सोलो ट्रीप- भाग २- पूजा पाठक

पक्ष्यांच्या किलबिलाटाने अनया ला जाग आली. उजाडू लागले होते. क्षणभर तिला आपण कुठे आहोत, काय करतोय काहीच आठवेना, मग एकदम कालचा दिवस तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला आणि स्वप्नाळू डोळ्यांनीच ती प्रसन्नपणे हसत उठली! तिची नजर शेजारी झोपलेल्या प्रद्युम्न वर गेली. पाय दुमडून आणि हातांची उशी करून तो गाढ झोपला होता! “किती क्युट दिसतोय!” त्याला स्पर्श करायची तिची इच्छा अनावर झाली.. तिने घाबरत घाबरत त्याच्या केसांवरून हात फिरवला.. तो गाढ झोपेत होता..उठून बाहेर येताच ती शहारली! काल संध्याकाळी भेसूर आणि भीतीदायक वाटणारे ते जंगल किती मोहक दिसत होते! थोड्या दूरवर नदी दिसत होती.

अनया ने पटकन चूळ भरली, टी-शर्ट काढला, शॉर्ट्स घातली आणि तशीच नदीवर गेली. मस्तपैकी सूर मारला आणि मनसोक्त पोहू लागली. इकडे प्रद्युम्न लाही जाग आली. उठल्यावर बघतो तर अनया शेजारी नव्हती.. असेल बाहेर म्हणून तो बाहेर आला तर ती बाहेरही नव्हती.. त्याला शेजारीच पडलेले कपडे दिसले, आणि हि नक्की नदीवर गेली असेल अशी त्याची खात्री झाली. तोहि नदीच्या दिशेने चालू लागला. दुरून त्याला कोणीतरी पोहल्याचा आवाज येत होता. कानोसा घेत तो नदीजवळ आला तर अनया नदीत मस्त पोहत होती. “मगरी असतात बर का इथल्या पाण्यात” प्रद्युम्न तिला घाबरवण्यासाठी म्हणाला. “इ याक्स कसल्या घाण दिसतात त्या .. मी कोणत्या प्राण्यामुळे मरणार असेल तर हत्ती किंवा सिंह , वाघ , चित्ता यांच्यामुळे मरू दे. मला मगर अजिबात आवडत नाही. कसली मंद दिसते ती?”-अनया पाण्यातून बाहेत येत म्हणाली, पण प्रद्युम्न चा तिच्या बोलण्याकडे लक्ष होताच कुठे?

तो तिला पाहताच राहीला.. नितळ कांती, शून्य मेक अप, आणि अप्रतिम बांधा .. “तू नाही उतरणार का पाण्यात?” तिच्या प्रश्नाने तो भानावर आला. “नाही. चला आपल्याला निघायचंय. तुला जंगलातून सेफली बाहेर सोडलं कि माझी जबाबदारी संपली.”-प्रद्युम्न. काही ना बोलता अनया त्याच्या मागे चालू लागली. आज कोणताही शहाणपणा न करण्याचे तिने ठरवले.
सामानाची बांधाबांध झाल्यावर दोघे निघाले. येताना प्रद्युम्न ने झाडावर खुणा करून ठेवल्या होत्या, त्या बघतच ते निघाले. सलग दोनेक तास चालल्यावर थोडी विश्रांती घेऊन ते पुन्हा निघाले. वाटेत अनया ची अखंड बडबड सुरु होती. बोलता बोलता दोघांच्या लक्षात आलं कि त्यांच्या खूप आवडी निवडी सारख्या आहेत! एव्हाना उन्हं वाढली होती. दोघेही वाटेत एका झाडाखाली थांबले. थोडी बिस्किट्स खाऊन सावलीत डोकं टेकून बसले. इतक्यात अनया सावध झाली. प्रद्युम्न ला काही कळेपर्यंत तिने झपकन पुढे येऊन त्याच्या खांद्यावर येऊ पाहणारा साप पकडला. प्रद्युम्न हे पाहून अवाकच झाला. “तुला साप पकडता येतात? आहेस तू!”-प्रद्युम्न म्हणाला. आता जंगल संपत चाललं होतं, पण दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. दोघे असे गप्पा मारत होते जसे एकमेकांना खूप पूर्वीपासून ओळखतात. हा प्रवास संपूच नये असं दोघांना वाटत होतं.

