सोन्याचा पिंजरा
“सोनालीssssss अगं ये बाहेर लवकर… शाळेला उशीर होईल. डॅडा कधीचा गाडी काढून उभा आहे बघ गेट बाहेर?” आईचा गजर ऐकून सोनाली रूम मधून बाहेर आली. पाठोपाठ आजोबा तिचं दप्तर घेऊन आले. आजीनं सोनालीला घोटभर पाणी पाजलं… मऊ पदरानं तिचं तोंड पुसलं. मग दुर्मुखलेल्या चेहेऱ्यानं सोनाली गाडीत बसली.
गाडी शाळेच्या दिशेनं धावू लागली. रस्त्यात सोनालीला तिच्याच शाळेतली मुलं मुली मस्ती करत रस्त्यातून जाताना दिसली. सोनालीला क्षणभर हेवा वाटला त्यांचा. वाटलं की पटकन गाडीतून उडी मारावी आणि या मुला मुलींबरोबर मस्ती करत शाळेत जावं. पण डॅडाला हे मुळीच आवडलं नसतं. मागे एकदा तिनं त्याला विचारलं देखील, “डॅडा, मी चालत जाऊ आज शाळेत?” यावर डॅडा कुत्सित हसत म्हणाला होता, “त्या बाकीच्या मुला मुलींबरोबर? तुझ्याशी बोलायची तरी लायकी आहे का त्यांची? तू एका प्रख्यात सर्जनची मुलगी आहेस बेटा. ही मुलं तुझ्या योग्यतेची नाहीत.”
डॅडाचं वाक्य घरात प्रमाण वाक्य असायचं. त्याच्या समोर कोणीच बोलायचं नाही… अगदी मम्मा किंवा आजी आजोबा सुद्धा… सोनाली गप्पच झाली.
गाडी शाळेच्या गेट समोर उभी राहिली. ड्रायव्हरने बाबांचं दार उघडलं. बाबाने सोनालीचं दप्तर हातात घेऊन तिच्या बाजूचं दार उघडून धरलं. सोनाली गाडीतून उतरली. शाळेच्या ग्राउंडवर खेळणारी मुलं गाडीकडे पहात राहिली.
सोनालीच्या वर्गापर्यंत येऊन तिच्या शिक्षकांशी जुजबी बोलत डॅडाने सोनालीच्या हातात तिची स्कूल बॅग दिली आणि तो तिला बाय करून निघून गेला.
आता दोन तासांनी डब्याची सुट्टी होईल. मग आजी डबा घेऊन येईल. आजोबा शाळेतून न्यायला येतील. घरी गेल्यावर होम वर्क मध्ये मदत करतील शिवाय दुसऱ्या दिवशीची स्कूल बॅगही भरतील.
सोनालीला कुठलंच काम करावं लागत नव्हतं. इतकंच काय तिला ते जमलंही नसतं. कारण लहानपणापासून तिची कामं दुसरंच कोणीतरी करत होतं. तिलाही अशीच सवय होती.
त्यामुळंच डॅडा सोडून गेल्यावर आता काय करायचं असा प्रश्न सोनालीला पडला. टीचर वर्गात येईपर्यंत मुलांचा दंगा आणि मुलींची अखंड बडबड सुरु झाली होती. सोनाली कोणाशीच बोलत नसे. खरं तर काय बोलायचं हे ती ठरवेपर्यंत टीचर येऊन शिकवायला सुरुवात करत.
पण आज टीचर बराच वेळ आल्याच नाहीत. तिच्याशी अधून मधून बोलणारी, तिच्या शेजारी बसणारी रुपाली सोनालीशी बोलली. सोनालीला खूप आनंद झाला. ती देखील रुपालीचं बोलणं मन लावून ऐकू लागली. आज खूप दिवसांनी शाळेत तिच्याशी कोणीतरी बोलत होतं. आज पहिल्यांदाच सोनालीच्या चेहेऱ्यावर हास्य फुललं होतं.
इतक्यात मुलांच्यात मारामारी झाली. दप्तरांची फेकाफेक सुरू झाली. या गोंधळात रुपालीचा सगळा डबा सांडून गेला. ती अगदी रडवेली झाली.
सोनालीला मात्र आनंद झाला. आज पहिल्यांदाच ती कोणाच्या तरी बरोबर डबा खाणार होती. रोज आजी डबा घेऊन यायची आणि सोनालीला भरवूनच डबा घेऊन घरी जायची. ते काही नाही. आज आपण आजीला सांगून रुपालीलाही आपल्याच डब्यातला खाऊ खायला लावायचा. मी आणि रुपाली दोघी मिळून डबा खाऊ या विचारानेच सोनालीला खूप आनंद झाला.
या आनंदाच्या भरात टीचर कधी आल्या आणि दोन तास कसे भुर्रकन उडून गेले तिला कळलंही नाही.
इतक्यात डब्याची सुट्टी झाली. घंटा वाजली आणि शाळेच्या गेट मधून आजी डबा घेऊन येत असलेली सोनालीला दिसली. ती धावतच आजीकडे गेली.
“आजी, आज माझ्या मैत्रिणीचा डबा सांडला. तिला पण देऊया आपल्या डब्यातलं?” तिनं आशेनं विचारलं.
“हो तर. देऊ हो तिला पण. मी भरपूर खाऊ आणला आहे आणि फळं देखील आणली आहेत. बोलाव तिला.” आजीच्या पडत्या फळाची आज्ञा मानून सोनाली वर्गाकडे धावली.
आजी शाळेतल्या तिच्या नेहमीच्या खांबाजवळ बसली. सोनालीसाठी तिने बस्कर अंथरले. डबा, छोटे ताट ठेवायला न्यूज पेपर पसरला. पाण्याची बाटली काढली. ती ताटात वाढेपर्यंत सोनाली पळत पळत रुपाली जवळ गेली. तिचा हात धरुन ओढत म्हणाली, “तुझा डबा सांडला ना? चल ना… आपण सोबत जेवू. माझी आजी भरवेल आपल्याला.”
रुपालीने वर्गातून डोकावून आजीची तयारी पाहिली. इतक्यात रुपालीला अनेक मैत्रिणींनी हाका मारल्या. सोनालीने पाहिलं, प्रत्येकीने आपल्या डब्यातला खाऊचा एक एक घास काढून रुपालीच्या डब्यात ठेवला होता. वेगवेगळ्या खाऊच्या पदार्थांनी रूपालीचा डबा गच्च भरून गेला होता. आपला हात हळूच सोडवून घेत, “मला त्यांच्या सोबत जेवायचं आहे” म्हणून रुपाली धावत जाऊन त्या मुलींमध्ये मिसळून गेली…. आणि मघाशी हसणारी सोनाली आता उदास चेहेऱ्यानं आजीकडे चालू लागली….
तिच्या कानात मात्र मघाशी टीचरांनी शिकवलेल्या कवितेच्या ओळी ऐकू येत होत्या….
“चिऊ ताई चिऊ ताई
माझ्या पिंजऱ्यात येतेस बाई?”
“जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला
राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना”
Image by Spencer Wing from Pixabay
Latest posts by Sanika Wadekar (see all)
- प्रगती भाग ८ – शेवटचा भाग - September 10, 2020
- प्रगती भाग ७ - September 7, 2020
- प्रगती- भाग ६ - September 4, 2020
मस्त कथा👌😊