असून नसणारा माणुस….

माझ्या जन्माच्या वेळी त्याच अर्ध आयुष्य जगून झाला होत. गोष्ट त्याच्या मी पाहिलेल्या अर्ध्या आयुष्याची आहे.

काही माणस जन्माला येतात, जन्मली म्हणून जगतात, जगली म्हणून वाढतात, वाढली म्हणून म्हातारी होतात, म्हातारी झाली म्हणून मरतात. ती असून कोणाला अडचण होत नाही आणि नसली तर खोळम्बा होत नाही. इतक न जाणवणार त्यांच अस्तित्व असत. पण ते असत. काही लोकांच आयुष्य रंगीबेरंगी असत, काहींच ब्लाक एंड व्हाइट तर काहींच सीपिया टोन सारख राखाडी. पण प्रत्येकाच्या आयुष्याचा चित्रपट पडद्यावर दिसू शकतो. पण महादेव शिवराम मोघे ह्या माणसाच्या आयुष्याचा चित्रपट पहायला फिल्म मशीनवर लावली तर काहीच न उमटलेली पण एक्सपोज्ड फिल्म सुरु रहते आणि पडद्यावर फ़क्त पांढरा उजेड पडतो.

माझ्या वडिलांच्या वयाचा, चार भावंडात सर्वात मोठा असलेला म्हादु गिरगावातील चाळीत पाहिलेले एक पात्र. आम्ही त्याला म्हादु मामा म्हणत असू. तो किती शिकला होता ते त्यालाही माहित नव्ह्त. पाच फुट दोन इंच उंची, कुरळे दाट केस, समोरून बाहेर आलेले पटाशिचे मोठ्ठे दात, कृष शरीर, आत्मविश्वासाचा लवलेश नसलेले चेहेर्यावरील भाव, बावळट आणि करुण झाक असलेले नजर चोरणारे डोळे, बारीक मिशी, पांढरे खुंट वाढलेली दाढ़ी असा म्हादु मामा. मी त्याला कधीच बूट घालून, इन शर्ट करून बाहेर गेलेला पहिला नाही. अगदी त्याच्या उशिरा झालेल्या लग्नात देखिल! बाकी प्रिंटिंग प्रेस मधे खीळे जुळवायच काम करणार्या त्याच्या आयुष्यात बूट घालून जायचे प्रसंग कधी आलेच नसतील हे आज जाणवत. चाळीत घरी असला की नाडीची रेघांची चड्डी आणि सांडो गंजिफ्रोक हां वेष ठरलेला. प्रसंगी फ़क्त चड्डी आणि वर उघडा कृष देह.

म्हादु सर्वात थोरला असला तरी बुद्धि आणि कर्तृत्व शून्य असल्याने बाजूला पडला. बहिण लग्न करून गेली. तीन नंबर भाऊ सरकारी नोकरीत चिकटला. त्यामुळे त्याला घरात मान. धाकटा खामका होता. फारस कर्तृत्व नसल तरी जबान जोरात होती. म्हादु गरीब आणि घाबरट. मग आयुष्य गेल घरातली आणि लोकांची काम करण्यात. आज आठवुन वाइट वाटत. आम्ही लहान असताना गोट्या खेळायचो. संपल्या की म्हादुमामाला खाली जाऊन विकत आणायला पाठवायचो. तो निघाला की त्याच्या घरचा दळणाचा डबा, गोगटयांचे इस्त्रीचे कपडे, जोश्यांची भाजीची पिशवी, परांजप्यांची वाण्याची लिस्ट हे सर्व त्याला अपोआप चीकटायचे. तो पण आनंदाने सर्वांची कामे करायचा. त्याला अक्षरश: कोणीही काहीही काम सांगायचे!

एक दिवस अचानक त्याच लग्न ठरल्याची खबर आली. असेल तो 45 वर्षांचा तेव्हा. पालघर, कर्जत, विरार अश्या कुठल्यातरी गावातली मुलगी शोधली होती. एका लहानश्या होल मधे लहानसा कार्यक्रम झाला आणि मामी चाळीत आली. पण काही महिन्यातच मामी दिसेनाशी झाली. मी आईला विचारले मामी कुठे गेली तर “तुला काय करायच्या आहेत उठाठेवी?” अस म्हणून माझ कुतूहल दाबण्यात आल. पण चाळीतील बायकांच्या चोरून ऐकलेल्या चर्चेतून इतके कळले की मामी कोणाबरोबरतरी पळून गेली होती कारण “मामाला झेपल नाही”. ते झेपल नाही म्हणजे काय हे कळायला थोड़ी वर्ष जावी लागली!

