रिले कथा- लॉकडाऊन… अनलॉक नव्या आयुष्याचा- भाग ३

भाग – ३

सखामामाने ऑफिसचा सेट अप अगदी सुंदर तयार करून दिला होता. गार वाऱ्याची झुळूक, पाखरांचा किलबिलाट आणि सभोवतालचं हिरवेगार शेत अशा वातावरणात अगदी प्रसन्न मनाने समीर काम करत होता. नेटचा स्पीड तुलनेने कमी असला तरी त्यामध्ये समीर आणि मुख्य म्हणजे त्याचा मॅनेजर अॅडजस्ट करत होता. व्हिडिओ मिटिंगच्या वेळी तर सगळेजण समीरचा हेवा करत असत.

“समीर लकी यार, बरं झालं अडकलास तिकडे. नाहीतर अशा सुंदर वातावरणात काम करण्याचं सुख तुला मिळालं नसतं. टेन्शन घेऊ नकोस मी घेईन सांभाळून”, खुद्द मॅनेजरच असं म्हणल्यावर समीर आश्वस्त झाला.

गावाकडे मात्र एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. गावाने आपल्या सीमा बंद केल्या होत्या. लॉकडाऊनचे सगळे नियम गावकरी काटेकोरपणे पाळत होते. ऑफिसच्या कामाचे कॉल, मिटिंग्ज ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे होतच होत्या.  पण त्याव्यतिरिक्तही सगळेजण समीरला व्हिडीओ कॉल करत असत. आत्तापर्यत व्हिडिओ कॉलवरून समीरने त्यांना घर, शेत, आंब्याची बाग, इतकंच काय तर पाण्याच्या विहिरीही दाखवल्या होत्या.

बघता बघता पंधरा दिवस होत आले. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली होती. परिस्थिती अधिकच भीषण होत चालली होती. एकंदरीत दुसरा लॉक डाऊन डिक्लेअर होणार आणि आपण अजून काही दिवस इथेच अडकणार या विचाराने समीरच्या मनाचा ताबा घेतला आणि तो पुन्हा अस्वस्थ झाला.

मनाच्या अवस्थेचा परिणाम कामावर होऊ लागला. आणि एक दिवस तो ओठांवर आलाच. ऑफिस मीटिंगमध्ये त्याने हे बोलून दाखवले.

“समीर उलट तू तिकडे जास्त सुरक्षित आहेस. उलट मी तर म्हणतोय शक्य असेल तर वहिनी आणि लेकाला पण तिकडे न्यायची व्यवस्था कर”, ऑफिसमधली सहकारी स्पृहा म्हणाली.

“स्पृहा म्हणतेय ते खरं आहे समीर. मी तुझी अवस्था समजू शकतो, पण इकडची परिस्थिती कठीण आहे आणि दिवसेंदिवस भयानक होत जाणार आहे. आणि तू काळजी करू नकोस जॉनशी बोलणं झालं आहे माझं, त्यानेही ग्रीन सिग्नल दिला आहे. तुझा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, त्या जीवावर सगळे तारुन नेशील तू. अरे जागतिक समस्या आहे ही. जॉन सांगत होता अमेरिकेत तर खूपच कठीण परिस्थिती आहे, त्यामुळे त्यालाही परिस्थितीचा अंदाज असेलच”, समीरच्या मॅनेजरने त्याला समजावले.

समीर बरोबर अजून एक व्यक्ती अस्वस्थ होत होती ती म्हणजे समीरची वहिनी मधुरा. किती झालं तरी इतक्या वर्षात ४/८ दिवसांसाठी येणारा समीर आता अनिश्चित काळासाठी इथे राहणार हे तिच्या लक्षात आलं होतं. “टू इज अ कंपनी बट थ्री इज अ क्राउड” तिच्या संसारात तिला तिसऱ्या व्यक्तीची अडगळ वाटू लागली होती. त्याची हुशारी, त्याचं स्टेटस, सासू सासऱ्यांकडून सतत त्याचं होणारं कौतुक, याबद्दल तिला पुसटशी असूया वाटू लागली होती.

समीरला हे सगळं जाणवत होतं. सौम्याशी या विषयावर बोलून नवीन वाद ओढवून घ्यायचा मूर्खपणा तो नक्कीच करणार नव्हता. आई बाबांना दुखवायचं नव्हतं, तर मिहिरशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. अखेर त्याने आपल्या मनाची घालमेल आपल्या मित्राला दिनेशला सांगितली.

