शेजार
” माझी एक इंच जमीन द्यायची नाही, मी”
घरातून नुकताच भूमिअभिलेख विभागातून रिटायर झालेल्या बर्वे काकू गरजल्या. जमिनीशी संबंधित सर्व कायदे आपण जाणून आहोत असा त्यांचा ठाम गैरसमज होता.
त्यांना उत्तर द्यायला म्हणून जगदाळे काका धावत बाहेर आले खरे, पण टी शर्ट घालायला विसरल्यामूळ यशस्वी माघार घेऊन पुन्हा आत गेले.
गेल्या काही दिवसांपासूनची हि रोजचीच खुन्नस होती. आधीचं शोभिवंत झुडुपांच कुंपण असताना हे वाद नव्हते. फारतर झुडपाच्या फांद्यांवर दोन्ही कडून आक्रमण व्हायचे. पण वाद नाही. ते हेज म्हणजे . . . . . कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नामध्ये कारवार धारवाड बेळगांव आणि कधीमधी गडहिंग्लज सारखी अवस्था . . . .. . . .. त्यांचं जे अनन्यसाधारण महत्व आहे तेच जणू त्या हेजचं महत्व होतं. त्याला लालूच दाखवल्यासारखं भरपूर पाणीही दिलं जायचं, अन हवी तेव्हा, हवी तशी कात्री लावली जायची. पण एका उन्हाळ्याIत कुंपण जळून गेलं अन, खालची तिरक्या विटांची ओळ उघडी पडली.
तिथपासून बॉर्डर सिनेमा मधल्या कुलदिपसिंग सारखी दोन्ही कडून गर्जना व्हायला लागली.
मध्ये सरळ भिंत बांधून घ्यावी, इतपत एकवाक्यताही होत नव्हती, अन खर्च करण्याची तयारी दोन्ही बाजुंची नव्हती.
बर्वेकाकू आपला “इंच इंच लढवू” हा कोकणी बाणा कोकणातून पुण्यात घेऊन आलेल्या, अन जगदाळेकाका आपला घाटी गबाळेपणा सोडायला तयार नव्हते.
दोघांनाही सोबतीला कुणी नव्हतं…..
आपल्या मुलांना अमेरिकेला डोनेट करण्यात यशस्वी झालेले, …. पण टिपिकल स्वाभिमानी पालक . . . . एकही पैसा मुलांचा न घेणारे.
मुलं कधी आलीच तर त्या दोघांच्या वादाकडे दुर्लक्ष करायची, . . . कधी हसायचीही. पण या दोघांसाठी मात्र हा जीवनमरणाचा प्रश्न होता.
. . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . .
चार महिन्यांपूर्वी काकू तीर्थ यात्रेला गेल्या होत्या. . . . . दक्षिण भारतात . . . . . तोवर जगदाळे काकांची गनिमी कावा वृत्ती जागी झाली. . . . . जमेल तितकं विटांचं खोदकाम करून चांगल्या चार इंचानं विटा पलीकडं रोवून टाकल्या.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . … . . . . . . .
” हुश्श ” करत तब्बल दहा दिवसांनी काकू अवतरल्या, ओला मधल्या बॅगा गेट मध्ये ठेवतात न ठेवतात, लगेच सीमेवर जाऊन आल्या. . . . . . . टायगर हिल वर काहीतरी हालचाल झाल्याचं लक्षात आलं. . . . . . पण त्याही गनिमी कावा कोळून प्यालेल्या . . . . . . . काहीच समजलं नाही असं दाखवत आत निघून गेल्या.
. . . . . . . .
पण दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून कामाला लागल्या. . . . . . . गनीम जगदाळे घोरत पहुडलेला. . . . . . . अख्ख्या कॉलनीतली कुत्री स्वरभास्कर जगदाळ्यांच्या “घोर” रागाला प्रतिसाद देऊन कंटाळून झोपी गेलेली.. . .. . . तरी अजून भैरवीलाही सुरुवात नव्हती.. . . . . . . चालू मैफिलीत सीमेवर हालचाली झाल्या अन पुन्हा विटांची जागा आठ इंचांनी सरकली.
