अश्रुफुले (प्रकरण शेवटचे )- अभिजित इनामदार

अवि शुद्धीत आल्यानंतरचा चौथा दिवस –
मृणाल हॉस्पिटल मध्ये आली. यश अविला काहीतरी पीजे सांगून हसवण्याचा प्रयत्न करत होता. तो एकदम गप्प झाल्यामुळे अविला कोणीतरी आल्याचे कळले. आता त्याच्या बाकीच्या किरकोळ जखमा भरत आल्या होत्या. डोक्याला अजून पट्टी होतीच.
मृणाल – अवि, मला बोलायचं आहे तुझ्याशी.
अवि – अरे मृणाल, बोल काय म्हणतेस. चेहऱ्यावर हसु आणून अवि उद्गारला
यश उठून बाहेर जाऊ लागला.
मृणाल – यश हे थोडे पर्सनल असलं तरीही तू थांब.
तो कोपऱ्यात निमुटपणे उभा राहिला.
मृणाल – अवि मी असे ठरवले आहे कि मी अमेरिकेला जात नाहीये. मी इथेच थाबेन तुझ्या सोबत.
यश मध्येच ओरडला – अरे व्वा हि तर गुड न्यूज आहे.
अवि – गप रे तू. अरे वा मृणाल मला बरे वाटले हे ऐकून. पण आपण जरा मला हे सांगायचे कष्ट घ्याल का की आपण इथे थांबून काय करणार आहात?
त्याचा स्वर तिरकस होता. मृणालला तो जाणवला
मृणाल – मी काहीही करेन.
अवि – आणि ते काहीही म्हणजे नक्की काय?
मृणाल – मी. मी एम. बी. ए. करेन.
अवि – इच्छा नसताना??
मृणाल – अरे इच्छेचा प्रश्न येतोच कुठे? अरे हे बघ कालानुरूप आपल्याला काही निर्णय बदलावे लागतात आणि मी तेच करते आहे.
अवि – आणि हे तुला कोणी सांगितले? अगं एवढी चांगली संधी आहे आणि तू माझ्यासाठी जाणार नाही म्हणतेस? हा शुद्ध वेडेपणा आहे वेडेपणा. आणि अगं तुझ्या आई बाबांचा विचार कर त्यांच्या तुझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा, त्यांची स्वप्नं ह्यांचा पण विचार कर.
मृणाल – पण तुला ह्या अवस्थेत सोडून मी कशी जाऊ?
अवि – अगं मी हातापायाने चांगला धडधाकट आहे. फक्त दृष्टी गेलीय. आणि तो जरा हसला.
मृणाल – अवि प्लीज. ही असली थट्टा मला अजिबात आवडत नाही. आणि मी जाणार नाही हे मी आता नक्की केलय. आई बाबांना पण आत्ताच सांगते जाऊन. हे एकदम फायनल.
अवि – हे बघ आपल्या बाबतचे सगळे निर्णय तू एकटीने नाही घ्यायचे. अमेरिकेला जायचे, त्यात पण आपण दोघांनी जायचे हे पण तूच ठरवले. आता नाही जायचे हे तू नाही ठरवायचे. मला पण काहीतरी ठरवू देत.
हे बघ विचार कर की आजपासून दहा वर्षांनी जेव्हा तू आयुष्यात मागे वळून बघशील तेव्हा तुला तुझा हा निर्णय योग्यच होता असेच वाटायला हवे. तेव्हा जर तर तुला असे वाटले की अरे आपण जर वेगळा निर्णय घेतला असता तर बरे झाले असते तर?? तर मग काही उपयोग नाही. आणि तुला तेव्हा जर असे वाटले तर माझ्या इतके दुर्दैवी ह्या जगात कोणीही नसेल.
तिच्या बाबांची वाक्य आगदी तशीच अवीच्या तोंडून ऐकून ती एकदम चाटच पडली. आणि तो तिच्याबद्दल किती विचार करतोय हे तिला जाणवून गेले.
पण मृणालने पुन्हा जाणार नाही म्हणताच अवि तिच्यावर ओरडला. वैतागला. त्याला असे चिडलेलं ती पहिल्यांदाच पाहत होती. रागावून, चेहरा पाडून ती निघून गेली. आज यशने पाहिले. दोन प्रेमी भांडत होते. एकमेकांच्या सुखासाठी.
ती गेल्यानंतर
यश – अवि तुझी काय इच्छा आहे?
अवि – कशाबद्दल?
