फॅमिली पॅक

हो..
त्याला कंटाळा येत नाही प्रवासाचा.
आवडतो प्रवास.
एकटा.
एकला चलो रे….
लांबच लांब न संपणारा रस्ता.
एकट्यानेच तुडवायचा.
सोबत फक्त स्वतःचीच.
स्वतःशीच नव्याने ओळख करून घ्यायची.
प्रेम करायचं.
भांडायचं.
चुका कबूल करायच्या.
माफ करायचं.
सगळं स्वतःने स्वतःलाच.
सवय झालीये त्याला याची.
हल्ली एकटेपणा बेवफाई करत नाही.
ईमाने ईतबारे सोबत करतो त्याची.
जिंदगी आ रहा हूँ मैं !
दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंतवत तो ,
खिडकीतून बाहेर बघतोय.
गाडी नादमस्त स्वतःच्याच तालात चाललीय.
रूळ सोडून पळायची हिंमत नाही तिच्यात.
बाहेर दिशा थकून जमिनीला टेकलेल्या.
केशरी भंडारा आभाळभर ऊधळलेला.
सांजवेळ…
तो लांबवर बघतो.
अजून अडीच दिवस प्रवास करायचाय त्याला…
पुणे ते कन्याकुमारी.
मी माझा.
फक्त माझाच.
दुसर्या कुणाचा कधीच होवू शकलो नाही.
हाडाचा कलाकार आहे मी.
बोटात जादू आहे माझ्या.
कुंचला हातात धरला की ,
कॅन्व्हासवर मनमोही रंगांची ऊधळण.
चित्र पाहणारा हरवून जातो.
लाखो रूपयांना एक एक चित्र विकलं जातंय.
आयुष्यात रंग नाही भरू शकलो…
जाऊ दे…
मनोमन अस्वस्थ असतो तो.
एखादं मनासारखं चित्र रेखाटलं,
त्यात मनासारखे रंग भरले,
सृजनाच्या प्रसववेदना सोसल्या की अपार समाधान वाटतं.
आपल्याच कलाकृतीच्या प्रेमात पडायला होतं.
तो बहर संपला की…
पुन्हा अस्वस्थ.
नुसती तगमग.
असं काही झालं की तो,
सरळ खांद्यावर सॅक अडकवतो.
दोन चार कपड्यांचे बोळे.
स्केचबुक, पेन्सिल, कलर्स…
मै और मेरी तनहाई..
भटकंती.
त्यात कन्याकुमारी त्याची फेवरीट.
तिथं विवेकानंद राॅकवर जाऊन बसतो.
खारा वारा खात.
तीनही समुद्र नजरेनं पिवून टाकतो.
कागदावर रेखाटतो.
शांत वाटतं एकदम.
जोवर बरं वाटेल तोवर तिथं रहायचं.
नंतर बॅक टू पॅव्हेलीयन.
मुंबईहून दुपारी निघालाय तो.
साडेपाच वाजत आलेत.
पुणं येतंय.
तो साईड बर्थला आहे.
मस्त पाय पसरून बसलाय.
पुणं आलं.
पाच मिनटात गाडी सुटलीय.
भिरभिरती नजर.
बांधणीचा पंजाबी ड्रेस.
लांबसडक काळेभोर केस.
चाफेकळी नाक.
विलक्षण बोलके डोळे.
मृगनयनी.
गौर वर्ण.
चेहर्यावर कमालीचा काॅन्फीडन्स.
त्यातून सहज डोकावणारा अहं.
हरणासारखी डौलदार चाल.
साध्या चालण्यातही थिरकट धा जादू.
सगळं जाम ओळखीचं वाटतंय.
बर्थ नंबर शोधत ती जवळ आली.
अगदी नाकासमोर.
मायक्रोसेकंदात ओळख पटली.
एकदम अवघडल्यासारखं झालं.
तिलाही अन् त्यालाही.
कसा आहेस ?
तिनं एकदम फाॅर्मली विचारलं.
मजेत.
तू कशी आहेस ?
एकदम मजेत.
त्याच्या डोक्यावरचा बर्थ तिचा.
तीनं सामान वर टाकलं.
साॅरी व्यवस्थित रचलं.
त्याच्या समोर येवून बसली.
हातात पुस्तक.
डोक्यावर गाॅगल.
कानात ईअरफोन.
पायात आठवणीनं बरोबर आणलेली स्लीपर.
काहीतरी क्लासिकल ऐकत असेल.
ती सहज पुस्तकात हरवली.
तो रिकामा होता.
तो तिलाच वाचू लागतो.
अजून तशीच आहे.
स्लीम अॅन्ड ट्रीम.
अजूनही तिचे डान्सचे प्रोग्रॅम चालूच असणार.
केसही तसेच.
लांबसडक.
थोडीशी रूपेरी किनार.
