पम्पूशेठच लग्न….
तसा आमचा पम्पूशेठ काही मदनाचा पुतळा नव्हता बरं का ? त्यात भरीस भर म्हणून, कावळ्याइतका चतुर असलेला हा प्राणी, लहानपणीच कुठल्याशा विटी अस्त्रांमुळे खरोखर एकाक्ष झाला तो कायमचाच.
महाभारत सुरू झाल्यावर, धृतराष्ट्राच्या नावानं गावातल्या बायकांनी “आंधळ्या” म्हणत बोटं मोडली नसतील, त्यापेक्षा खूप जास्त वेळा या कावळ्याच्या नावानं मोडली असतील.
सहाजिकच, महाभारतातल्या धृतराष्ट्राविषयी त्याला विशेष आपुलकी असणं स्वाभाविक होतं. त्यातल्या त्यात, गांधारी सुंदर होती, हे कळल्यापासून नुसती आपुलकीच नव्हे तर, हाच आपला पूर्वज ….. इथंपर्यंत आमचा पम्पूशेठ कुरुवंशी झाला होता. एवढंच नव्हे तर , गावच्या तलाठ्याच्या साहाय्याने हस्तिनापूर , वागदरवाडी पासून कुठल्या दिशेला, ….. किती किमी, ….. साधारण किती एकर जमीन आसंल , आणि गट नंबर काय काय असतील, इथपर्यंत गडी रिसर्च करून बसला.
पण गावातल्या देशपांडे गुरुजींनी जेव्हा, कौरव किती अन त्यांची पिलावळ किती याचा अंदाज दिला तेव्हाच गडी थंड पडला. असो, पण धृतराष्ट्र प्रकरणामुळे, आत्मविश्वास वधारून, गांधारीचा शोध सुरू झाला हेही काही कमी नव्हते. शाळेतल्या, गावातल्या , आसपासच्या गावातल्या बहुतेक कन्यांना पम्पूशेठच्या एकनजरी दिलफेकी बद्दल अंदाज होता, आणि त्यामुळं, तिथं, काही डाळ शिजणं शक्य नव्हतंच. कुणी ना कुणी माझ्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधणारी असेलच की,………. अशा विश्वासानं, पम्पूनं सुरुवात केली की,
“आरं, ती पट्टी बांधलं ,….. पर एकाच डोळ्यावर, बँडिट queen वानी , मग काय करशील ?” असा हिरमोड कुणीतरी केलाच म्हणून समजा. इरसाल पम्पूशेठ पण आता, निराशेच्या काठावर येऊन उभा होता, ………. असं लोकांना वाटत होतं. पण गडी इतक्यात हरणारा नव्हता. तरीही घायकुतीला आला होता, हे खरं.
आणि एक दिवस, बुधवारच्या आठवडी बाजारात, पम्पूशेठची नजर गांधारीवर गेली, ……….. मिरच्या विकत होती, …….. मिरची पेक्षा तिखट वाटत होती, ……….आमच्या अर्धं धृतराष्ट्राने, अशा आणीबाणीच्या प्रसंगी वापरण्यासाठी खास बनवून घेतलेला झिरो नंबरचा फोटोक्रोमॅटिक चष्मा घातला, ……. अन समोर जाऊन बघत उभा राहिला. अजून शब्द जुळवणी सुरूच होती, तोवर, ….
“का , कधी बघितली न्हाई का ?”
असा तीर आला.
“जरा , झणझणीतच वाटतीय.” सगळं वाकचातुर्य पणाला लावून पम्पूला हे वाक्य सुचलं होतं.
“डोळ्यावरचं ढापण काढून बघा, मग डोळ्यांतनं पाणीच निघंल.”
“…….” नुसतंच आ वासून पम्पू फक्त पहात राहिला.
“काय बनवायचा बेत हाय? ……. म्हंजी कशाला पाहिजे होती ?”
