#अश्रुफुले (प्रकरण ४ थे )- अभिजित इनामदार

अवि आपल्या कामामध्ये बिझी होता आणि अचानक त्याचा फोन वाजू लागला. नंबर न बघतच त्याने कॉल रिसीव्ह केला.
अवि – हॅलो… अविनाश हिअर…
मृणाल – हो का ? बर… मृणाल धीस साईड
अवि ताडकन उडालाच… पटकन फोन पाहिला… नंबर अननोन  होता.  त्याने तडक प्रश्नांची सरबत्ती सुरु केली… अगं आहेस कुठे? कशी आहेस? बऱ्याचदा फोन केला पण तुझा फोन लागत नव्हता. मृणालने मध्ये जुना नंबर बंद करून  हा नंबर घेतला होता हे सांगितले. बाकी काही विचारू नकोस मी पुण्यात येते आहे. उद्या पोहोचेन. भेटलो कि सविस्तर बोलू असे सांगून फोन कट केला.
कितीतरी गोष्टी विचारायच्या होत्या… कितीतरी गोष्टी सांगायच्या होत्या… तीच्यावर ओरडायचे होते… अजून बरेच काही करायचे होते पण अवि असे काहीच करू शकला नाही.
दुसऱ्या दिवशी अवि तिला स्टेशन वर घ्यायला गेला… नेहमीच्या कट्ट्यावर कॉफी घ्यायला थांबले… प्रश्नोत्तराचे तास झाले कोण सध्या काय करते… तुझे काय? माझे काय? सगळे अवांतर बोलणे झाले… येणाऱ्या दोन महिन्यात ती GRE ची एक्झाम देणार असल्याचे सांगितले आणि त्याच्याच तयारीसाठी ती आली होती. तिच्या वडिलांच्या ओळखीच्या एका काका – काकूंकडे ती काही दिवस पी. जी. मध्ये राहणार होती . भरपूर गप्पा… कॉफी चे अनेक राऊंड झाल्यावर अंधार पडल्यावर दोघे उठले. तिला त्याने तिच्या काकांकडे सोडले आणि रूमवर परतला… आज यश चक्क रूमवर होता.
यश – काय साहेब स्वारी एकदम मूड मध्ये दिसतीये…
अवि – अस काही नाही रे.
यश – तरी पण काहीतरी असेलच ना
अवि – अरे मृणाल आली ना आज नागपूरहून… तिच्याच सोबत होतो… हे सांगताना अविचा चेहरा का कोणास ठाऊक पण लाजल्यासारखा झाला…
यश – तरीच !
त्याला पुढे काही न बोलू देता अवि म्हणाला – अरे पण आज तू घरी कसा? तेही एवढ्या लवकर?
यश – अरे आज बोअर झालो… संध्याकाळी भेटायलाही कोणी नव्हते… म्हटल मूव्हीला जावे… पाहतो तर तू दुपारीच कल्टी मारलेलीस…
अवि – हो अरे तुला सांगायचं राहूनच गेलं
यश – बरोबर आहे… आता काय प्रेमाचं माणुस आलय… मग यशची आठवण कशी राहील म्हणा…
अवि – यश गप रे …
दोघांच्याही चेहऱ्यावर मंद स्मित होतं…
दिवसामागून दिवस लोटत होते. अवि आणि मृणाल रोजच भेटत होते. काही स्पेसिफिक कारण हवच असे काही नव्हते… कधी जेवायला… तर कधी मृणालला कंपनी म्हणून मूव्हीला तर कधी तिच्या सोबत शॉपिंगला… इतका वेळ सोबत राहून देखील कुणीच काही बोलत नव्हते. एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम जरी कृतीतून जाणवत असले तरी शब्दात परावर्तीत करणे गरजेचे होते. अविला ते जमत नव्हते आणि मृणालला पण असेच वाटत असेल ह्याची त्याची त्याला खात्री वाटत नव्हती.