हात झटकत , बर्वे काकू आत निघून गेल्या. . . . . . पुन्हा निद्रेची आराधना सुरू केली. अर्थात ती येणार नव्हतीच.
. . . . . . . . . . . . . . . . . . .
जगदाळे काका त्यांच्या भल्या पहाटे आठ वाजता उठले. दरवाजात ठेवलेली चितळेंची पिशवी अन तोंडावर रागाने मारावा तसा फेकलेला सकाळ गोळा करत, चिपड आलेल्या अर्धोन्मीलित नेत्रातून पहिला कटाक्ष टाकला तो सीमेकडे. आपल्या घन’घोर’ झोपेने आपला घात केला हे त्यांच्या लक्षात आले. आता गाव बोंब करणं गरजेचं होतं. झालंच तर युनो म्हणजे सोसायटीच्या दरबारी प्रश्न घेऊन जाणं अपरिहार्य झालं. त्याआधी नीट ब्रश करून चहा टोस्ट खाऊन घेऊ, अन्यथा ऐन रणधुमाळीत शुगर लो व्हायची . . . असा प्रामाणिक विचार करून ते आत गेले.
पूर्ण तयारीनिशी बाहेर आले तेव्हा, काकू झाडांना पाणी देत होत्या.
” हे शोभत का तुम्हाला बर्वे काकू?”
जगदाळ्यांचा पहिला बॉम्ब, . . . .
” मग तुम्हाला शोभलं का मी गेल्यावर असं वागणं?”
प्रतिप्रश्न करायच्या नादात काकूंनी घुसखोरी कबूल करून टाकली.
“स्वतःला भूमिअभिलेखच्या कायदेपंडित समजता, ही कुठली पद्धत ……………..”
“तुम्हाला समजत नाही का आपण कसे वागावे ते. आपलं वय काय? वागतो कसे ?”
” माझ्या वयावर जाऊ नका मी व्ही आर एस घेतली आहे, इतकं वय नाही माझं”
” वय कमी म्हणजे काय? दूध खुळे आहात का ? आणि काय माहीत व्ही आर एस घेतली की काढून टाकलंय.”
एका वाक्यात दोन दोन अपमान . . . . . . . बी पी वाढतोय बहुतेक.
” खबरदार माझ्या नोकरीबद्दल बोललात तर, घरी या माझ्या कम्पनीची प्रशस्तीपत्रके दाखवतो”
” शेकोटी करा प्रशस्तीपत्रकांची . . . . . . …”
आणि असंच बरंच काही दोन्ही कडच्या तोफांमधून येत राहिलं. सोसायटीची करमणूक होत राहिली. . . . . शेवटी सोसायटी सचिवांनी मध्यस्थी करून दोघांना घरात पाठवलं. दोघांपैकी कुणाचाही बी पी वाढला तरी त्यांच्याच डोक्याला ताप होणार होता.
सचिवांनीही सीमेचं निरीक्षण केले, . . . . ….. एकही वीट सरळ नव्हती, काही विटा काकूंकडे काही विटा काकांकडे सरकलेल्या, . . … सोसायटीने रोवून दिलेला प्लॉटच्या कॉर्नरचा दगड मात्र स्थिरपणे हसत होता. सचिवांनीही त्या दगडाच्या हसण्यावर टाळी दिली. अन दोघांकडे आळीपाळीने जाऊन समुपदेशन करून आले. तब्येतीची काळजी . . . . . बी पी ची गोळी . . . . . वेळच्या वेळी जेवण वगैरे वगैरे.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . ……………. . .. . . .
तरीही सीमावर्ती भागात हालचाली सुरूच राहिल्या.. …… आता दोघे भांडत नव्हते. . . . . . . . .पण सीमा सरकवण सुरूच होतं. या सरकवण्याला त्या “विटा”ही आता विटल्या होत्या.
