दिल काय चीज आहे- अभिजित इनामदार
आता कुणी म्हणतं आता तो पहिल्या सारखा बोलत नाही, कुणी म्हणे आता तो घुमा झालाय कुठे काय चालू आहे त्याचे त्यालाच कळत नाही. कुणी म्हणे एका पोरीनी राकट तरुणाचं पार कोकरू करून टाकल हो. पण हो झालंय खरं असं. कोण्या एका सुंदर अशा नखशिखांत लावण्यांनी त्याची अशी अवस्था केलीय. काय पुरावा म्हणून काय विचारता? आहो सगळ्याच गोष्टीना मी पुरावा आहे माझ्या समोरच तर झाल्या ना सगळ्या गोष्टी. आता हा मंदार आईचा लाडका एकुलता एक. त्या कोपर्यावरच्या चाळीत राहतो. साधारण १५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांची मिल बंद पडली अन ते खचून गेले. अन त्यातून ते अधिकच खालावले अन एक दिवस त्यांनी जगाचा निरोप घेतला.
पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या मंदार वर हा मोठ्ठा आघात होता. मला आठवते मी तेव्हा ८ वीत किंवा ९ वीत असेन. मग त्याच्या आईनी त्याला कसाबसा वाढवला. आधी खाण्या पिण्याची आबाळ मग चाळीचे भाडे थकु लागले. मग सगळे चाळकरी आजू बाजूचे त्यांच्या मदतीला धावून जात. कोणी चाळ मालकाशी बोलून भाड्याची मुदत वाढवून देत, कोणी जमतील तशी पैशांची मदत करीत. स्वतंत्र ब्लॉक मध्ये घराची दारं बंद करून शेजारच्या घरात काय चालू आहे ह्याची फिकीर नसल्याची संस्कृती अजून मुंबईमध्ये अजून जन्माला यायची होती.
मंदारची आई म्हणजे शांता काकू घर चालवायला शक्य ते करत होत्या. शिवणकाम, मसाल्याचे पदार्थ, लोणची पापड पडेल ते काम त्या करीत होत्या. पण ह्या सगळ्यातून फक्त घर चालाण्यापुरते पैसे मिळायचे. मांदाराची शाळेची फी वह्या पुस्तके हा प्रश्न होता. मग आम्हा मुलांची जुनी पुस्तके वह्या वापरून तो शाळा शिकू लागला. पण त्याचे मन काही शाळेत रमले नाही. कशी बशी दहावीची परीक्षा त्यांनी दोन तीन दा दिली. ती सुटत नाही म्हटल्यावर कोपर्यावरच्या अब्दुल भाईच्या ग्यारेज मध्ये हेल्पर म्हणून चिकटला. अब्दुल भाईनि सुद्धा गरजू म्हणून त्याला ठेऊन घेतला.
वाढतं वय अन असणारी संगत त्यामुळे त्याच्यातला टगेगिरी हा गुण आफाट वाढीला लागला. त्यात आता तो पैसे कमवू लागला होता अन घरी बोलणार असं कोणी नव्हतं. फक्त आईचं होती. ती तिच्यापरीनी समजावे पण हा ऐकून सोडून देई. त्यात ग्यारेजच्या कामात त्याचा कोणी हात धरत नव्हतं. मग काय रोज दुरुस्ती साठी आलेल्या गाड्या घेऊन फिरणे. टवाळक्या करणे. मित्रांच्या टोळक्यात उभे राहून सिगारेटी फुंकणे कधी मधी ओल्या पार्ट्या झोडणे हे ही प्रकार सुरु झालेच होते. हळू हळू मंदारची मंद्या भाई होण्याकडे वाटचाल सूरु होती.
मला कधी मधी भेटला तर “काय भाई… कसा काय चाललाय”? असे काही तरी बोलायचा. मी काही समजवायला गेलो तर “भाई यार तू आता आई सारखा टेन्शन नको देऊ यार हं.” असा म्हणायचा. चाळीतल्या गणेश उत्सवात किंवा दही हंडी किंवा दिवाळीत वर्गणी जमवायला हाच पुढे असे. कोणी काही कमी जास्त बोलला तर त्याला उलट डोस पाजायला मंद्या भाई एकटाच काफी होता.
