सुजाता…

”ए आई… हळू की दुखतंय मला”

”हम्म …. गावभर उंडारायला पाहिजे, संध्याकाळी केस फिस्कारून घरी यायचं मग गुंता काढताना केस खेचले जाणारच ना … नीट बस छान वेण्या घालून देते तुला.”

आईचं आणि माझं नेहमीचं भांडण सुरु होतं. मी रोजच्यासारखं तिला उलटून काहीतरी बोलणारच होते इतक्यात मैत्रिणींच्या हाका  सुरु झाल्या. पटकन दप्तर घेऊन, चपला घालून तीन तीन पायऱ्या गाळत मी वाड्याचा जिना उतरले आणि मैत्रिणींमध्ये जाऊन मिसळले.

घरात आई मला काहीही बोलत असली ना तरी मी मैत्रिणींमध्ये किती फेमस आहे हे तिला कुठे  माहिती आहे? वीस पंचवीस जणी तरी रोज शाळेत घ्यायला आणि सोडायला येत असतात. आमच्या बाई तर म्हणतात मला, ”अजातशत्रू आहे हं पोर  कोणाशीही पटकन मैत्री होते तिची.” मला पण खूप छान वाटायचं आणि ते खरंही होतं म्हणा. फक्त आमच्या चवथी अ च्या वर्गात नाही तर इतर वर्गातही मैत्रिणी होत्या मला.

असो, तर काय सांगत होते? आम्ही सगळ्याजणी शाळेत गेलो आणि शेवटच्या बाकावर एक मुलगी दिसली मला. ”ही  कोण? आपल्या वर्गात काय करतेय?” एवढे प्रश्न मनात येईपर्यंत वर्गात बाई आल्या. माझ्या पहिल्याच बाकावर खिडकीजवळच्या जागी मी जाऊन बसले आणि बाईंनी त्या नवीन मुलीची ओळख करून दिली. सुजाता नाव होतं  तिचं . किती जुनाट नाव आणि केवढा तो गंभीर चेहरा.

दिवसभराच्या दंग्यात तिला विसरूनही गेले मी. दुसऱ्या दिवशी सुजाताच्या शेजारी कोणी बसायलाच तयार होईनात. बाईंनी चार पाच दिवस आळीपाळीनं सगळ्यांना तिच्याजवळ बसवून पाहिलं, ”ती नवीन आहे की नाही आपल्या शाळेत? तुमची मैत्रीण आहे ना ती? मग बोला तिच्याशी.” वगैरे  सगळं सांगून सुद्धा कोणीच मुली सुजाताशी बोलत नसत कि खेळत नसत. मला तसं थोडंथोडं तिच्याबद्दल वाईट वाटत होतं; पण आठवड्याभरानं आमच्या बाईंनी कमालाच केली, खुशाल तिला माझ्याशेजारी आणून बसवलं आणि माझी खिडकीशेजारची जागा तिला देऊन टाकली. असा राग आला  मला. पण काही बोलले नाही. सांगितलं ना आई जरी मला हट्टी, दंगेखोर वगैरे म्हणत असली तरी मी खूप समजूतदार, शहाणी मुलगी आहे हो,  खरंच मला माहिती आहे ना?

तर राग बाजूला ठेऊन मी तिच्याशी बोलायला लागले. पण ही सुजाता असली ढीम्म … नुसती हां हुं  करत उत्तर द्यायची. मी पण मग चंगच बांधला. हिला बोलती करायचीच. आमची शाळा खूप खूप  मोठी आहे, लपण्यासाठी खेळण्यासाठी तर इतक्या जागा आहेत कि काही विचारू नका. शाळेत येण्यासाठी आणि जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. भले मोठे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गाला सोळा खिडक्या. पॅसेज लगतच्या दरवाजा असलेल्या बाजूला सात आणि समोरच्या बाजूला नऊ. समोरच्या खिडक्यांच्या बाहेर शाळेचं वॉल कंपाऊंड. त्या वॉल कंपौंडच्या आणि खिडक्यांच्या मध्ये एक अरुंद बोळ. या बोळात मात्र जाता येत नसे.  मी ठरवलं सुजाताला पूर्ण शाळा फिरवून दाखवायची.