सरकारी नोकरीतला भाऊ लग्न करून वेगळा झाला. धाकट्याची बायको चाळीत आली. त्यालाही बहुधा “झेपल नसाव” कारण त्यांना मूलबाळ नाही. पण छोटी मामी नांदली. वर्ष सरत गेली. आजी (म्हादुची आई) गेली. म्हादुचा प्रेस बंद पडला. वयाची पन्नाशी उलटली होती. लहान भावाच्या आणि वाहिनीच्या तूटपूंज्या उत्पन्नावर घर आणि म्हादुच पोट सुरु होत. त्या बदल्यात घरातील कपडे, भांडी, केरवारा, सामान आणणे, गाद्या घालणे ही आणि अशी शाररिक मेहेनातीची कामे म्हादु मामा करत होता. भाऊ आणि वहिनीचे प्रसंगी अपमानास्पद बोल तो आनंदाने ऐकून सोडून देत होता. दिवसा घरातील आणि शेजर्यांची कामे करायची आणि रात्री चाळीच्या ग्यालरित झोपायच हा शिरस्ता अनेक वर्ष चालला. आम्ही मुल मोठी झालो. क्वचित म्हादु मामाची थट्टा करू लागलो. पण तो फ़क्त ते कसनुस हसू चेहेर्यावर ठेउन नजरेत नजर न मिळवता वेळ मारून नेइ.

माझे वडिल जाउन काही वर्ष उलटून गेली होती. माझ गिरगावात जाण कमी झाल होत. असाच एकदा मी गेलेलो असताना म्हादु मामा भेटला. म्हणाला “मंदार तुझे बाबा स्वप्नात आले होते” . मी विचारल “काय म्हणाले?” तो म्हणाला “काही नाही. माझी चौकशी केली आणि एकदा मठात जाऊन ये म्हणाले”. मी तसाच त्याला गाडीत बसवला आणि मठात नेला. माझे वडिल क्वचित एका मठात जात आणि कधीतरी ह्याला पण नेत. मामा खुष झाला तिथे जाऊन. निघताना हळूच म्हणाला “चहा पिउया का?” आम्ही चहाच्या छोट्या टपरीवर गेलो. पोर्याने समोर पाण्याचे ग्लास ठेवले. ह्याने खिशातून पार्ले जी चा एक छोटा पुडा काढला आणि बिस्किट पाण्यात बुडवून खाऊ लागला. मी म्हटल “अरे हे काय? चहा येइल ना आता. त्यात बुडव”. तो म्हणाला “चहा प्यायला मजा येते. बिस्किट मी अशीच खातो!!” त्यानंतर जेव्हा जेव्हा गिरगावात गेलो तेव्हा त्याला चहा नाश्ता द्यायचो. दिवसाच्या कोणत्याही वेळी दया, त्याला भूक असायचीच!

काही वर्षांपूर्वी गिरगावातील जागा विकून ते लोक सफाळा इथे रहायला गेले अचानक. मग भेट नाही. एकदा तारापुरला टाटा वायर मध्ये गेलो होतो तेव्हा मुद्दाम वाकडी वाट करून त्यांच्या घरी गेलो. म्हादू मामा, छोटा मामा आणि मामी भेटले. म्हान्दू मामा थकला होता. पण चहा त्यानेच आणुन दिला आणि कप पण त्यानेच धुतला. त्यालाही झाली आता दोन वर्ष. त्यानंतर एकदा मामीचा फोन आला होता एखादा वृद्धाश्रम माहित आहे का विचारायला. म्हादु मामाला ठेवायच म्हणत होती. नंतर काहीच खबर नाही.

परवा एका ओळखिच्या व्यक्तिकडून कळल की म्हादुमामा सहा महिन्यापूर्वी गेला. म्हादूमामाचा मृत्यु देखिल त्याच्या अस्तित्वासारखा जगात कोणालाच फरक न पडणारा. काही माणस असल्याने कोणाची अडचण होत नाही आणि नसल्याने खोळम्बा होत नाही. पण ती असतात! चुकुन एक्सपोज झालेल्या आणि काहीच न उमटलेल्या फिल्म सारखी!!!!

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!