आठवणींची कातरवेळ- कल्लोळ भावनांचा_३

“डिओर्स! डिओर्स घेऊन नवरा बायको एकमेकांना आपल्या नात्यातून मोकळं करतात पण त्यांच्या मुलांचं काय? अमेरिकेमध्ये अगदी सहज डिओर्स घेतात. पण भारतात तसं नाही. भारतीय संस्कृती नाती जपायला शिकवते स्वार्थ नाही. आजपर्यंत कित्येकवेळा मनात हा प्रश्न येऊन गेलाय मी भारतीय कुटुंबात का जन्माला आले नाही?”  माझ्या मनात येणाऱ्या या प्रश्नाचे एकच उत्तर होते ते म्हणजे, नशीब! 

लहानपणापासूनआई बाबांची भांडणंच बघत आलेय. नंतर दोघेजण घटस्फोट घेऊन मोकळे झाले.. जेव्हा एकत्र होते तेव्हाही त्यांना कुठे वेळ होता माझ्यासाठी? एकमेकांवर कुरघोडी करणं, बिझनेस मिटिंग्ज, पैसा बास! बालपणात यापेक्षा वेगळं काही ₹ अनुभवलंच नाही मी. घरासमोर राहणाऱ्या एक भारतीय कुटुंबाकडे बघून नेहमी वाटायचं की हे आपले आई बाबा असते, तर किती बरं झालं असतं!

सोहम – सानिका! कितीवेळा ‘थँक्स’ म्हणू मी तुम्हा दोघांना? मी अगदी सहज भारतात जाऊन तिथली संस्कृती समजून घ्यायची इच्छा बोलून दाखवली आणि सोहमने त्याच्या चुलत आजीच्या घरी राहायचं सुचवलं. सगळं कसं अगदी न ठरवता घडत गेलं आणि मी अवघ्या दोन महिन्यांमध्ये सगळी तयारी करून सौरभच्या आजीच्या घरी  चक्क दोन वर्षांसाठी राहायला गेले. माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर दोन वर्ष होती ती!

आजोबांच्या मृत्यूनंतर आलेलं एकटेपणाचं दुःख आजीने न सांगताही मला कळलं. किती सुंदर नातं जपतात भारतीय लोकं! ६० वर्षांचा संसार! आजी तू खरंच खूप ग्रेट आहेस ग! इतकी वर्ष एकत्र कुटुंबात राहून संगळ्यांचं केलंस आणि आताही एकटं राहून घर संभाळतेयस. कशी ग तू अशी. स्वतःसाठी काही क्षण तरी जगली असशील का ग तू? 

“व्हॉट इज लव्ह, केअर अँड फॅमिली? ओन्ली इंडियन्स कॅन अंडस्टँड रिअल मिनींग ऑफ दिज वर्ड्स. मला या शब्दांचे अर्थ तुझ्यामुळे कळले आजी. अँड आय रिअली लव्ह मराठी लँग्वेज अँड इंडिअन कल्चर. माझा फारसा विश्वास नाही देवावर पण तू शिकवलेली शुभंकरोती, रामरक्षा, रोज  देवासमोर समोर म्हणते मी, तुझ्यासाठी! 

आजोबांच्या मृत्यूनंतर किती एकटी पडली होती आजी.  आजीने तिचं दुःख तिने कधीच कोणासमोर व्यक्त केलंच नाही. खरंतर दुःख व्यक्त करण्याइतकं जवळचं कोणीच नव्हतं तिला. त्यादिवशी मी  तिला आजोबांबद्दल विचारलं तेव्हा मात्र तिच्या डोळ्यातले अश्रू बघून मला खूप वाईट वाटलं होतं. ‘आजी, यु आर अ सिंगल पर्सन इन माय लाईफ, जिला मी कधीही सॅड बघू शकत नाही.

