आतल्या गोटातील खास खबर….
वेळ 11:15
स्थान: अंधेरी ते सी एस टी लोकलचा जनरल डब्बा.
शेयर बाजारातील दोन पापड बोलत असतात. मला हर्षद मेहता आणि केतन पारेख ह्यांचा शेजारी बसून प्रवास केल्याचा आनंद मिळत असतो.
ऑपरेटर सध्या कोणता स्टॉक खेचतायत, कोणता एक्सिट केलाय, कोणता ठोका, कोणता उचला, जे वाढले ते ऑपरेटरने कसे खेचले, रिलायंस, टाटा, hdfc, icici ह्यांच काय होणार, मुकेशचे खास कोण, सायरस कसा ऑपरेट करतो, कामत आणि पारेख ह्यांच कस नेक्सस आहे, अनिल कसा प्रोब्लेम्स मधे आहे, ह्या दोन कुबेरांनी स्वत: कसा आणि किती माल योग्य वेळी घेतला आणि ठोकला आणि कसे पैसे “छापले”, इंट्रा डे म्हणजे नक्की काय, कैंडल स्टिक चार्ट कसा फालतू असतो, निफ्टी आणि सेंसेक्स ह्यांच भवितव्य काय असेल ह्या सर्वाची “आतल्या गोटातील खास खबर” मला मिळाली आहे….
मी गुलबकावलीचे फूल मिळाल्याच्या आनंदात आहे. माझ्या शेकडो विमान प्रवासात देखिल न सापडलेली ही दोन इतकी मोठी माणसे माझ्या सारख्या क्षुल्लक आणि फालतू माणसाच्या शेजारी रेल्वेच्या जनरल डब्यात बसली आहेत ह्या आनंदाने मी भारावून गेलो आहे. ही सगळी खबर वापरून मी पण आता सोमवार पासून माझी “बैल धाव” मार्केट मधे सुरु करणार आणि अब्जाधिश होणार!
इतक्यात त्यातल्या एकाला फोन येतो.
तो: (फोनवर) हां सेठ. करता हूँ. (समोरच्याने नक्की काहीतरी गरम त्याच्या कानात ओतले आहे असा चेहेरा होतो) अरे नहीं सर. मंडे तक कुछ भी करके अरेंज करता हूँ! ……नहीं नहीं इस बार पक्का….दो महिनेका इंटरेस्ट तो कर ही दूंगा. बाकी तीन मंथ एंड तक पक्का. (फोन ठेवून घामाने डबडबलेला चेहेरा पुसतो. दुसर्याकडे पाहून कसनुसे हसतो)
दूसरा: (पहिल्याच्या हातात गुटक्याची पुडी सरकवत) कितना है?
पहिला: दो पेटी
दूसरा: मेरा भी तीन है! छोड ना यार! बजार में कमाके दे देंगे. बस इंटरेस्ट टाइम पे भरने का. फिर तकलीफ नहीं.
दोघे हसतात आणि गुटका पुडी तोंडात रिकाम्या करून खिडकी बाहेर पाहू लागतात. मी पण जमिनीवर येतो आणि पोस्ट लिहायला घेतो…पोस्ट लिहून होई पर्यन्त रोजच्याप्रमाणे सी एस टी आलेल असत आणि माझ्यातला चाकरमानी कामावर पोहोचलेला असतो…
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023