साय

शाळेतून सपनी आत आली तेव्हा आजा खोलीत समोरच बसला होता टीव्ही बघत. “कुटं होतीस ? किती वाजले काय अक्कल हाय कि नाय ?” आज्जा ओरडला. “सायकल पंचर झालती. किती येळा सांगितलंय तुला त्याचा टायर खराब झालाय.” सपनी वैतागली आणि जेमतेम १० बाय १० च्या दोन खोलीतल्या स्वयंपाकघरात असलेल्या मोरीत तोंड धुवायला गेली. “अय , थोबाड वाजवू नको जास्त. मी काय झाड लावलंय का पैक्याचं ? माझी पेन्शन मला पुरी पडना हितं विष खायला. निस्ती याची फी भरा त्याची फी भरा , पैका आनायचा कुटून ?” आज्जाची रोजची बडबड सुरु झाली.

सपनी ने त्याच्याकडे लक्ष न देता खोलीचा पडदा ओढला, आणि कपडे बदलले.  तिने कपडे बदलून पटकन भाकरी टाकली. जेमतेम अजून दोन भाकऱ्यांचं पीठ उरलं होतं डब्यात. तिने एकाच भाकरीचं पीठ घेतलं. जमेल तशी भाकरी थापली आणि तव्यावर टाकली. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत आज्जी होती तोवर तिला हे सगळं करायची गजर पडली नव्हती. पण अचानक आज्जी गेली आणि आईबाप नसलेली सपनी अगदी एकटी पडली. आज्जा सपनी  बद्दल आणि तिच्या आईबापाबद्दल काही बाही बरळायचा तेव्हा आज्जीचा आधार असायचा तिला. झोपताना तिच्या डोक्यावरून हात  फिरवून, आपल्या गोधडीतली पण गोधडी तिच्यावर टाकून आज्जी तिला थोपटत राहायची. ती कशी झाली, तिचे आई वडील कोण कुठे होते आणि आता कुठे आहेत – कशाचा कशाचा पत्ता नव्हता तिला.

गरम भाकरीच्या वासाने तिच्या पोटात भूक खवळली. वाढतं वय , दमछाक आणि सकाळपासून उपाशी असणारं पोट .. आणि समोर असलेली गरम भाकरी. तिने झटकन मान फिरवून डाळीचं पीठ तव्यात ओतलं आणि धिरडं करून आज्जाला जेवायला वाढलं. तिने जेवण केलं कि नाही हे न विचारता आज्जाने जेवायला सुरुवात केली. “तू खा , मला भूक नाय. सोनी नि सामोसा दिलेला खायला. ” ती उगाच म्हणाली. आज्जाने जेवायला विचारावं म्हणून कि त्याने तिची काळजी करू नये म्हणून – हे तिचं तिलाही कळलं नाही.

“अब्यासाला जातीस का गाव फुंकायला जातीस भायेर. सामोसा आली खाऊन. किती पैशे दिले का फुकटात आली खाऊन ? हे असलं जमणार न्हाई सांगतोय मी अदूगार. हे भायेर खान पिन , हिंडन हे करायचं असलं तर लगीन देतो लावून, उगा जीवाला घोर नकुय माज्या. तुझ्या आईनं शेन काय कमी खाल्लं का तेव्हा आता तू माज्या तोंडाला काळं फासायला निगालीस ?” आज्जाने भाकरी संपवून ताट भिरकावून दिलं ते थेट सपनी च्या पायाला येऊन लागलं. ताटाची कड कचकन लागून घोट्यातून रक्त येऊ लागलं.

“मग मारून का न्हाई टाकलं मला ? द्यायचं कि उकिरड्यावर फेकून. कशाला वाढवलं ? माझ्या आईबापाने कायपन केलं असलं तरी माजा काय दोष त्यात ? मी रोज उपाशी रायते. कायपन खाल्लं नाय मी. काल्पन नाय जेवली आजपण नाय. कुनाचं फुकट खात न्हाय मी. मला उगं वाटलं तू इचारशील तू जेवली का पण तुला कुनाची काय पडलीये ? मी चालत जात जाईल रोज, नको मला तुझा पैका.” सपनी चा बांध फुटला.

“अय उगा रडू नग .. आपलं आपन नीट राहायचं असतंय .. ” आज्जा उगाच काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणला. “एक चूक झाली माझी आज्जा .. ” सपनी म्हणाली. आज्जा ने कान टवकारले. “कसली चूक ?” सावध आवाजात त्याने विचारले. “त्या दिवशी चांगली जात होती मी आज्जी सोबत. गेली असती तर मेली असती ना मी पन. कटकट संपली असती तुज्या मागची.” म्हणत सपनी आत गेली आणि जमिनीवर वाकळ टाकून आडवी पडून राहिली. आज्जा मात्र बधिर झाल्यासारखा बसून राहिला होता. खूप खूप वेळ गेला. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली आणि गल्लीतली कुत्री उगाच भुंकू लागली. आज्जा हलक्या पावलाने आत आला. सपनीला गाढ झोप लागली होती. झोपेत तिचा कुर्ता वर गेला होता. आज्जाने हलक्या हाताने तिचा कुर्ता खाली ओढला. तेलाच्या बुधलीतून त्याने तेल  थेंबभर तेल घेतलं आणि मिसळण्याच्या दाबातून चिमूटभर हळद घेतली, आणि मिसळून त्याने हलक्या हाताने जखमेवर तेल लावलं.

सपकन झोंबलेल्या हळदीने सपनीची झोप मोडली. अज्जाने हळद लावली आणि त्याच हातांनी त्याने तिचे पाय चेपायला सुरुवात केली. “काय वंगाळ बोलली पोरगी .. काय म्हाईत हिला कि जल्मल्या जल्मल्या आई मेल्यावर बाप उकिरड्यावर च टाकायला चालला होता हिला ..  तिथून आणली तिला वापस .. सांभाळायला .. आता हाय कोन आम्हाला जगायला .. घासातला घास द्यून वाढवली हिला .. चांगली राय ग पोरी .. आईसारखं वाटुळ नग करून घिऊ .. आमच्या लेकीचं वाटुळ झालं तुज तरी भलं व्हावं म्हनून तर तुला जगवलं ..  ” आज्जा चिरक्या आवाजात रडत होता ..

सपनी मात्र गोठलेल्या बर्फासारखी सुन्न झाली होती ..

Image by Abir Roy from Pixabay 

Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

2 thoughts on “साय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!