धन्वंतरीचं टेंगुळ……

रडून रडून त्याची उशी ओली झाली होती.

आजारपणात सतत रडणं, त्याच्यासाठी चांगलं नव्हतं……. डॉक्टर नर्स समजावून थकले होते. तोंडाला बांधलेलं ते मुस्काट आयुष्यभरासाठी तोंडाला चिकटलंय असं आता वाटायला लागलं होतं. नक्की आयुष्य किती राहिलंय हे तरी कुठं सांगता येत होतं? पण तेही त्याच्या रडण्याचं खरं कारण नव्हतं.

त्याचा मोबाईलही काढून घेतला गेला होता. घरच्यांना कॉल करता येत नव्हता. डॉक्टर जो काही निरोप देतील, ….. बस तेवढ्यावरच समाधान मानावं लागत होतं. त्यातही डॉक्टर राउंडला आल्यावर विसरून गेले तर, ….. पुन्हा चोवीस तास, …. वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.

खरंतर, त्याला फारसा त्रास नव्हता तरीही, पडून राहणं अन देतील त्या गोळ्या खात राहणं इतकंच तो करू शकत होता. इंडस्ट्रीयल झोन मधल्या एका हॉस्पिटलमध्ये, मोठ्याशा हॉल मध्ये एका कोपऱ्यात तो पडून होता. बऱ्यापैकी अस्वच्छ, ……. भिंती, ……. बेडशीट …… जास्त पेशंट नसूनही कुबट औषधांचा वास. पण त्याबद्दल ही त्याची फारशी तक्रार नव्हती. त्यासाठी तो रडतही नव्हता.

त्याला खरी चिंता, त्याच्या आईची होती, ……. कुटुंबाची होती. संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन झालं होतं. आईला दर पंधरा दिवसांनी, मुंबईत घेऊन जाणं गरजेचं होतं. एरव्ही तोच जायचा. त्या मुंबईला जाऊन येण्यातच घात झाला होता.

मुंबईतलं मोठं हॉस्पिटल …… कडक सिक्युरिटी …… आई स्पेशल वॉर्डमध्ये, …….. बाराव्या किंवा पंधराव्या मजल्यावर, …… तिची किमो होईपर्यंत चारपाच तास याला बाहेर काढायचे. तो थेट, रिसेप्शन समोरच्या गर्दीत, …… कधी बसायला जागा असायची कधी नसायची. कधी एखाद्या खांबाशी उभा, …. कधी नुसताच अधांतरी, ….. फिरत रहायचा, …. माणसं चुकवत, …. चेहरे चुकवत. …….. तोंडाला मास्क बांधून.

नक्की कधी ते सांगता येणं कठीण, पण अशाच एका मुंबई फेरीत तो कुठंतरी फसला, अन काही दिवसांनी, ताप भरला. तापानं अनेक कुशंका मनात आणल्या. डॉक्टरांना भेटला……. अन काही दिवसात, तो पॉजिटीव्ह म्हणून घोषित झाला. त्याआधी काही दिवसांपासूनच त्याला ऍडमिट केलं होतं. कोविड टेस्ट झाल्यापासून जवळजवळ पंधरवडा होत आला होता.

“डॉक्टर …… आईचा रिपोर्ट आला का ?”

“नाही, …… तुमच्या घरचा कोणताही रिपोर्ट अजून आलेला नाही.”

“डॉक्टर, तिची लास्ट किमो बाकी आहे, ….. त्यासाठी तिला मुंबईला जावं लागेल, …. मी इथं अडकून पडलोय, …. कसं होणार? कशी परवानगी मिळणार ? कोण जाणार ? काहीच सुचत नाही. डोकं अगदी सुन्न झालंय.”

“मिस्टर शशी, ……. तुम्ही आधी स्वतः बरे व्हा, ” असं म्हणत डॉक्टरांनी मोठा श्वास सोडला,  ….. जायला निघाले. जाता जाता, मागे वळून बोलले, ” तसंही, कॅन्सर पेशंट निगेटिव्ह असणं, it’s very rare……..”

ते निघून गेले अन दरवाजा आपटला गेला…… थेट नशिबालाच टेंगुळ आल्या सारखं वाटलं. ज्या धन्वंतरीच्या दारात, जीवनाची भिक मागत, ते गेले होते,…… जात होते….. त्या धन्वंतरीनं,…… हातातला अमृताचा कुंभ बदलला होता. बदललेल्या कुंभात नक्की काय होतं, हे चेक करायला, दुसऱ्या धन्वंतरीच्या दरबारी स्वॅब गेले होते.

“कुठलंही साधं इन्फेक्शन त्यांच्यासाठी धोकादायक आहे, ….. Take care….”

ऑनकॉलॉजिस्टचं वाक्य डोक्यात घुमत राहिलं, …… त्या किमो नंतर आम्ही एकाच गाडीने तर आलो. …… तिच्या उष्णतेच्या त्रासामुळे एसी सतत सुरू होता. सुनसान रस्त्यावर, एक ठिकाणी फक्त नारळवाला दिसला, ते नारळपाणी घ्यायला दरवाजा उघडला तितकीच काय ती वेगळी हवा …….. नाहीतर दोघेही ….. एकाच गाडीत , ….. काचा बंद. अजून बायको मुलगा सगळ्यांचंच आयुष्य तलवारीच्या धारेवर आलं.

कसं झालं ….. काय झालं …… का नशीब फुटलं? काही काही उमगत नव्हतं, विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. रात्री नर्सने दुरून ठेवलेलं जेवण……. त्याने पाहिलंही नाही. उशिरा कधीतरी झोप लागली.