यश – अरे आत्ता तुझ्या आणि मृणालच्या मध्ये जे बोलणं झालं त्याबद्दल
अवि – अरे तिने जावे अमेरिकेला. आपले एम.एस. करावे असेच मला वाटते
यश – अरे नेहमी भावनिक वागणारा तू आता असं का वागतोयस? तुला तिची गरज आहे इथे. आणि ती थांबली तर तुला आनंदच होईल. खरे ना?
अवि – नाही रे. हे माझे मनापासूनचे मत आहे
यश – अरे पण ती पूर्णपणे गुंतली आहे तुझ्यात. तिची मानसिक अवस्था बघ.
अवि – हो मला मान्य आहे. पण हा गुंता कधी ना कधी तरी सोडवायला हवा ना. आणि अजून जर हा गुंता वाढला, मीच हळवा – भावनिक झालो तर सगळंच कठीण होऊन बसेल.
यश – म्हणजे?
अवि – अरे मला मान्य आहे कि तिची इथे मला आवश्यकता आहे. तिचं इथे असणंच माझ्यासाठी सुखावणारं असेल. पण मी फक्त माझा स्वतःचा विचार कसां करू सांग तूच? तिचही आयुष्य आहे. त्यात तिने काहीतरी महत्वाचे ठरवले आहे त्याचा मी पण विचार करायला हवा ना. मग? माझं आता पुढे काय होईल. हे आत्ता तरी नक्की माहित नाही. मग ह्या अवस्थेत मी स्वतःहून तिला का ओढवून घेऊ? तिची प्रत्येक गोष्टीत फरफट कशाकरता? वरवर माझ्या बरोबर आहे म्हणून ती आनंदी, खुश असल्याचं दाखवेल पण तिचं मन तिला खात राहील. मग तिने असं मन मारत जगणं मला नकोय. तीला असंख्य तडजोडी कराव्या लागतील. आणि तूच म्हणतोस ना यश तडजोडींच्या बेस वरती माणसाला सुख मिळत नाही.
यश – ये अव्या. तू आता माझे डायलॉग मलाच मारू नको ना यार.
अवि फक्त हसला.
यश – तिने एम.एस. केले आणि पुढे? ती इकडे येईल…? आणि समजा आली तर?
अवि – तर माझ्या इतका आनंदी कोण असेल?
यश – अन समजा तिला तिथेच चांगली संधी मिळाली तर?
अवि – तरीही मी तिच्यासाठी आनंदीच असेन.
यश – पण अरे का? हा हट्ट कशासाठी?
अवि – प्रेमासाठी यश.
यश – अरे पण अशा प्रेमाचा काय उपयोग जे तुम्हाला एकमेकांपासून वेगळे करेल?
अवि – अरे वेगळे म्हणजे काय यश. शरीराने आम्ही एकत्र नसू एवढेच. आणि प्रेम म्हणजे फक्त घेत राहायच नाही रे द्यायचं पण असत. माझ्या आधी तिच्या आनंदाचा तिच्या सुखाचा मी विचार करणे हेच तर प्रेम आहे. आता सध्या मी तिच्यासाठी एवढेच करू शकतो. तिचे स्वप्नं पूर्ण करण्याची मुभा देऊ शकतो. हेच देऊ शकतो मी आत्ता ह्या वेळी.
यश – पण ती तुझ्यापासून दूर जाऊन सुखी होईल असे तुला म्हणायचे आहे का?
अवि – नाही रे पण मी, तिने स्वतः, तिचे आई वडील आम्ही सगळ्यांनीच एक स्वप्न बघितलं आहे ते तिने पूर्ण करावं हीच आमची इच्छा आहे. ती आत्ता जरा भावनिक झालीय इतकेच. प्रेम माणसाला आधी दुसऱ्याचा विचार करायला लावते मग स्वतःचा. तिच्या जागी ती बरोबर आहे. माझ्या जागी मी. पण तुला एक सांगू मला नेहमी वाटतं प्रेम हे माणसाची प्रगती साधणारं असावं. त्याच्या प्रगतीत अडथळा घालणारं किंवा त्या माणसाला अधोगतीला लावणारं नसावं.
यश – मला वाटते तरीही तू एकदा तुझ्या निर्णयाचा विचार कर.
अवि – वाटण्याचं काय घेऊन बसलास यश. वाटायला काय रे काहीही वाटतं पण आयुष्यात तसे घडतंच असं नाही ना.