अशाच एका पावसाळ्यात ती लुना ढकलत आली. दिसायला मंद्याच्या भाषेत सांगायचं तर एकदम छावी. गोरी पान, दुधाळ वर्णाची, कोरीव भुवया असलेली, पिंगट गहिर्या डोळ्यांची, नाजूक पातळ ओठ असणारी अन हसताना गोबर्या गालावर पडणाऱ्या खळीने समोरच्याच्या जीव बेजार करणारी. ती आली तेव्हा नखशिखांत भिजलेली, पावसाचे हट्टी थेंब जणू तिला सोडायचे नाही म्हणून तिच्या किसंवरून गालांवरून ओघळत होते. मंद्या अन मित्रमंडळ चहा आणि सिगारेट च्या तंद्री मध्ये होते. तिने गाडी लावली अन “कोणी आहे का”? असा आवाज दिला. तिने वळून बघितले अन तेव्हाच मंदारने पण वळून बघितले. अन पहिल्या नजरेत ती त्याला आवडून गेली.
तो धावत गेला. काय झालाय ते पाहिले. देतो दुरुस्त करून म्हणून तिच्या गाडीचा ताबा घेतला. तो पर्यंत तिला एक चहा ऑफर झाला. त्याची बोलण्याची स्ताइल, कायम फौलादी वस्तूंच्या संपर्कात असल्यामुळे झालेली बळकट शरीरयष्टी, भरदार दंड, नीटनेटका चेहरा ह्यामुळे तिलाही कदाचित तो तेव्हाच आवडून गेला असावा. अर्थात तिने तेव्हा तसे काही सांगितले नाही.
गाडी दुरुस्त करून ती निघून गेली. अर्थात आपल्या हिरोनी तिच्याकडून एवढ्याशा कामाचे काय पैसे घ्यायचे म्हणून पैसे घेतले नाहीत. ती जाताना वळून बघत बघत गेली अन मंद्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले. मग काय संध्याकाळ पर्यंत ती कोण कुठे राहते कुठल्या कॉलेजला जाते वगैरे सगळी माहिती मिळवली. अन तिच्या जायच्या यायच्या रस्त्यावर पाठशिवणीचा खेळ सुरु झाला. तिचं वयही अल्लड, समज नसलेलं. आपल्या मागे कोणीतरी लागलाय ह्या भावनेनच पाखरू झालेल. यथावकाश दोघे भेटले त्यांनी अन तिने एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. मग काय रोज वेग वेगळ्या बहाण्यानी तिची गाडी बंद पडू लागली. तर कधी कॉलेजला दांडी मारून मॅटिनी शो किंवा आण्णाच्या हॉटेल मध्ये कोपर्यातल्या टेबलवर डोसा किंवा वडा सांबर. कधी चौपाटी तर कधी बाग. रोज वेग वेगळ्या ठिकाणी ते भेटत होते. मंदारनी घरची सगळी परिस्थिती तिला सांगितली होती. लवकरच तिच्या आई बाबांना भेटून लग्नाची मागणी घालायची. असा साधा सोपा प्लॅन त्यांच्या डोक्यात होता. पण कुठून तरी तिच्या वडिलांना ह्या गोष्टीची खबर मिळाली. त्यांनी तिचे काही न ऐकता तिला तिच्या काकांकडे पुण्याला पाठवून दिले. तिला तिकडेच कोलेजला प्रवेश घेतला. तिच्या वडिलांनी त्याला तिच्याबद्दल ती कोठे आहे कशी आहे काय झाले आहे अशी काहीच माहिती दिली नाही.
