अश्रुफुले (प्रकरण १ ले ) – अभिजित इनामदार

अविनाश देसाई..!! कम्प्युटर इंजीनिअरिंग केलेला, साधा सरळ असा तरुण आहे. दिसायला एकदम सेक्सी वगैरे नसला तरी उठावदार असं त्याचं व्यक्तिमत्व नक्कीच आहे. ६ फुट उंच, गव्हाळ रंग, उभट चेहरेपट्टी, लांबसडक नाक, काळेभोर पाणीदार डोळे, केसांचा मधून झुपकेदार भांग पडणारा असा हा तडफदार तरुण चार चौघात सहज आपलं लक्ष वेधून घेतो. मुख्य म्हणजे कोणत्याही वेळेला इतरांच्या मदतीला धाऊन जाणारा असा हा तरुण आहे. म्हणूनच त्याचा मित्र परिवारही मोठा आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तो कार्यरत आहे. त्याला रक्ताचं असं कोणी नाही. त्याने जोडलेली माणसं हीच त्याची जवळची माणसं. त्या सगळ्यांमध्ये यश हा त्याचा आगदी खास मित्र. तो त्याच्याच कंपनीमध्ये कार्यरत आहे. तो ही याच्या सारखाच इंजिनिअर आहे. शिवाय ते दोघे रूममेट्स देखील आहेत. ते त्यांच्या कॉलेजच्या दिवसंपासुनाचे मित्र आणि रुममेट आहेत. त्यामुळे एकमेकांना चांगलेच ओळखून आहेत.
दोघांच्या विचारात अन विचारसरणीत तर कमालीचा फरक आहे. त्यांचं सहजा सहजी असं पटकन कोणत्याही गोष्टीवर एकमत होत नाही. अवि एकदम भावनिक, समोरच्याला काय वाटेल ह्याचा विचार करणारा तर यश  प्रॅक्टिकल अॅप्रोच ठेवणारा. कुठल्याही बाबतीत उगाच फाफटपसारा त्याला आवडत नाही. त्याला त्याचं फ्रीडम महत्वाचं वाटत. तो पटकन स्वतःला कोणत्याही बंधनात अडकवून घेत नाही. कुठलीही गोष्ट म्हणजे आगदी स्वतः बद्दलचीही तो आगदी त्रयस्थ होऊन पाहू शकतो अन त्याच्या लेखी त्यामुळेच तो खूप सुखी आहे. अवीच्या दृष्टीने तो स्वतः सुखी आहे. तो भावनिक आहे, इतरांचा विचार करणारा आहे, इतरांना सोबत घेऊन पुढे जाण्यात त्याला आनंद वाटतो अन तो तसे करतोही. पण इतक्या दिवसांचा सहवास म्हणा किंवा अजून काही म्हणा पण दोघांच्या विचारांचा त्यांच्या एकमेकांच्याही नकळत थोडाफार फरक पडला होता. यश कधीमधी भावनिक होत असतो तर अवि प्रॅक्टिकल. पण दोघे मान्य करत नाहीत हा वेगळा मुद्धा.
नुकत्याच रचलेल्या कवितेच्या ओळी गुणगुणत अवि बेडवर पडला होता:
तिचं लाजून हसणं
काळजावर जसा वार
ती करितसे एकवार
आणि मग वारंवार
तिच्या पायीचं पैंजण
वाजतसे छनछन
भुलवित जातसे
देहभान तनमन
तेवढ्यात यश – अव्या मित्रा काहीतरी ऐकव ना… नवीन कविता वगैरे
अवि – मग इतका वेळ काय ऐकत होतास?
यश – अरे मी कुठे काय ऐकतोय… कामात होतो… तू काय बडबडत होतास त्याकडे लक्ष नव्हते माझे.
अवि – छान छान… आणि काय आज चक्क चक्क घरी येउन पण काम सुरु आहे तुझे? काय रे बाबा बॉस काही बोलला का तुला?
यश – छे रे… उद्या जरा लवकर कलती मारणार आहे ऑफिस मधून. म्हणून मग काम संपवून टाकलं.
अवि – मग… उद्या लवकर सटकून काय प्ल्यान काय? डेट का?
अवीच्या प्रश्नाबरोबर त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. एक डोळा हलकेच लववून मानेनेच तो हो म्हणाला
अवि – अरे आता कोण नवीन
यश – आहे ती… शलाका म्हणून. ते छोड ना यार तू ऐकवतोयस ना काहीतरी…
अवि हसला अन पुन्हा कविता गुणगुणू लागला
तिच्या नजरेचे तीर
जाती काळजाच्या पार
वेदना सुखावित
ह्रिदयाच्या आरपार…
यश – वा अवि वा… क्या बात है
अवि –
तिचं रुपडं साजिरं
न भासे मज चंद्रापरी
चंद्रामाजी असे डाग
ती तर मोहक सुंदरी
यश – काय साहेब… प्रेमा बिमात पडलाय काय कोणाच्या?
अवि – छे रे… ही आपली अशीच केलेली कविता आहे
यश – एक विचारू का रे..
अवि – मला काही विचारायला परवानगी? हे म्हणजे आजी म्या ब्रह्म पहिले असे झाले यश… बोल काय विचारायचय
यश – अरे तुझी ती जुनी फ्रेंड काय म्हणते रे? काय बर नाव तिचं? मृणाल… हां…
मृणाल
अवि – तिचं काय मधेच आता? ती कुठून आठवली एकदम तुला?
यश – तसं काही खास कारण नाही… पण बर्याच दिवसात काही बोलला नाहीस तिच्याबद्दल अन शिवाय आज काय एकदम कविता वगैरे… म्हणून विचारलं रे
अवि नुसताच हसला… नाही म्हटलं तरी आता त्याला मृणालची आठवण होतच होती….
क्रमश:
Image by Pete Linforth from Pixabay 
Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

One thought on “अश्रुफुले (प्रकरण १ ले ) – अभिजित इनामदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!