स्ट्रोन्ग ओल्ड वुमन…

दिवस: २५ जून २०१४

वेळ: सकाळी १०

स्थळ: कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल, मुंबई

आणि तिने हसऱ्या चेहेऱ्याने आणि आश्वासक नजरेने माझ्याकडे पहात माझा धरलेला हात सोडला. माझ्या चेहेर्यावर बहुधा काळजी आणि थोडीशी भीती दिसत असावी तिला. म्हणून ते आश्वासक भाव…तिथून पुढचा ३ तासाचा प्रवास तिला एकटीलाच निष्णात डॉक्टरांच्या साथीने करायचा होता. वॉर्डबॉय तिचा बेड ढकलत तो लांब कोरीडोर पार करत होते. मी एका जागी स्तब्ध होऊन पहात होतो. एक एक दरवाजा उघडत ते आत जात होते आणि दरवाजे बंद होत होते. शेवटचा दरवाजा “ऑपरेशन थेटरचा”……..

साधारण दोन महिन्यापूर्वी अनेक वर्ष होत नसलेला निर्णय झाला. ऑपरेशन करायचं ठरलं! मग ओळखीच्या लोकांकडे चौकशी, रेफरेंस, काय काय करावं लागतं, बजेट काय असतं, कोण डॉक्टर चांगला अशी सर्व माहिती काढली. कारण ऑपरेशन आपण रोज करत नसतो. ती मिळाल्यावर कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील डॉक्टर जोशी ह्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यांनी ऑपरेशन केलेले ५ जण आमच्या कॉम्प्लेक्स मधेच मस्त आनंदाने फिरताना दिसत होते. आणखी विचार करायची गरजच नव्हती. मग घेतली त्यांची अपोइंतमेन्ट.

ठरलेल्या दिवशी (साधारण महिन्यापूर्वी) सहकुटुंब त्यांना भेटायला गेलो. अगदी जवळच्या नात्यातील लग्नाला जावे तसा. प्रसन्न व्यक्तिमत्व आणि हसऱ्या चेहेऱ्याच्या डॉक्टरांनी “या या प्लीज..बसा” असं मराठीमध्ये स्वागत करून आम्हाला खिशातच टाकलं. सगळे रिपोर्ट आणि एक्सरे पाहुन ऑपरेशन केलेल चांगलं असं सल्ला दिला. आईला “ह्या वयात देखिल फिट आहात, बीपी, शुगर काही नाही” असे सर्टिफिकेट दिले. वरून अत्ता जमत नसेल तर दोन वर्षांनी देखिल ऑपरेशन केलं तरी हरकत नाही पण तोवर दुखणं सोसावं लागेल आणि झीज अधिक होईल हे देखिल सांगितलं. आमच्या अनेक (त्यांच्या दृष्टीने) बावळट प्रश्नांना शांतपणे आणि आम्हाला समजतील अश्या भाषेत उत्तरे दिली. अगदी आमच्या आईने “तुम्ही जोशी म्हणजे कोकणस्थ का? परशुरामचे का?” असं विचारल्यावर मी देशस्थ आहे आणि इंदूरचा आहे हे देखिल बिनदिक्कतपणे सांगितले. चेहेर्यावर ज्ञान, हुशारी आणि आत्मविश्वास ओथंबून वहात होता त्यांच्या. त्यांच्या समजावण्यातून त्यांची passion झळकत होती. एखाद्या निष्णात भटजीने पूजेची प्रक्रिया सांगावी तितक्या सहजतेने ते “ बायल्याटरल नी रिप्लेसमेंट” सर्जरी बद्दल बोलत होते. डॉक्टर आम्हाला भलतेच आवडले. त्यांनी एक टेस्ट करून घ्यायला सांगितली आणि ते स्वतः भारताबाहेर जात असल्याने आजची तारीख ऑपरेशनसाठी ठरली.

