चिकणा
“ए चिकण्या , इकडे ये !!
…ये म्हटलं न !” शर्ट च्या बाह्या वर करत , जरब दाखवत रॉजर म्हणाला , तशा सगळ्यांच्या नजरा केविन कडे वळल्या . विन लायब्ररी च्या समोरच्या कट्ट्यावर बसून मोबाईल वर गिटार चे
‘लेसन्स’ घेत होता . रॉजर ची हाक ऐकल्यावर खाली उतरला . आपल्या थोड्या नाजूक , थोड्या लचकत्या चालीने चालत , कपाळावरचे केस मागे सारत पुढे आला .
कॉरिडॉर च्या दोन्ही बाजूला नेहमी सारखीच गर्दी होती . खाली ‘रेड कार्पेट’ अंथरली आहे ,आणि आपण त्यावर खास आमंत्रित म्हणून चालत आहोत अशा थाटात केविन आला .
” व्हॉट अ स्टाईल !! अँजेलीना ज्योली सारखाच चालतोय रे! ” रॉजर च्या ह्या कुत्सित शेऱ्या नंतर एकदम सगळे फुटल्या सारखे हसू लागले .
कुणीतरी ओरडलं ..” हाय तेरी कातील अदा !” आणि मागून फिदीफिदी हास्य आलं .
सगळ्या कडे दुर्लक्ष करत आपल्या खास ‘स्वॅग’ मध्ये केविन रॉजर समोर उभा राहिला . कमरेला झटका देऊन नाटकी आवाजात म्हणाला ,
” बोलो मेरे स्वामी! ” त्याच्या ह्या अभिनयासाठी सगळ्यांनी जोरात ‘हुट’ केलं .
रॉजर जाम चिडला .
” शट अप!!! चूप!! ए केविन , जास्त आवाज नाही करायचा . यु आर अ न्यू बर्ड हीअर ! शिस्तीत रहायचं !”
केविन ने चक्क पाठ फिरवली आणि जातांना त्याला रागात मधलं बोट दाखवलं , तसा रॉजर रागाने बेभान झाला . एका ज्युनिअर , आणि तेही ‘बायल्या’ मुलाने आपला असा अपमान
करावा हे त्याच्यासाठी नवीन होतं .
तो केविन वर चालून जाणार इतक्यात प्रिन्सिपल सर आले , आणि सगळे तिथून पांगले .
नंतर त्या दिवशी रॉजर ला केविन कुठे दिसलाच नाही .
**** ” सॉलिड उतरवलीस हं तू त्याची ! आवडलं आपल्याला .” कॉफ़ी चा मग त्याच्या हातात देत , एक खुर्ची ओढत किथ म्हणाली .
” तुझ्यामुळे ग बाई ! तूच शिकवलस . नाहीतर माझी एव्हढी हिम्मत? “
किथ फक्त हसली.
पाच फूट सात इंच उंची , केसांचा बॉय कट ,
रिप्ड जीन्स , बकल बुट्स अशा वेशातील बिनधास्त फिरणारी किथ ऍडमिशन च्या वेळी केविन ला पहिल्यांदा भेटली होती .
डॅशिंग आणि बेफिकीर मुलगी एकदम आवडली केविनला . त्यांची फार पटकन मैत्री झाली .
त्या नंतर ते बऱ्याचदा भेटले होते , पण केविन मधील ‘फेमिनाईन’ वैशिठ्या बद्दल तिने चुकूनही उल्लेख केला नव्हता …
” हा रॉजर तुला इतका कसा काय वचकून असतो ग ?”
” अरे मला पण त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला होता . बूट काढून नंगेपाव पूर्ण कॅम्पस ला बाहेरून चक्कर मार म्हणे . ” कॉफी चा घोट घेत किथ म्हणाली .
” मग ? मारली चक्कर ?”
