पम्पूशेठ ……
तुम्ही मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं पाहिली असतील, पण इथं टाळूवर लोणी थापायच्या आतच गायब करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे पम्पूशेठ, …….
कुठल्या तरी नवसाच्या कारट्याच्या घरी, बोकडाच्या पंक्तीत मांडीला मांडी लागली न पम्पूशेठ गळ्यात पडलं. न शिजणारं बोकडदेखील पचवायची ताकद असलेलं वाघाचं आतडं असलेला पठया डोक्यानं मात्र कोल्हा होता. पण हे समजेपर्यंत आमच्या खिशातलं नव्हे तर खिसेच गायब झाले होते……. अन आम्ही पम्पूशेठच्या डोकॅलिटीचं कौतुक करत त्याचेच फॉलोअर झालो होतो.
तशी ती, एका वेळी एकच हाफचड्डी घालायच्या (म्हणजे आतलं अन बाहेरचं असं वेगळं काही नव्हतं) त्या दिवसातली दोस्ती, त्यामुळं आमची खिशासह हाफचड्डीही गायब करायचा मोह पम्पूशेठला झाला नाही.
अगदी परवा परवाची गोष्ट, …… बिडी काडीची कसलीच सोय नसलेले लॉकडाऊनचे दिवस, ……. आणि असलंच कुणाकडे काही तरी, घरात कलम १४४ लागू, …….. चिंतातुर जंतूना पम्पूशेठने गाठलं, प्रत्येकाला खिंडीत एकटे गाठून दोन-दोनशे रुपये चौकातल्या सेटिंग साठी घेतले. वरून बिडी काडीचे वेगळे, …………… टेरेसवर सिगारेटी मारायला आलेल्याना खुप वेळ गप्पा मारायला आल्यावर कळले की प्रत्येकी दोनशे रुपयांचा चुना आपल्याला लागला आहे. वरून झाकलेल्या जीवनावश्यक पालकच्या जुड्यांमुळं पाकिटं ओली झाली ते वेगळंच. शिवाय काही पामरांसाठी जीवनावश्यक द्रव्य असलेल्या रॉयल काळविटाची सोय हा पम्पूशेठने आयुष्यभर जनतेवर केल्या उपकारांपैकी उच्चांक होता, ……… अर्थात तिप्पट किमतीत……. स्वतःच्या खिशातला एकही पैसा न लावता.
मागे एकदा, ……. त्याच्या गावी, काहीच उद्योग नसल्याने, पम्पूशेठ जवळजवळ तासभर चूळ भरत राहिले, अन हे त्याचं चाललेलं मेडिटेशन नक्की कुणाला बुडवणार , याचा विचार करण्यात मीही तास घालवला. ………….. ……. थोडया वेळाने, ज्या म्हशीकडे पहात पम्पूशेठ चूळ भरत होते, ती म्हैस ओरडू लागली. अत्यंत करूण स्वरात तिने साद घालायला सुरुवात केली, अन तिचा मालक संभा भाऊची अर्थातच गाळण उडाली. …… अर्थात संकटमोचक पम्पूशेठ धीर द्यायला पोहोचले.
“सकाळ पातूर , चांगली होती की रं….”
“आरं, काय झालं काय म्हाइत, बघ की वाईच ……”
तोपर्यंत तिकडं, संभाभाऊच्या बायकोनं म्हशी साठी टाहो फोडला, अन संभाच्या नावानं शिव्या घालायला सुरुवात केली. तो गलका ऐकून आसपासच्या चार बायका गोळाही झाल्या, ….. पण संभाला जिता पाहून वाईच नाराजच झाल्या. तरीबी, आलोच हाय तर…… म्हणून फतकल मारून बसल्या, अन त्याच्या बायकोला आधार देऊ लागल्या. त्यातली एक सुगरण लगबगीनं संभाच्याच घरात गेली, अन जमलेल्या माणसासाठी हाफ हाफ चहा टाकायला घेतला.
तोवर, पम्पूशेठने ओरडणाऱ्या म्हशीला, खालून , वरून, मागून , पुढून चेक स्वतःच्या तज्ज्ञ स्टाईलने चेक करायला घेतले. अर्थात, म्हशीच्या पुढे जास्त वेळ थांबु शकलं नाही.
तोवर संभाच्या बायकोचा टाहो अजून वाढत होता. त्या टाहोला घाबरून म्हैस आपलं ओरडणं थांबवल का काय ?….. अशी शंका पम्पूशेठच्या डोक्यात आली. त्यानं जास्त नाटक न करता संभाला बाजूला घेतलं न म्हणाला,
“औशिद हाय गड्या, परं महाग हाय जरा, …… बग म्हजी परवडत नसल तर नाही तर दे सोडून.”
“आरं बोल की लौकर ….”
“ह्या पोटाच्या दुखण्यावर रामबाण उपाय आणतो, पर दोन हजार लागत्याल.”
५०००० च्या म्हशीसाठी २००० ……… किस झाड की पत्ती…
संभानं लगीच दोन हजार काढून दिले न झालं ……..
कसलासा पाला कुटून पम्पूशेठनी आणला, …….. अर्ध्या एक घंट्याने म्हैस शांत झाली न समोरची वैरण हानु लागली.
…………………………………………………………………
दोन हजारातुन दोनशे, बांधाच्या पलीकडच्या धोंडवड मामांना मिळाले, ………………… शेवटी त्यांनीच तर पम्पूशेठच्या सांगण्यावरून त्यांचा मस्तवाल रेडा बाहेर आणून बांधला होता, ………… अन त्याला पाहून कामातुर झालेली संभाची म्हैस ओरडून साद घालू लागली. तिकडं पम्पूशेठनी पाला खाऊ घातला न रेडा पुन्हा आत गेला, त्यासरशी इकडं म्हैसही एकदाची शांत झाली होती.
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Hahaha mast
मस्त
ह्या ह्या ह्या