चालता चालता अचानक खडबडीत रस्ता सुरु झाला, म्हणून चालताना प्रद्युम्न ने अनया चा हात घट्ट धरला.. अनया च्या अंगावर रोमांच उभे राहिले.. त्या स्पर्शात एक उब होती, आश्वासकता होती आणि पॅशन हि!
हळूहळू अंतर कमी होत चालले, तशी दोघांच्या मनात हुरहूर दाटली.. आणि अचानक एक काटा शूज आरपार छेदून अनया च्या पायात घुसला. अनया किंचाळली , तिने तिथेच बसकण मारली. ती वेदनेने विव्हळत होती.. प्रद्युम्न ने पटकन तिचा शूज काढला तोच अनया ने पाय मागे खेचला. “बघू दे मला.. ” प्रद्युम्न च्या आवाजात काळजी होती आणि हक्क हि.. तिच्या उत्तराची वाट न बघता त्याने पटकन काटा उपसून काढला, तसे अनया ने प्रद्युम्न च्या खांद्याचा आधार घेतला आणि वेदनेने रडू लागली.. नकळतपणे त्याने तिला जवळ घेतले.. ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली .. “खूप दुखतंय?”-प्रद्युम्न. “हम्म .. ” हमसून हमसून रडत अनया म्हणाली. “अग साप पकडणारी मुलगी तू, अशी रडते काय एक काटा लागला तर?” – प्रद्युम्न. “मग काय नाचू “काटा लगा” म्हणत? हे घे टोचते तुला म्हणजे कळेल किती त्रास होतो ते.” – अनया चिडून म्हणाली. तिचं ते रूप बघून प्रद्युम्न ला हसू आवरले नाही. “चला मॅडम नाहीतर आजही जंगलात राहावं लागेल .. ” तिच्या दोन्ही गालांचे गालगुच्चे घेत प्रद्युम्न म्हणाला.. “आय विश.. ” अनया मनात म्हणाली..

दोघेही चालू लागले. बघता बघता जंगल संपले! निरोपाची वेळ झाली होती..
“थँक्स फॉर एव्हरीथिंग! इट वॉज रिऍली नाईस नोइंग यू .. “-अनया. “सेम हिअर मिस .. ” म्हणत त्याने प्रश्नार्थक चेहरा केला. “ओह तुला माझे नाव च माहित नव्हते? अनया नाव आहे माझं .. भेटू परत जमलं तर. म्हणजे मला माहितीये आपलं जग खूप वेगळं आहे, पण.. ” – अनया परिस्थितीची जाणीव होऊन दुखावलेल्या स्वरात बोलली. प्रद्युम्न च्या नजरेतून ते सुटले नाही. “नक्की. मी आहे अजून १० दिवस. कधीही भेटू शकतो. ” प्रद्युम्न म्हणाला. “ओक देन .. बाय”-अनया. “बाय .. “-प्रद्युम्न.

“गुडबाय ह्ग?”-अनया ने विचारले.. त्यावर हसत प्रद्युम्न ने तिला मिठीत घेतले.. अनया घट्ट डोळे बंद करून त्याच्या मिठीत विसावली.. तिला कायम वाटायचं.. कि आपला जोडीदार असा आपल्यापेक्षा उंच आणि स्ट्रॉन्ग असावा, सेम हाईट वगरे नको. असा असावा कि त्याच्या मिठीत शिरल्यावर खूप सेफ वाटावं .. आत्ता तिला अगदी तस्संच वाटत होत.. त्याच्या मजबूत हातांचा विळखा तिच्याभोवती होता आणि आत्ता या क्षणी ती जागा तिला जगातली सगळ्यात सुरक्षित जागा वाटत होती.. ती त्याच्या स्पर्शाचा एक एक सेकंद जणू साठवून ठेवत होती.. प्रद्युम्नही जणू तिच्यात हरवून गेला होता.. २०-२२ वर्षांची मुलगी येते काय , आपल्याबरोबर राहते काय आणि आपल्याला वेड लावते काय.. बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते..