” पागल आहेस का ? मध्ये एक अंडर ग्राउंड रस्ता आल्याने पाच की.मी चा फेरा पडतो . त्याला म्हटलं दुसरं काही ‘टास्क’ सांग , ते करते , तर दादागिरी करायला लागला …. मग दिल्या दोन चार ठेवून! सा s ला ! प्रिन्सि ला सांगायची धमकी पण दिली , तेव्हा थोडा सरळ झाला .”
” मी नाही न असं ठेऊन देऊ शकत . तुला तर महीतेय न माझा प्रॉब्लेम ….”
” कम ऑन केविन!! जर मी लढू शकते तर तू का नाही ?….तुला तुझ्या शारीरिक आणि मानसिक ठेवणीला पूर्णपणे स्वीकारूनच जगावे लागेल केविन . त्याच्या आड लपून आपल्या दुबळेपणावर पांघरूण घालणं बंद कर! ”
“मग मी काय करू?”
“रड ! भीक माग!….काय न केविन, तुझ्यातील ताकद तुलाच ओळखावी लागेल . तुला लोक तुडवून निघून जातील इतका दुबळा राहू नकोस . जे बदलता येत नाही , त्यात गुंतून न राहता जे तू घडवून आणू शकतोस ते बघ ! ” कॉफीचे आपल्या हिश्श्याचे पैसे टेबलावर ठेवून ती तरातरा निघून गेली .
त्याच्या मनात तिचे शब्द घुमत राहिले …..’जे बदलता येत नाही त्यात गुंतून न रहाता’ ….
नेमकं काय बदलता येणार नाहीये?
आतली उर्मी ?
कोण आहोत आपण ? हे सतत काय धुमसत असतं आतून ? नुकताच शाळेत जायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा जाणवलं होतं .
नाटकासाठी कपडे येऊन पडले तर राजकुमारी चा झगा घालून बसलो होतो आपण .
नंतर घरात रेश्मा दिदीच्या हिल्स घालून फिरत असतांना आईने हटकले होते ..
केस वाढवून पोनी बांधायला आवडायचं . मुलींसारखं रहावं वाटे
नेहमी ….
ब्रेक डान्स पेक्षा स्त्री वेशात लावणी करायला आवडू लागलं .
पण क्लास लावून जबरदस्ती ‘हिप हॉप’ शिकलो .
घरात कुणाजवळ बोलून दाखवायची चोरी ….लहानपणी तर निभावलं , पण मोठं झाल्यावर चर्चा होऊ लागली . इतरांचं जाऊ देत ,
आई , दादा पण टोचून बोलू लागले .
कुमार वयापर्यंत
आत्मविश्वास पार चुरडून गेला होता .
जीव कोंडायचा …अजूनही घुसमट होते …त्यात हे रॉजर सारखे लोक छळतात . काही मुलं आडून आडून विचारतात , की ‘आतून’ मी कोण आहे?
भ*** ना सरळ विचारायची नियत नाही …
म्हणूनच किथ सोबत रहायला आवडतं . मोकळा विचार अन सरळ सरळ स्वीकार ..
आता केविन बऱ्यापैकी रुळला होता , पण त्याच्यातील दडलेल्या स्त्री विषयी आता सगळ्या विद्यापीठाला समजलं होतं . घाणेरडी शेरेबाजी , सूचक पुढाकार , विनय भंगाचे प्रयत्न ह्याला तोंड देत त्याचं शिक्षण सुरू होतं . पैसे पाठवण्या पलीकडे घरचे लक्ष घालत नव्हते .
मनाने थकलेल्या केविन चं आणखी एक आश्रय स्थान म्हणजे त्याची आणि किथ ची घर मालकीण
ग्रॅनी डेझी . एक विद्वान ,बंडखोर आधुनिक , आणि धडाडीचं व्यक्तिमत्त्व होतं . सिटी हेराल्ड च्या संपादक म्हणून हेराल्ड चा खप शिगेवर नेण्यात डेझी ग्रॅनीचा मोठा वाटा होता . कुठल्याही विषयावर ग्रॅनी , केविन आणि किथ खुली चर्चा करत . ग्रॅनी नेच आग्रहाने त्याची हार्मोन टेस्ट , आणि इतर तपासण्या साठी क्लिनिक मध्ये नेऊन आणले होते .