“गळ्यात बांधायला ……” पम्पूच्या तोंडातून आपसूक खरं ते घरंगळलं. अन मिर्चीवाली मिरची सकट लाजून लाल झाली.
बस्स, आता ठरलं, काही झालं तरी ही सोयरीक हातातून जाऊ द्यायची नव्हती. रोजच्या रोज, पांदीच्या रस्त्यानं जाता येता लाजणाऱ्या , अनेकजणींपेक्षा ही वेगळी होती.
बाकी कुळी मुळीची माहिती काढून, पम्पूशेठनं नानांसमोर विषय मांडला.
“आर्रर्रर्र, कुणाचं नशीब फुटलं रं पम्पू ?” ज्याला चड्डी घालायला शिकवली, त्याची काढायला, नानांना काहीच वाटायचं नाही. पण पम्प्या फुरंगटलं.
“नाना, लगीन करीन तर हिच्याशीच…… नाहीतर नाही”
“तसंबी कुठं होणार हाय, तुझं लगीन ?” नानांनी अजून पम्पूची नाडी हातातच ठेवली होती.
“बर बघू, तुझ्या डोळ्यांची गिणती, तिनं केलीय नव्ह…..”
“ते मी बगून घिन” पम्पूशेठचा फोटोक्रोमॅटिक टेक्नॉलॉजीवरचा विश्वास अढळ होता.
झालं, ……… मुलगा, मुलगी पाहण्याचा पारंपारीक कार्यक्रम, सुपारी, याद्या, खरेदी …….. सगळीकडे मुलगा आपला चशमा लावूनच …… त्यामुळं, गावातली “आंधळं” ही पदवी जाऊन, सासुरवाडीतल्या गोटात “ढापनं” ही नवी पदवी बहाल झाली.
अगदी, हळदीच्या धामधुमीतही चष्मा तसाच, …….. पण अखेर घडायचं ते घडलंच, पम्प्याच्या मोठ्या मेव्हनीनं गालावरून हात फिरवताना, चष्मा चुकून वर सरकला, अन पम्पूशेठची एकाक्ष नजर मेव्हणीच्या नजरेला भिडली. मेव्हणीच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भीती, ….. झालंच तर, तोंडाचा मोठ्ठा आ, असं सगळं काही…
बाकीच्यांना काही समजेना, त्या सर्वजणी तिचा दशावतारी मुख अभिनय पाहण्यात व्यस्त. तेवढ्यात, पम्प्याने चष्मा सावरला. पण मनातल्या मनात, कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनापेक्षा बिकट अवस्था झाली होती. काळ आला होता पण अजून वेळ होता.
पण नंतर समजलं, की पम्पूशेठच्या तीरे नजरने घायाळ झालेली मेव्हणी, …… चष्मा सरकताच, डोळा मारणाऱ्या तिच्या भावजीना, भलतीच चावट समजत होती. आणि मोठ्ठे डोळे, मोठ्ठा आ वासणे, आणि एकूणच चेहऱ्यावरचा भीतीदायक मुद्राभिनय हा तिच्या लाजण्याचाच एक प्रकार होता. अशा भयरसयुक्त लाजण्याचा रस पीत आपल्या साडुने कसा काय इतकी वर्षे संसार केला असेल, असा विचारही पम्पूशेठच्या मनात येऊन गेला. आणि बिच्चारा साडू, त्या भयचकित संसाराच्या फांदीवर लागलेल्या दोन झेंडूच्या फुलांना मांडवभर खेळवत होता, …….. रसभंग झाल्यासारखा.
लग्न लागलं, …… सत्यनारायण उरकलं,……. जागरण गोंधळ झाला, गावानं बोकड रिचवलं. ….. आणि पम्पूशेठला मनगटावरचं हळकुंड सोडायची घाई झाली.
वरच्या मजल्यावर पम्पूची खोली, त्यात बऱ्याच पाली, …… त्यांचीच सोबत होती इतके दिवस.
