त्रिदेवी, महिला दिवस विशेष, लेखक- श्रीनिवास चितळे
“अमळ आडवा हो ,उगीच वांडपणा करू नको ,मी वेखंड उगाळून कपाळावर चांगला चरचरीत लेप देत्ये आणि एक कोपभर आल टाकून चहा करून आणत्ये तो घटाळ,सर्दी दोन तासात जाईल शेंबूड पुसत “.मला कधी सर्दी झाली किंवा बारीक अंग गरम झाल कि क्रोसिन घेताना नेहमी आजीचा वरचा डायलॉग आठवतो .
आजी या नात्याविषयी मी बर्यापैकी हळवा आहे .कोणाचीही आजी स्वर्गवासी झाल्याच वाचल कि दोन मिनिट तरी मी शांत होतो अर्थात वयानुसार ती जाण हे क्रमप्राप्त तरीही एखाद्याचे आजोबा गेले तर “देहाचे सोने झाले ,लोळत पडले नाहीत ,सुखी आयुष्य जगले ,मरण कोणाला चुकलय हि छापील सांत्वनाची वाक्य मी पोपटा सारखी फेकतो पण आजी गेली कि थोडा एक मिनिटभर गलबलतो खरा .
आजी हे खरच तुळशीच झाड असत ,कधीही तिच्या जवळ बसल कि प्राणवायू देणार ,हळूच बोलत बोलत टोमणे मारीत ,शब्दाचे चिमटे काढीत आपल्या डोक्यातील मोठेपणाची जळमट झाडून टाकणारी ती केरसुणी रुपी लक्ष्मी असते .
“पडू आजारी हीच मौज वाटे भारी “अशी एक कविता होती आणि त्या कवितेवर एक आजीच सुरेख चित्र होत .माझ्या कल्पनेतील आजीशी अगदी मिळत जुळत .
काही म्हणा पण आजी म्हटल कि ठेंगणी ,ठुसकी ,कपाळावर कुंकवाची चिरी किंवा बंदा रुपया ,थोडी कमरेत वाकलेली ,डोक्यावर विरळ झालेले पांढरे केस आणि त्याचा बुचडा बांधलेला .कोवळ्या उन्हात नातवंडाच्या गोतावळ्यात पाठ शेकत बसलेली .वडिलांना ,आजोबाना ठणकावणारी ,वाढताना ओचे पदर बांधा गो नाहीतर आमटीत बुचकळवाल अस ठणकावणारी ,झिपऱ्या सोडून भोरपिणी सारख बाजारात जायचं नाही असा दम भरणारी .अभ्यासाला बसा नाहीतर आहे मग नशिबात शेणगोठा,कधी मार्क कमी पडले तर समोर झाडणारी पण सार्वजनिक आपल्या बाजूने “नारायणा,त्याला ओरडतो आहेस पण तू तरी कुठे बालीश्तर होतास ?” अस वडिलांना सांगणारी आणि वर “विहिरीतच ठणठणाट तर पोहर्यात कोठून येणार अस सुनावणारी ,”पादौ बिभीषण श्रीदः” रांडेच्या हसतोस कशाला मांडी वर करून ?पादौ म्हणजे पायाशी ,असा मजेत परवचा म्हणून घेणारी .सूनबाई समईत तेल व्यवस्थित घालत जा ,शुभंकरोती फु हि सवय आम्हा पेंडश्यान्कडे नाही हो अस सासुपण मिरवणारी .माझी आजी म्हणजे आईची आई जे वरील वर्णन केल आहे ना तशीच होती .
त्या काळाप्रमाणे शिकलेली नव्हती पण उतार वयात एक डोळा बारीक करून पोथी वाचत बसलेली तिची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आणि अंतःकरणात कोरलेली आहे .अतिशय स्पष्टवक्ती ,अतिशय धोरणी ,शिस्तीची भोक्ती आमच्यात थोडीफार शिस्त असेल तर ती या मातुल घराण्या कडून आलेली .
