पैशाचं सगळं आमच्या ह्यांना माहिती…..
आजच कळलेली एक वाईट बातमी. माझ्या एका शालेय मैत्रिणीचा घटस्फोट झाला. ती एकुलती एक होती. वडील ती कॉलेजमध्ये असताना गेले आणि आई ३ वर्षांपूर्वी. आई वडिलांनी आपली सगळी पुंजी आणि राहती जागा अर्थात तिच्या नावावर केली होती. ही मैत्रीण सरकारी नोकरीत आहे. तिच्या आईच्या मृत्युनंतर तिच्या नवर्याने जागा ट्रान्स्फर करणे, सगळे पैसे इन्व्हेस्ट करणे ह्या गोष्टी “सांभाळल्या”. हळूहळू संबंध बिघडून घटस्फोटापर्यंत गोष्टी गेल्यावर ही तिच्या मुलाला घेऊन बाबांच्या घरी जाते म्हणाली तेव्हा लक्षात आले की बाबांची जागा आणि त्यांनी दिलेले पैसे “ह्यांचे” झाले होते. आता घटस्फोटानंतर ती नालासोपारा इथे भाड्याच्या जागेत राहत आहे. तिच्या वडिलांची तिच्यासाठी ठेवलेली जागा आणि सगळी पुंजी ती हरवून बसली आहे. कारण? कारण आहे बर्याच स्त्रियांचा “मला त्यातलं काही कळत नाही बाई. आमचे हेच सगळं पहातात” हा व्यवहाराच्या बाबतीतला attitude ! आज देखील अनेक सुशिक्षित, करियर करणाऱ्या स्त्रिया व्यवहाराच्या गोष्टी आल्या की “ह्यांच्यावर” सोपवून मोकळ्या होतात. फक्त “कुठे सही करू?” असं विचारून आपलं भविष्य दुसर्याचा हातात सहज टाकतात. मान्य तो नवरा असतो वगैरे. पण काय हरकत आहे व्यवहार माहिती करून घ्यायला? जगात काय चाललाय ह्याबद्दल थोडं अपडेट असायला? आज “हम दो हमारा एक” च्या जमान्यात तर एकुलत्या एक मुली लग्नाच्या बाजारात खरच धनाची पेटी असतात. आईवडील आयुष्यभराची पुंजी त्यांच्या भविष्यासाठी सोडून जातात. तेव्हा त्याचा मान राखण्यासाठी तरी बेसिक व्यवहार ज्ञान आणि भान ठेवायला काय हरकत आहे? जागा, गुंतवणूक, व्यवहार, सेव्हिंग, विमा, लोन ह्या गोष्टींशी आपलं संबंध नाही असं वागून आत्ताच्या जमान्यात नाही चालणार. अन्यथा ह्या माझ्या मैत्रिणीसारखी गत होऊ शकते. आणि अगदी नवर्याशी संबंध सौहार्दपूर्ण असतील तरीही स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य जपायला हरकत काय आहे? सगळं “ह्यांच्यावर” सोपवून आपण फक्त घर आणि मुलं सांभाळायची ही मानसिकता का? अर्थात प्रत्येक नियमाप्रमाणे ह्याला अपवाद असणार्या आणि आर्थिक निर्णय सक्षमपणे घेणाऱ्या महिला देखील आहेतच. पण सर्वसाधारण चित्र “अहो किंवा हे” ह्याकडे झुकलेलं दिसत. ते तसा राहू नये ह्यासाठी मुख्यतः मुलींच्या पालकांनी तसे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून करणे ही काळाची गरज आहे. मला पण एकुलती एक मुलगी आहे. आणि मी तिच्यावर आर्थिक स्वातंत्र्य कसे सांभाळायचे ह्याचे संस्कार नक्की करणार आहे. मग तिचे “अहो” कसेही भेटले तरी ती आयुष्यभर कोणावरही “अवलंबून” राहणार नाही…. — feeling sad.
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023