बोहोनी……
रात्रीचे ११ वाजून गेले होते. पंछी, बॉबी आणि पपलू परेशान होते. रोज एव्हाना बोहोनी होऊन वरून एखादा राउंड व्हायची सवय असलेल्या त्यांच्या चेहेऱ्यावरची अजून बोहोनी न झाल्याची चिंता त्या अंधुक प्रकाशात देखिल जाणवत होती. एखादी गाडी स्पीड कमी करून थांबून निघून जात होती. बाकी साला सगळा रोड खाली होता आज. बोहनी कधी होणार कळत नव्हते….
बॅलार्ड इस्टेटच्या वालचंद मार्गावर असलेल्या अनेक इमारतींमधील ऑफिसेस सहा ते साडे सहाच्या मध्ये सुटत. रस्त्यावर अचानक वर्दळ सुरु होई. गाड्या, बसेस, taxi आणि चालणाऱ्या लोकांनी रस्ता तासाभरासाठी फुलून जात असे. मग हळूहळू अंधार होऊन मुनिसिपालटीच्या पिवळ्या दिव्याच्या उजेडात तो रिकामा रस्ता आणखी एकाकी वाटू लागे. साहेबाच्या काळात बांधलेल्या दगडी इमारती एकमेकिंच्या आणि त्यांनी एकत्र जगलेल्या इतिहासातील आठवणींच्या आधाराने उद्याचा सूर्य उगवायची वाट बघत आळसावत. एखाद्या ओव्हर टाईम करणाऱ्या चाकरमान्याच्या मधूनच जाणाऱ्या गाडीच्या मागून भुंकत धावणारी कुत्री सोडली तर त्या रस्त्यावर नऊ वाजल्यापासून भयाण शांतता असे. त्या शांततेच्या आडोशात ह्यांचा “धंदा” तेजी पकडत असे….
खांद्यापासून ६ इंच खाली सुरु होऊन गुढग्यापासून ८ इंच वर संपणारा खोल गळ्याचा, अंगाला घट्ट बसून सर्व डीटेल्स उठावदारपणे दाखवणारा, स्लीवलेस, डोळ्यात रुतेल अश्या लाल रंगाचा फ्रॉक परिधान केलेली बॉबी चेहेर्यावर भडक मेकप करून, उंच टाचांचे चंदेरी बूट घालून हातातली हिरवी पर्स आणि गळ्यातला जांभळा स्कार्फ हलवत दगडी खांबामागे बिडी मारत उभी असे. बिहारमधल्या दरभंगा गावातल्या एका गरीब शेतकऱ्याच्या शेतात पिक फारसं यायचं नाही पण बायकोची कुस सदा फुललेली असायची. अगदी न चुकता. सतत १२ वर्ष. त्या कुशीतलं एक फूल म्हणजे बॉबी. मग अश्या घरातल्या काही मुलींचा जे होतं तेच बॉबीचं देखिल झालं. ओळखीचा काका, मुंबईमध्ये चित्रपटात कामाची फूस आणि जे जे काय होऊ शकत ते सगळं होऊन गेली ३ वर्ष बॉबी स्वतःच्या “देहावर” उभी आहे. तिला ह्याची लाज, पश्चाताप वगैरे काही नाही. हा तिचा धंदा आहे आणि तो ती इमानदारीने करते.
बॉबी स्थानापन्न झाली की पंछी पोझिशन घेई. दाढीचे खुंट वाढलेले, चरस मारून खोल गेलेले डोळे, तोंडात तुंबलेला गुटखा आणि त्याचे ओठांच्या दोन्ही बाजूने बाहेर पडणारे ओघळ, गळ्यात रुमाल आणि तर्जनी व मधल्या बोटात धरलेली फिल्टर भिजलेली ब्रीस्तोल धरून पंछी सराईत नजरेने गिऱ्हाईक हुडकत असे. डोंगरीच्या रिमांड होम मध्ये बालपण गेलेल्या पंछीचे पंछी एव्हढेच नाव होते. रिमांड होम मधून “सज्ञान” झाल्यावर बाहेर काढल्यानंतर भुरट्या चोर्या, पाकीटमारी, तिकिटांचा काळा बाजार करत करत जवळ जवळ सगळ्या पोलीस ठाण्यात ओळख झाली होती. दिवसा ठोल्यांचा खबरी आणि रात्री बॉबीचा दलाल बनून पंछी दोन वेळची दारू आणि जोइंटची सोय करत असे. जेवणाची सोय टीबी हॉस्पिटल मध्ये डोस घ्यायला गेल्यावर होत असे. “इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम” ह्या त्याला उच्चार देखिल करायला कठीण असलेल्या रोगाने त्याला ग्रासले होते. त्याला इतकेच माहिती होते की रोजचा दिवस बोनस आहे. तो जियो जी भरके….
पपलू म्हणजे एक वल्ली होती. दिवसा एका इराण्याच हॉटेलात वेटरचे काम, पहाटे कॉल सेंटरच्या पोरांना सुमोने ड्रॉप करायचे, ओळखीच्या लोकांची RTO ची कामे घ्यायची आणि रात्री ८ ते पहाटे २ पर्यंत बॉबी आणि गिऱ्हाइकांना गोल्डन लॉज मध्ये सोडायचे. प्रत्येक कस्टमरचे २०० रुपये द्यायचा इक्बालभाय. त्याची बायको राजस्थान मध्ये राहायची. मग इथे साथ बॉबीची. शेवटचं गिऱ्हाईक गेलं की मूड असेल तर तो थांबायचा लॉजवर. त्याच्या आणि बॉबीच्या मध्ये “व्यवहार” ह्या पलीकडे नाव न देता येणार एक नातं होतं…..
