पालवी
डिपार्टमेंट चे जवळपास सगळेच जणं आज मोकाशी च्या टेबला भोवती जमले होते . हे त्यांचं नेहमीचंच . कुणी नवीन मेंबर जॉईन होणार म्हटलं की ही अशी ‘कोंडाळी’ होणार , आणि त्या व्यक्ती बद्दल आराखडे केल्या जाणार हे ठरलेलं. मिस जया अष्टेकर मात्र ह्याला अपवाद .
मान खाली घालून , चष्मा आणखीन वर ओढत कॉम्प्युटर ‘नेट’ वर ती आपले काम अगदी ‘नेटाने’ करत असे . त्याला कारण ही तसंच होतं . मिस जया , वय वर्ष बत्तीस , ही एक अविवाहित आणि अनुभवाने तुसडी झालेली स्वतःला पोक्त समजणारी महिला .. कुणामध्ये न मिसळता एकटं रहाणं पसंद करत आपलं काम चोख करण्यात पटाईत. आजही सगळे जमलेले असतांना ती कामातच होती .
मोकाशी च्या टेबलाजवळ जोरात चर्चा सुरू …
“ए कोण येतंय ? बकरा , का बकरी ?”
” बोकड आहे कुणी , सारंग शेटे नावाचा.”
” ए , आधी मी माझ्या फाईल्स त्याच्या डोक्यावर टाकणार हा ? माझं झाल्यावर तुम्ही तुमची कामं सांगणार.”
” अरे , मिस कडू बघ न ! फॅन खाली बसूनही हिचा एक केस देखील हलत नाही रे ! काय धाकात ठेवलंय न?”
सगळे फिदीफिदी हसले …आणि एकदम शांतता झाली. तांबे साहेब नवीन रुजू होणाऱ्या तरुणास घेऊन येत होते. त्यांनी सारंग शेटे ची सगळ्यांशी ओळख करून दिली .
नंतर मिस जया च्या टेबलापाशी जाऊन तिची वेगळी ओळख करून दिली . तिचा तुटक पणा सारंग च्या लगेच लक्षात आला. तिच्या शेजारच्याच टेबलावर त्याची जागा होती .
” हॅलो मिस जया . माझ्या डाटा मधील ह्या सगळ्या आकड्यांना पाय चार्ट मध्ये दाखवायचंय , पण ह्या संख्या त्यात येतंच नाहीयेत . जरा बघता का ? ..प्लिज?”
गेल्या आठ दिवसात एक शब्दही न बोललेल्या तिला नाही म्हटलं तरी हे ऐकून छानच वाटलं. तिने त्याचं काम करून दिलं . त्यानंतर अधूनमधून दोघं एकमेकांना मदत करू लागले. सारंग फार मिश्किल होता . हरहुन्नरी आणि रसरशीत ! काहीतरी विनोद करून तिला हसवायचा.
डिपार्टमेंट च्या टवाळखोरांना तिची खिल्ली उडवायला आणखी एक कारण मिळालं. सारंग ला हे समजत नव्हतं असं नाही , पण त्याला ते आवडत नसूनही त्याने विरोध केला नाही . बाकीच्या मंडळींनाही तो आपल्या मजेदार शैलीत काहीतरी ऐकवून सतत हसवायचा .
” आज डबा नाही आणला मॅडम ?” एकाने विचारलं .
” नाही , आज जमलं नाही . ”
” चल न जया , माझ्यासोबत जेव आज.” निकिता ला आज अचानक कुठली उपरती झाली हा विचार करत तिने हसून नकार दिला .
नव्हतं जमलं आज …बाबांच्या एक्स रे आणि टेस्ट ला बराच वेळ लागला होता . कसाबसा त्यांच्या पुरता वरण भात करून निघाली होती ती .
” हं , हे घ्या ! ” एक पार्सल पुढे करत सारंग बोलला .
“कशाला आणलंस सारंग ? मी चहा बिस्कीट खाल्लं आत्ताच .”
” पण जेवली नाहीस न तू ? म्हणून पराठ्यांचं पार्सल आणलंय . घे .”
पोटभर खाऊन झाल्यावर तिच्या लक्षात आलं की त्याच्याशी बोलतांना आपण नकळत एकेरीवर आलोय .
आता दोघंही बरेच मोकळे झाले होते. कधी संध्याकाळी मिळून गाणे ऐकत एखादा पदार्थ करणे , कधी बाहेर जेवायला जाणे ..सारंग तिच्या वडिलांना औषध किंवा काही सामान लागलं तर आणून देई . त्याचा हा स्वभाव तिला मोहवून टाकत होता , पण पहिल्या लग्नाच्या कटू आठवणी मुळे तिच्या वठलेल्या मनाला कोवळ्या पालवीचंही ओझं होतं. तिच्या रहाण्यातील , देहबोलीतील बदल पाहून ऑफिस मध्ये सूचक नेत्रपल्लवी होऊ लागली .