आजी नंतर आमच्या मातोश्री .ती श्यामची आई नक्कीच नव्हती .एक उदाहरण देतो .
आमच्यावेळच्या आया प्रेमळ असतीलहि पण त्या पेक्षा कर्तव्य कठोर जास्त होत्या अस वाटतंय ,उगीच बाबा ,पुता ,सोनू ,मोनू हा प्रकार नाही .जेवणात ,खाण्यापिण्यात सुद्धा माफक लाड नाहीतर “खायचं तर खा नाहीतर रहा उपाशी “किवा “रडलास तरी चालेल ,काहीही मूत आटत नाहीये “हे बोधामृत ठरलेल .
एकदिवस आईने बाहेरून येऊन फतवा काढला “निवास उद्यापासून सकाळी ७ वाजता बालक मंदिर “.मी माणिक [बालमंदिरातील बाई] जवळ आत्ताच बोलल्ये.आमच्या वेळी बालकमंदिर होती प्ले ग्रुप नव्हते ,मंदिराचा खेळ खंडोबा झाला नव्हता.माझी हे ऐकल्यावर मुसमुसायला सुरवात ,आई ने लक्षच दिले नाही ,ती माझ्यासाठी आणलेली दगडी पाटी कोळशाने घासून लक्ख करीत होती .ते झाल्यावर तिने माझी मुलाखत घेतली ,तुझ नाव सांग मग मी रडत “श्रीनिवास उ उ केशव चितळे ,मुक्काम उ उ पोस्ट चिपळूण ,जिल्हा रत्नागिरी ,देश भारत ,खंड आशिया .रडायला काय झाल ? मला नाही जायचं बालक मंदिरात . या दप्तरात हि पाटी भर ,दगडी पेन्सिलला टोक काढ ,पेन्सिल खायची नाही ,तोंडात घालायची नाही ,आणि हो पाटीला पुसायला जर थुंकी लावलीस तर सरस्वतीदेवी रागावते ,काहीही विद्या येणार नाही .हळूहळू मी भोकांड पसरायच्या मूड मध्ये .तेवढ्यात काकू आली आणि तिने मला पदरात घेतले “शामल[माझी आई] काय तुझ चाललय बालक मंदिर ,बालक मंदिर ,मी सांगत्ये निवास अजिबात उद्या जायचं नाही ,परवा पासून जायचं “,म्हणजे हि देखील तिला सामील .मग दोघींनी मिळून थोडावेळ माझी समजूत काढली अरे बाबा शाळेत जाऊन विद्या शिकला नाहीस तर मोठा कसा होशील ? तुला मोठा साहेब व्हायचं आहे ना ?माझ रड थांबेना मग मोठी आई [काकू ]मला स्वयंपाक घरात घेऊन गेली हातावर गुळाचा खडा ,”आधी रड थांबव ,हा खा आणि जा अमळ देवळाशी खेळायला .थोडावेळ संकट टळल या आनंदात मी पळालो ,उशीर झाला तरी देवळात बसलेला ,आई आली आणि म्हणाली घरी चल ,मी म्हणालो मला नाही यायचं तू उद्या बालक मंदिरात पाठवशील .आई मारुत्या गुरवाला म्हणाली मारुत्या त्याला फरफटवीत थोड्या वेळाने घरी आण नाही ऐकला तर गठडी वळून घेऊन ये .आल्यावर सरबत्ती सुरु अरे शाळेत जाणार नाहीस मग शेणगोठा करून गुर का चरायला नेणार आहेस तस तरी सांग म्हणजे हरी उदेकाला उद्या पासून येऊ नको सांगत्ये ,तरीही माझ रडण सुरु ,मग जवळ घेऊन पदराने माझ तोंड पुसून म्हणाली अस करू नये बाळा,शाळेत जायलाच हव ,शिकायला हव ,मोठ व्हायला हव ,१० /१५ मिनिटे समजवण्यात गेली तरी माझ रड थांबेना मग चौदाव रत्न ,केरसुणीचा एक हिर काढून सपासप माझ्या पोटरीवर प्रहार चालू झाले “म्हणे शाळेत जाणार नाही ,दळभद्री लक्षण ,उद्या पासून जेवण बंद …………” या सगळ्या प्रकारात घरातील वडिलधार कोणीही मध्ये पडल नाही .