पुढच्या आठवड्यातच तिचे आई वडील देखील राहती जागा सोडून दुसरीकडे कुठे तरी गेल्याचे समजले. मंद्यानी खूप शोधला त्यांना पण काहीच पत्ता नाही लागला. अन मग त्याचा धीर सुटला. मग तो कोणाशीच बोलेनसा झाला. काही जणांनी त्याला समजावला पण त्याने काही आइकले नाही. परवा मला त्याच्या बरोबरच्या एक दोघांनी त्याला थोडे समजावा अशी विनंती केली. मीही गेलो त्याच्याशी बोलायला. मला बघून मंदार नी तोंड फिरवले. त्याच्या डोळ्यातले पाणी बरेच काही बोलून जात होते. मी बळे बळेच त्याला बसवला अन चार गोष्टी सांगून बघितल्या की होतात अशा काही गोष्टी आयुष्यात सोडून दे. नव्यानी सुरुवात कर. असे काही बाही मी सांगत होतो. त्याने सगळे ऐकून घेतले. पुढे कोणीच काही बोलले नाही म्हणून मग मी नाईलाजानीच उठलो अन घराकडे जायला वळलो.
तेव्हा तो बोलू लागला. तो माझ्याशी बोलत होता असे नाही पण स्वतःच स्वतःशी बोलल्यासारखे बोलू लागला. किंबहुना त्याची धगधग कुठेतरी बाहेरी पडायचीच होती म्हणून तो बोलला “आपलं काय चुकला. बोल ना भाई आपण हा आहे असा आहे. हे का माहित नव्हता का तिला? आपण काय पण लपवून नाय ठेवला आपलं घर अन काम अन सगळा तिला माहित होता. अरे साला. सिगारेट सोड. दारू सोड बोलली. तिच्या शब्दावर आपण ते पण सोडून दिली.
एकदा बोलली त्या तुझ्या मित्रांबरोबर फिरत जाऊ नकोस. साला मित्र पण सोडले. अन एक दिवस साला हीच आपल्याला असा लटकावून गेली ना भेंडी. च्यायला. काय चुकला आपलं बोल ना. तिच्या बापाला आपण पसंत पडणार न्हाय हे तिला माहित नव्हता काय आधी? अन ते जर माहित होता तर साला आपल्याला कशाला हो म्हणायचा? ज्या पोरांकडे पाठ फिरवली ती पोर आज पण आपल्या बरोबर आहेत रे भाई. पण पण साला आपलं काय चुकला. सांग ना.
तिच्या बापानी तिला पुण्यात कुठे तरी ठेवलाय. जाम फिल्डिंग लावली पण पत्ता लागला नाय. पण साला तिच्याकडे इथला पत्ता बित्ता हाय ना. एक कागद धाडता नाय का आला. कुठे हाय ते कळला असता तर अशी घेऊन आलो असतो तिला. पण साला. खरच प्रेम होता काय रे भाई. असं प्रेम बीम काय असतं काय भाई. साला तिच्या भाषेत मला चांगला सुधरवण्याच्या नादात मला उलटा बिघडवून गेली ना भाई आता ना सिगारेट ना दारू ना काही. साला माणसांनी जगायचं कसा भाई सांग ना.”
मंद्या बराच वेळ बोलत राहिला. डोळ्यात रोखून धरलेला बांध आज फुटला होता अन त्याच्या दाढी वाढलेल्या गालांवरून तो ओघळत होता. बोलून बोलून तो शांत झाला. उठून निघून गेला.
कधी वाटते कुठून तरी त्याची ती पेटंट हाक “काय भाई… काय बोलतो”? ऐकू येईल. पण तो नाही बोलत काही हल्ली. असाच बसून असतो शून्यात नजर हरवलेल्या विस्थापिता सारखा. शरीरानी तो मुंबईतल्या चाळीच्या कोपर्यावर बसून असतो. पण मनानी पुण्याची गल्ली बोळे धुंडाळत असतो.
खरच ज्याचं जळत त्यालाच कळत… दिल काय चीज आहे.
©अभिजीत अशोक इनामदार
Image by Pete Linforth from Pixabay
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021