“समीर, तू का डिस्टर्ब होतोयस? अरे ते घर तुझं पण आहे. आजपर्यंत तू काय कमी केलंस का आई बाबा आणि भावाच्या कुटुंबासाठी. एक लक्षात ठेव तू तुझ्या हक्काच्या घरात आहेस. तिथे तुला ऑकवर्ड वाटायची काहीच गरज नाही. मनापासून सांगायचं ना तर, मी तुझ्या जागी असतो ना, तर हे गाव सोडून कधीच मुंबईला आलो नसतो. अरे काय आहे इकडे गर्दी, चिकचिकाट, टेन्शन. खरं सुख गावातच आहे रे. कदाचित तुला नाही आवडणार पण तुझ्याकडे सोन्यासारखी जमीन आहे. रीतसर वाटण्या करून घे आणि सोनं पिकव तिकडे. अजून किती वर्ष तू त्या विदेशी टकल्याला प्रेमाने,  ‘जॉन अॅम आय ऑडीबल..’, विचारत त्याने दिलेल्या डेडलाईन फॉलो करत राहणार आहेस? लोकांना आयटीचा पगार दिसतो पण प्रेशर नाही. बघ हीच वेळ आहे विचार करायची. आत्ता लगेच नाही पण पोरगा इंजिनिअर झाल्यावर कॅम्पसमधून मुंबई बाहेर गेल्यावर तू गावात परतायचा निर्णय घेऊच शकतोस.

माझा मेव्हणा अक्षय शेतीतज्ञ आहे.तुला हवं तर जमिनीचे सगळे डिटेल्स पाठव मला त्याच्याशी बोलतो मी. अरे या एसीच्या कृत्रिम हवेपेक्षा नैसर्गिक वाऱ्यावर काम करत लाखो रुपये मिळवशील तू. साल्या तेव्हा इंजिनिअरिंग करण्याऐवजी अॅग्रीकल्चरला गेला असतास तर आज करोडपती झाला असतास. मी हे सगळं अगदी मनापासून बोलतोय. सध्याच्या परिस्थितीत आम्ही इकडे कसं जगतोय ते आमचं आम्हाला माहिती. कामवाली नाही, दुधासाठी रांग, भाजी आठवड्यातून दोनदा, किराणा यादी सोसायटीने ठरवलेल्या माणसालाच द्यायची, तो देईल त्या ब्रॅंडचा माल घ्यायचा.. सम्या लेका सुटलास तू या सगळ्यातून. मुंबईत असतास तर, भांडी घासावी लागली असती घरी. तुझ्याकडे बघितलं की वाटतं, ‘साला आपली पण गावाकडे जमीन वगैरे असती तर, नोकरीवर लाथ मारून गावी जाऊन राहिलो असतो. “

दिनेशचा फोन झाल्यावर नाही म्हटलं तरी नकळतपणे समीर त्याच्या बोलण्याचा विचार करू लागला होता. त्यालाही इथली जीवनशैली आवडायला लागली होती. मुंबईतून एकदम इकडे येऊन राहणं कठीण असलं तरी अशक्य नव्हतं. मुख्य म्हणजे उतारवयात दगदगीचं आयुष्य जगण्यापेक्षा इथे राहून निवांत आयुष्य जगणं केव्हाही चांगलं. पण हे सारं जमेल? मनूचं ठीक आहे, तो इंजिनिअरिंग झाल्यावर एक तर एम.एस. करायला बाहेर जाईल किंवा कॅम्पसमधून सिलेक्ट होऊन नोकरी करेल, त्याचं स्वतःचं वेगळं आयुष्य सुरू होईल. आणि सौम्याचं काय? एकवेळ नोकरी सोडेल ती, पण मुंबईतल्या घरातल्या सगळ्या सुविधा इथे दिल्या तरी ती इथे अॅडजस्ट होऊ शकेल का? मुळात ती इथे यायला तरी तयार होईल का? सौम्याचं जाऊदे, माझं काय? एसी ऑफिसमध्ये बसून सोमवार ते शुक्रवार मरमर करायची आणि वीकेंडला आऊटिंग, मुव्ही, शॉपिंग अगदीच काही नाही तर, दिवसभर घरात लोळत पडायचं आणि जेवण बाहेरून ऑर्डर करायचं, अशा सुखासीन आयुष्याची सवय झाल्यावर उन्हातान्हात, मातीत काम करणं जमेल मला? मुंबईमध्ये गर्दी आहे, धावपळ आहे पण तिथल्या झगमगाट हरवून गेलोय मी. पुन्हा या गावातल्या सध्या सरळ लाईफ स्टाईलशी जुळवून घेऊ शकेल का मी?  एक ना अनेक प्रश्न त्याच्याभोवती पिंगा घालू लागले.

– मानसी जोशी

Image by mohamed Hassan from Pixabay

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!