चिकना….

स्थान: घाटकोपर मेट्रो स्टेशन

वेळ: दहा मिनिटांपूर्वी

गडद निळ्या रंगाचे, डिसेंबर महिन्यात नेपाळी लोकांनी मुंबईच्या रस्त्यावर काहिशे रूपयाला विकलेले हूड आणि नाडीवाले अवजड जाकिट, आत आंब्याच्या केशरी रंगाचा अंगाला चिकटलेला टीशर्ट, खाली पोपटी रंगाची सुरवारीसारखा फिट असलेली प्यान्ट, त्याखाली उत्तर प्रदेश मेड आणि डोंगरी सोल्ड कॅटरपीलरचे नारिंगी नाडया असलेले राखाडी अँक्लेट बूट. हातात उल्हासनगर मेड राडो चे घड्याळ, दुसऱ्या हातात टॅबपेक्षा छोट्या पण मोबाईल म्हणून मोठ्या अश्या धेडगुजरी आकाराचे यंत्र, दोन्ही कानशिलांवर दोन इंचांपर्यन्त केस भादरलेले, माधोमध उरलेले शेंडी ठेऊन मानेवर रुळलेले, डोळ्यावर सप्तरंगी कचकड्याचा #@बाज गॉगल…

हा चिकणा की छावा की डुड की मॉडर्न की फॅशन आयकॉन की हार्ट थ्रॉब किंवा तत्सम काही असलेला प्रकार हातातले यंत्र कानाजवळ धरून त्यात बोलत अतिशय बिझी असताना माझ्यासारख्या सकाळी सहा वाजता उठून दीडशे किमी प्रवास करून घसा सुकेपर्यंत प्रेझेंटेशन करून थकून ए सी मेट्रोत गारवा शोधणाऱ्या अनेक तुच्छ पोटार्थी प्रवाहपतीतांकडे तिरस्कारात्मक कटाक्ष टाकत अमच्यातला नाही असे भासवत मेट्रोत चढला. धावत एका सुंदर, सुस्वरूप, सुवासिक तरुणीच्या शेजाराची जागा पटकावून गर्दीत होणाऱ्या ओझरत्या स्पर्शाचा आनंद घ्यायला सज्ज झाला! मेट्रो निघाली!

त्या मुलीला फोन आला. ती बोलत होती. मेट्रोने साकीनाका स्टेशन गाठले. इतक्यात तिच्या फोनची ब्याटरी संपली. महत्वाचा संवाद अचानक तुटल्याने काळजीत पडलेल्या त्या तरुणीने शेजारच्या डूडला विचारले:

तरुणी: Excuse me. My battery drained out. Can I use your phone please? Its a bit urgent!

डूड: (चेहऱ्यावरचे अजाण भाव लपवत टोनी ग्रेगने इंग्रजीत प्रश्न विचारल्यावर पाकिस्तानी क्रिकेटर जसे दिसतात तसा विनोदी दिसत) क्या?

तरुणी: (संयमाने) Can I borrow your phone please?

तो: (डोक्यात प्रकाश न पडल्याने फक्त मठ्ठ हास्य)

तरुणी: (काय समजायच ते समजून नाइलाजाने) क्या मैं आपका फोन यूज कर सकती हूँ? मेरी बॅटरी खत्म हो गयी है!

तो: (काही क्षण शांत बसून, आपल्याकडे अनेकांचे लक्ष आहे हे लक्षात येऊन अगतिकपणे ओशाळा हसत) मॅडम बॅलन्स नहीं है!

इतक्यात मेट्रो चकाला स्थानकात येते. ती मुलगी आणि अमच्यासारखे इतर तुच्छ लोक त्याच्याकडे आणि एकमेकांकडे पहात फक्त स्मित करतात! तो त्वरेने उठून उतरतो! दूसरी मेट्रो, दुसऱ्या तुच्छ लोकात आपली रंगीत आधुनिकता आणि मेड इन उल्हासनगर श्रीमंती मिरावयाला…दरवाजे बंद होतात…मेट्रो निघते…ती मुलगी एका “सामान्य” कामकार्याच्या “बॅलन्स असलेल्या” सामान्य आकाराच्या फोनवरून कॉल करते…ए सी चा थंड झोत सुरु होतो…

मी: (मनात) हे असले प्रकार मलाच कसे काय दिसतात???

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!