आई
दारातून आत येताच तिने घाईने चप्पल एका बाजूला सरकवल्या, पर्स खोलीत अडकवली, बाथरूममधे जाऊन हातपाय स्वच्छ धुतले आणि लेकीला हाक मारली. इतर असंख्य बायकांसारखी घर, नोकरी, मूल, आलंगेलं, यातली तिची कसरत न संपणारी होती. रोजच्याप्रमाणे दमलीच होती ती, पण यावर एक रामबाण औषध होतं तिच्याकडे. लेकीशी खेळणे आणि स्वतः काहीतरी मस्त बनवून तिला खाऊ घालणे! दिवसातला सर्वात आनंदाचा क्षण असावा तिच्यासाठी हा.
आई ही जमातच विलक्षण असते. जगातल्या सगळ्या आयांच्या समोर स्वर्गसुख एका बाजूला आणि मुलाबाळांना खाऊ घालण्याचा आनंद दुसऱ्या बाजूला असं ठेवलं तर सगळ्या आयांचा चॉइस दुसरा असेल यात शंका नसावी.
‘आज काय बनवू? तिने लेकीला विचारलं. लेक म्हणाली, ‘तिखटमीठाच्या पुऱ्या.’ ‘अग काय सोप्पा पदार्थ सांगितलास, पटकन बनवते, दे टाळी ! असं म्हणत ती पदर खोचून कामाला लागली. कणकेत हळद, तिखट, मीठ, थोडी जीरेपूड आणि हो, भरपूर माया घालता घालता ती स्वतःशीच गुणगुणायला लागली. लेक तिच्या पायात पायात करत काहीतरी चिरीमिरी कामं करत होती. ‘जरा पाणी दे ग’ असं म्हणलं की हे भल्या मोठ्या पातेल्यात एवडूसं पाणी देत होती. ते बघून तिला हसू फूटत होतं. आपण सुद्धा कसे हट्टाने आपल्या आईला मदतीच्या नावाखाली सांडलंवडच जास्त करायचो ते आठवून चेहऱ्यावर आणखी हसू पसरत होतं.
कणिक तयार झाली. तिने पुऱ्या लाटायला घेतल्या. पण आज काही केल्या तिच्या पुऱ्या नीट लाटल्या जाईनात. पोळपाटावर एक एक नकाशेच व्हायला लागले. आज काय अचानक अशी गडबड झाली? ती हिरमुसली. वाटीनेच कापाव्यात असा विचार करत तिने लेकीकडे एकवार पाहिलं. लेकीला तिचा प्रॉब्लम कळला. ती मोठ्याने टाळ्या पिटत म्हणाली, ‘आई, ती बघ श्रीलंका पुरी आणि ही ऑस्ट्रेलिया पुरी तर फारच मस्त झालीये’. तिला आश्चर्य वाटलं, ‘ही बया इतकी शहाणी कशी झाली? एरवी तर ‘गोल पुरी दे ‘ म्हणून भोकाड पसरलं असतं. लेकीला जवळ घेऊन ती म्हणाली ‘मन्या, आज काही जमेनात बाई या पुऱ्या. सॉरी ग, बघ की, गोलच होईनात.’ यावर लेक म्हणाली, असू दे आई, इतक्या परफेक्ट गोल नाही झाल्या पुऱ्या तरी चालेल, पण त्याची तयारी करताना, बनवताना, तू कीती खुश होतीस, मस्त गात होतीस, हसत होतीस. मला अशीच हॅपी आई हवी आहे, मग ती परफेक्ट नसली तरी चालेल.’
कीती तथ्य आहे यात, Mothers shouldn’t try to be, they can’t be perfect but they need to be happy. आनंदी आयाच आनंदी जग बनवतील. करीयर, घर, नाती, ही न ती कामं यांच्या धबडग्यात सगळीकडे पुरं पडत असताना आईने आनंदीही रहावं हे कुठेतरी विसरून जातो आपण. आई परफेक्ट नसली तरी चालेल पण आनंदी मात्र खचितच हवी.
©गौरी ब्रह्मे
Image by Pete Linforth from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022