इस्त्री…
काही फॉर्मल ऑकेजन्स, विवाह किंवा तत्सम सोहळे अश्या ठिकाणी जाताना दाढी करणे, चेहरा त्यातल्यात्यात बरा दिसेल ह्या वेड्या आशेने बायकोने माझ्या चेहऱ्यावर केलेले विविध सोपस्कार कोणतीही खळखळ न करता करून घेणे ह्याच बरोबर “ड्रेस फॉर द ऑकेजन” ह्या नियमाने इस्त्रीचा कडक शर्ट, प्यांट, ब्लेझर, सिल्क कुडता असा प्रसंगाला शोभेसा पेहेराव करावा लागतो. वरुन चेहर्याला आणि जिभेला तर कांजी करून इस्त्री करावी लागते जेणेेकरून बिनडोक लोक किंवा हास्यास्पद गोष्टींचा कितीही मारा झाला तरी जीभ किंवा चेहऱ्यावर चेष्टेची एकही सुरकुती दिसणार नाही! मग असा इस्त्री केलेला पेहेराव आणि गुळगुळीत ऍटिट्यूड ल्यालेला मी यंत्रवत कार्यक्रमास जातो. खेटर मारल्यासारखे किंवा आत्ताच मंगळावरून आल्यासारखे भाव असलेल्या लोकांना देखील मी अत्यंत हसऱ्या चेहर्याने सामोरा जातो. ज्यांनी तोंड उघडताच हुशारी वाहू लागते अश्या ज्ञानी लोकांच्या ज्ञानगंगेत नाक (आणि तोंड सुद्धा) बंद करून गटांगळ्या खातो. मग भूक उरली असेल तर चार घास पोटात ढकलून घरी येतो.
सर्वप्रथम इस्त्रीच्या कडक कपड्यात अवघडलेले शरीर मोकळे करतो. टीशर्ट आणि जीन्स परिधान करून “स्वतःत” परत येतो. शांत बसतो. मग दिवसभरातील लोक, प्रसंग डोळ्यासमोरून चित्रपटासारखे सरकू लागतात. हा चित्रपट अनेकदा खूप करमणूकप्रधान असतो. मग कधीतरी काहीतरी लिहितो. ज्यामागे “मला किती छान लिहिता येत, मला किती अनुभव आहे, मी किती शहाणा आहे, मी लोकांना शिकवू शकतो, माझी भाषा किती सुंदर आहे, या रे माझे कौतुक करा” असे कोणतेही इस्त्रीवाले विचार नसतात. आपली औकात आणि आवड जीन्स आणि टीशर्ट! इस्त्री नको, कांजी नको की हँगर नको! मनात येईल तेव्हा अंगावर चढवा. बडेजाव नसला तरी जीन्स आणि टीशर्ट घालून खूप कम्फर्टेबल वाटते. आपल्या आनंदासाठी लिहून वाटते तस्सेच…इस्त्री नसलेले….
Image by Steve Buissinne from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023