स्वप्नांची ऍनिव्हर्सरी
15 ऑगस्टआणि 26 जानेवारीनंतर जर कोणता महत्वाचा दिवस ‘त्या’च्या आयुष्यात लक्षात राहात असेल तर तो, त्याच्या लग्नाचा वाढदिवस. तसा तो लक्षात राहात नाहीच, पण मेंदूमध्ये मात्र कोंबला जातो.
आठ दिवस आधीच खरेदी सुरू होते,
तिच्या सात आठ खरेदीनंतर,. . . . त्याच्यासाठी एखादं यो स्टाईलचं टी शर्ट खरेदी करून. ……
त्याचं पोट सुटलेलं असतानाही,…..
मग त्याला आपोआप लक्षात येतं की तो दिवस लक्षात ठेवावाच लागेल. . . .
त्या दिवसाच्या आठवणी. ….. कशाही असल्या तरीही.
नाहीतर, भटजींनी केलेल्या होमासमोर कडक शेरवानीत घाम पुसतानाची आठवण कोण काढेल.
ते नातेवाईकांचे रुसवेफुगवे ……
साडीच्या रंगावरून पडलेले चेहरे,
अन मानपानावरून उतरवलेले फेटे,. . . . . . .
आणि पुन्हा पहिलीत शाळेत घातल्यासारखं तिचं धाय मोकलून रडणं,…..
होमामध्ये लाह्या टाकताना, तिच्या नाजूक बोटांचा हाताला झालेला स्पर्श, इतकीच काय ती त्या ऐतिहासिक दिवसाची गोड आठवण.
. . . . . . . . . . . … …….. . . . . . . . . . . . . . .
काळाच्या ओघात, बारा वर्षांनी, ते स्पर्श तितके नाजूक राहिले नसतीलही, . . . . . . . .
खरंतर आठवतच नाही.
नाही, . . . . . आजच्या ऍनिव्हर्सरी ला पुनःप्रत्यय घ्यायचाच. . . . . .
त्याच्या मनानं हिय्या केला, . . . . . .
हिय्या करून, तो जोशातच सोफ्यातून उठतो, रात्री लागणाऱ्या शस्त्रांची बेगमी करायला,
पण उठता उठता पाठीत सणक …….
‘ती’ लाच बोलावून मूव्ह लावून घेण्यात ऍनिव्हर्सरीची सांगता होते की काय अशी अवस्था,
पण होतो सरळ कसाबसा, . . .. तिच्याच मदतीनं,
कुठं चाललाय, हे न सांगताच निघून जातो,
“स्ट्राबेरी फ्लेवर देऊ की चॉकलेट”
मेडिकलवाल्याचा आगाऊपणा,
लपवत छपवत कसंबसं पाकीट घेतो,
तसेच लपवत दोन गुलाबही,
. . . . . . . .
तर दारातच छोटे पहारेकरी, त्यांच्या आईचे,
हातातले गुलाब तिकडेच जप्त होतात,
“अरे अरे, ” म्हणेपर्यंत त्या गुलाबांची अख्ख्या घरात जाहिरात होते,
आणी त्याच्या इराद्यांचीही, ……………
नाही म्हणायला, किचनमध्ये ‘ती’च्या भोवतीने दोन्ही गुलाब नाचत, फेर धरुन येतात,
तिचं गालातल्या गालात हसणं, आमटीच्या फोडणीलाच काय ते फक्त दिसतं,
फोडणीही मग खळखळून हसते,
घरातले ते दोन गुलाब, उर्फ कार्टी बापाने आणलेल्या गुलाबांची जाहीरात पुर्ण झाल्याखेरिज ब्रेक घेणे शक्य नसते.
ज्ञानेश्वरीतुन डोके वर काढुन, आई देखील पहाते, नाचत्या गुलाबांकडे, आणी ते घेउन नाचणार्या तिच्या बाल सवंगड्याकडेही, …….
आणी पुन्हा खाली पाहुन किंचीत हसत वाचु लागते,
“पाहे पां पुर्ण चंद्राचिया भेटी । समुद्री भरते अपार दाटी।
तेथ चंद्रासि काय किरिटी । उपखा पड्ला ॥“
‘तो’ बिचारा, काहीच न समजल्याने न्युज वर लक्ष देतो,
तिकडे त्या गुलाबांच्या दोन काटक्यांच्या तलवारी झालेल्या असतात,
मोठ्या बेडवर लढाई,
दोन्ही मावळे आधीच नाचून बेडशीटचं रणांगण करून टाकतात,
अख्ख्या बेडवर त्यांच्याही नकळत पाकळ्या पसरून टाकतात,
‘तो’ जातो, . . . . . . त्या दोन काटेरी काटक्या फक्त हलकेच उचलून फेकून देतो,
बाकीचं गुलाबी पाकळ्यांच्या सोबतीतलं, बेडशीटचं विस्कटलेपण त्याला आवडतं, . .
ते तो तसंच ठेवतो, . .
पण, तिला नाही आवडत. . . . . .
जेवणं आटपल्यावर,. . . ती येते,. . सगळी गुलाबी स्वप्नं बेडशीटातच गुंडाळून, झटकून येते,
पुन्हा बेडशीट नीट अंथरून, मुलांना झोपायचं फर्मान काढते,
दोन्ही उपद्व्यापी बाळं बेडरूममध्येही मस्ती करत राहतात,
हा उगाच, वेगवेगळ्या चॅनेलवर गाणी बदलत राहतो,
तिचं लक्षच नसतं,
ती मुलांच्या युनिफॉर्मला इस्त्री करत राहते,
. . . . . . . . . . . . . . . . . . . . .
बाहेर चांदण्यांनी बाल्कनीत तोबा गर्दी केलेली असते,
चंद्रही उगाच झूम लेन्स लावून बसल्यासारखा,
ती मात्र तिच्या कुशीत तिचे दोन नटखट चंद्र झोपवत राहते,
. . . . . . . . .. . . . . . . . . . . . . .
तोही त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत राहतो,
त्याच्या डोळ्यातलं आर्जव तिला दिसूनही, ती दुर्लक्ष करत उगाच पुटपुटते,
“पाचला उठायचंय, मुलांची शाळा आहे उद्या……”
कुठल्यातरी नकळत क्षणी,
दोन्ही बाळं स्वप्नांच्या दुनियेत गुंगून निद्रेच्या अधीन होतात,
अन . . . . . . बहुतेक ‘तो’ ही,
‘ती’ हलकेच हसते, त्याच्या स्वप्नांवर चादर टाकून, डोक्यावरून हात फिरवते,
अन, . . . . . .कुशीवर वळते,
तोच त्याचा हात पाठीवर,
इतक्यात, . …….. आईची हाक येते,
“बाम लावुन देतेस का ग …..”
ती पुन्हा उठते,
जाताना ती शांतपणे म्हणते,
“झोपा आता ……”
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . …
आता तो पुन्हा बाल्कनीत,
पहिल्या सिगारेटच्या झुरक्यातही, चांदण्या काही पांगत नाहीत,
तिथेच हटून बसतात,
दोनतीन धुराच्या वलयांनी, अगदी ठसका लागला तरीही तशाच ताटकळलेल्या,
अखेर, . . . . . .
अखेर,. . . . . . ती येते,
पाठीमागून हलकेच मिठीत घेते,
मग मात्र, चांदण्याही विरघळू लागतात अन चंद्राच्या झूम लेन्सची काचदेखील,. . . . . . . . .
Image by Thanks for your Like • donations welcome from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Good
धन्यवाद