रात्री झोपलो तेव्हा पायावरून हात फिरत होता ,आई कसल तरी मलम पायाला लावीत होती आणि रडत होती .
दुसऱ्या दिवशी सकाळी मी निमूट बालकमंदिराच्या रस्त्याला लागलो आणि सात वाजता प्रार्थना सुरु झाली “बैसली मयुरा वरती देवी शारदा वरदा देवी शारदा “.
ज्या दिवशी अर्मस्त्रोंगच पहिलं पाउल चंद्रावर पडलं त्या दिवशी आमच्या घरात या बाईने खीर पुरी असा गोडाचा नैवेद्य देवाला दाखवला होता .खूप लवकर गेली पण जाताना ज्ञान आणि विज्ञान दोन्ही माझ्या झोळीत टाकून गेली .अंतिम इच्छा सांगताना म्हणाली निवास माझ श्राद्ध नाही केलस तरी चालेल त्या ऐवजी ते पैसे एखाद्या होतकरू मुलाला शालेय शिक्षणा साठी दे .
त्या नंतर माझ्यावर प्रभाव आमच्या काळे बाईंचा .
पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन ,
मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन !
नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव ,
राहे चित्ती प्रिय मम परी जन्मभूमी सदैव !
काळे बाई खूप छान शिकवायच्या हि कविता ,मंदाक्रांता हे गोड वृत्त ,आणि शिकवताना म्हणायच्या देखील अगदी कीर्तनकारासारखी ,कुठेतरी ऑर्गनचा मागे मस्त सूर लागलाय ,आम्ही देवळात बसलो आहोत असा फील यायचा आणि आमच्या काळेबाई ,बाई कसल्या आमची दुसरी आईच ती ,सुरेख सुरु करायच्या “बाळानो ,आज आपण ना खरे आजोबांची एक छान कविता बघणार आहोत बर का .यशवंता मागे आपण एक कविता शिकलो होतो आठवते का रे ?”बाळ जातो दूर देशा ,मन गेले वेडावून ,आज सकाळ पासून “मग पूर्ण वर्ग ती कविता थोड्या घोगऱ्या आवाजात म्हणायचा .आईची हि अवस्था तर तो मुलगा काय म्हणतोय पहा बर अशी हि संथा असायची कविता झाली कि सहज विचारायच्या तुम्हाला अशीच एक सावरकरांची कविता आठवते का रे ? कधीतरी ऐकली असाल .मग सगळा वर्ग ते आठवण्यात मश्गुल व्हायचा आणि आमच्या वर्गात एक ज्ञानू बाबू कांबळे नावाचा अत्यंत गरीब घरचा पण अत्यंत हुशार मुलगा होता ,त्याची आई रस्त्यावर भाजी विकायची ,बाईनचातो खूप लाडका त्याला विचारायच्या “ज्ञानराजा ,काही आठवतंय का ?”आणि मग स्वतःच सुरु करायच्या “ने मजसी ने परत मातृभूमीला …………….
एकदिवस अचानक मला फोन आला .
“कोण ,चितळे बोलताय का ? श्रीनिवास चितळे ?”
हो .
मी काळे बोलतोय दादरहून .
बोला ,काय काम आहे ?
तुम्ही दादरला पालन सोचपाल मध्ये येऊ शकाल का ?
कशासाठी ? मला काही संदर्भ लागत नाहीये .
ओ ,सॉरी.तुम्ही काळे बाईंचे विद्यार्थी ना ?
हो हो .
मी मुलगा त्यांचा .
अरे वा.खूप आनंद झाला .बाई कशा आहेत ?
नाही नाही ,आई ५ वर्षापूर्वी देवाघरी गेली .शेवटी अमेरिकेत माझ्याकडे होती .आज ५ वर्षांनी भारतात आलोय .
ओहो ,कशाने गेल्या ?
