रिले कथा- लॉकडाऊन… अनलॉक नव्या आयुष्याचा- भाग ५

भाग ५

सौम्याने फोन ठेवला आणि ती विचारात पडली. समीरच्या बोलण्यावरून त्याच्या डोक्यात काहीतरी शिजतंय याची कुणकुण तिला लागली होती. गेली वीस वर्षे ओळखत होती ती समीरला त्याच्याकडे बघून किंवा त्याच्या आवाजावरून त्याच्या मनाची स्थिती ती ओळखू शकत होती.

समीर खरोखरच तिकडे जाऊन राहायचा विचार करत असेल तर? अचानक काय झालं याला? आई बाबांनी काही डोक्यात भरवून तर दिलं नसेल? नाही पण समीर असा अविचार करणार नाही आणि कोणीतरी सांगतंय म्हणून तर नाहीच नाही म्हणजे जे काही आहे ते त्याच्याच डोक्यातले विचार आहेत. हे सगळं आत्ता उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आहे की अजून काही?

कोरोनाची फेज ही  टेम्पररी फेज आहे. एकदा का यावरची लस सापडली की सगळं सुरळीत होईल, पहिल्यासारखं!

पहिल्यासारखं?? पहिल्यासारखं  म्हणजे पुन्हा गर्दी, ट्रॅफिक, तुडुंब भरलेल्या ट्रेन्स, उशीर… फक्त हे सगळंच का येतंय डोळ्यासमोर? म्हणजे इतके दिवस आपण जगत होतो ते खरंच सुरळीत आयुष्य होतं? इथे मुंबईमध्ये घरातून बाहेर पडलेला माणूस सुखरूप घरी येईल याची अजिबात शाश्वती नसते. रोजची धावपळ, दगदग आणि वीकेंडला काय तर एखादा मुव्ही, मॉल नाहीतर घरातच लोळत पडायचं. तिकडे गेल्यावर समीरला या साऱ्याची जाणीव झाली असेल. इथे दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहून चौकटीत जगण्यापेक्षा तिकडंच बाहेरचं मोकळं जग अनुभवणं त्याला सुखद वाटत असेल, तर त्यात जगावेगळं काहीच नाही. तसंही ते त्याचं घर आहे, त्याचं बालपण गेलंय त्या घरात. इतक्या वर्षांनी त्याला तिकडे भरपूर दिवस राहायची संधी मिळाली आहे, साहजिकच त्याच्या मनात तिथेच राहावं असा विचार येऊच शकतो.

समीर खरोखरच तिकडे राहायचा विचार करत असेल की मला उगाचच तसं वाटतंय. पण खरोखर समीरने तिकडे रहायचा विचार केला तर, मनू तर नक्की येणार नाही तिकडे आणि हे त्याला पक्कं ठाऊक असणार आहे.  पण माझं काय? मला ग्राह्य धरलं का त्याने? की नेहमीसारखं आत्ताही मला कनव्हीन्स करू शकेल याची खात्री आहे त्याला. मला काय वाटतंय? मी या निर्णयामध्ये समीरला साथ देऊ शकेन?

गावाकडे राहायला न आवडण्यासारखं काहीच नाही. पण तिकडे राहावंसं वाटावं असंही काही नाही. लग्नानंतर गावातून मुंबईत आले तेव्हा हे शहर अगदी अनोळखी होतं माझ्यासाठी. पण हळूहळू इथे रुळले, ही माझी कर्मभूमी आहे. गावातल्या लाजऱ्या बुजाऱ्या मुलीला जगण्याचा, कमावण्याचा आत्मविश्वास या शहराने दिला. ही माझी कर्मभूमी आहे. पै पै साठवून हे घर उभं केलं आम्ही, इथला प्रत्येक कोपरा अगदी मनापासून सजवला मी, हे सगळं सोडून तिकडे जाऊन राहणं जमेल मला? गणपतीत आणि मे महिन्यात असं मिळून वर्षभरातले जेमतेम पंधरा दिवस राहत असेन मी तिथे. त्यातही मधुराची नाराजी एकदातरी सहन करावी लागतेच. तिला उगाचच वाटतं मी माझ्या नोकरीचा, स्टेटसचा टेम्भा मिरवते म्हणून. बोलली नाही तरी वागण्यातून कळतंच. आईदेखील किचनमध्ये फारसं काही करू देत नाहीत मला. अशा परिस्थितीत आम्ही तिकडे रहायचा निर्णय घेतला, तर त्या घरात तरी रुचेल का सगळ्यांना?

“आई…. अग किती हाका मारतोय लक्ष कुठाय तुझं?” मनू

“सॉरी मी जरा… जाऊ दे काय झालं? कशाला हाक मारत होतास? सौम्या.