आणि एक दिवस,
बर्वे काकूंचा मुलगा येऊन गेला…….. जगदाळे पहात होते, “म्हातारी” खुश दिसत होती.
एक दिवस मुलीला घेऊन आईकडे राहिला , आठ दिवस पुण्यातच सासुरवाडीत राहिला. सुन आलीच नाही. तरीही “म्हातारी” नातीला घेऊन मिरवत होती.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . … … ……..
आठ दिवस झाले मुलगा माघारी जाऊन,.. … …
काकू हल्ली बाहेर दिसेना. …..
बागेला पाणी द्यायलाही नाही.. . . . .
बरेच दिवस झाले विटांची हालचाल नाही.. . . . . . .
त्यामुळं जगदाळेंनाही करमेना. . . ……. आणि बहुतेक विटांनाही. काकांनीही मग सीमेवर हालचाल बंद केली.
अजून आठ दिवस गेले, ….
परिस्थिती गंभीर होत चाललेली…. ..
न राहून काकांनी सचिवांकडे विषय काढला.
“अहो मग बरंय की, भांडण नाही , शांतता आहे.” सचिव हसत म्हणाले.
” नाही, तरिपण मी काय म्हणतो,……. तब्येत वगैरे ठीक आहे ना. तुम्हीच एकदा चौकशी करून पहा.”
ठरल्याप्रमाणे सचिव गेले, . . …… काकूंशी तासभर चर्चा करून आले.
काका रस्त्यातच उभे . ….
“मुलगा माघारी येणार नाही म्हणतोय, हवं तर घर विकून स्टेटसला ये म्हणतोय” सचिवांनी माहिती पुरवली. “त्यामुळं काकूंनी धसका घेतलाय, जेवणही कमी झालंय. अशक्त वाटत होत्या. मुलाला कळवावे लागेल, बहुधा, बघू.”
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
पुन्हा नेहमीप्रमाणे सकाळ झाली. काकांचं घोरणं अजून सुरूच होतं. दारात ‘चितळे’ हजर होते. . ….इतक्यात सकाळही फडफडत येऊन पडला. काकूंच्या दारावर मात्र पेपर वाल्याने जरा जोर लावूनच लोकसत्ता फेकून मारला. . ….. चहा पिता पिता, काकू उठल्या…… बाहेर आल्या……. पेपरवाला पळाला होता.
त्यांनी पेपर उचलला …. अन ….. प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारखं सीमेकडे पाहिलं. ……………
तिरक्या विटांचं कुंपण अक्षरशः उधळलं होतं. …… डोक्याची शीरच हलली. हातातला चहा रागाच्या भरात फेकत त्या पायरीवरून खाली उतरल्या……
धुमसतच पदर खोवून कामाला लागल्या….
काकांचं फावडं तिथंच पडलं होतं. …..
बडबड करत …… एका रेषेत सगळ्या विटा लावूनच दम घेतला……
….. . . . . . . . . . . . . . .. . . . . . .
खूप थकल्या होत्या ……
कडकडून भूक लागली होती……
रागाच्या भरात आत गेल्या……
दहा पंधरा मिनिटं गेली असतील…..
खमंग थालिपीठाच्या वासाने काका जागे झाले……..
पलीकडच्या किचन मधून दरवळ येत होता…..
डोळे चोळत, काका उठले होते…..
खिडकीतून बाहेर पाहतात तर, …… सगळ्या विटा ओळीत …..
आता स्वतःशीच काका हसू लागले,
……….…………………………………
“थालीपीठ छान झालंय हो. झकास वास घमघमतोय.”
काकांनी बागेत बसून चहा पिता पिता आरोळी दिली. अन रस्त्यावरून पेपर वाटून माघारी निघालेल्या पोराला, अंगठा दाखवला.
“एकही मिळणार नाही, निर्लज्ज माणूस, कुठला.” अस म्हणत काकूंच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. काका खदाखदा हसत सुटले.
Image by Dean Moriarty from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
भारीच👌👌
धन्यवाद
छान
shejarcha vad chhan mandala aahe