कातरवेळ! माय मोस्ट फेव्हरेट वर्ड. आजी तुला कातरवेळ आवडायची ना खूप, मलाही आवडते. तुझ्यासोबत रोज संध्याकाळी अंगणात बसून मारलेल्या गप्पा, केलेली डिस्कशन्स , अँड नीरज! आय विल नेव्हर फरगेट ऑल दिज थिंग्ज. आय वॉन्ट टू लिव्ह दॅट लाईफ अगेन. मला घरी यायला उशीर झालेला तुला अजिबात आवडत नसे. तिन्हीसांजेच्या आधी घरी येत जा ग.  तिन्हीसांज! एक आठवड्यानंतर हा शब्द बोलायला शिकले मी. पण तू रागावलीस ना तरी कधी राग नाही आला तुझा. उलट मला खूप छान वाटलं की कोणीतरी माझी काळजी करतंय. 

आजोबांना मी कधी बघितलं नाही पण तू जेवढं सांगितलंस त्यावरून मी एक नक्की सांगू शकते की आजी आणि आजोबा जगातलं बेस्ट कपल आहेत. इतकं प्रेम, खरंच कधी कोणावर करू शकतं का? मी कधी कोणावर असं प्रेम करू शकेन का? 

नीरज! आजीने इंडियन कल्चर शिकवलं आणि तू हिस्ट्री. मी तुझ्या घरी आलेलं आवडायचं नाही ना तुझ्या फॅमिलीला? टिपिकल ट्रॅडिशनल पर्सन्स! म्हणून तू रोज संध्याकाळी आजीकडे यायचास. मला आवडायचास तू खूप. पण मला आपल्यामध्ये मैत्री सोडून अजून कोणतीच रिलेशनशिप नको होती म्हणून तुला कधीच बोलले नाही मी काही.  तसंही आजीने सांगितलं होतं, लग्न दोन माणसांचं नाही, तर दोन कुटुंबांचं होतं. मला तर माझी फॅमिलीच नाही आणि तुझ्या फॅमिलीत मी कधी कोणाला आवडलेच नाही.

दोन वर्ष कधी संपली ते मला कळलंच नाही. निघताना वाटत होतं, जाऊच नये आजीला सोडून. या जगात जिला आपलं म्हणावं अशी एकच व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात, ती म्हणजे आजी. तिलाच सोडून दूर यावं लागलं. 

‘जेनी, नको ग जाऊस.’ असं बोलून पाणावलेल्या डोळ्यांनी तू मारलेली मिठी मी कधीच विसरू शकत नाही आजी. माझ्यावर कधी कोणी इतकं प्रेम करेल अशी अपेक्षाच केली नव्हती मी कधी.

अमेरिकेत परत येऊन वर्ष होऊन गेलं तरी आजी, अंगण, नीरज या साऱ्यांची खूप आठवण येतेय. सतत एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की अमेरिकेत जन्माला येऊनही भारतात गेल्यावर एकदाही इथली आठवण आली नाही पण अवघ्या दोन वर्षात भारतात घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण सतत बेचैन करते खास करून ही कातरवेळ! ही कातरवेळ वेड लावते, हुरहूर लावते. तरीही मला ती आवडते कारण याच वेळेने खूप सुंदर क्षण दिले आहेत मला.  म्हणून तर, तिन्हीसांजेला जेव्हा शक्य तेव्हा इथे पार्कमध्ये येऊन बसते मी.

आजही जेनी पार्कमध्ये  येऊन बसली होती. मी भारतातच रहायला हवं होतं का? आई, वडील, आजी, नीरज ही सारी नाती माझ्या नशिबात का नाहीत? आजी म्हणते तसं हक्काचं माणूस मला कधी भेटेल का? भेटलंच समजा कोणी तरी मी ते नातं निभाऊ शकेन का? 

लहानपणीच लग्न, कुटुंब या संकल्पनांबद्दल मनात निर्माण झालेला तिटकारा विसरून जेनी कधी या संकल्पनांचा स्वीकार करू शकेल का? जेनी भारतात परत जाईल का? तिला नेमकं काय हवंय आणि काय नको हे समजेल का तिला कधी?

Image by ReLea from Pixabay 

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!