शाळेच्या डाव्या बाजूला असलेली तालीम, शाळेमागचं मंदिर, शाळेत जाताना गल्लीत लागणारी  वेगवेगळी घरं , त्यातलं आमच्या वाघ बाईंचं घर, पिण्याच्या पाण्याचे नळ असलेली जागा, शाळेची गच्ची, तालमीतल्या पहिलवानांच्या व्यायामाची साधनं ठेवलेली खोली, तिथल्या सायकली, डंबेल्स… कानाकोपरा फिरायचो आम्ही. हिच्यासाठी माझ्या बाकीच्या मैत्रिणींपासून मी दूर झाले.

मी दाखवत होते तिला अगदी उत्साहात सगळं, दाखवताना माझा तोंडाचा पत्ता सतत चालत  असायचा…

अगदी पहिल्यांदाच तिला तालीम दाखवली. तिन पहिलीच नव्हती कधी म्हणे… इतकी सगळी मुलं  कुस्ती शिकत होती त्यांचे गुरु त्यांना सूचना देत होते, प्रोत्साहन देत होते पण हि आपली ढिम्मच.

चालता चालता अचानक माझा हात अगदी घट्ट पकडत सुजाता म्हणाली, ”ऐकलंस ?”

”काय” मी थबकले. ”कुस्ती खेळणाऱ्या मुलांचे आणि त्यांच्या उस्तादांचे आवाज ना? अगं  घाबरू नको. त्यांची पण ही  शाळाच आहे असं समज.”

”शू ssss  ते नाही… नीट ऐक डोळे बंद करून … मार खाणारे, हरणारे, कानातून, नाकातून रक्त  वाहणारे पहिलवान आहेत ना ते रडतायत… हुंदके देतायत … त्यांना पळून जायचं आहे इथून…” वगैरे ती बरंच काही बोलत राहिली. प्रत्यक्षात तिथं मला कोणीच रडताना दिसत नव्हतं. तिथून बाहेर आलो. शाळेशेजारच्या मंदिरात मी तिला घेऊन गेले.

“कसलं मंदिर आहे पाहिलंस का?” सुजाता म्हणाली,

आजपर्यंत आम्ही इतक्यांदा त्या मंदिरात खेळलो होतो कि गाभाऱ्यात जाऊन कोणाचं मंदिर आहे हे कधी पाहिलंच नव्हतं.

”कालिका मातेचं मंदिर आहे हे. बळी द्यावा लागतो इथे. या खांबांवर पाहिलंस? सगळी भूत, प्रेतं ,  राक्षसांचे पुतळे कोरलेले आहेत.” गूढ आवाजात सुजाता बोलत होती. एरवी तोंडाचा पत्ता अखंड चालवणारी मी सुजाता समोर मात्र गप्प होते. पहिल्यांदाच मला खूप उदास, निराश वाटत होतं. अजिबात खेळू नये, कोणाशी बोलू नये खाली मान घालून सूक्ष्मातले आवाज ऐकत बसावं असलं काहीतरी विचित्र वाटायला लागलं होतं मला. जशी सुजाता वागत, बोलत होती तशीच मीहि वागत होते, गंभीरपणे बोलत होते. असेल काहीतरी नवं थेर असं समजून आई माझ्याकडे पाहून हळूच गालातल्या गालात हसत होती. घरी आरशात पाहिल्यावर मी हळूहळू सुजातासारखी पोक्त दिसतेय हे मला जाणवत होतं. किंचाळावं, हे सगळं आई जवळ बोलावं असं खूप वाटत होतं. पण आई मात्र मला अजून अल्लड समजत होती. मला माझ्या इतर सगळ्या मैत्रिणींशी बोलायचं होतं, खेळायचं  होतं पण ही सुजाता जवळ बसायला लागल्यापासून सगळ्या माझ्यापासून तुटल्या होत्या.