रात्री न जेवल्यामुळं, सकाळी औषधांची जबरदस्त रिऍक्शन आली. तो टॉयलेट मध्ये कोसळला, ……. बेशुद्ध. असला पेशंट उचलायचा म्हणजे , पीपीई किट घातलेली माणसं लागणार.

नर्स वैतागली…….. तिची बडबड सुरू झाली.

“मास्क लावला असला तरी, तोंडाने  कमीत कमी  बडबड करा,.” तशाही अवस्थेत,    सूचना करत डॉक्टर आत शिरले. त्यांना एकट्यालाच पीपीई किट मिळाली होती. त्यांनीच पेशंट धरून उठवला, धडपडत बेडवर नेला. …… सलाईन लावली.

“पेशंटची इम्युनिटी चांगली आहे, नीट लक्ष द्या सिस्टर.”

“आवो डॉक्टर ,पण त्याने खायला नको का ?” किरट्या आवाजातलं नर्सचं उत्तर.

……………………………………………………………

अत्यंत शांत मंद्र सप्तकात कुणीतरी सुरावट छेडत असावं, …….. तशी विचारांची लय जुळू लागली होती ………. काल तुटलेल्या घटनांच्या कड्या पुन्हा सांधल्या जात होत्या. अंधुकसं ………. आसपास काही दिसत होतं. कुणीतरी शेजारी , बोलत होते बहुतेक ……. पण अजून नक्की कुठं आहे, …… हे त्याला कन्फर्म होतं नव्हतं. नाही अजूनही चेहरे स्पष्ट होत नव्हते…….

नुसतं पांढरट पांढरट काही दिसत होतं, ……. काय आहे हे, माणसं की भुतं ? …… स्वप्न की खरं आहे, पांढरे कपडे का घालत असतील हे लोक ?…….

किंवा माझी शंका खरी ? ???? तर नाही ना ?? ….. कोण गेलं, …… कोण वारलं, …… नक्की कोण ? ……

“आई sssss” किंचाळण्याचा प्रयत्न करत होता, ….. पण अखेर आवाज फुटला अन हॉस्पिटल हादरलं. तो जागा झाला. …… उठून बसला. मेट्रन धावत आली. फक्त डॉक्टर जवळ जाऊ शकत होते.

“शांत हो …. शशी.”

स्वतःला सावरत त्यानं विचारलं,

“काय झालंय डॉक्टर ?”

“काही नाही, थोडं पाणी प्या. शांतपणे चहा घ्या.”

डॉक्टर अजूनही गुपित फोडत नव्हते. त्यानं चहाचा कागदी कप तोंडाला लावला तरी, त्याची व्याकुळ नजर डॉक्टरांकडेच.

त्याची व्याकुळ नजर, डॉक्टरांनी हेरली अन गालात हसले.

“ऑल इज वेल, शशी, …. तुझी पहिली टेस्ट निगेटिव्ह आलीय. ”

एवढं सांगून, डॉक्टर मेट्रनला सूचना देत राहिले. बोलता बोलता, ते चालू लागले. असं कसं जाऊ शकतात डॉक्टर, ….. तो पुन्हा अधीर झाला.

त्याला उठून डॉक्टरांमागे धावावं वाटलं क्षणभर. ….. तो मनातल्या मनात धावलाही. बोलत बोलत दरवाजापाशी पोचलेल्या डॉक्टरांनी ऐकले बहुतेक, त्याच्या मनातले प्रश्न.

मागे वळले, पुन्हा हसले, ” वन मोअर थिंग मिस्टर शशी, …… सरप्रायझिंगली, युअर फॅमिली इज निगेटिव्ह…… हो …. हो आईसुद्धा….. तरीही ते क्वारंटाईन राहतील घरीच……. आणि डोन्ट वरी, मी आईचे सर्व रिपोर्ट वाचलेत. उद्यापर्यंत आपल्याकडे किमो नर्स येईल….. इकडेच करू यावेळची किमो आईची.”

इतकं बोलून डॉक्टर निघून गेले. ओरिजिनल अमृताचा कुंभ घेऊन आलेली धन्वंतरीची पाठमोरी जिवंत मूर्ती तो पहात राहिला.

या वेळीही दरवाजा धाडकन लागला……. पण टेंगुळ मात्र त्या विषाणूला आलं.

Image by Pete Linforth from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

14 thoughts on “धन्वंतरीचं टेंगुळ……

          • June 1, 2020 at 9:30 am
            Permalink

            खूपच छान, अमृतकुंभ

      • May 23, 2020 at 3:24 am
        Permalink

        धनवंतारीचं टेंगुळ फारच सुंदर

        Reply
  • May 18, 2020 at 7:50 am
    Permalink

    katha awadli, sadhyparisthitivar aadharit sundar ani hridaysparshi katha.

    Reply
  • May 19, 2020 at 6:11 pm
    Permalink

    खूपच छान!! एकदम काळाशी सुसंगत…

    Reply
  • May 28, 2020 at 8:00 pm
    Permalink

    Chhan..sadhyachya paristhititali patient chi manasikata ekadam perfect mandali ahe

    Reply
  • May 29, 2020 at 6:56 pm
    Permalink

    छान 👌

    Reply
  • June 2, 2020 at 9:26 am
    Permalink

    Chhan , ya corona kalat ashi vyatha baryach petientchi hot asel.

    Reply
  • July 4, 2020 at 8:36 pm
    Permalink

    मस्त लिहलंय बी आर… जिवंत … 👏👏👏👌👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!