अश्रुफुले (प्रकरण ५ वे)- अभिजित इनामदार
अवीची तशी ती प्रतिक्रिया काही अंशी मृणालला अपेक्षितच होती. पण ती आगदी निर्विकार पणे पाहत होती. अविला अंगातून एकदम अवसान गळाल्यासारखे वाटत होते. असं वाटू लागले की आता आयुष्यात काहीच उरलं नाही. आता जगायचं तर कोणासाठी? आयुष्यात एकदाच… पहिल्यांदाच प्रेम केलं पण… पण
त्याला असे गप्प पाहून मृणाल काही क्षण गप्प राहिली… कॉफी शॉप मधली गर्दी आता कमी झाली होती. त्यांच्या आजूबाजूला कोणीच नव्हते.
मृणाल – अवि अरे काय झाले? गप्प का झालास तू? तुला माझी निवड आवडली नाही का?
तिच्या त्या वाक्याबरोबर अवि भानावरती आला… स्वतः ला सावरून म्हणाला
अवि – तसं काही नाही गं… पण तू कधी बोलली नाहीस ह्याबद्दल… अन विजय कोण?
मृणाल – अरे तो नाही का? मला एक वर्ष सिनियर… मागे तुला भेटवलं होतं बघ मी एकदा… तो सध्या एम. एस. करतोय… गेल्या वर्षी अमेरिकेला गेला आहे.
अवि कसनुसा हसला…
मृणाल – का रे हसलास असा?
अवि – अगं विजय चा चेहरा आठवून हसू आले…
मृणाल – का रे असे म्हणतोस?
अवि – काही नाही गं… ते सोड… त्याची अशी कोणती खास गोष्ट आहे जी तुला जास्त आवडली? म्हणजे त्याच्यात असे काय आहे?
“जे माझ्यात नाही” हे अर्थात मनात होते…
मृणाल – तो एकदम भारी आहे… तो कधीच कुठलीही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवत नाही. तो तुझ्यासारखा नाही…
अवि – म्हणजे? तुला नक्की काय म्हणायचंय?
मृणाल – हेच की तो तुझ्यासारखा नाही. त्याने मी त्याला आवडते हे आमच्या दुसऱ्या भेटीतच सांगून टाकले होते…
अवि – हे बघ मला हे असे कोणाशीही कम्पेअर करू नकोस… मला ते आवडत नाही. आणि हे तुला चांगलेच माहिती आहे.
मृणाल – ह्म्म्म्म
अवि – आणि अजून एक गोष्ट…. त्याने सांगितले म्हणून काय झाले? तुला जर पण्णासजणांनी तू आवडते म्हणून सांगितलं तर तू काय प्रत्येकाला लग्नाला हो म्हणणार काय?
अर्थात आपल हे वाक्य तार्किक नाही हे त्याला माहिती होतं… कारण असं बोलून पटकन जीभ चावली. पण आता बोल सुटले होते…
पण अविचा स्वर त्रासिक होता…
मृणाल – हो ! त्यात हरकत काय आहे पण? आणि महत्वाचे म्हणजे तू का चिढतोयस एवढा?
अवि – कारण… कारण
मृणाल – काय कारण? बोल ना… बोल कारण काय?
अवि – कारण…
अवि पुन्हा अडखळला…
आता वेळ आली आहे आणि आजची ही शेवटची संधी आहे तिच्यासमोर कबुल करण्याची की आपण तिच्यावर प्रेम करतो ते… आता आज नाही तर परत कधीच नाही. कारण असेही आता उद्यापासून आपण तिच्याशी ह्या विषयावर बोलूच शकणार नाही. पण एकदा तिला सांगून टाकू म्हणजे ही सल मनात राहणार नाही. अवीच्या डोळ्यांच्या कडा एकदम पाणावल्या कशा हे त्याचे त्यालाच कळेनासं झालं. आवाज घोगरा होऊ लागल्याचं त्याला जाणवू लागलं.
प्रेम इतका हळवं असतं? अवि आज हे पहिल्यांदाच अनुभवत होता… अशा नाजूक समयी गप्प बसायचे सोडून आपले हृदय जोरजोरात ढोल वाजवतंय की काय असे त्याला वाटून गेले… कारण त्याच्या हृदयाची धडधड त्याच्या कानात त्याला स्पष्टपणे ऐकू येत होती. आपलं काळीज आता आपल्यापासून दूर दूर जात आहे असे उगाच त्याला वाटून गेले.
