अश्रुफुले (प्रकरण ७ वे)- अभिजित इनामदार

भांडणं. कुठल्याही प्रेमी युगुलाने आम्ही भांडत नाही असे म्हटले तर ते जगातले आठवे आश्चर्यच समजावे. आता अवि आणि मृणाल यांची भांडणं होत नव्हती असे नाही. भेटण्याच्या जागेवरून, भेटण्याच्या वेळेवरून, उशिरा येण्यावरून. यावरून आणि त्यावरून सुद्धा. म्हणजे थोडक्यात काय तर काही विशेष कारण हवेच असे नाही.
अवीच्या मते तिच्याशी भांडण्यात मजा येते, एक  वेगळंच थ्रील असते. ती कधी कधी टोकाची भूमिका घेते, स्वतःला त्रास करून घेते पर्यायाने मलाही त्रास होतो पण चालता है. कारण तिला मनवण्यात जी मज्जा आहे ती काही औरच आहे ती दुसऱ्या कोणाला सांगून कळणार नाही. आणि भांडणानंतर जेव्हा ती पुन्हा प्रेमाने माझ्याकडे पाहत आणि हळूच माझ्या मिठीत शिरते ना. आहा.  एकदम जान कुर्बान करावा असं क्षण असतो तो.
मृणालच्या मते भांडणांनी प्रेम अजून गहिरं होतं. त्यामुळेच कळते त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. मला मनवण्यासाठी तो जे काही वेगवेगळे प्रकार करतो ते खरेच मला आवडतात. शिवाय माणुस अशाच माणसावर रागावतो ना ज्यावर आपण प्रेम करतो. म्हणून तर कधी कधी मी असं गमतीने भांडते त्याच्याशी. माझा रुसवा घालवायला तो जे काही करतो ते पाहताना मज्जा येते. कधी कधी हसूही येते. पण समाधान पण मिळते की खरेच कोणीतरी एवढ्या जीवापाड आपल्यावर प्रेम करतेय हे पाहून. आपल्या रुसण्याने कोणालातरी फरक पडतो हि कल्पनाच मजेशीर आहे, अंगावर मोरपीस फिरवणारी आहे. मला तर वाटते भांडण आणि प्रेम ह्या एकाच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत.
अशाच एका संध्याकाळी.
यश – काय प्रेमवीर काय म्हणताय?
अवि – काही नाही रे.
यश – का रे काय झाले? एकदम वैतागल्यासारखा वाटतो आहेस.
अवि – काही नाही रे
यश – काहीतरी आहे खरं. त्याशिवाय तू असा वागणार नाहीस. काय झालय अवि?
अवि – तुला सांगू कधी कधी असे वाटते की प्रेम म्हणजे डोक्याला ताप आहे नुसता.
यश – लवकर समजले तुला. पण असे काय झाले रे. आधी मारे मोठ्या गप्पा मारत होतास प्रेमाबद्दल आता काय झाले?
अवि – आगदि तसेच काही नाही रे. पण मी केलेली कोणतीच गोष्ट तिला जशीच्या तशी आवडत नाही. त्यात काहीतरी खुसपट काढणारच. बरं तिला विचारले तर म्हणते आता तुला कळायला हवे माझ्या मनात काय आहे ते. मला असे सारखे सारखे सांगायला नाही जमणार. आता मला सांग मी काय ब्रम्हदेव आहे का तिच्या डोक्यातले सगळे विचार समजायला?
यश – हे. तू बोलतो आहेस अवि?
अवि – मला सांग. मलाही भावना आहेत ना?
यश – Correct ! आता तू योग्य track पकडला आहेस. बोल. बोल. तुलाही भावना आहेत, इच्छा आहे, आवडी निवडी आहेत, तुझ्याही काही अपेक्षा आहेत. बरोबर ना?
मिश्किल पणे हसत यश हे बोलत होता
अवि – तेच ना. प्रत्येकवेळी काय हेच कर, तेच कर, असे वाग तसे वागू नको. अरे मी काय लहान बाळ आहे का असे सांगायला?
यश त्याची फिरकी घेण्याच्या मूड मध्ये म्हणाला
यश – अरे पण हरकत काय आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे वागायला? प्रेम करतोस ना तिच्यावर?
अवि – मी वागतो ना तिच्या मनाप्रमाणे, मी कुठे नाही म्हणतोय. पण तिने पण जरा माझ्या मनाचं विचार करावा. तिनेही थोडे मला आवडेल असे वागावे.
