पिठलं भात ……
किचन मधून भांड्यांचा खडखडाट ऐकू येत होता.
आवाज जरा जास्तच होता, …….
आज संध्याकाळ पर्यंत मॅटर सेटल व्हायला हवं, नाहीतर दूध ब्रेड खाऊन झोपायला लागणार होतं. लॉकडाऊन मुळं….. कसल्याही ……. पार्सलची सोय नव्हतीच.
फार काही नाही, सासुरवाडीच्या लोकांचा बुद्धयांक मोजून दाखवायची माझी जुनी खोड बहुधा नडली होती. तिकडच्या कुणाची तरी अक्कल काढली की हवेतलं तापमान वाढायला लागतं. अशी रणांगणासारखी आदळ आपट सुरू झाली, की किचन परिक्षेत्रात न जाण्याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा, लाटणं किंवा उलथणे यापैकी कुठल्या अस्त्राच्या परिक्षेपात तुम्ही याल हे सांगता येत नाही.
मुलं मात्र अशावेळी, अलिप्तवादी संघटनेत असतात.
डोळे टीव्हीतल्या लायन किंग वर ठेवून फारतर कान किचन मधल्या आखाती देशांवर ठेवतात. मध्यमवर्गीय माणसांनी, सकाळची न्याहारी उरकून, भरल्या पोटी, आखाती रणकंदनाच्या बातम्या पारावर बसून जितक्या तटस्थपणे वाचाव्यात, ती तऱ्हा मुलांची. काहीही संबंध नसल्यासारखे वागतात. एखादी वाचवणारी साक्षही द्यायला कानाडोळा करतात. “तुमचं तुम्ही पाहून घ्या….” अशा निर्विकारपणे वावरत असतात.
तशाही परिस्थितीत जेवणाची तयारी सुरू होते. लॉकडाउनच्या काळात, भाज्यांच्या कमतरतेमुळे, पिठलं किचनमध्ये रटरटत असतं.
त्यातल्या मिरचीला कडक तेलात ढकलून माझ्या वरचा राग काढला जातो. मिर्चीचाही इगो दुखावला जातो. मग काय, मिरचीच ती, अख्खा घराला ठसका देऊन जाते. पण बसल्या बसल्या पिठलं भाताच्या कल्पनेनं आपल्या पोटातला ज्वालामुखीही खदखदायला लागतो. आणि मी तुझ्या हातचं जेवणार नाही हे मनातले निश्चय मनालाही न सांगता परस्पर डिलीट करावे लागतात. हळूहळू आपली परिस्थिती, विकसनशील देशांपेक्षा खालावणार असते. आधी आपण अमेरिकी तोऱ्यात असतो, ……. पण जसजशा किचन मधल्या फोडण्या आपला दरवळ घेऊन नासिका प्रवेश करतात, …… तसतशी आपली परिस्थिती म्यानमार, बांगलादेश किंवा कुठल्यातरी आफ्रिकी अविकसित राष्ट्रासारखी होत जाते.
नमतं धोरण स्वीकारून आपण आपलं पाकिस्तानसारखं कोडगं होत युनोच्या सभेला जाऊन बसावं, अगदी तसं मी डायनिंग टेबलवर जाऊन बसतो. आतल्या भांड्यांच्या धुमश्चक्रीत अन तिच्या बडबडीच्या वावटळीतही पिठल्याचा सुवास म्हणजे, युद्धाच्या ऐन धामधुमीत वॉकी टॉकी वर तलतची गझल लागण्यासारखं होतंं.
मला माझेे परराष्ट्रीय संबंध सुधारायचे असतात. मी लहान राजदूताची नेमणूक करतो. तो लहान राजदूत नुकताच, बोबडकांदे पदावरून चटपटीत कांदे पदावर प्रमोट झालेला असतो. होतकरू असतो. पण हा चोम्बडा कांदा, पढवलेलं बोलत नाही.
“आई, बहुतेक बाबांना भूक लागलीय, सारखे विचारतायेत, किचनचा अंदाज घे, किचनमध्ये काय चाललंय बघ.”