बऱ्याच वेळाने अवि म्हणाला – कारण… मृणाल… आय…
मृणाल – काय अवि? अरे बोल स्पष्टपणे…
अवि – आय लव्ह यू… मृणाल…
इतके बोलून त्याने डोळे मिटले… शेवटी आपण आपल्या मनातले तीला सांगितले. अर्थात आता ह्याचा काही उपयोग नव्हता पण तरीही… कधीच बोलून दाखवले नाही ही सल आता मनात राहणार नव्हती. त्याच्या पाणीदार डोळ्यातून दोन थेंब अलगद निखळले… त्याच्यावरच नजर रोखलेल्या मृणालने पटकन पुढे सरकून ते दोन थेंब आपल्या तळव्यावर अलगद पकडले… हलकेच आपल्या मुठीत बंद केले. ती होती साक्ष तिच्यावरच्या त्याच्या प्रेमाची… ती होती प्रेमाची कबुली देणारी नाजूक फुले… अश्रुफुले. होय… अश्रुफुले.
मृणाल – धन्यवाद रे देवा… आज तरी बोललास अविनाश…
तिच्या ह्या वाक्यावर अवीने पटकन डोळे पुसले
मृणाल – अरे आता बोलतोयस तू? बाकी सगळ्या बाबतीत तू एवढा स्मार्ट आणि माझ्यावरच्या प्रेमाची कबुली द्यायला एवढा वेळ? ते पण आज मी हा विषय काढला म्हणून… नाहीतर तू कधीच बोलला नसतास…
अवि – मला माहित आहे मी खूप उशीर केला आहे… पण मला भीती वाटत होती गं… तुझ्या नकारापेक्षा तुझं माझ्या आयुष्यातून निघून जाणं हेच माझ्यासाठी त्रासदायक होतं… अन तुझ्या मनात असं काही नसेल तर? म्हणून मी बोलू शकलो नाही…
मृणाल – अरे पण एकदा सांगून तर बघायच होतस… मी विचार केला असता…
अवि – अगं पण समजा तुझ्या मनात नसेल अन तू चिडलीस तर… म्हणून मी नाही बोलू शकलो. खरं सांगतो मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही गं…
मृणाल – अन मी जगू शकेन तुझ्याशिवाय यडचाप?
मृणालच्या कापर्या स्वरातील ह्या वाक्याबरोबर अवि ताडकन उडालाच… मृणाल आता तिचे डोळे पुसत होती…
मृणाल – अरे बाबा आता सांगशील मग सांगशील म्हणून मी अजून किती वर्षे वाट पाहू रे…?
अवि – म्हणजे?
मृणाल – म्हणजे वाघाचे पंजे… अरे बुध्दू बाबा… माझ्या आयुष्यात तुझ्या शिवाय कोणीही नाही… एवढं साधं पण कळत नाही काय रे तुला? देवा असं होणार आहे माझं पुढे?
वादळाच्या फटकाऱ्याने फुटलेली नाव बुडायची वेळ आली असता अचानक समोरून बचाव करणारी बोट यावी त्यावेळी त्या नावेतील लोकांचा चेहरा जसा आनंदित होईल तसा अविचा चेहरा एकदम आनंदाने उजळून निघाला… आता त्याला काय करू आणि काय नको असे झाले…
अवि – आय लव्ह यू… आय लव्ह यू… असे बडबडत सुटला…
त्याचा हात हातात घेऊन घट्ट पकडून ती म्हणाली
मृणाल – आय लव्ह यू टू
प्राक्तनाच्या फटकाऱ्याने काळीज तोडून उंच डोंगर माथ्यावरून एखाद्यास खोल निर्जन दरीत लोटून दिले असता खाली पडता पडता त्याला एखाद्या फांदीचा आधार सापडून तो मनुष्य बचावला जावा तशीच काहीशी अवस्था आविनाशची झाली होती.
क्रमश:
Image by Pete Linforth from Pixabay
Latest posts by Lekhak Online (see all)
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021