हा ताण मला अगदी असह्य होत होता.  सुजाता मला प्रचंड राग येत होता. एके दिवशी मात्र अगदी असह्य होऊन शेवटी मी म्हटलंच, ”पुढच्या आठवड्यात बाईंना सांगून माझी जागा मी बदलून घेणार आहे. मला माझ्या जुन्या  मैत्रिणींजवळ बसायचंय … पुढं मला काही बोलू न देता सुजाता गूढ हसली.

मला अजूनच चीड आली.

”हसायला काय झालं?”

”अगं …. तुला जागा बदलून घ्यायची काही एक गरज नाही.”

”का? तू दुसऱ्या शाळेत जाणार आहेस?”

शांतपणे नकारार्थी मान हलवत सुजाता थंड नजरेनं माझ्याकडं पाहत राहिली. मी अस्वस्थ झाले. ती थंड नजरेनं एकटक माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली,

”नाही. मी मरणार आहे. आज पासून बरोबर चार दिवसांनी. येत्या रविवारी मी मरणार. मग तुला  जागा बदलायची गरज नाही. बस तु तुझ्या खिडकीतल्या जागेवर.”

”मी सांगितलं होतं ना तुला? तुम्हाला कोणालाही ऐकू न येणारे आवाज मला ऐकू येतात, बोललेलं  समजतं …?”

मी यांत्रिकपणे फक्त मान हलवली आणि हिप्नोटाईझ  झाल्यासारखी तिचं बोलणं ऐकत राहिले ….

”तर ते तेवढंच नाहीये. म्हणजे मला जसे तुम्हाला सगळ्यांना ऐकू न येणारे आवाज येतात किनई? तशी काही माणसं पण दिसतात.”

मला प्रचंड भीती वाटत होती, मला खूप बोलायचं होतं, सुजातापासून लांब पळून जायचं होतं. काहीतरी अतिशय वाईट माझ्या बाबतीत घडणार आहे हे अतिशय तीव्रतेनं वाटत होतं. पण मी काहीही हालचाल करू शकले नाही. थिजून फक्त सुजाताचं बोलणं ऐकत राहिले. एरवी किलबिलाट असणाऱ्या आमच्या शाळेत मला एकही आवाज ऐकू येत नव्हता.

डोळे विस्फारून मी सुजाताकडे बघत असतानाच ती अचानक स्फुंदून स्फुंदून रडायला लागली, म्हणाली, ”दीपा, मला मरायचं नाहीये गं … प्लिज वाचवशील मला?” माझे हात घट्ट पकडून ठेवत तिनं मला खिडकीकडे खेचलं.

”ती मुलगी बघ.” शाळेशेजारच्या बोळीत वाकून बघत ती मला म्हणाली, ”ती बघ…  तुला ती मुलगी दिसतेय?”

मी वाकून बघितलं.  खिडकी बाजूच्या त्या बोळीत झाडाची पानं, आमचे काही वेळेला पडलेले खोडरबर, शार्पनर, आम्ही फेकलेले कागदाचे बोळे याव्यतिरिक्त काहीही नव्हतं.

”ती बघ. आपल्याएवढीच आहे गं  ती. माझ्या आधीच्या शाळेत होती. कावीळ झाली होती तिला त्यातच गेली ती मागच्या वर्षी. बघ कशी पिवळी फट्टक… अशक्त दिसतेय. बोळीच्या टोकाशी पाच दिवसापूर्वीच दिसली मला. एकटक माझ्याकडे बघत, शाळेच्या भिंतीचा आधार घेत रोज पुढे पुढे येते गं ती. पहिल्या दिवशी दिसली तेव्हा पहिल्या खिडकीत होती. नंतर रोज एक खिडकी पुढे येते. दीपा आत्ता दिसतेय तुला ती? ती बघ आज पाचव्या खिडकीपर्यंत आलीये.”

