पापी घ्यायचा प्रयत्न करू लागले.
त्या नंतर परत रोज विलास काका संध्याकाळी घरी यायला लागले. मला संध्याकाळ होण्याचीच भीती वाटत होती. कितीही लपून बसले तरी ते मला हाक मारून बोलावून घ्यायचे आणि मी आतल्या खोलीत बसले तर मोठी काकू, आई किंवा आजी कोणी ना कोणी बाहेर आणून मला विलास काकांसमोर हजर करायचेच. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात एक क्रूर हास्य उमटलेलं मला स्पष्ट दिसायचं पण भीतीनं माझ्या तोंडून शब्द फुटायचा नाही.
सलग चौथ्या दिवशी विलास काका आले. चहाची हाक देऊन त्यांनी मला उचललं. मी घट्ट डोळे मिटले…. एक हात फ्रॉक खालून माझ्या मांडीवर ठेवून दुसऱ्या हातानं त्यांनी मला आवळून धरलं. ते माझी पापी घेणार इतक्यात मागून कडाडता आवाज आला, “सोडा आधी तिला.” काकांनी मला पटकन सोडलं आणि लहान काकूने हाताला धरून मला स्वतःकडे ओढून घेतलं. मी तसेच डोळे बंद ठेवून तिला बिलगले.
“कळत नाही का तुम्हाला? ती मुलगी तुमच्या हातातून सुटण्यासाठी केव्हाची धडपड करतेय तरी तिला आवळता? लाड करायची ही कुठली पद्धत? तुम्ही अंध आहात म्हणून लोकांचा गैरफायदा घेऊ नका. असाल नातेवाईक, पण म्हणून रोज संध्याकाळी इथे चहा प्यायला येता… तासनतास बसून गप्पा झोडता… हे करायला ही गावचावडी नाही … घर आहे. इथे बायकांना रात्रीचा स्वयंपाक करायचा असतो…. पुरुष दमून घरी आलेले असतात. काम असेल तेव्हा या… निघा आता… “
विलास काकांनी एकदा आजीकडे पाहिलं. पण सगळ्यांनाच धक्का बसला होता. विलास काका निघून गेले… आता ते परत कधीही आमच्या घरात येणार नव्हते… मला खूप आनंद झाला… पण अजूनही आजी काहीच बोलली नव्हती …
इतक्यात आजीचा आवाज आला… “शहरातून येऊन माणसं तोडा तुम्ही …”
पण आजीला बोलू न देता लहान काकू कडाडली… “तुमच्या नातीचं मन समजत नाही तुम्हाला? ते लेकरू कधीचं त्या माणसाच्या हातून सुटायचा प्रयत्न करतं आहे आणि तुम्ही मोठी माणसं खुशाल बघत बसता? निदान आईला तरी मुलीचं मन कळावं? ही असली फुकटी माणसं मला परत घरात नकोत. अपंग लोकांना सहानुभूती जरूर दाखवा, पण आपल्या लोकांचा आत्मसन्मान जपून. बाकी असले नातेवाईक नसलेलेच बरे.”
लहान काकू समोर कोणीही काहीही बोललं नाही. आज मला माझी लहान काकूच मोठी वाटत होती. तिच्यामुळे मला खूप सुरक्षित वाटत होतं. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची धमक तिच्यात होती.
जी मला खिजगणतीत धरत नाही असं मला वाटलं होतं तिचं माझ्यावर प्रेम होतं. त्या क्षणी मी ठरवून टाकलं… मी पण मोठी झाल्यावर माझ्या लहान काकू सारखीच होणार…. ♥️♥️♥️
Image by Helen Matos from Pixabay 
Sanika Wadekar
Latest posts by Sanika Wadekar (see all)

Sanika Wadekar

लेखन वाचनाची आवड. व्यवसाय - पुस्तक प्रकाशन पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात कोणतीही शंका असेल तर निःसंकोच पणे विचारा.

10 thoughts on “लहान काकू

    • March 26, 2020 at 6:46 am
      Permalink

      Thank you 😀

      Reply
    • December 17, 2020 at 2:19 pm
      Permalink

      झक्कास 👌👌👌

      Reply
    • March 26, 2020 at 6:47 am
      Permalink

      Thank you Shubhangi 😀

      Reply
  • March 26, 2020 at 6:06 pm
    Permalink

    Mast lihilyas sanika tai 😊👌👌👌

    Reply
    • March 31, 2020 at 12:27 pm
      Permalink

      Thank you Ketaki 😀

      Reply
    • April 11, 2020 at 6:54 am
      Permalink

      Thank you

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!