आगदी मृणालने बदललेली हेअर स्टाईल एवढी खास वाटत नाही असे अवीने म्हणताच… दुसऱ्याच दिवशी मृणाल आपली पहिलीच हेअर स्टाईल करून आली. हा बदल अविला सुखावणारा होता. त्याने तिला तसे विचारले देखील त्यावर ती म्हणाली
मृणाल – अरे तूच म्हणालास ना ती स्टाईल मला एवढी छान दिसत नाही म्हणून…
अवि – अच्छा म्हणजे मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तू ऐकणार का?
मृणाल – तू सांगून तर पहा…
ह्यावेळी खरेतर अवीच्या क्षणभर मनात आले कि मृणालला सांगून टाकावे की मी देखील तू सांगशील तसे ऐकायला तयार आहे… आयुष्यभर !! पण…. तिला आवडेल? तिच्या मनात तसे काही नसेल तर? तिच्या घरचे काय म्हणतील? त्याला तिच्या सोबत आयुष्य काढायचे होते… टाईम पास करायचा नव्हता…  त्यामुळेच हा पण आडवा येत होता.
पण कधी ना कधी आपल्या मनात काय आहे हे तिला सांगणे क्रमप्राप्त होते ह्याची जाणीव अविला होती पण तो ह्यापेक्षा चांगल्या संधीची वाट पाहू लागला.
एके दिवशी मृणालने त्याला धक्काच दिला… दोघे नेहमीच्या जागी कॉफी शॉपमध्ये त्यांच्या नेहमीच्या कोपऱ्यातील टेबलवर बसलेले होते.
मृणाल – अवि मला कित्येक दिवसांपासून एक महत्वाची गोष्ट सांगायची होती…
अवि शांतपणे बसला होता…
मृणाल – अवि मी तुझ्याशी बोलतेय…
अवि – बोल मी ऐकतोय…
मृणाल – अवि अरे कसे सांगू तेच कळेना… अरे आई बाबा मागे लागले होते की लग्न कर… कोणी तरी मुलगा आहे म्हणे माझे एम. एस. होईपर्यंत थांबायला तयार आहे… फक्त एंगेजमेंट लवकरात लवकर करु म्हणून मागे लागले होते…. पण मी माझ्या आई आणि बाबांना आता सांगून टाकले आहे… मी लग्न करेन तर माझ्या आवडत्या मुलाबरोबरच करेन…
अवीची हार्टबीट एकदम फास्ट झाली. आपण इतके दिवस ज्या संधीच्या शोधात होतो ती आज आली आहे असे वाटून मनात एकदम वेगळीच फिलिंग येऊ लागली. घसा उगाच कोरडा पडला… अंग शहारले… आता आज काही झाले तरी आपल्या मनातील प्रेम व्यक्त करायचेच असे त्याने ठरवले… कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवून तो मृणालच्या डोळ्यांकडे पाहू लागला… काहीसे मिश्कील… काहीसे आनंदी अशा मिश्रणाने तिचे डोळे त्याच्याकडे पाहत होते…
मृणाल – तुला काय वाटते अवि?
अवि – मला विचारशील तर… हे बघ मला असे वाटते की… आय मीन… तू असे डायरेक्ट सांगितलेस आई बाबांना…
मृणाल – अरे ते महत्वाचे आहे का? की मी आई बाबांना काय सांगितले… मुळात मला कोण आवडलय हे तुझ्या दृष्टीने महत्वाचे नाही काय?
अवि – म्हणजे?
मृणाल – अरे म्हणजे तुला काय वाटते? कशी वाटेल आमची जोडी? आम्ही सुखी आनंदी होऊ ना? हे बघ तुला काय वाटतय ते माझ्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे.
अवि – कोणाबद्दल म्हणतेस तू?
मृणाल – अरे मी आणि विजय… आमच्याबद्दल बोलतेय मी…
अविच डोकं सुन्न झाले… मृणाल पुढे काय म्हणाली ते त्याला ऐकूच गेलं नसावं बहुतेक… त्याचा चेहरा एकदम उतरला… तिच्या चेहऱ्यावर… तिच्या डोळ्यात डोळे घातलेली त्याची नजर त्याच्याही नकळत झरकन खाली उतरली… तिने आज त्याच्यासाठी खास म्हणून आणलेल्या पिवळ्या गुलाबांवर ती नजर स्थिरावली.
क्रमश:
Image by Pete Linforth from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!