सुजाताने कष्टानं त्या बोळीतली नजर काढून माझ्याकडे पाहिलं. मी अविश्वासानं आणि भीतीनं गोठून तिच्याकडे पाहत होते. तिला प्रचंड धक्का बसला.

”म्हणजे दीपा तुला दिसत नाहीये ती?” आश्चर्यानं आणि घाबरून तिनं विचारलं. आणि माझ्याजवळ सरकून माझे हात गच्च पकडून ती मला परोपरीनं विनवत राहिली. ”दीपा, प्लिज, तू तरी विश्वास ठेव गं. मला खरंच दिसतेय ती. आपल्या बाजूच्या खिडकीत ती आली ना … कि मग मरणार मी…. फक्त चारच दिवस राहिलेत दिपू… मला वाचव” आणि दोन्ही तळव्यात तोंड लपवून ती ढसाढसा रडायला लागली.

मी भीतीनं थिजून बसले होते. काही करून सुजाताला वाचवायला हवं. पण हे सांगू कोणाला? कोण विश्वास ठेवेल माझ्यावर?

पाय ओढत ओढत घरी आले. आई शेजारच्या काकुंशी बोलत होती, ” आता मोठी होतेय ना…. म्हणून शांत झाली आहे. मला तरी काळजीच होती बाई… अजून किती वर्ष धुडगूस घालत राहणार आहे बया… पण आजकाल अगदी गंभीरपणे, मोठ्या मुलीसारखी वागते हो … हे काय… हि बघा आलीच.”

मला आईला जोरात ओरडून सांगावसं वाटत होतं, ‘आई मी का गंभीर झाले ते पण विचार ना … सारखी ओरडू नको ना माझ्यावर… मला बोलायचं आहे ग तुझ्याशी ‘

हातपाय धुवून बाहेर आल्यावर आईनं दिलेली डिश बाजूला सरकवत मी आईला सांगितलं, ”आई मला काहीतरी सांगायचंय.”

”बोल बाळा.” आईच्या या दोनच शब्दांनी माझ्या घशात आवंढा आला … सगळा धीर एकवटून मी सगळं सगळं आईला सांगितलं. अगदी सुजाता मला पहिल्यांदा दिसली तेव्हापासूनचं सगळं. काहीही लपवलं नाही.

आईनंही सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि माझ्याकडे बघत माझ्या डोक्यावर तापली मारत एकदम हसतच सुटली. ”त्या भयकथांच्या पुस्तकांची पारायणं  करून एके दिवशी तूच भयकथा लेखिका होणार आहेस…. हाहाहा… लेखिका बाई हा खाऊ सगळा संपवून टाका आणि मग जा खेळायला… आणि रात्री झोपताना मला सांगा बरं का अशीच एखादी अजून एक कथा.”

माझं काहीही ऐकून न घेता आई तिची कामं करायला निघूनही गेली. हुंदका दाटून माझा घसा दुखत होता. आता शेवटची आशा देखील संपली होती. जर प्रत्यक्ष आईलाच माझं  बोलणं खरं वाटत नव्हतं तर इतर कोणी माझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नव्हता.