“वाटणं आणि असणं
यात तसं खुप अंतर आहे
वाटणं हे मनाचं स्वाभाविक
तर असणं हे नियतीचं देणं आहे”
नेहमी प्राक्टीकल वागणाऱ्या यशच्या सुद्धा डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
अवि शुद्धीत आल्यानंतरचा पाचवा दिवस –
अवि – मृणाल मला वाटते आता आपण इथेच थांबावे. एका घटनेनी आपल्या आयुष्यात जी परिस्थिती आलीय त्यामुळे आत्ता लगेच एकत्र राहणे तेही तुझे स्वप्न तोडून हे म्हणजे शिक्षा होईल माझ्यासाठी. मला माहित आहे तुझे खुप प्रेम आहे माझ्यावर. आणि विश्वास ठेव माझेपण तितकेच प्रेम आहे तुझ्यावर. पण प्रेम प्रगतीपथावर नेणारं असावं. अधोगतीला लावणारं नसावं ह्या मताचा मी आहे. मला माहित आहे उद्याची तुझी फ्लाईट आहे.
मृणाल – पण मी काय करू रे अशा ठिकाणी जाऊन तेंव्हा तू इथे असा असताना. तुझी मला साथ नसताना. तुही येणार होतासच ना माझ्याबरोबर. आणि आता.
अवि – आपली साथ कधीच सुटणार नाहीये. ट्रस्ट मी. आपण जरी फिजिकली एकत्र नसलो तरीही मी तुझ्या सोबतच असेन.
मृणाल – अरे पण. इथे तुझ्या सोबत कोणी.
अवि – माझी काळजी करू नकोस. मी सावरीन स्वतःला. तू तुझे आणि आम्हा सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करायला जा. मला आता फक्त इतरांची सहानुभूती मिळवत जगायचे नाहीये. आता मला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. पूर्वी परिस्थितीशी सामना करून उभा राहिलो होतो. आता ह्या काळोखाशी सामना करेन. आणि काळजी करू नको ह्या काळोखातही न धडपडता चालायला शिकेन मी. पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहीन.
मृणाल – अवि. आणि समजा एम.एस. करून मी इकडे परत आले नाही तर. मला तिथेच चांगली संधी मिळाली तर. किंवा अजून कोणी भेटले तर?
तिचा स्वर खट्याळ होता. अवीने ते तातडीने ओळखले पण आपल्या गंभीर स्वरात तो म्हणाला
अवि – माझीही तशीच इच्छा आहे. तुला तिथे चांगली संधी मिळाली तर आवश्य ती स्वीकार.
मृणाल – काय???
मृणालच्या या मोठ्या काय वर अवि अर्थपूर्ण हसला. तिचं परत येणं न येणं काळानेच ठरवावे असे त्याला ह्या क्षणी वाटून गेले.
तसा खूप उशीर झाला होता. व्हिजिटिंग अवर्स कधीच संपून गेले होते. अवीच्या कॉटवरती मृणाल त्याच्या उजव्या खांद्यावर मान टेकवून आणि त्याचा हात आपल्या कोमल तळाव्यात घट्ट धरून बसली होती.
मृणाल – अवि कशी राहू रे मी तिकडे तुझ्याशिवाय?
तिच्या ह्या प्रश्नावर अविला त्याची एक चारोळी आठवली. उत्तरादाखल त्याने ती चारोळी तिला म्हणून दाखवली.
अवि –
“नेहमीच भावनिक असू नये
असं काहीजण म्हणतात
कधी कधी भावना मोडून जगावं लागतं
यालाच तर जीवन म्हणतात”
निर्धाराने अवीने आपला उजवा खांदा मोकळा केला. तिच्या नाजुक हातात गुंफला गेलेला आपला हात निर्धाराने सोडवून घेतला आणि तिला निरोप देण्यासाठी उभा राहू लागला. त्याच्या हालचाली मुळे मृणालच्या डोळ्यातले दोन टपोरे मोती निखळले. ते अवीच्या उजव्या मनगटावर पडले. त्याने हलकेच ते मोती आपल्या डाव्या हाताच्या मुठीत बंद केले. ते फक्त अश्रू नव्हते तर तू होती साक्ष त्याच्यावरच्या तिच्या प्रेमाची. ती होती प्रेमाची कबुली देणारी तिच्या नयनांतून ओघळलेली नाजुक ओलसर फुले… होय अश्रुफुले… अश्रुफुले.
समाप्त
Image by Pete Linforth from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!