” आजकाल बेलाच्या कडू झाडालाही गोड फळं येतायत नाही ?”
” पण शेवटी कडू ते कडूच! ”
अश्या संवादाकडे आधी सारखे दुर्लक्ष करणे तिला जड जात होतं .
आपल्याला कुणी चांगलं म्हणावं , तारीफ करावी , आपणही आरश्यात पाहून मुग्ध हसावं असं वाटू लागलं .
सारंगने कधीही कुठलीच मर्यादा ओलांडली नव्हती , किंवा सूचक बोलला नव्हता . कधी ऑटो मध्ये एकत्र जावं लागलं तर तिला अप्रशस्त वाटू नये ह्याची तो काळजी घेई .
आपल्याला वाटतंय ते प्रेम आहे का ?
तर तिचं उत्तर होतं , नाही !
त्याचं नसणं तिला अधीर करत नाही . ..त्याच्या पुसटश्या स्पर्शाने अंगावर रोमांच फुलत नव्हते .. नव्या संसाराची स्वप्नही बघितली नव्हती . पण फरक पडला होता नक्की . तिला माणसांमध्ये मीसळावं , हसून बोलावं , टापटीप छान रहावं असं वाटू लागलं . शेजारच्या छोट्या बबलूशी खेळून तिचा शीण कमी होत होता .
” बाबा , फिरून आलात ? ”
” हो ग , आजकाल इतकं चं फ्रेश वाटतं न , ह्या सारंग च्या येण्याने फार मोठी जादू झाली ग ! अशी माणसं असावीत बघ आजूबाजूला . जग किती सुंदर होईल न ?”
” चला बाबा , मस्तं नाटक आलंय , आपण जाऊ बघायला . ”
बाबा पण नवीन आयुष्य मिळाल्या सारखे उत्साहात निघाले . सारंग आणि जयाचे बाबा गप्पा मारत बसले होते . सारंग ने त्यांना खूप हसवलं होतं ….
” सारंग , एक विचारू ? ”
” बिनधास्त बोला काका .”
” अजून लग्न का नाही केलस ?”
” काका , मी माझ्या आई वडिलांचं आयुष्य जवळून बघितलंय . त्यांनी आईला कधीच काडीचंही सुख मिळू दिलं नाही . सतत तिचा पाणउतारा केला . ती कमालीची तयार अशी रियाजी गायिका होती , भरतनाट्यम ची प्रशिक्षित नृत्यांगणा होती . लग्नाच्या वेळी यांनी तिला फार मोठे मोठे अश्वासनं दिले ..नृत्याचे , गाण्याचे कार्यक्रम भरवू , परदेशात जाऊ ….”
” मग ?”
” कार्यक्रम सोडा , ती नुसती शेजारी जरी गेली न , तरी घर डोक्यावर घ्यायचे ते . चांगले कपडे घालू नको , केस घट्ट बांध ..गाणं गुणगुणायचं नाही …
त्यांनी तिचा अक्षम्य मानसिक कोंडमारा केला . ..मी पाचवीत असतांनाच गेली ती .”
” अरेरे ! …
पण म्हणून तू लग्न नाही करायचं असं थोडीच ! ”
” करीन की ! आणि तुम्ही जयाची काळजी नका करू काका . जगण्यातील आनंद घ्यायला जमतंय तिला आता . ..तिचा पुढचा प्रवास बहरलेला असणार , नक्की ! ..पुढच्या आठवड्यात मी नाशिक ला जातोय .तिथे ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायचे आहेत .”
” वापस कधी येणार ?”
” आता पुन्हा इथे नाही येणार काका. तिथून दुसरीकडे जाईन . नमस्कार करतो. ”
जया ऑफिस मधून आली तर घर सुरेल स्वरांनी दरवळत होते .
” अरे वाह ! बाबा , काय बनवलंय ? मस्तं खमंग वास येतोय .”
” मी फणसाची भाजी केलीय बघ …आवडेल तुला. सारंग भेटला का ग ? ”
” आज निरोप दिला त्याला . तो आता नाशिक ला असणार आहे बाबा . काय माणूस आहे न? जिवंत ! त्याने इथून जावंच. त्याची गरज आहे माझ्यासारख्या अनेक जयांना. अनेक वठलेल्या झाडांना पुन्हा पालवी फुटायची आहे . ”
Image by Schwoaze from Pixabay
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
खूपच सुरेख!!
अजून मोठी चालली असती
वाह
कथेचा आशय फारच सुंदर 👌👌
थँक्स अपर्णा , छान वाटलं
Kadaaaak! Ugach nehmichya vatene na janara, jara vegla shevat dokyat , vicharat swataha chi jaga tayar karun gela .
धन्यवाद
chan lihili ahe gosht
खूप छान
धन्यवाद .
आनंद देणारे लोक आजूबाजूला सतत मिळाले तर आयुष्य किती सुंदर होईल, हे जग ही सुंदर होईल ,अप्रतिम वहिनी.