नथिंग ,जस्ट ओल्ड एज,शी वाज ८५ .
यस यस,माझ्या पाचवी ,सहावीच्या बाई.
नाही मी फोन अशासाठी केला कि तिच्या शेवटच्या इच्छेतील एक तुमच्याशी संबंधित आहे .
माझ्याशी ?
हो हो ,तिची घरात जुनी पुस्तके आहेत ,शेक्सपियर ,वर्डस्वर्थची ती तुम्हाला द्यायला सांगितली आहेत .
कै.काळेबाई—तेथे कर माझे जुळती .
Earth hath not anything to show more fair:
Dull would he be of soul who could pass by
A sight so touching in its majesty:
This City now doth, like a garment, wear
The beauty of the morning; silent, bare,
Ships, towers, domes, theatres and temples lie
Open unto the fields, and to the sky;
All bright and glittering in the smokeless air.
Never did sun more beautifully steep
In his first splendor, valley, rock, or hill;
Ne’er saw I, never felt, a calm so deep!
The river glideth at his own sweet will:
Dear God! The very houses seem asleep;
And all that mighty heart is lying still!
मी मराठी सहावीत होतो. आज शिक्षक दिन ,पु .ल .न च्या चितळे मास्तरान सारख्याच असलेल्या आमच्या काळेबाईनी वर्डस्वर्थचि हि कविता [सिल्याबस मध्ये नसलेली] चितळे मास्तर वाचल्यावर मी अर्थ विचारायला गेलो होतो तेव्हा समजावून सांगितली होती .
या चितळे मास्तर [मला त्या चितळे मास्तरच म्हणायच्या. असे म्हणून ,काय आज मातोश्रींना तुमचा भांग पाडून द्यायला वेळ नाहीका झाला ? ,नाही केस विस्कटलेले,सकाळी प्यायलेल्या दुधाची ओठावर राहिलेली मिशी तशीच, असे म्हणून आपल्या नऊवारीच्या पदराने माझे तोंड पुसले होते व बोटाने भांग सरळ केला होता.उद्याच्या तासाला हि कविता घेऊ बर का चितळे मास्तर असे म्हणून मला टपली मारली होती आणि नंतर दोन दिवस त्यांनी वेस्टमिन्स्टर ब्रिजवरून नुसत्या शब्दातून आम्हाला फिरवून आणल होत,शेवटी म्हणाल्या होत्या “मुलानो,डोळे उघडे ठेवा ,हिज म्याजेस्ती पावलो पावली सौंदर्याची उधळण करीत असतो”डॉक्टर व्हा ,इंजिनियर व्हा ,पण Dull would he be of soul होऊ नका,निरस होऊ नका आणि मग चक्क वर्गातील छाया रिसबूड ला “या बाळानो या रे या ,लवकर भर भर सारे या “हि कविता म्हणायला लावली होती .
काळेबाई तुमच्या त्या शब्दांची आठवण ठेऊन अजूनही जीवनाचा मस्त आनंद घेत जगतोय.तुम्ही निघून गेलात आम्हाला हा आनंदाच्या अलीबाबाच्या गुहेचा तिळi दार उघड हा मंत्र देऊन ,तुमच्या आशीर्वादाने आम्हाला ,तुमच्या विद्यार्थ्यांना ती गुहा सापडली आहे. बाई शतशः प्रणाम .
या तीन स्त्रियांनी माझ आयुष्य सप्तरंगी केल .आजी मुळे शिस्त ,स्पष्टवक्तेपणा ,आई मुळे साहित्य ,भाषण ,नाटक ,कीर्तन म्हणजे हि सगळी देन तिचीच आणि काळे बाईनी Dull would he be of soul होऊ नका,निरस होऊ नका.
महिला दिना निमित्त या माझ्या त्रिदेविना साष्टांग .
mage by Bianca 2019log from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
खूप छान
👍😊
Khupach chhan 👌
Mast very nice and touching
काळे बाईंना नमन.
सुंदर लिहीलंत तिन्ही देवींबद्दल