“त्यांना म्हणावं, तुम्ही तर माझ्या हातचं जेवणार नाहीत, तेव्हा तुमचं जेवण नाही बनवलं…… आणि परत चोम्बडेगिरी करत आलीस तर खबरदार ! तुझं तंगडं देईन हातात.” तिकडून पुन्हा रॉकेट बंबार्ड होतं. लहान राजदूत धूम पळतो. आल्यावर असा काही लूक देतो, की जणू काही मी तिचा मतदारसंघ पळवलेला असतो. मी आता डबल गिल्ट मध्ये सापडतो.
हळूहळू एक एक किचनमधलं भांड डायनिंग टेबलवर येऊ लागतं. मला टेबलावर पाहून, प्रत्येक भांड्याचं गुरुत्वाकर्षण अचानक वाढतं , आणि त्यांचं लँडिंग टेबलवर आदळून होत राहातं. किमानपक्षी, पोषणाहार योजने अंतर्गत तरी, काही भरणपोषण होईल अशी आशा असताना, तीनच ताटे वाढायला घेतली जातात. आता मात्र डोक्यात तिडीक जाते. व्हेटोचे अधिकार तर सोडाच, भर परिषदेत, समोरून माईकही काढून घेण्यात यावा अशी परिस्थिती झालेली असते. तरीही, ‘आपल्याला काही फरक पडत नाही……’ असा आव आणत, सकाळी वाचलेल्या बातम्या मी पुन्हा वाचायला घेतो. त्याही बहुधा पुन्हा मला पाहून नाक मुरडतात. पण अपमान टाळण्यासाठी, वर्तमानपत्र बरं असतं.
इतक्यात, वर्तमानपत्रामागे, ताटाचा आवाज येतो, ……. कुणीतरी वाढत असल्याचाही भास होतो ….. समोर पिठलं भात, पोटात भूक, अशा स्थितीत, भास होणारच, ….. सहाजिक होतं ते. पण समोरच्या बातम्यांमागे खरंच काहीतरी घडत होतं. ऐनवेळी पेपरमध्ये होल करणं शक्य नसतं. शेवटी, समोरच्या बातम्यांमागचं सत्य, मी पेपर दूर करून पाहतोच.
माझी लेक, ……. मघाचा चोम्बडा राजदूत, …… माझ्यासाठी, ताट घेऊन आला होता. भात वाढला होता, आता पिठलं वाढायची धडपड चालली होती.
“अगं आईला विचारलंस का ?” मी आपला शहाजोगपणा दाखवत म्हणालो.
“वाढू द्या, वाढू द्या, ……. त्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही, …….. लेकीची माया …….. काय असते ते.”
हे वाक्य बोलताना, शब्दागणिक, ….. मघाच्या तोफेचा आवाज, गहिवरत जातो, अन भरवलेल्या घासासोबत रागही विरघळत जातो.
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
लै भारी!👌👌 साधं भांडण पण किती मस्त विवेचन!😅
धन्यवाद
खूपच सुंदर …..लेकीची माया अतुल्य
खरंय
Sadha ani sunder Pithala
धन्यवाद
Masta😄
Thanks
हा हा हा 😂😂 किती सुरेख वर्णन केलंत छोट्याशा प्रसंगाचं. पोट भरल्यावर आमच्या वहिनीची समजूत तुम्ही काढली असेलच तरीही एक युक्ती सांगते, “अगं, तू जेवलीस का?” असं हळूच गोड आवाजात विचारायचं की राग पळालाच म्हणून समजा. अहो फार काही अपेक्षा नसतात आम्हा बायकांच्या 😀
युक्तीसाठी धन्यवाद🙏
Khup sundar lihilay
मिरचीचा अहंकार 😊😊👍👍
आवडलं हे पिठलं
अहाहा… फारच सुरेख….साध पीठल भात पण फारच चविष्ट करून गेलात…मस्तच…..
फारच सुरेख
Khup chan
धन्यवाद 🙏
😅😃👍
चोम्बडा कांदा पण भारी
Sansaratil Lutuputu che bhandan…….agdi surekh…….varnan keley……..Hasu pan khupp ale…..mast
Ek number lekhan