दुसऱ्या दिवशी शाळेत जायची अजिबात इच्छा नव्हती. तरी गेले. सुजाता आलीच नव्हती. मला बरंच वाटलं खरंतर. तरीही खिडकीतल्या माझ्या आवडत्या जागेवर बसायची माझी काही हिम्मत झाली नाही. डोळ्याच्या कोपऱ्यातून सुजातानं सांगितलेली ती मुलगी दिसतेय का हे मी पहात होते. पण कोणीही नव्हतं तिथं. पुढेही दोन दिवस सुजाता आलीच नाही. मी इतर मुलींशी बोलायला लागले. माझ्याजवळ माझ्या एका मैत्रिणीला बसवलं बाईंनी. तिला मी सुजाताची सगळी गोष्ट, तिला दिसणारी ती मुलगी सगळं सगळं सांगितलं. तशी थोडी घाबरली ती. पण एकमेकींच्या सोबतीनं. आम्ही खिडकीतून वाकून पाहिलं. कोणीही नव्हतं तिथं. मग जे काही आम्ही खिदळत सुटलो. छे.. असं काही असतं का? त्या बोळीत कोणी जाऊच शकत नाही तर ती मुलगी तिथं गेलीच कशी ना? आता मला बिलकुल भीती वाटत नव्हती. आज शुक्रवार… सोमवारी सुजाता आली कि तिला इथं बसूच द्यायचं नाही. उगाच घाबरवत बसते. मी पक्कं ठरवून टाकलं.

सोमवारी मी नेहमीप्रमाणं बागडत शाळेत आले. आजही सुजाता आली नव्हती. मला बरंच वाटलं मनातून. इतक्यात बाई आल्या. त्यांनी आम्हाला सगळ्यांना उभं राहायला सांगितलं आणि म्हणाल्या, ”आपल्या शाळेत नवीनच आलेली मुलगी सुजाता खासनीस हिचा काळ काविळ झाल्यामुळं आजच पहाटे मृत्यू झाला… तिच्या आत्म्यास…” मला पुढचं काही ऐकूच आलं नाही.

सुन्न होऊन मी खाली बसले. काही झालं तरी सुजाता आणि ती कावीळ झालेली अशक्त मुलगी काही डोक्यातून जात नव्हत्या. म्हणजे सुजाता सांगत होती ते खरं आहे तर… सुजाताचं त्या दिवशीचं बोलणं मला आठवलं, ”दीपा, प्लिज, तू तरी विश्वास ठेव गं. मला खरंच दिसतेय ती. आपल्या बाजूच्या खिडकीत ती आली ना … कि मग मरणार मी…. फक्त चारच दिवस राहिलेत दिपू… मला वाचव”

मी उठून उभी राहिले… कोणतीतरी अज्ञात शक्ती मला ‘नको नको’ म्हणत मागे खेचत असताना सुद्धा मी बाजूच्या खिडकीतून वाकून त्या अरुंद बोळीत पाहिलं… झाडाची पानं, धुळीनं भरलेले खोडरबर, शार्पनर, आम्ही फेकलेले कागदाचे बोळे या सगळ्यावरून माझी नजर पुढे जात जात बोळीच्या अगदी टोकाशी गेली… तिथे  भिंतीला हात टेकवून आधार घेत सुजाता उभी होती… अशक्त… पिवळी पडलेली …. पिवळ्या धम्मक पडलेल्या डोळ्यांनी ती माझ्याकडेच एकटक बघत होती…

आज सोमवार …. आज ती पहिल्या खिडकीत उभी आहे… म्हणजे अजून बरोबर नऊ दिवसांनी … मंगळवारी … मी…. मी…

मला मदत कराल प्लिज? …. प्लिज मला वाचवा हो.. मला मरायचं नाहीये… मला सोडवाल यातून??? करा ना काहीतरी प्लिज…

Image by Lorraine Cormier from Pixabay 

Sanika Wadekar
Latest posts by Sanika Wadekar (see all)

Sanika Wadekar

लेखन वाचनाची आवड. व्यवसाय - पुस्तक प्रकाशन पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात कोणतीही शंका असेल तर निःसंकोच पणे विचारा.

8 thoughts on “सुजाता…

  • July 29, 2020 at 6:07 am
    Permalink

    Even though it is a story it gives a sad feeling, feeling of helplessness, feeling that Deepa could not saved Sujata and she (Deepa) is now feeling the same sensation.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!