मला घडवणाऱ्या, दिशा देणाऱ्या शिक्षिका!, महिला दिवस विशेष- प्रसाद शिरगावकर
३. इयत्ता बारावी: गोखले मॅडम
बारावीच्या रिझल्टचा दिवस हा माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आणि आयुष्याला कलाटणी वगैरे देणारा दिवस आहे.
मला बारावीत मेरिट लिस्टमध्ये यायची इच्छा होती. वर्षाच्या सुरुवातीपासूनच होती. थोडेफार प्रयत्नही करत होतो. पण वर्षभरात अनंत डिस्ट्रॅक्शन आली, बरीचशी मी स्वतः ओढवून घेतली. आंतरमहाविद्यालयीम नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून ते राजकीय आंदोलनांमध्ये झोकून देऊन पार कश्मिरला जाण्यापर्यंत अनेक उद्योग बारावीत असतानाच केले. शिवाय ग्रुपमधल्या काही उडाणटप्पू मित्रांच्या सोबत कॉलेजमध्ये लेक्चर्स बुडवून दिवसभर टेबलटेनिस खेळत बसणं वगैरेही उद्योग केले.
प्रिलीम महिन्यावर आली तेंव्हा एकदा, लेक्चर बुडवून टेबलटेनिस खेळताना, आमच्या गणिताच्या गोखले मॅडमनी मला पकडलं. मॅडमनी धू धू धुतलं (शाब्दिक). (त्यांनी तेंव्हा बोललेला शब्द अन शब्द अजूनही आठवतो आहे!). ते करण्याची त्यांना काही गरज नव्हती. त्यात त्यांचा काहीही स्वार्थ नव्हता. आपला एक हुषार विद्यार्थी भरकटू नये ह्या कळवळीपोटी त्यांनी मला झापलं होतं. पण ते खूप मनाला लागलं माझ्या.
मग स्वतःचीच लाज वाटून खडबडून जागा झालो. बेहेरे सरांच्या अकाउंट्सच्या आणि लोढा सरांच्या + गोखले मॅडमच्या maths च्या नोट्स घेऊन अभ्यास करायला लागलो (बाकी साऱ्या टंगळमंगळीमध्ये बेहेरे/लोढा सरांचा accounts + maths चा आणि अंधारे मॅडमचा जर्मनचा क्लास मात्र मी न चुकवता नियमित अटेंड करत होतो हे नशीब!).
मग दोन महिन्यांचं टाईम टेबल आखून वेड्यासारखा अभ्यास केला. दिवसाला चार-सहा-आठ-दहा कितीही तास अभ्यास करायचो. अत्यंत गुणी आणि हुषार मित्र मिलिंद पुरोहितची संगत धरली. त्याच्यासोबत बसून गेल्या सात-आठ वर्षांचे पेपर्स सोडवले. अशा भरपूर तयारीनी बारावीची परीक्षा दिली!!
पुढे काय चमत्कार झाला माहित नाही, पण बारावीला बसलेल्या महाराष्ट्रातल्या दिडेक लाख मुलांमध्ये मी तेरावा आलो!
तेंव्हा जे वाटलं ते तेंव्हाही शब्दांत सांगता आलं नाही, अजूनही येत नाही!! पण त्या दिवसानं माझ्या आयुष्याला अफाट कलाटणी मिळाली! Nothing succeeds like success! आपण काही करायचं ठरवलं आणि त्यासाठी जिवापाड प्रयत्न केले तर ते आपण करू शकतो याचा अफाट विश्वास त्यादिवशी मिळाला!! आणि त्या विश्वासाच्या आधारावर गेली पंचवीसेक वर्षं जगत मी जगभर हिंडत माझं करीयर केलंय!
जर गोखले मॅडमनी प्रीलिमच्या आधी मला झापलं नसतं तर हे सारं घडलं असतं का ह्या विचारही करवत नाही आज…
२. इयत्ता सहावी: कुलकर्णी बाई
“बाई, माझं भाषण आहे आज शाळेत, तुम्हाला म्हणून दाखवू का आधी?” मी माझ्या शिकवणीच्या कुलकर्णी बाईंना विचारलं…
“कसलं रे भाषण?”
“आज टिळक पुण्यतिथी आहे ना त्याचं…”
दरवर्षी एक ऑगस्टला आमच्या शाळेत काही निवडक मुलांना वेगवेगळ्या वर्गांमध्ये जाऊन लोकमान्य टिळकांसंबंधी भाषण द्यायला सांगायचे… मी सहावीत असताना एकदा माझी निवड झाली होती. मी एकदम कष्ट करून भाषण तयार केलं होतं पण शाळेत म्हणायच्या आधी कुलकर्णी बाईंना म्हणून दाखवावंसं वाटलं…
मग मी “लोकमान्य टिळकांचा जन्म, दिनांक… ” पासून सुरु करून पाठ केलेलं सगळं भाषण घडाघड म्हणून टाकलं…
भाषण झाल्यावर बाई म्हणाल्या, “शून्य मार्क…”
“का? बरोबर आहे की सगळं…” मी रडवेला होऊन म्हणालो…
“अरे, सनावळी वगैरे सगळ्या बरोबर आहेत भाषणात… पण त्या मुलांना पुस्तकातही वाचायला मिळतात की… मग तुझं भाषण का ऐकावं त्यांनी… भाषणात नेहमी ऐकणाऱ्यांना इंटरस्टींग वाटेल आणि त्यांना काहीतरी शिकता येईल अशी एकच ‘गोष्ट’ सांगायची… सनावळी नाहीत…”
“मग काय करू मी आता?”