अपटू डेट राहणारी.
स्वच्छतेची अतिरेकी आवड.
टापटीप आणि टीपटाॅप.
ती तेव्हा तशी.
आत्ताही तशीच सेम टू सेम.
पुस्तकातून डोकं बाहेर काढून ती हळूच बाहेर डोकावली.
ऊसकी चोरी पकडी गई.
याचं हे नेहमीचंच आहे.
चुक् कुरकुरत तिनं पुस्तक मिटलं.
‘तू बिलकूल बदलला नाहीयेस.
कुर्त्याला ईस्त्री नाहीये.
फ्लोटर्स घालून आलायेस…
बरं जेवायचं काय ?
रेल्वेचा टिफीन चालेल तुला ?
तुझी खायची आवड निवड संपली वाटतं ?’
रेल्वेच्या जेवणाची आॅर्डर घेणार्या माणसाला,
तिनं ऊपाशीच परत पाठवलं.
नऊ वाजले…
तीन वरच्या बॅगमधनं टीफीन बाहेर काढला.
तो मन लावून जेवला.
बोटं चाटून पूसून खायची सवय त्याची.
तिला बिलकूल आवडायची नाही.
आज मात्र राग नाही आला त्याचा.
त्यानं नेहमीसारखं तोंड भरून केलेलं कौतुक.
त्या कौतुकानंच पोट भरलं तिचं.
जेवण झालं.
खरं तर दारापाशी जाऊन धूर काढायचा होता त्याला.
तिला पाठ होतं हे.
किती वेळा नाही म्हणलं..
काहीच फरक नाही पडायचा तेव्हा.
आज मात्र दुसर्या कुठल्याही नशेची गरजच पडली नाही.
त्यानं हळूच तिच्याकडे बघितलं.
तिचे डोळे आश्चर्याने खुदकन् हसले.
थोड्याशा गुदगुल्या झाल्या हार्टला.
दोघांच्याही एकाच वेळी.
काही वेळ ऊगाचच सायलेन्स झोन.
‘चूक तुझीच होती…’
ती एकदम म्हणाली.
‘माझी नाही तुझीच.
आयुष्यभर ईगोला कुरवाळून बसलीस.’
टाईमप्लीज.
टाईमप्लीज म्हणून पुढचा खेळ कंटिन्यू करावा तसं झालेलं.
पंधरा वर्षापूर्चं भांडण.
दोघांनी पुन्हा कंटिन्यू केलं.
आज कुछ मजा नाही आया यार..
वाढत्या वयाचा परिणाम.
पोरकटपणा कमी झालाय.
पेटलेलं भांडण लगेच विझलं.
पहिल्यांदा…
पहिल्यांदा दोघांनी एकमेकांना साॅरी म्हणून टाकलं.
अंधाराच मळभ पुसलं गेलेलं.
पहाट ऊगवलेली.
ते भांडण रात्रभर पुरलं…
खरंच पुरून टाकल आता कायमचं.
शिकवा नही.
पुढचे दोन दिवस.
मजेत गेले.
जुन्या मैत्रासारखे.
नव्याने साक्षात्कार झालेला.
भलेबुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर…
तो वेडापिसा.
त्याच्या चिऊच्या आठवणीनं.
आता मोठ्ठी झाली असेल ना ?
तुझ्यावर गेलीये.
जे जे ला अॅडमीशन घेतलीये.
हातात जादू आहे तिच्याही.
मोराच्या घरात साळुंकीचे पाय घेवून आली.
भरतनाट्यममधलं ओ का ठो कळत नाही.
तरीही…
कौतुकच वाटतं.
तिचं आणि तुझंही.
तो आनंदी ओक्साबोक्शी रडला.
बिगबाॅसच्या घरात राहिल्यासारखं वाटत होतं दोन दिवस.
खूप मिस केलेलं एकमेकांना.
आता मात्र एकमेकांशिवाय…..
त्रिवेंद्रम आलं.
एक ऊंचाडी पोरगी बोगीत शिरली.
तिला कडकडून मिठी मारली.
अन् त्यालाही.
चिऊ.
हुश्शार पोरगी.
तुझा स्टुडन्ट रवि.
माझा फ्रेन्ड आहे.
तु ईकडे चाललायेस हे कळलं…
कसंबसं आईला ईथे अॅडजस्ट केलं.
जुळून येती रेशीमगाठी.
चिऊ , ती आणि तो.
त्रिवेंद्रमच्या प्लॅटफाॅर्मवर भल्ला मोठा सेल्फी घेतला.
आभाळाच्या कॅन्व्हासवर आनंदाचा रंग माईना.
चिऊचा फॅमिली पॅक आज कम्प्लीट झाला.
हॅप्पी फॅमिली डे !
Image by OpenClipart-Vectors from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

5 thoughts on “फॅमिली पॅक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!