काही वेळाने दोघेही सावरले आणि आपापल्या दिशांना निघाले..

इकडे अनया घरी अली नाही म्हणून व्हिएतनामी कुटुंब खूप काळजीत पडले होते.. तिला बघून त्यांना हायसे वाटले.. ती अंघोळ करून फ्रेश झाली, आणि जेवून आराम करण्यासाठी खोलीत अली , पण डोळ्यांसमोरून प्रद्युम्न चा चेहरा जात जात नव्हता.. “काय विचार करतोय आपण? तो इतका मोठा स्टार आहे, थोडा वेळ त्याने दिला आपल्याला म्हणून काय प्रेम बीम करेल का तो? आपल्याला तो आधीपासूनच आवडत होता.. भेटल्यामुळे अजून आवडायला लागलाय इतकंच .. ”
अनया ने स्वतः च्या मनाची समजूत घातली, आणि डोळे घट्ट मिटून घेत झोपायचा प्रयत्न करू लागली..

इकडे प्रद्युम्न चीही अवस्था तशीच होती.. कोणीतरी येऊन आत्म्याला स्पर्श करून गेल्यासारखे वाटले त्याला.. या स्टारडम च्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून आपल्याला आवडलेली मुलगी.. इतकी जबरदस्त केमिस्ट्री कधीच कोणाबरोबर जुळली नाही.. आणि हे सगळं काही तासांत ? खरं आहे का हे,कि एक स्वप्नच.. त्याच्या डोळ्यांसमोरून अनया जाताच नव्हती.. बडबडी, धीट, पण खूप निरागस.. फक्त सुंदरच नाही तर निर्मल.. किती विश्वासाने तिने आपल्या खांद्यावर डोके टेकवले होते.. परत कधी भेटेल ती? आणि नाही भेटली तर?? नाही, आपण तिला शोधलेच पाहिजे.. प्रद्युम्न बेचैन झाला..

इकडे दुसऱ्या दिवशी अनया साईटसीईंग साठी बाहेर पडली.. दिवसभर तिचे मन प्रद्युम्न पाशीच ओढ घेत होते! संध्याकाळी घरापाशी येताच तिला दारात गाडी दिसली. असेल कोणाची तरी म्हणून तिने दुर्लक्ष केले. आत गेल्यावर बघते तर समोर प्रद्युम्न उभा! तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता! तिने पळत जाऊन त्याला मिठी मारली.. काही क्षण दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले.. “तू इथे कसा काय आलास?”-अनया. “तूच सांगितलं होतस .. ” प्रद्युम्न हसत म्हणाला! “बाय द वे .. एक जबरदस्त जागा आहे, पण दूर आहे खूप. त्यासाठी पार्टनर शोधतोय मी.” – प्रद्युम्न. “५व्या मिनिटाला बॅग घेऊन बाहेर येतीये!” आणि खरंच बॅग घेऊन अनया ५ मिनिटात बाहेर अली सुद्धा! दोघांनाही माहित नव्हतं हि वाट त्यांना कुठे घेऊन जाणार होती, पण दोघांनीही पुढे पाऊल टाकलं होतं , पुढच्या रोमांचक प्रवासासाठी!

क्रमशः

Image by Pete Linforth from Pixabay 
Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

One thought on “सोलो ट्रीप- भाग २- पूजा पाठक

  • March 25, 2020 at 5:41 am
    Permalink

    Intresting…waiting for next part

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!