रात्रीच्या पिवळ्या उजेडात दगडी इमारतींच्या आडोश्याने सामसूम झाल्यावर ह्याचं “दुकान” लागायचं. मुंबईमध्ये एकटे राहणारे, जीव रमवू पाहणारे, घरातल्या पोळीपेक्षा बाहेरच्या नळीची चटक लागलेले अनेक ह्या दुकानाची खबर ठेऊन होते. मग हळूच एखादी गाडी किंवा बाईक त्या गल्लीत स्पीड कमी करून दगडी खांबानपलीकडे शोधक नजरेने पहात फिरायला लागायची. पंछीची सारवलेली नजर सावज हुडकायची. त्याचा इशारा मिळाला की बॉबी बिडी टाकून चिंगम तोंडात कोम्बायची आणि मोबाईलच्या लाईट मध्ये लिपस्टिक नीट करून तयार राहायची. गाडी ठराविक ठिकाणी येऊन थांबली की पंछी गुटखा थुंकून पुढे व्हायचा आणि “क्या साब दिखाऊ क्या? मस्त माल है” म्हणून जाळ टाकायचा. आसुसलेलं गिऱ्हाईक अधाश्यासारख दिखा यार म्हणायचं आणि पंछीची परवलीची शिट्टी ऐकून बॉबी खांबाआडून बाहेर यायची. तिचा एकंदरीत अवतार पाहून उतावळ झालेलं गिऱ्हाईक फारशी घासाघीस न करता पैसे पंछीच्या खिशात कोंबायच. मग ह्या व्यवहारातील “रायडर” सांगितला जायचा. बॉबी घरी नाही जाणार. तुम्हाला गोल्डन लॉज मध्येच जावं लागेल. एव्हाना बॉबीने शेजारी बसून दंडाने हळूच स्पर्श केलेलं गिऱ्हाईक लॉजच भाड किती, ते कुठे आहे असल्या फालतू चौकश्या करायच्या मूड मध्ये नसायचं. मग हळूच अंधारातून उगवणारा पपलू गाडीत बसायचा. आणि गाडी लॉज कडे रवाना व्हायची. रूमवर गेलेली बॉबी काही वेळात गिऱ्हाईकाला रिता करून, परत मेकप करून खाली यायची. पपलू आणि ती परत स्पॉटवर. बॉबी परत बिडी पेटवून खांबानमागे उभी राहायची आणि एखादी हळू फिरणारी गाडी परत शोधात यायची. परत धंद्याला सुरुवात व्हायची……
रात्रभरात काही हजार कमवायची चटक लागलेल्या ह्यांना आज बोहोनी न झाल्याने अस्वस्थ वाटत होतं. आता जवळ जवळ बारा वाजून गेले होते. त्यातच आज राउंडअपवाले ठोले सहा गांधी घेऊन गेले होते. पूर्वी एकदा पैसे दिले नाही म्हणून बॉबीला उचलून घेऊन गेले होते. जेल मध्ये तीन रात्री काढलेली बॉबी नंतर आठवडाभर नीट चालू शकली नव्हती. “अशी साल्यांची गिधाडांची जात” असं पपलू म्हणत असे. म्हणून तेव्हा पासून रोकडा घ्या आणि निघा असा अलिखित नियम होता गिधाडांसाठी. तर आज त्यांची पण धाड पडली होती. महिना अखेर होती. बॉबीला गावाला थोडे पैसे पाठवायचे होते. घरून चिट्ठी आली होती. पंछीला एका मोठ्या डॉक्टरला भेटायचे होते. पैसे हवे होते. पापलुच्या बायकोला नववा महिना लागला होता. पैसे पाठवणं आवश्यक होतं. बोहोनी होण्याची सगळ्यांना गरज होती. दोन तीन गाड्या येऊन गेल्या पण सौदा झाला नव्हता. सगळे परेशान होते….
इतक्यात एक मोठ्ठी लांबसडक गाडी येऊन थांबली. पंछी सरसावला. गाडीची काच खाली गेली. गाडीत एक अरब होता. बॉबी पुढे आली. अरबाने तिला पसंत केली. पंछीने खूप हिम्मत करून नेहेमीपेक्षा दहा पट भाव सांगितला. अरबने क्षणभरही विचार न करता एक आठवड्याचं बुकिंग केलं. सगळे पैसे अडवान्स. फक्त अट एकच. बॉबीने तो रहात असलेल्या हॉटेलात त्याच्या बरोबर रहायचं. पपलू तयार नव्हता. अरबने त्याचं तोंड देखिल नोटांनी भरून टाकलं. बॉबी गाडीत बसली. काळ्या काचा बंद झाल्या. गाडी हळूच निघून गेली. आज सहा महिन्याची कमाई एकाच झटक्यात अरबाने करून दिली होती.
बोहोनी झाली होती……
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023