“काही नाही ते आपलं… ते जाऊ दे तू एवढी टेन्स का दिसतेयस? सगळं ठीक आहे ना? तू बरी आहेस ना? आणि बाबा ठीक आहेत ना?” मनू.

“सगळं ठीक आहे रे. बाबा म्हणत होते, ‘मुंबईमधून गावी जायला पास मिळायला लागलाय, तुम्ही दोघं पण या इकडे. तिथल्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे इकडे’, यावरच विचार करत होते.” सौम्या.

“गावी जायचं? आत्ता? म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही पण तुला जमेल का? तिकडे राहून ऑफिसचं काम मॅनेज करू शकशील का तू?” मनू.

“ऑफिसचं काम या चार/ पाच दिवसांत संपेल.  नवीन प्रोजेक्ट मिळेपर्यंत तसं निवांतच असेल, तसंही सध्या नवीन प्रोजेक्ट मिळण्याचे चान्सेस जवळपास शून्यच आहेत. त्यामुळे तो प्रश्न नाही. ” सौम्या.

“कुल!! देन वी कॅन गो. मला आवडेल उलट तिकडे. तसंही बाबा ऑफिसचं काम करतायत म्हणजे नेट फुलटू मिळत असेल. किमान बाहेर फिरता तरी येईल तिथे. इथे घरात बसून जाम बोअर झालंय. तिकडे शौर्य असेल त्यामुळे वेळ पण चांगला जाईल. विहिरीत पोहता येईल घरचं लोणी, आजीच्या हातची मऊ लुसलुशीत भाकरी, वा!! जाऊया आपण तिकडे आई” मनू.

मनूचं बोलणं ऐकून सौम्याला बरं वाटलं किमान हा मुलगा गावाचा तिरस्कार तरी करत नाही उलट त्याला गाव आवडतंय तिकडची ओढ वाटतेय या जाणिवेमुळे सौम्याला डोक्यावरचं एक ओझं उतरल्यासारखं वाटलं.

“बरं ठीक आहे तू लगेच ऑनलाईन पास साठी प्रयत्न सुरू कर मी लगेच सामान आवरायला घेते. आपले तिघांचेही लॅपटॉप नेऊया. आणि उद्या सकाळी जाऊन गाडीत पेट्रोल भरून आणायला हवं. टाकी फुल करायला हवी म्हणजे वाटेत थांबायचा प्रश्न येणार नाही. पास मिळाल्यावर शक्यतो सकाळीच लवकरच निघू म्हणजे उन्हाचा जास्त त्रास होणार नाही.” सौम्या.

मनू गावाला जायच्या निर्णयामुळे खुश झाला होताच पण  यामागे अजून एक कारण होतं, ते म्हणजे निकिता! कोकणात कधीही न गेलेल्या निकीताला तिकडच्या खाण्याची आवड होतीच पण एकूणच तिकडच्या संस्कृती बद्दल मनात  प्रचंड उत्सुकता होती.

तिकडे गेल्यावर घर, बाग, गोठा, विहिरी अशा या ना त्या कारणाने निकिताला व्हिडीओ कॉल करता येतील, तिला फोटो पाठवून तिच्याशी बोलायची संधी मिळेल, या विचाराने मनू अजूनच सुखावला. तर, तिकडे गेल्यावर आपल्यासमोर काय वाढून ठेवलेलं असेल या काळजीत सौम्याने सुस्कारा सोडला.

फोन करून सौम्याने आपण तिकडे येत असल्याचा निर्णय कळवला आणि बोलताना मुद्दाम, “सगळं स्थिरस्थावर झाल्यावर आपली गाडी असली म्हणजे आपल्याला लगेच निघता येईल, असं म्हणून आपल्या मनात कुठेही तिथेच कायमचं राहण्याचा विचारही नाही हे स्पष्ट केलं.

समीर खुश झाला होता. त्याचं अर्ध काम झालं होतं. त्याला आपला निर्णय सौम्यावर लादायचा नव्हता. सौम्यावर त्याचं मनापासून प्रेम होतं. तिने नकार दिला तर तो या निर्णयाचा आग्रह तिला करणार नव्हताच उलट हा निर्णय बदलायचीही त्याची तयारी होती. म्हणूनच तिने या निर्णयाला होकार देण्यापेक्षा तिने हा निर्णय मनापासून स्वीकारणं त्याच्यासाठी जास्त महत्वाचं होतं. सौम्याला आपला मुद्दा पटवून देणं त्याच्यासाठी कठीण नव्हतं, पण सौम्याने केवळ मनाने नाही, तर बुद्धीनेही आपला निर्णय स्वीकारणं, हे सर्वात मोठं आव्हान त्याच्यासमोर होतं.

– मानसी जोशी

Image by mohamed Hassan from Pixabay

Image by mohamed Hassan from Pixabay

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

2 thoughts on “रिले कथा- लॉकडाऊन… अनलॉक नव्या आयुष्याचा- भाग ५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!