मग त्यांनी मला टिळकांच्या एक दोन गोष्टी / किस्से सांगितले… माझ्या भाषणा ऐवजी ते किस्सेच मी बसवले आणि अर्थातच भाषण खूप छान झालं…
पुढे जगभर लेक्चर्स देत आणि भाषणं करत हिंडताना कुलकर्णी बाईंनी शिकवलेला हा धडा नेहमी सोबत राहिला!… आजही जगाच्या पाठीवर कुठेही मी भाषण किंवा लेक्चर देण्यापूर्वी, ‘लोकांनी माझं बोलणं का ऐकावं?’ याचा विचार करतो. अन त्यांना इंटरेस्टींग वाटेल अशा कोणत्या गोष्टीच्या रूपाने मला माझं म्हणणं मांडता येईल तो विचार करून तसं मांडतो.
कुलकर्णींबाईनी शिकवलेला हा भाषणाचा फंडा पंधरा देशांतल्या, तीसेक शहरांतल्या हजारो श्रोत्यांसमोर मी यशस्वीपणे वापरला आहे!!
१. इयत्ता पहिली : महाजन बाई
माझा पहिलीतल्या वर्गातला पहिला दिवस. जरा उशिराच ॲडमिशन झाली होती माझी शाळेत. तोपर्यंत इतर मुलं सेट झाली होती, मीच नवा होतो वर्गात. आईनी काय काय आमिषं दाखवून शाळेत नेलं होतं. मोठ्ठी शाळा, मोठ्ठं पटांगण, मोठ्ठा वर्ग बघून घाबरलो होतो सॉलीड… आई वर्गात मला सोडून निघून गेली… मी धाय मोकलून रडायला लागलो!
महाजन बाई होत्या आम्हाला… नऊवारी नेसणाऱ्या, आज्जी टाईप दिसणाऱ्या… त्यांनी आधी माझ्या रडण्याकडे दुर्लक्ष केलं… मी थांबेचना म्हणल्यावर आल्या आणि पाठीत दोन दणके घातले! मी चिडीचूप!!
पुढचे दोन दिवस मी आईवरचा आणि बाईंवरचा राग म्हणून शाळेत घुम्यासारखा बसून रहायचो… पाटी, पुस्तकं काही वर्गात काढायचोच नाही… तिसऱ्या दिवशी महाजन बाई काहीतरी अक्षरं वगैरे फळ्यावर लिहून ते आम्हाला पाटीवर लिहायला सांगत होत्या… मी ढम्म बसून राहिलो होतो… त्या आल्या, पाठीत पुन्हा दोन दणके दिले!
मी दप्तरातून पाटी काढून हुंदके देत देत लिहायला लागलो… जरावेळानी महाजन बाई आल्या आणि त्यांनी त्यांच्या नऊवारीच्या पदरानी माझे डोळे पुसले… माझ्या शेजारी बसून मला काय आणि कसं लिही ते समजावून सांगायला लागल्या…
आज पानंच्या पानं भरून लिहिताना, कधितरी, मी ‘गमभन’ गिरवावं म्हणून महाजन बाईंनी दिलेले ते चार दणके आणि मग माझे डोळे पुसतानाचा तो नऊवारीचा उबदार स्पर्श आठवतो!!
आपल्याला उगाच वाटत असतं आपण Self made man वगैरे… पण किती लोकांचे किती निस्सीम, निरागस आणि निस्वार्थी स्पर्श घडवत असतात आपल्याला ते लक्षातही येत नाही आपल्या!!
किंवा लक्षात ठेवत नाही आपण…
********
आयुष्यात योग्य त्या वेळी योग्य ती दिशा देणारा गुरु भेटावा लागतो. मला जेंव्हा दिशा दाखवण्याची गरज होती तेंव्हा महाजन बाई, कुलकर्णी बाई आणि गोखले मॅडम भेटल्या. त्यांनी दिशा दाखवल्या अन घडवलंही मला. त्या भेटल्या नसत्या तर आज जे आयुष्य जगत आहे ते निश्चितच जगत नसतो.
अशा आपल्याशी काहीही संबंध नसलेल्या, काहीही नातं नसलेल्या पण तरीही आपल्याला घडवणाऱ्या माऊल्यांचं कर्ज आयुष्यभर फेडता येत नाही.
Image by Bianca 2019log from Pixabay
Latest posts by Lekhak Online (see all)
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021