काल रात्री आईला आडमिट केले. मी रात्रभर राहायला होतो तिच्या शेजारी. मस्त गप्पा झाल्या. सकाळ झाली. मी घरी येऊन पटकन आन्हिक उरकून तयार झालो. भाऊ आणि त्याची बायको आले. आम्ही एकत्रच निघालो. कितीही नाही म्हटलं तरी टेन्शन होतच. All said and done, it is a major surgery!!! आम्ही सगळेच थोडे दडपणाखाली होतो. पुढारलेले वैद्यकीय शास्त्र, अत्याधुनिक सुविधा आणि निष्णात डॉक्टर दिमतीला आहेत हे माहित असून देखिल आम्ही ह्या सर्वा पलीकडे असलेल्या त्या निराकार शक्तीचा कुठेतरी धावा करत होतो. पण जिला ह्या दिव्यातून जायचे होते ती आमची आई स्थितप्रज्ञपणे पेपर वाचत होती. अखेर दहा वाजता वॉर्डबॉय आले आणि पलंगासकट मातोश्रींना पाचव्या मजल्यावरील ओ टी मध्ये नेऊ लागले. आम्ही बरोबर होतोच. पाचव्या मजल्यावर एका जागी आम्हाला थांबायला सांगण्यात आले आणि तिने हसऱ्या चेहेऱ्याने आणि आश्वासक नजरेने माझ्याकडे पहात माझा धरलेला हात सोडला……

कॅन्डीक्रश खेळून झाला, फेसबुक आणि WA वर लोकांना पिडून झालं. पण वेळ जाता जात नव्हता. आमच्यासारखे अनेक लोकं ज्यांच्या जवळच्या माणसाचं ऑपरेशन सुरु होतं असे अनेक चेहेऱ्यावरची काळजी शक्यतो लपवत उसनं हसू आणून आपल्या नावाचा पुकारा व्हायची असह्य वाट पहात होते. एक वाजेपर्यंत संपणारे ऑपरेशन ३ वाजले तरी न संपल्याने काळजी वाढली होती. ओ टी च्या बाहेरचा माणूस ऑपरेशन सुरु आहे. सर आत आहेत. झालं की कळवतो ह्या पलीकडे काही सांगू शकत नव्हता. जीवाची घालमेल होणे म्हणजे काय हे आज अनुभवलं. अगदी हिंदी सिनेमात ऑपरेशन चं सीन आणि बाहेर असलेले लोकं कसे दाखवतात तसंच काहीस सुरु होतं आमचं. एकदाचा कोल आला. डॉक्टर भेटले. दोन मोठी ऑपरेशन केल्याचा शीण कुठेच जाणवत नव्हता त्यांच्याकडे बघून. आम्हीच वाट पाहुन जास्त दमलेले वाटत असू बहुतेक. डॉक्टर म्हणाले “ऑपरेशन मस्त झालं. तुमची आई सबंध वेळ स्टेबल होती. बहुधा तिला आय सि यु मध्ये देखिल ठेवावं लागणार नाही जे सामान्य रुग्णांना ऑपरेशन नंतर ठेवावं लागतं. तिला आपण डायरेक्ट वॉर्डलाच शिफ्ट करू!” आयला आमची म्हातारी झाशीची राणी निघाली!

तिला भेटलो आत जाऊन. तिला काळजी कसली तर तीन तासाचे ऑपरेशन एव्हडे लांबले त्यामुळे आम्हाला काळजी वाटत असेल आणि त्रास होत असेल ह्याची!! हेच आईचे हृदय का काय म्हणतात ते असावे का? त्या अवस्थेत देखिल तिला आमची काळजी वाटत होती. ऑपरेशन लांबले नव्हते तर सुरु व्हायला उशीर झाला होता. भावाला तिथेच सोडून मी निघालो. घरी येऊन जेऊन परत झोपायला जाण्यासाठी. आत्ताच भावाचा फोन आला. मातोश्री रूम मध्ये आल्या आहेत. मस्त गप्पा मारत आहेत. कधी जाऊन तिला भेटतो असे झाले आहे. पळतो आता. आमच्या “स्ट्रोन्ग ओल्ड वुमन” ला भेटायला!!! 🙂

Image by Sasin Tipchai from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!