” हे , किथ ! कोंगो मॅन ! तुझे रिपोर्ट कूल आहेत सगळे …ग्रॅनी सांगत होती …. सो ?….”
” Nothing new !! ते तर वयाच्या सोळाव्या वर्षीच समजलं होतं ग मला! “
मग त्यांनी
‘एफिमिनीझम’ , त्याचे परिणाम आणि त्याच्यातील आंतरिक द्वंद्व ह्या बद्दल सविस्तर चर्चा केली .
किथ आणि ग्रॅनी खूप काळजीत पडल्या होत्या . केविन अजून आला नव्हता . त्याची टर्म एन्ड झाली होती , पेपर्स पण छान गेले होते , मग इतक्या रात्री तो काय करत असेल ही काळजी होती .
मध्यरात्री केविन आला . खूप विमनस्क आणि घाबरलेला होता . ग्रॅनी ने दार उघडल्या बरोबर आत येऊन तो कॉट वर कोसळला .
मला मारून टाका , मला जगायचं नाही , ते *** मला खूप छळतात …असं ओरडत होता .
त्याचं हे असं केविलवाणं रूप किथ ला सहनच झालं नाही . ती त्वेषात उठली , त्याचं बखोटं पकडलं , आणि दोन तीन मुस्काटात ठेवून दिल्या .
” भेकड साला !! पुरुषाला सारखा पुरुष असून इतका नेभळट कसा रे तू ?
कुणीही **** येऊन तुझ्या पॅन्ट शी खेळावं , आणि तू बोंबलत घरी यावं का? “
” कारण मी मनाने स्त्री आहे !!!” तो किंचाळला .
” इनफ !! मग भरती हो डॉ. झायमन कडे , आणि सर्जरी करवून घे !! पूर्ण बदलवून टाक स्वतःला मी करते तुला मदत ! “
” इतकं सोपं वाटलं का तुला?
खेळ वाटला का ? माझं पूर्ण सेकंड इयर जाईल त्याच्यात ! तुला काय माहीत मी काय सहन करतोय ते?….”
केविन काय काय बोलत होता , आणि किथ संतापून आत निघून गेली होती .
“ग्रॅनी , मला नाही रहायचं इथे . मला वाटलं होतं ही मला खरंच समजून घेऊ शकते .”
ग्रॅनी आवेशात म्हणाली ,
” हो !! हो !! घेऊच शकते , कारण ती स्वतः आधी एक पुरुष होती !! निग्रहाने ट्रान्सफॉर्मेशन करवून घेतलं . पूर्ण तीन वर्ष जगापासून लपून राहिली होती , आणि स्मिथ ची किथ झाली ती . एक सुंदर आणि एकदम कणखर स्त्री ! “
केविन साठी हा फार मोठा धक्का होता . किथ ? ..त्याने डोळे पुसले . आपण किथ ला खूप दुखावलं ह्याची जाणीव होऊन तो आवेगात आत गेला .
…किथ पाठमोरी बसली होती …तो सावकाश पुढे सरकला … आणि हळूच
किथच्या पायाशी जाऊन बसला .
त्याच्या केसातून हात फिरवत ती हसून म्हणाली ,
” मग आता नवीन नाव काय ठेवायचं तुझं ? विनी?
आणि सांगून ठेवते ग्रॅनी , माझा स्कर्ट मी हिला बिलकुल देणार नाही हं! ”
ग्रॅनी दारात उभी राहून किथ विनी कडे भरल्या नजरेने बघत होती .
Image by Gerd Altmann from Pixabay
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
आजकाल हा विषय चर्चेत घेणे आवश्यक
धन्यवाद
खूपच सुंदर😊😊
थँक्स
Navin subject Chan mandala
धन्यवाद
नवीन विषय वाचायला मिळाला