पम्पूच्या बहिणीने, दोन बायका लावून खोली साफ करून घेतली, अन सगळ्या पाली पळवून लावल्या.
“आता नवीन पांढरी पाल यायची म्हटल्यावर, जुन्या पालींची काय गरज ?” असं समस्त नणंद जमातीला शोभेलसं वाक्य फेकून, सजावटीची सांगता केली.
रात्र झाली, तसा पम्पूशेठच्या चष्म्याच्या काचेचा, काळपटपणा कमी झाला. जेवण उरकून पांगापांग झाली, ….. वरच्या खोलीची लाईट ऑफ झाल्यावरच गडी रूममध्ये घुसला. रूमचा अंदाज होता, त्यामुळं अंदाज घेत बेडवर पोचल्यावरच चष्मा काढला, अन कुठंतरी हाताशी येईल, असा उशाशी ठेवून दिला.
पम्पूला रूमचा अंदाज असला तरी मिरचीचा नव्हता. लग्नातल्या भरजरी कपड्यांचा घोळ आवरता आवरत नव्हता. तरीही अंदाजा अंदाजानं रात्र कशीबशी पार पडली, अन पहाटेला पम्पूशेठ घोरायला लागलं.
सकाळी मिरची वहिनी, आपल्या घोरत पडलेल्या, कान्ह्याला सोडून आवराआवर करायला निघून गेल्या. ….. थोड्या वेळानं, शनिमा स्टाईल मध्ये, चहाचा कप घेऊन वर आल्या अन कान्ह्याला उठवू लागल्या, …… हे काय? …….. कान्हा उर्फ पम्पूशेठ उठलं पण …. एकाच डोळ्याने, दुसरा डोळा उघडनातच. …… काय म्हणावं बाई चावटपणा…….. पम्पूशेठ भेदरून उठलं, अन चष्मा शोधू लागलं.
चादरी खाली कुठशी चुराडा झालेला चष्मा सापडला. तरीच …… मिरची वहिनी रात्री, “टोचतंय, टोचतंय ” असं हळूहळू कण्हत होत्या, अन बाहेर बायका फिदीफिदी हसत होत्या. ……… पण आता चष्म्याच्या भिंगासोबत पम्पूशेठचं बिंग फुटलं होतं……. अन मिरची वहिनीने किंकाळी फोडली होती. …. त्यासरशी खालून पाठराखीन म्हणून आलेली, मोठी मेव्हणी धावत सुटली. ….. सोबत पम्पूची बहीण अन आईसुद्धा.
पण त्या सर्वजणी पोचण्याआधीच, पम्पूच्या जुन्या गर्लफ्रेंडनं बेडवर उडी मारली…….. पाली ला आपल्या बेडवर पाहून मिरची वहिनींनी अजून एक किंचाळी मारली, ….. अन …… पम्पूशेठला घट्ट मिठी मारली.
सगळे पोहोचले, तेव्हा दृश्य खासच होते……. नव्या पांढऱ्या पालींनं एकाक्ष अवस्थेतल्या बिन चष्म्याच्या पम्पूला , डोळे झाकून मिठी मारली होती, …… अंदाजाअंदाजानं पार पडलेली, कालची रात्र पुन्हा तिच्या गालावर फुलली होती. ….. तिकडं पोचलेल्या नणंदेनं पालीला झाडून टाकली होती…… ते दृश्य पाहून संसार मार्गाला लागला म्हणून आई आनंदली होती……. अन धाकटीला मिठीत घेऊन, तशाही अवस्थेत, मोठ्या मेव्हणीला डोळा मारणाऱ्या पम्पूशेठवर, मेव्हणी मात्र भयंsss कर फिदा होती.
Image by Shutterbug75 from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
व्वा सर कॉमेडी पण
हा…हा…हा…!!मस्तच
Bhannat katha
mastach
zakas!