आठवणींची कातरवेळ- कल्लोळ भावनांचा_६
सॉरी रॉन्ग नंबर… मला वाटलं नीरजचा फोन असेल. इकडे माहेरी आल्यापासून सतत एकाच गोष्टीची वाट बघतेय मी कातरवेळ आणि नीरजचा फोन. पण नीरजची संध्याकाळ तर जेनीच्या आठवणींनी भरून गेलेली असते.
नाही…. उदास नाही होणार मी. नीरजचं जेनीवर प्रेम होतं की नाही हे त्याला माहिती नसलं, तरी माझ्यावर नीरजचं जीवापाड प्रेम आहे, हे मला पक्कं माहिती आहे.
जेनी! कधीच भेटले नाही तुला, भेटायची इच्छा आहे असंही नाही. तुझा दुस्वास नाही केला कधी. एक मैत्रीण म्हणून नीरजच्या जीवनात तुझं जे स्थान आहे त्याचा मी आदर करते. त्याच्या मैत्रीवर तुझा अधिकार आहे. पण मी नीरजची बायको आहे. त्याचा अख्खा दिवस तुझ्या आठवणींमध्ये गेला तरी चालेल पण त्याची कातरवेळ मात्र मला हवी आहे.
नीरजचं आणि माझं अरेंज्ड मॅरेज. लग्न ठरलं आणि दोन महिन्यात मी सौ. नीरज झाले. हळूहळू फुलत गेलेलं साधं सरळ नातं आमचं. कसला आडपडदा नाही की राग रुसवे नाहीत. खरंतर नीरज इतका गोड आहे ना की ठरवून पण त्याच्यावर चिडता येत नाही मला. भांडणं होतात कधीतरी पण तेव्हढ्यापुरतीच. रात्री त्याच्या मिठीत सारं काही विसरायला होतं.
मला प्राजक्त आवडतो म्हणून आमच्या बेडरूमच्या खिडकीतून सहज दिसेल अशा ठिकाणी प्राजक्ताचं झाड लावलं त्याने. बाकी गजरे वगैरे मला कधी आवडलेच नाहीत. पण नीरजने आणले आणि मी माळले नाहीत असंही कधी झालं नाही.
प्रेम! कधी वाटलं नव्हतं मी कोणावर कधी इतकं प्रेम करेन . प्रेम मागून मिळत नाही. हिरावूनही घेता येत नाही. अचानक कोणीतरी तुमच्याही नकळत अलगदपणे तुमच्या आयुष्यात येतं. नीरजही असाच आला माझ्या आयुष्यात, अलगदपणे, पाऊल न वाजवता! आमचं नातं असंच बहरत राहू दे. भीती वाटते कधीकधी, कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना आमच्या प्रेमाला… नीरज… तू कधीही दूर जाऊ नकोस माझ्यापासून! माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. पण समजा तसं काही घडलं, तर माझीही अवस्था शेखर दादासारखी होईल का? रेवाच्या आठवणीत काय अवस्था करून घेतली आहे त्याने.
तिन्हीसांजेला हा काय विचार करतेय मी. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात, ते काही खोटं नाही. नीरज आला असेल का घरी? मी फोन करू का त्याला? … नाही…नको…. अनेकदा त्याला संध्याकाळी एकट्याला राहायचं असतं, जेनीच्या आठवणींमध्ये रमायचं असतं. नाही… या गोष्टींचं मला अजिबात दुःख नाही. पण नीरजची संध्याकाळ माझ्या आठवणीत जात नाही या गोष्टींचं वाईट मात्र नक्कीच वाटतं.
माझ्या आयुष्यामध्ये माझा मित्र, प्रियकर, सखा, नवरा सारं काही फक्त नीरज आहे. नीरजच्या आयुष्यात मला जेनीची जागा नाही घ्यायचेय. मला तशी गरजच नाही कारण त्याच्या आयुष्यात माझी अशी एक खास जागा आहे. पण त्याच्या आठवणींमध्ये मात्र मला माझी वेगळी जागा निर्माण करायची आहे. आणि मला खात्री आहे, आज ना उद्या त्याची संध्याकाळ माझ्या आठवणींनी भरून जाईल. त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघतेय नीरज.
नीरजवर निस्सिम प्रेम करणारी त्याची पत्नी निधी त्याच्या आयुष्यात एक मैत्रीण म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करू शकेल का? नीरजची आठवणींची संध्याकाळ कधी निधीच्या आठवणींनी भरून जाईल का?
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021