यश – There you are. तुला सांगू प्रोब्लेम काय आहे ते?
अवि – सांग ना काय आहे प्रोब्लेम
यश – काय आहे ना अविनाश. तुम्ही दोघे एकमेकांचं वागणं स्वतःच ठरवता. तुम्हाला हवं तसं समोरच्याने वागावे असे तुम्हाला वाटते. याउलट समोरचा तसे वागत नाही आणि मग तुम्हाला त्याचा त्रास होतो. काय होतं ना की तुम्ही आधीच समोरच्याला गृहीत धरता आणि समोरचा तसे वागत नाही म्हटल्यावर तुम्हाला वाईट वाटते. जेव्हा तू म्हणतोस की माझी मृणाल असे असे नाही करणार किंवा अमुक अमुक करेल त्यावेळी तू तिला गृहीत धरलेले असते. हे सगळे तूच ठरवलेले असते पण खरच ती तसेच वागेल किंवा नाही हे सर्वस्वी तिच्यावरतीच अवलंबून असते. असेच तीही तुझ्याबाबतीत करत असेल कदाचित… ते काही मला माहित नाही पण जेंव्हा तुमच्यापैकी एकजण असे म्हणतो तेव्हा ते तसे म्हणणे हे दुसऱ्या साठी कंपल्शन वाटू शकते. आणि तिला किंवा तुला हे कंपल्शन आवडत नाही आणि मग भांडण. वाद. सेल्फ एक्झीस्टन्स मित्रा. मी तुला सांगितले आहे हे आधी.
अवि हताश नजरेने त्याच्याकडे पाहत होता. अचानक त्याचा मोबाईल किणकिणला.
मृणालचा whatsapp होता. सो सॉरी अवि. मी असे वागायला नको होते.
मग काय अवीच्या डोळ्यात अचानक चमक आली आणि तो फोन उचलून तिच्याशी बोलू लागला.
यश मात्र गाढवापुढे वाचली गीता असे म्हणून कपाळावर हात मारून घेऊन बाहेर निघून गेला.
अवि आणि मृणालच भांडण झाले तरी ते काय फक्त एक दोन दिवसच राही कारण त्यापेक्षा जास्त वेळ अबोला धरून राहणे दोघानांही शक्य नव्हतं. त्यांना आता एकमेकांना काय आवडते काय नाही आवडत हे कळून चुकले होते. म्हणतात ना प्रेमाची इंटेनसिटी जास्ती असेल तर बऱ्याच गोष्टी ह्या न बोलता सुद्धा दुसऱ्याला कळू शकतात तसेच काहीसे आता अवि आणि मृणालच्या बाबतीत घडत होते.
मृणालची GRE एक्झामची तारीख ४ दिवसांवर आली होती. एके दिवशी मृणालने त्याच्याकडे विषय काढला
मृणाल – अवि अरे तू काय ठरवले आहेस?
अवि – कशाबद्दल?
मृणाल – अरे मला आता अमेरिकेला जावे लागेल पुढील काही वर्षे मग तू काय करणार इथे?
अवि – काय करणार म्हणजे? माझा जॉब, काम. आपल्या घरासाठी प्लानिंग सगळे आता करायला हवे ना.
मृणाल – अरे पण ते सगळे इथेच करायचे आहे का? तू बाकी काही विचार नाही करत आहेस का?
अवि – म्हणजे? मी नाही समजलो.
मृणाल – अरे तुला असे नाही वाटत का कि तू देखील यावेस माझ्याबरोबर अमेरिकेला?
अवि – अगं मी काय करणार येऊन?
मृणाल – तुला सहा महिन्यांपूर्वी तुझ्या कंपनीने मागे तुला एका प्रोजेक्ट साठी तिकडे जाणार का म्हणून विचारले होते ना.
अवि – अगं हो. पण आधी तुला कुठे अॅडमिशन मिळते आहे ते पाहू नंतर मग बघू. नाहीतर तिथे जाऊन सुद्धा तू एका शहरात मी दुसऱ्या टोकाला असे असेल तर काय उपयोग. नाही का?
मृणाल – पण तेव्हा तू स्वतः जायला नकार दिला होतास. पण आता संधी मिळाली तर येशील. बरोबर ना?
अवि – यस माय डीअर. एनी थिंग फॉर यू.
दोघेही मनमुराद हसले.
ते दोघे आता फक्त एक्झामच्या दिवसाची वाट पाहत होते.
क्रमश:
Image by Pete Linforth from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!